नवलकोल: (हिं. गाठ गोभी इं. नोलखोल, कोलराबी लॅ. ब्रॅसिका ओलेरॅसिया प्रकार कॉलोरॅपा कुल-क्रुसिफेरी). ही ओषधीय [→ ओषधि] वनस्पती मूळची उत्तर यूरोपातील आहे, पण आता तिचा सर्वत्र प्रसार झाला आहे. ⇨ सलगमपेक्षा ही उष्ण हवेत चांगली येते. कोलराबी हे नाव जर्मन भाषेतील असून त्याचा अर्थ ‘कॅबेज–टर्निप’ म्हणजे सलगमसारखी चव व आकार असलेला कॅबेज असा आहे [→ कोबी].

नवलकोलाची शारीरिक लक्षणे सामान्यतः ⇨ क्रुसिफेरी कुलात (मोहरी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. खोड (म्हणजेच गड्डा) जाड, गोलाकार (८ ते १२ सेंमी. व्यास), मांसल पाने साधी, मोठी, लांब देठाची, पांढरट, जाड व तळाशी रुंदट असतात.

क्षीरसागर, ब. ग.

नवलकोल हे भाजीचे पीक असून वनस्पतीच्या खोडाचा जमिनीवरील तंतुमय नसलेला फुगीर गोल भाग (गड्डा) भाजीसाठी वापरतात. भारतात या पिकाची लागवड विशेषेकरून महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब व आसाम येथे होते. महाराष्ट्रात ती नाशिक, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांत जास्त प्रमाणावर आहे. व्हाइट व्हिएन्ना व अर्ली व्हाइट हे प्रकार हळवे (लवकर तयार होणारे) आणि पर्पल व्हिएन्ना हा गरवा (उशीरा तयार होणारा) प्रकार आहे. व्हाइट व्हिएन्ना या प्रकाराचे बी नवी दिल्ली येथील इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमधून पुरविण्यात येते. या प्रकाराचा आतील गर मलईच्या रंगाचा, लुसलुशीत व चवदार असतो. या प्रकाराचे नवलकोल (गड्डे) बाहेरून पांढरट हिरव्या रंगाचे असतात. पर्पल व्हिएन्नाचे नवलकोल जांभळट रंगाचे असतात.

नवलकोलाच्या बाबतीत जमीन, मशागत, खत, हंगाम, हवामान, लागणीसाठी रोपे तयार करणे, आंतर मशागत, पाणी देणे इ. सर्वसाधारणपणे कोबीप्रमाणे असतात [→ कोबी]. महाराष्ट्रात सामान्यपणे हे पीक कोबी आणि फुलकोबी (फुलवर) यांच्या पिकांत मिश्रपीक म्हणून घेण्याची प्रथा आहे. सपाट वाफ्यात कोबी अगर फुलकोबी ही मुख्य पिके व पाटाच्या कडेने नवलकोलाची रोपे २० ते ३० सेंमी. अंतर ठेवून लावतात किंवा सरी–वरंब्याच्या एका बाजूला फुलकोबीची रोपे आणि दुसऱ्या बाजूला नवलकोलाची रोपे लावतात. हे थोड्या मुदतीत निघणारे पीक असल्यामुळे ते थोडे पुढे-मागे लावले तरी चालते. मिश्रपीक म्हणून घेतल्यास एक हेक्टर क्षेत्रासाठी सु. ४५० ग्रॅ. व स्वतंत्र पीक घेतल्यास हेक्टरी १·२५ किग्रॅ. बी लागते. भारतातील काही भागांत हे पीक पाभरीने पेरतात आणि त्यासाठी हेक्टरी ४–६ किग्रॅ. बी लागते.

लागणीपासून दीड-दोन महिन्यांनी कोवळे आणि भाजीसाठी योग्य असे (सु.५ ते ७·५ सेंमी. व्यासाचे) नवलकोल तोडतात. उत्तर भारतात हेक्टरी २२,००० ते २६,००० किग्रॅ. व महाराष्ट्रात स्वतंत्र पीक १०,००० ते १२,००० किग्रॅ. व मिश्रपीक सु. ४,५०० किग्रॅ. येते. याच्यावरील रोग व किडी यांकरिता ‘कोबी’ ही नोंद पहावी.

पाटील, ह. चिं.