पॅशनफ्रुट : (१) तणावे, पाने व फळे यांसह फांदी (२) संरचना दर्शविणारे अर्धे फळ.पॅशनफ्रुट : हे नाव ⇨कृष्णकमळाच्या (इं.पॅशनफ्लॉवर) सामान्यतः सर्वच जातींच्या वेलींच्या फळांना वापरतात. तथापि हे नाव त्यांपैकी विशेष खाद्य म्हणून लागवडीत असलेल्या जातींच्या फळांना उद्देशून वापरले जाते. जायंट ग्रॅनॅडिला(पॅसिफ्लोरा क्वाड्रँग्युलॅरिस ), पर्पल ग्रॅनॅडिला (पॅ. एड्यूलिस ) आणि यलो ग्रॅनॅडिला (पॅ. लॉरिफोलिया ) ह्या जातींची फळांकरिता (पॅशनफ्रुट) विशेष ख्याती आहे. वेस्ट इंडीजमध्ये स्वीट कॅलाबाश (पॅ.मॅलिफॉर्मिस ) ही जाती लोकप्रिय आहे. पहिल्या तीन जाती उष्ण कटिबंधीय अमेरिकेत पिकवतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि द. आफ्रिका येथे पर्पल ग्रॅनॅडिला व हवाई बेटांत त्याचाच पिवळा प्रकार पिकवितात. भारतात पर्पल ग्रॅनॅडिला (हिं. झुम्कलता) लागवडीत आहे व त्याची फळे पॅशनफ्रुट या नावाने विकली जातात. ती ज्या वेलीपासून मिळतात तिला निळ्या कृष्णकमळाची (पॅशनफ्रुटची) जाती असे म्हणतात. हिची सर्वसामान्य लक्षणे कृष्णकमळ व ⇨पॅसिफ्लोरेसी (कृष्णकमळ कुल) यांत वर्णिल्याप्रमाणे आहेत. तणाव्यांनी वर चढत जाणाऱ्या ह्या वेलीला त्रिखंडी, साधी, एकाआड एक पाने असून त्यांच्या बगलेत द्विलिंगी, सु. सात सेंमी. व्यासाची, पांढरी (जांभळट छटांची) सुवासिक फुले येतात. मृदुफळे ४-५सेंमी. व्यासाची, गोलसर किंवा लंबगोल, पिवळी व कठीण सालीची असून त्यांवर जांभळट ठिपके असतात. फळ खाद्य, स्वादिष्ट, पौष्टिक, उत्तेजक व अनेकबीजी असते. ते काहीसे आंबट असल्याने साखर लावून खातात. फळांचा रस मोठ्या प्रमाणात काढून सरबते व तत्सम पेये बनवितात अथवा फळांची जेली व जाम बनवितात. मिठाई, केक, आइसक्रीम इत्यादींमध्ये फळांचा रस स्वादाकरिता वापरतात. काही देशांत त्यांना व्यापारी महत्त्व आले आहे. जहाजातून फळे दूर पाठविण्यास गैरसोयीची असल्याने त्यांचा खप बहुतेक उष्ण कटिबंधीय देशांत स्थानिक स्वरूपाचा आहे.

जमदाडे, ज. वि. परांडेकर, शं. आ.  

भारतात पंजाब व हिमाचल प्रदेशात याची लागवड करतात. दमट हवामानात निलगिरी आणि आंध्र प्रदेशातील आरकू खोरे या भागांत याची वाढ चांगली होते. त्याला किंचित कडक थंडी सहन होते परंतु थंडीचा कडाका अपायकारक ठरतो. बंगालच्या व आसामच्या काही भागांत उटकमंड आणि कोडईकानलच्या आसपास ते जंगली अवस्थेत वाढत असलेले आढळते. निचरा न होणाऱ्या भारी व अतिशय नापीक जमिनी सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या जमिनीत ही वेल वाढते. 

स्वतंत्र पीक म्हणून किंवा मिश्रपीक म्हणून लागवड करतात. लागवडीसाठी रोपे, मुळावलेली छाट कलमे किंवा दाब कलमे वापरतात. रोपासाठी बी कुंडीत किंवा चांगल्या मशागत केलेल्या जमिनीतील वाफ्यात पेरतात. बियांची अंकुरणक्षमता अल्पकालीन असते म्हणून पक्व फळामधून बी काढल्याबरोबरच पेरतात. ते दोन-तीन आठवड्यांत उगवते. ही रोपे ३-४ महिन्यांनी १५ ते २५ सेंमी. वाढतात आणि कायम जागी लावण्यालायक होतात. छाट कलमे लावल्यानंतर त्यांना लवकर मुळे फुटून सु. तीन महिन्यांनी ती कायम जागी लावण्यायोग्य होतात. स्वतंत्र पीक लावताना दोन ओळीत ५-६ मी. आणि ओळीतील दोन वेलींत जमिनीच्या मगदुराप्रमाणे ३मी.पर्यंत अंतर ठेवतात. ६ ते ८ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या फळबागेत फळझाडांच्या दोन रांगांमधील जागेत पॅशनफ्रुटची लागण ३ –५ मी. अंतरावर करतात. जरूरीप्रमाणे पाणी देतात आणि कोळपणी देऊन तण काढतात. या वेलींना वर्षातून एकदा चांगले तयार केलेले कंपोस्ट किंवा कुजलेले शेणखत थोडे रासायनिक खत मिसळून भरपूर प्रमाणात देतात.

या वेलींची सामान्यतः छाटणी करीत नाहीत पण फळे नव्या फुटीवर येतात म्हणून कमजोर व दाट झालेली वेलीच्या दुय्यम फांद्यांवरील मुख्य फांदीपर्यंतची वाढ फेब्रुवारी-मार्च या महिन्यांत छाटणे चांगले. रोपांपासून लागवड केलेल्या वेलींना सामान्यपणे दुसऱ्या वर्षी फळे येण्याची सुरुवात होऊन सहाव्या वर्षापर्यंत जास्तीत जास्त फळे म्हणजे अदमासे ७–९ किग्रॅ. (१५०ते २५० फळे) एका वेलीपासून मिळतात. कलमापासूनच्या वेलींना फार लवकर फळे येतात परंतु ती अकाली पक्व होणारी असतात. फळे वर्षभर येतच असतात पण ती मे-जून व सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांत जास्त येतात. फळे पिकल्यावर झाडावरून जमिनीवर गळून पडत असल्यामुळे चांगला रंग आलेली फळे पूर्ण पक्व होण्यापूर्वीच तोडणे श्रेयस्कर असते. फळे बंदिस्त जागी तेथील सामान्य तापमानात फार दिवस टिकत नाहीत. ती सुरकुतून निस्तेज बनतात. शीतगृहात ती ५·५° – ७·२°से. तापमानात ४-५ आठवड्यापर्यंत चांगली टिकतात. फळांची साल कठीण असल्यामुळे ती विक्रीकरिता दूरवर पाठविता येतात.  

भारतात या वेलीवर कोणत्याही महत्त्वाच्या किडी अगर रोग पडत असल्याचे आढळत नाही. तथापि साठवणीतील फळांवर निरनिराळ्या कवकांचा (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतींचा) प्रादुर्भाव होतो. या कवकांच्या प्रतिबंधाकरिता फळे साठवण्यापूर्वी ती फार्माल्डिहाइड(२% ). आयोडीन(२%), बोरिक अम्ल(५%) व अल्कोहॉल (९५%) यांच्या विद्रावात बुडवून काढतात किंवा ती ५% लायसोलाची प्रक्रिया केलेल्या पेट्यांत वा पॉलिथिनाच्या पिशव्यांत अथवा १-२% आयोडीन विद्रावाची प्रक्रिया केलेले कागदाचे कपटे आतून कडेने भरलेल्या पेट्यांत ठेवतात.  

चौधरी, रा. मो. 

संदर्भ : C.S.I.R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VII, New Delhi,1969.