कातड्याची मोट : (१) मोटवण, (२) मोट, (३) मोटेची सोंड.मोट : शेतीसाठी पाणी उचलण्याकरिता (उपसण्यासाठी) कातडी मोटा भारतात कोकण भागाखेरीज इतरत्र फार मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. मोटा दोन प्रकारच्या असतात एक सोंडेची मोट व दुसरी बिनसोंडेची मोट. मोट म्हणजे एका तोंडापासून दुसऱ्या तोंडापर्यंत निमुळती होत जाणारी १·५ ते २·२५ मी. लांबीचा एक कातडी पिशवीच होय. तिचे लहान तोंड २० सेंमी. व्यासाचे असते. मोठे तोंड ४०–५० सेंमी. व्यासाचे असून त्याला एक लोखंडी कडे जोडतात. मोटेच्या लहान तोंडाकडील भागास मोटेची सोंड म्हणतात. त्या लहान तोंडास सोंडदोर व मोठ्या तोंडास नाडा बांधून दोन्ही दोर मोटवणावरील दोन लाकडी चाकांवरून घेऊन बैलजोडीच्या मानेवरील जोखडास बांधतात. विहिरीत बुडल्यावर मोटेत दोन्ही तोंडांतून पाणी भरते. मोट पाण्याचे पूर्ण भरल्यावर बैल मोटवणापासून दूर असे धावेवरून खाली जोराने चालू लागतात आणि मोट वर खेचली जाते. धावेला उतार असल्यामुळे मोट ओढणे बैलांना सोपे जाते. वर आलेली मोट मोटवणापाशी खेटल्यावर आतील सर्व पाणी सोंडेतून थारोळ्यात पडते. मोट रिकामी झाल्यावर ती स्वतःच्या वजनाने विहिरीत उतरू लागते व बैल पाठमोरे (उलटे मागे सरकत) धावेवर चढू लागतात. बैल थारोळ्याजवळ पोहोचले की, मोट पाण्यात बुडते. नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे ह्या सर्व क्रिया पुनःपुन्हा घडतात. १५–२० मी. खोल विहिरीतील पाणी चढविण्यासाठी सुद्धा मोटा वापरतात. वापरानंतर मोट वाळवून नीट ठेवल्यास ती एक वर्ष सहज टिकते.

आ.२. लोखंडी पत्र्याची मोट : (१) पाणी आत घेणारा दरवाजा (झडप)

२० मी. पेक्षा जास्त खोल विहिरीतील पाणी उचलण्यास बिनसोंडेची मोट वापरतात. या मोटेला दुसरे तोंड नसते. यामुळे या मोटेत भरलेले पाणी विहिरीत गळून पडण्याचे प्रमाण अत्यल्प असते. ही बिनसोंडेची भरलेली मोट मोटवणापाशी पोहोचल्यावर आतील पाणी थोरळ्यात ओतण्याकरिता बैलहाक्याव्यतिरिक्त दुसऱ्या माणसाची गरज लागते.

गेल्या ५० वर्षात लोखंडी पत्र्याच्या मोटेचा वापर सुरू झाला आहे. यो मोटेच्या खालील बाजूस बिजागरीचा एक छोटा दरवाजा (झडप) असतो. मोट पाण्यावर टेकल्याबरोबर पाण्याच्या दाबाने दरवाजा उघडून मोटेत पाणी घुसते. पूर्णपणे भरल्यावर मोट वर जाऊ लागताच वरील पाण्याच्या दाबाने दरवाजा घट्ट बंद होतो. मोट मोटवणापाशी पोहोचल्यानंतर आतील पाणी मोटेच्या वरच्या भागातून थारोळ्यात ओतले जाते. पालापाचोळी अडकल्यामुळे दरवाजा पूर्णपणे बंद न झाल्यास मोटेतील पाणी विहिरीत गळत राहते. हा या मोटेत दोष आहे. बिजागऱ्यांना वरचेवर वंगण दिल्यास व पत्र्यास रंग दिल्यास ही मोट ५ वर्षेपर्यंतही टिकते. कातडी मोटा, तसेच पत्र्यांच्या मोटा १२५ ते २०० लि. पाणी मावेल अशा निरनिराळ्या आकारमानांच्या केल्या जातात.

मोटेत सुधारणा करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले आहेत व हल्लीही केले जात आहेत. धावेवरून बैल खाली पोहोचतात त्या वेळी थारोळ्यात मोट रिकामी होते. त्यानंतर जोखडापासून नाडा व सोंडदोर सोडून मोट मोटवणापासून खाली पाण्यात पडू द्यावयाची व बैल तोंडे फिरवून धावेवर चढू द्यावयाचे, थारोळ्याजवळ बैल पोहोचल्यावर पुन्हा एकवार त्यांची तोंडे फिरवून धावेवर चढू द्यावयाचे आणि जोखडास नाडा व सोंडदोर बांधून कामापुढे चालू करावयाचे. या पद्धतीत बैलांना पाठमोरे चढावे लागत नसल्यामुळे ते कमी दमतात परंतु बैल सोडून परत जोडण्यात वेळ मोडतो म्हणून या पद्धतीचा वापर वाढला नाही.

एकाच वेळी काम करणाऱ्या दोन मोटा दक्षिण भारतात काही ठिकाणी वापरतात. या पद्धतीत भरलेली एक मोट विहिरीतून वर चढत असताना दुसरी रिकामी मोट विहिरीत उतरते. भरलेली मोट थोराळ्यात पाणी ओतत असताना रिकामी मोट विहिरीत पाण्याने भरत असते. या पद्धतीत एकच बैलजोडी वापरतात. हे बैल विहिरीशेजारील सपाट जागी गोल फिरतात. गोल गतीचे आगेमागे गतीत रूपांतर करणाऱ्या यंत्रणेद्वारे दोन्ही मोटा वर-खाली जात राहतात. या पद्धतीने नेहमीच्या पद्धतीपेक्षा दुप्पट पाणी उचलेले जाते परंतु बैल लवकर थकतात. विहिरीतील पाणी थोड्या उंचीवर खेचण्यासाठी या पद्धतीचा वापर फायदेशीर होतो.

पहा : पंप रहाटगाडगे सिंचन.

सोमण, ना. श्री.