इसबगोल:(हिं. इस्पद्युल गु. उथमुं जिरुं सं. ईशदगोल इं. ब्लाँड सिलियम, प्लँटेन लॅ. प्लँटॅगो ओव्हॅटा कुल प्लँटॅजिनेसी). ही खोडहीन, लवदार व वर्षायू (एक वर्ष जगणारी) वनस्पती भूमध्यसामुद्रिक प्रदेशात व पश्चिम आशियात आढळते. तिचा प्रसार भारतात पंजाबच्या सखल भागात व लहान टेकड्यांमध्ये व सतलजपासून पश्चिमेस पाकिस्तानात सिंधपर्यंत आहे ती महाराष्ट्रात व उत्तर गुजरातमध्ये (मुख्यत्वे मेहसाणा व बनासकाठा जिल्ह्यांत) लागवडीत आहे. स्पेन व फ्रान्समध्ये निराळ्या जाती लावतात. पाने साधी, ७–२२ × ०·६ सेंमी., अरुंद, रेखाकृती, फारच निमुळती, अखंड, काहीशी दातेरी मुख्य शिरा तीनपुष्पबंधाक्ष पानापेक्षा लांब किंवा आखूड फुले लहान, हिरवट असून दंडगोलाकृती कणिशावर जानेवारी-मार्चमध्ये येतात. छदे सपक्ष संदले, प्रदले व केसरदले प्रत्येकी चार पाकळ्या जुळलेल्या, टोकास गोलसर अपिप्रदललग्न केसरदले किंजपुट ऊर्ध्वस्थ [→ फूल] बोंडात दोन एकबीजी कप्पे बोंडाचा वरचा अर्धा भाग झाकणीप्रमाणे तुटून येतो दोन बिया बोंडाच्या मध्यभागी चिकटलेल्या असून त्या कठीण, गोलसर, लांबट, गुळगुळीत व दुधी काचेसारख्या व श्लेष्मल द्रव्ययुक्त (बुळबुळीत पदार्थयुक्त) असतात.
इसबगोलाच्या पिकाला सर्व प्रकारची जमीन चालते पण उत्तम निचऱ्याच्या भारी दुमट जमिनीत ते चांगले येते. याला थंड व कोरडे हवामान लागते. हेक्टरी ३०–३५ गाड्या शेणखत घालून जमिनीची उत्तम मशागत करतात. पेरणीचा हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबर असून हेक्टरी ६–१३ किग्रॅ. बी दोन ओळीत ३० सेंमी. अंतर ठेवून पेरतात अगर हाताने फोकतात. पेरणीनंतर लगेच पाणी देतात. चार दिवसांत उगवण न झाल्यास पाण्याची दुसरी हलकी पाळी देतात. सामान्यत:पाण्याची पहिली पाळी पेरणीनंतर २०–३० दिवसांनी देतात. पुढे ७–१० दिवसांच्या अंतराने एकूण ५–८ पाण्याच्या पाळ्या पीक काढीपर्यंत लागतात. साडेतीन ते चार महिन्यांत पीक काढणीस तयार होते. मार्च एप्रिलमध्ये पिकाची कापणी करतात. मळणी करून, वारवून व चाळून बी स्वच्छ करतात. हेक्टरी ५००–१,१०० किग्रॅ. उत्पन्न येते. भारतात तूस व बी बहुधा वेगवेगळी विकतात.
उत्पन्नाच्या दृष्टीने इसबगोलाच्या बियांच्या तुसाला (भुसी किंवा सत् इसबगोल) खरे महत्त्व असते. बियांच्या अंतर्गोल भागात त्याचा पातळ पांढरा पापुद्रा असतो. भरडून व पाखडून तूस वेगळे करतात. ते २६-२७% मिळते.
इसबगोलाची रेचकासारखी होणारी क्रिया संपूर्णपणे तुसातील श्लेष्मल द्रव्यावर अवलंबून असते. त्याची क्रिया पूर्णपणे यांत्रिक असते. तूस थंड पाण्यात टाकल्यास फुगते व त्याचा जेलीसारखा पदार्थ बनतो. त्यामुळे बद्धकोष्ठता जाते कारण आतड्याचा क्रमसंकोच यांत्रिकपणे उत्तेजित होतो. ते द्रवरूप पॅराफिनापेक्षा स्वस्त असून त्याची क्रिया पॅराफिनासारखीच असते, परंतु पॅराफिनाच्या सवयीमुळे होणारे दुष्परिणाम (उदा., मोठ्या आतड्याचा मारक रोग, गुदाचे इसब इ.) इसबगोल वापरण्यामुळे होत नाहीत.
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) असून पचनसंस्था, मूत्रमार्ग यांच्या तक्रारींवर व आमांश, अतिसार, बद्धकोष्ठता इत्यादींवर वापरतात. सौंदर्यप्रसाधनांत आणि सुती व रेशमी धाग्यांना ताठपणा आणण्यासाठी त्यातील बुळबुळीत पदार्थ वापरतात.
जागतिक बाजारपेठेत इसबगोलाचे बी व तूस यांचा पुरवठा मुख्यत: भारतातून होतो. १९६६-६७ साली भारताने अमेरिका, प. जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम इ. देशांना सु. ८८४ टन (किंमत सु. रु. १८ लक्ष) बी व अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स इ. देशांना ३,५८० टन (किंमत सु. रु. २·२५ कोटी) तूस यांची निर्यात केली.
संदर्भ : CSIR, The Wealth of India, Raw Materials, Vol. VIII, New Delhi, 1969
जमदाडे, ज. वि.