ल्युपीन (ल्युपीनस आल्बस) ल्युपीन : (ल्युपीनस म्युटावीलीस कुल-लेग्युमिनोजी). एक वर्षायू व बहुवर्षायू (जीवनक्रम एका हंगामात व अनेक हंगामांत पुरे करणाऱ्या) वनस्पती. पांढऱ्या ल्युपिनाची पाने प्रांगुलित वा त्यांचा आकार अंड्यासारखा आयताकार असतो [⟶ पान]. पांढऱ्या फुलांचा पुष्पबंध शेंड्यावर येतो. शेंगा मोठ्या, मजबूत चोचीच्या व केसाळ असतात. ह्या एकाच वेळी पक्व होत नाहीत. बी गोलाकार चपटे वा पांढरे असते. फुलांच्या रंगावरून ल्युपिनाच्या चार मुख्य जाती केल्या आहेत : ल्युपीनस आल्बस (पांढऱ्या फुलांची), ल्यु. अँगुस्टीफोलीअस (निळ्या फुलांची आणि अरुंद पानांची), ल्यु. ल्युटेअस (पिवळ्या फुलांची) वन ल्यु. पॉलिथिलस (निळ्या फुलांची व बहुवर्षायू).

दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतीय प्रदेशात ३,००० वर्षांपूर्वी हे लोकांच्या उपजीविकेचे पीक होते. मोतीया रंगाचे बी पाण्यात उकळून ते काही दिवस पाण्यात भिजत ठेवल्यास त्यामुळे बियांतील कडू विषारी अल्कलॉइडे निघून जातात आणि बी खाण्यास उपयोगी पडते. ल्युपिनाची लागवड सध्या रशिया, पोलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि यूरोपातील काही देशांत होते. ह्या पिकाच्या लागवडीखाली ८,५०,००० हे. पेक्षा अधिक क्षेत्र आहे. सोयाबिनाच्या लागवडीस अयोग्य असलेल्या क्षेत्रात हे घेतात. जमीन चांगल्या निचऱ्याची हवी. अम्ल जमीन अयोग्य असते. ऑस्ट्रेलियात हिवाळी पीक घेतात, तर इंग्लंडमध्ये वसंत ऋतूत पेरणी करतात. चाऱ्याच्या पिकाच्या पेरणीसाठी पिवळ्या व निळ्या ल्युपिनाचे दर हेक्टरी १२३ किग्रॅ. आणि पांढऱ्या ल्युपिनाचे १३४ किग्रॅ. बी लागते. कडधान्य उत्पादनसाठी ह्यापेक्षा कमी बी लागते. त्यासाठी दोन ओळींतील अंतर १८ सेंमी. ठेवतात. चाऱ्याचे पीक यापेक्षा दाट पेरतात.

लागवडीसाठी सध्या कडू अल्कलॉइडे नसणाऱ्या गोड्या ल्युपिनाच्या जाती उपलब्ध आहेत. रशियात पांढऱ्या फुलांची ‘किव्हसकीज म्युटंट’ जात अधिक लोकप्रिय आहे. युक्रेनमध्ये ह्या जातीचे प्रती हेक्टरी ५ टन धान्योत्पदान मिळते, ह्या जातीच्या कडधान्यात तेलाचे प्रमाण १२ ते १४% असते. पोलंड व जर्मनीत पिवळ्या फुलांच्या जाती लोकप्रिय आहेत. पश्चिम ऑस्ट्रेलियात निळ्या फुलांच्या जातीची अधिक लागवड आहे.

ह्या पिकाला भरपूर फॉस्फेट खत द्यावे लागते. पोटॅशयुक्त खतेही द्यावी लागतात. पोटॅश नसल्यास पीक खुरटते आणि रोगाचा अधिक प्रादुर्भाव होतो. मुळांवर ऱ्हायझोबियम सूक्ष्मजंतूच्या गाठी असतात. जमिनीत मँगॅनीज नसल्यास बियांवरील साल फाटते. 

या पिकाला बुरशी रोगापासून उपद्रव होतो. पानावरील तपकिरी ठिपके, पानावरील करडे ठिपके, मर, भुरी व अँथ्रॅक्नोज हे यावरील प्रमुख रोग आहेत. पिकाला मावा किडीचा उपद्रव होतो.

रशियातील ६०% पिकाचा उपयोग गुरांच्या चाऱ्यासाठी व ४०% कडघान्यासाठी करतात. ल्युपिनाचे मक्यासोबत मिश्रपीक घेतात. दोन्ही पिकांची एकाच वेळी कापणी करून त्यांचे सायलेज (मूरघास) तयार करतात. गुरांच्या चाऱ्यासाठी गोड्या ल्युपिनाचाच उपयोग करतात. कडू ल्युपिनाची गुरांना विषबाधा होते. हे कडधान्य भरडून गुरांच्या खाद्यात मिसळतात. हे भरपूर प्रथिने असलेले खाद्य ऑस्ट्रेलियात डुकरांना खाऊ घालतात. त्याचप्रमाणे दुभत्या व मांसाकरिता पाळलेल्या गुरांनाही खाऊ घालतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील चरबी वाढते. ल्युपीन चारल्याने मेंढ्यांच्या शरीरातील चरबीपेक्षा स्नायूंचे प्रमाण वाढते. ल्युपिनाचे तेल सोयाबिनाच्या तेलाप्रमाणे खाद्य तेल म्हणून वापरतात. 

ल्युपिनाची लागवड अमेरिकेतील जॉर्जिया, फ्लॉरिडा व कॅरोलायना राज्यांतील किनारपट्टीच्या रेताड जमिनीत होत आहे. भारतात लागवड कमी आहे. बागेत शोभेच्या फुलांकरिता वाफ्यांत किंवा कुंड्यांत ल्युपिनाची झाडे लावतात.

रासायनिक संघटन : पांढऱ्या ल्युपिनाच्या बियांत प्रतिशत आर्द्रता १०.९६, प्रथिने ३२.८१, स्निग्ध पदार्थ ८.८८, शर्करा ६.३३ राख २.६२ व नायट्रोजनविरहित भाग ४४.७३ असतो. शिवाय पुढील खनिजे असतात : पोटॅशियम ०.७५, कॅल्शियम ०.३३, मॅग्नेशियम ०.२८, सोडियम ०.०१, फॉस्फरस ०.२५, लोह ०.०१ टक्का. बियांत ल्युपानीन व हायड्रॉक्सिल्युपानीन ही अल्कलॉइडे असतात. बियांचा औषधी उपयोगही होतो.

संदर्भ : 1. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI. New Delhi, 1962.

            2. World Farming. Vol. 21 (January 1979).

राहुडकर, वा. ब.