लॅटिमेरिया लॅटिमेरिया : डेव्होनियन (सु. ४० ते ३६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालात प्रभावी असलेल्या क्रॉसोप्टेरिजीआय या वर्गात मोडणाऱ्या माशांपैकी सध्या अस्तित्वात असलेल्या या माशाला लॅटिमेरिया असे म्हणतात. याचा समावेश सीलॅकँथिनी या गणात होतो. गेल्या तीस कोटी वर्षांच्या कालखंडात याच्या शरीरचनेत फारच थोडा फरक झाला आहे. याचे जीवाश्म (शिळारूप झालेले अवशेष) मध्यजीव (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालात सापडले आहेत.  

लॅटिमेरिया कॅलम्नी हा मासा मृतावस्थेत १९३८ साली सापडला व त्याचे वर्णन जे.एल्. बी. स्मिथ यांनी केले. हे मासे सात कोटी वर्षांपूर्वी नामशेष झाले असावेत, असा समज होता. १९३८ नंतर लॅटिमेरियाचे जिवंत नमुने हिंदी महासागरात मादागास्करजवळील कॉमोरो बेटांजवळील खोल पाण्यात सापडले. हे मासे लहान माशांवर आपली उपजीविका करतात. मच्छीमाराच्या जाळ्यात सापडलेल्या या माशांची लांबी एक ते दोन मी. असते व वजन ४० ते ८० किग्रॅ. असते. १९७२ साली याचे शवविच्छेदन करून याच्या शरीररचनेचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. याच सुमारास त्यांचा जीवरसायनशास्त्रदृष्ट्या आणि शरीरक्रियावैज्ञानिक दृष्ट्याही अभ्यास करण्यात आला. १९८७ साली यांच्या वर्तनाचा अभ्यास करून यांची छायाचित्रेही घेण्यात आली.

इतर माशांपेक्षा लॅटिमेरियाचे पक्ष (हालचाल करण्यासाठी व तोल सांभाळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या स्नायुमय घड्या पर) निराळे आहेत. याचे शेपूट रुंद आहे आणि त्याच्या कडेवर, तसेच वर आणि खाली पक्ष-अरांची रांग असते. शेपटीचे टोक एका खंडाचे असते. पुढचा पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) पंख्यासारखा असतो, दुसरा पृष्ठपक्ष व गुदपक्ष (ढुंगणावरील पर) यांच्या खंडावर खवले असतात आणि टोकावर पक्ष-अरांची रांग असते. अंसपक्ष (छातीवरील पर) व श्रोणिपक्ष (कमरेवरील पर) या युग्मित (जोडीने असलेल्या) पक्षांत पुष्कळ सारखेपणा असतो. श्रोणिपक्षाचा स्नायुयुक्त खंड जास्त लांबट असतो व तो ३६० अंशांतून वळू शकतो. त्यातील अस्थी व चतुष्पाद प्राण्यातील या अवयवाच्या अस्थी यांच्यामध्ये काही साम्य आढळत नाही.

पाठीचा कणा कशेरुकांचा (मणक्यांचा) बनलेला नसून तो तंतुयुक्त नलिकेच्या पृष्ठरज्जूचा असतो. या नलिकेत द्रवपदार्थ असतो. हा कणा शेपटीच्या टोकापासून निघून डोक्यात शिरलेला असतो. असा कणा सायक्लोस्टोम व स्टर्जन यांसारख्या आदिमत्स्यांत आढळतो. असा कणा असणारा लॅटिमेरिया हा एक वैशिष्ट्यपूर्ण मासा आहे. याच्या कवटीचे अग्र व पश्च असे दोन भाग पडतात. हे दान्ही भाग पृष्ठीय बाजूस जुळलेले असतात. पृष्ठरज्जूचा अग्रभाग अग्र कवटीच्या अस्थीशी जोडलेला असतो. कवटीच्या पश्चभागात मेद व रक्त यांनी वेष्टिलेला लहान आकाराचा मेंदू असतो.⇨पोष ग्रंथीचे मुख आणि मस्तिष्क खंड लांब दांड्याने जोडलेले असतात. मुस्कट व घ्राणेंद्रियात एक इंद्रिय असते त्याचे कार्य अज्ञात आहे. डोळे काळ्या रंगाचे व अंधुक प्रकाशाच्या दृष्टीने योग्य असे असतात. आंत्रात (आतड्यात) वलयाकार सर्पिल झडप असते. वाताशय आकुंचन पावलेल्या दोऱ्यासारखा असतो. या मत्स्याच्या खवल्यांची उत्पत्ती त्वचा व अस्थीपासून झाली असावी, असे दिसते.

आजपर्यंतचा जीवाश्मांच्या अभ्यासावरून असा निष्कर्ष निघतो की, सीलॅकँथ माशापासून (ज्यात लॅटिमेरियाचा समावेश आहे) जमिनीवरील चतुष्पाद प्राण्यांची उत्पत्ती झाली असावी. हे निष्कर्ष शरीरशास्त्राच्या अभ्यासावरून काढले आहेत पण आत जिवंत लॅटिमेरिया उपलब्ध झाल्यामुळे त्याचा शरीरक्रियावैज्ञानिक व जीवरसायनशास्त्रीय दृष्टींनी अभ्यास केला गेला व यावरून असे आढळून आले की, हे मासे शार्क व रे या माशांचे पूर्वज असावेत. लॅटिमेरियाचा अग्निपिंड व पोष ग्रंथी यांचा आकार शार्कच्या या इंद्रियांसारखाच आहे. दोहोतही गुदांत्र ग्रंथी आहेत. या दोन्ही माशांच्या रुधिराभिसरणात साम्य आहे परंतु हा सारखेपणा वर्गीकरण बदलण्यास पुरेसा नाही, असे अनेक शास्त्रज्ञांचे मत आहे. सीलॅकँथला अस्थिमय कंकाल (सांगाडा) आहे आणि खंडयुक्त पक्ष आहेत, हे त्यांच्या मते जास्त महत्त्वाचे आहे. ४० कोटी वर्षांच्या कालावधीत दोन्ही प्रकारचा क्रमविकास (उत्क्रांती) होणे शक्य आहे पण आणखी जिवंत लॅटिमेरिया मिळून त्यांचा सखोल अभ्यास होईपर्यंत हा प्रश्न अनिर्णितच राहणार आहे.

इनामदार, ना. भा.