गस्टव्हस आडॉल्फस : ( ९  डिसेंबर १५९४-१६ नोव्हेंबर १६३२ ). स्वीडनचा इतिहासप्रसिद्ध राजा. दुसरा गस्टाव्ह म्हणून तो प्रसिद्ध आहे. स्टॉकहोम येथे जन्म. सोळाव्या वर्षीच स्वीडनच्या गादीवर आला. याच्या कारकीर्दीत स्वीडनची गणना बलाढ्य राष्ट्रांत होऊ लागली. युद्धशास्त्रीय सिद्धांत व सुधारणा

गस्टव्हस आडॉल्फस

यांसाठी तो खास प्रसिद्ध असला, तरी स्वीडनच्या राज्यकारभारात त्याने बऱ्याच सुधारणा केल्या. विधिमंडळ, प्रकाशन, स्थानिक स्वराज्य व शिक्षण इ. क्षेत्रांत त्याने महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. परदेशी भांडवलास वाव देऊन त्याने स्वीडनच्या औद्योगिक प्रगतीचा पाया घातला. प्रॉटेस्टंट धर्मपंथी स्वीडनला चिरडण्यासाठी ऑस्ट्रिया, पोलंड, बव्हेरिया व फ्रान्स ही कॅथलिक राष्ट्रे जोराचे प्रयत्न करीत होती. त्यावेळी त्यांच्याविरुद्ध यूरोपातील प्रॉटेस्टंट राष्ट्रांची एकजूट करण्याचे त्याचे ध्येय होते. सामान्य जनता त्यास प्रॉटेस्टंटांचा वाली समजत असे. रशियाच्या अंतर्गत संघर्षात हस्तक्षेप करून त्याने १६१७ मध्ये स्टालबोव्हाच्या तहान्वये रशियास बाल्टिक समुद्रापासून दूर ठेवले. १६१८ मध्ये प्रॉटेस्टंट व कॅथलिक यांच्यामधील तीस वर्षांच्या युद्धात त्याने पोलंडवर स्वारी करून १६२१ मध्ये रीगा घेतले. १६२६ मध्ये वॉलहोफची लढाई जिंकून त्याने प्रशियाची बंदरे ताब्यात घेतली. १६३२ मध्ये त्याने बव्हेरियावर स्वारी केली. ल्यूट्‌सनच्या लढाईत चिलखताविना लढताना घोडदलाच्या हल्यात तो मारला गेला. सक्तीच्या लष्करभरतीची प्रथा त्यानेच सुरू केली होती. तसेच पायदळ व तोफखाना ह्यांच्या संयुक्त हल्ल्याचे नवे युद्धतंत्र त्याने प्रथमच यशस्वीपणे अंमलात आणले.

संदर्भ : 1. Ahnlund, Nils, Gustav Adolf the Great, New York, 1940. 2. Roberts, Michael,

             Gustavus  Adolphus, 2 Vols., London, 1953, 1958.

चाफेकर, शं. गं