हेर्टव्हिख, ऑस्कार (व्हिल्हेल्म आउगुस्ट) :(२१ एप्रिल १८४९–२५ ऑक्टोबर १९२२). जर्मन कोशिकाविज्ञान व भ्रूणविज्ञान या विषयांचे शास्त्रज्ञ. त्यांनी पृष्ठवंशी प्राण्यांच्या भ्रूण-विकृतीसंबंधी (व्यंगांसंबंधी) संशोधन केले. निषेचनामध्ये अंडाणू व शुक्राणू केंद्रकांचे सायुज्जन होणे ही आवश्यक बाब असल्याचे सर्वप्रथम त्यांच्या निदर्शनास आले.
![]() |
हेर्टव्हिख यांचा जन्म फ्रीडबर्ग येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण मूलहाऊझेन, थुरिंजिया येथे झाले. त्यांनी बॉन विद्यापीठाची पदवी घेतली (१८७२). येना, झुरिक व बॉन येथून त्यांनी प्राणिविज्ञान व वैद्यक विषयाचे शिक्षण पूर्ण केले. ते येना विद्यापीठात शरीरशास्त्र या विषयाचे व्याख्याते (१८७५) आणि प्राध्यापक (१८८१–८८) होते. बर्लिन विद्यापीठात ते शारीर व क्रमविकासीय इतिहासाचे प्राध्यापक आणि Anatomisch-Biologische Institute (Institute of Anatomy and Biology)या संस्थेचे संस्थापक व संचालक (१८८८–१९२१) होते.
हेर्टव्हिख यांनी त्यांचा भाऊ प्राणिशास्त्रज्ञ रिकार्ट कार्ल व्हिल्हेल्म थिओडोर फोन हेर्टव्हिख यांच्या साहाय्याने बहुकोशिक प्राण्यांमध्ये देहगुहा तयार होण्यासंबंधीचे संशोधन केले आणि देहगुहा, बाह्य व मध्यस्तर यांच्या भ्रूणवैज्ञानिक उत्पत्तीचा शोध लावला. तसेच भ्रूणस्तर ( जननस्तर) सिद्धांतावर अनेक प्रबंध लिहिले. सर्व अवयव व ऊतक-निर्मिती ही बाह्यस्तर, अंतःस्तर व मध्यस्तर यांपासून तयार होतात, असे वर्णन त्यांनी त्या प्रबंधामध्ये केले आहे.
निषेचनासाठी अंडाणू व शुक्राणू यांचे मिलन होणे अत्यावश्यकअसते, हे हेर्टव्हिख यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रथम आंत्रकृमीच्याअंडाणू व शुक्राणूच्या परिपक्वनाची तुलना केली, त्यावरून त्यांना न्यूनी-करण विभाजनाचे (अर्धसूत्रणाचे) महत्त्व लक्षात आले. आनुवंशिक गुणांचे केंद्रकीय संचारण, जीवावर्तन सिद्धांत तसेच रेडियम किरणांचा काय कोशिका व जनन कोशिकांवर होणारा परिणाम या क्षेत्रांतही त्यांनी कार्य केले. सामाजिक समस्यांच्या संबंधात जीवविज्ञानाचे महत्त्व या विषयात त्यांना रस होता. त्यांनी स्वतंत्रपणे Lehrbuch der Entwicklungs- geschichte des Menschen und der Wirbelthiere(१८८६), Die Zelle und die Gewebe(१८९३) या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे नावAllgemeine Biologie(१९०६) इ. ग्रंथ लिहिले. तसेच रिकार्ट यांच्यासोबत Entwicklung Die Colomtheorie(१८८१) व Entwicklung des Mittleren Keimblattes der Wirbeltiere(१८८३) हे दोन ग्रंथ लिहिले. ते अनेक वर्षे Archiv fur Mikroskopische Anatomieया नियतकालिकाचे संपादक होते. हेर्टव्हिखहे ⇨ एर्न्स्ट हाइन्रिख हेकेल आणि जेगेनबॉर यांचे शिष्य होते, तरीनंतर त्यांनी डार्विनवादापासून फारकत घेतली होती.
हेर्टव्हिख यांचे बर्लिन येथे निधन झाले.
जमदाडे, ज. वि.
“