टर्की : हा पक्षी मेलिअ‌ॅग्रिडिडी या पक्षि-कुलातील आहे. यांचे मेलिॲग्रिसॲग्रिओकॅरिस हे दोनच वंश आहेत. मेलिॲग्रिस गॅलोपॅव्हो  ही टर्कीची विशेष माहीत असलेली सामान्य जाती आहे. हे पक्षी मूळचे अमेरिका, द. कॅनडा व मेक्सिकोचे रहिवासी असून तेथील दाट अरण्यात ते एके काळी मुबलक होते, पण बेसुमार हत्येमुळे हल्ली त्यांची संख्या कमी झालेली असून दाट झाडी असलेल्या डोंगराळ व दुर्गम प्रदेशातच ते आढळतात.

रान टर्की (मेलिअ‌ॅग्रिस गॅलोपॅव्हो)

टर्की हा एक सुरेख, डौलदार आणि मोठा पक्षी आहे. याचा, विशेषतः नराचा, रंग सोनेरी बिरंजी असून त्यावर हिरव्या, निळ्या आणि काळ्या रंगांची झळाळी असते. डोके आणि मान उघडी (पिसे नसलेली) असते उन्हाळ्यात या दोन्ही भागांचा रंग तांबडा असतो कपाळावरून एक लांब मांसल ‘कॅरंकल’ (मांसल वाढ) लोंबत असतो. गळ्यावर गलुली (गळ्यापासून लोंबणारी मांसल वाढ) असते केसांसारख्या पिसांचा एक झुपका छातीवरून लोंबत असतो. या पक्ष्यांचे लहान कळप असतात.

बारीक फळे, बी आणि किडे हे यांचे भक्ष्य होय. हा वेगाने धावू किंवा उडू शकतो पण एकाच वेळी १·५ किमी. पेक्षा जास्त लांब उडू शकत नाही.

यांच्यात बहुपत्नीत्व आढळते. एका नराबरोबर कित्येक माद्या असतात व त्या नराला नेहमी खूष ठेवण्याचा प्रयत्न करतात. प्रजोत्पादनाच्या काळात दाट झुडपांच्या खाली एक खळगा करून त्यात पाने घालून घरटे तयार केलेले असते. मादी त्यात ८–१५ अंडी घालते. कधीकधी दोन-तीन माद्या एकाच घरट्यात अंडी घालतात. सु. एक महिन्याने अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात.

इ. स. १४९२ च्या सुमारास श्वेतवर्णीयांना या पक्ष्याची माहिती मिळाली. याचे मांस स्वादिष्ट असल्यामुळे त्यांनी याची बेसुमार हत्या केली. यामुळेच काही भागांतून हे पक्षी अजिबात नाहीसे झाले. टर्की फार लवकर माणसाळत असल्यामुळे व मांसाकरिता त्याला फार मागणी असल्यामुळे अमेरिकेत आणि इतर पाश्चात्त्य देशांत टर्कीपालन हा एक महत्त्वाचा धंदा होऊन बसला आहे. आपले जिव्हालौल्य पुरविण्याकरिता इंग्रजांनी टर्कीची भारतात आयात केली, पण टर्की पालनाला आपल्याकडे व्यवसायाचा दर्जा केव्हाही मिळाला नाही.

कर्वे, ज. नी.