शिवाथेरियम : स्तनी वर्गाच्या समखुरी गणाच्या (आर्टिओडॅक्टिलाच्या) जिराफिडी कुलातील एक नामशेष झालेला प्राणी. हा प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) काळात पृथ्वीवर अस्तित्वात होता. दक्षिण यूरोप, आफ्रिका व आशिया या प्रदेशांत हा विपुल होता. भारतात हिमालयाच्या पायथ्याशी हरद्वारजवळ असलेल्या शिवालिक टेकड्यांमध्ये ह्याचे अवशेष प्रथम आढळले. त्यामुळे ह्याला शिवाथेरियम हे नाव देण्यात आले. त्या अवशेषाचे नाव शिवाथेरियम जायगँटिअम असे आहे.

शिवाथेरियम हे जिराफाचे पूर्वज होत. ते दिसण्यास बरेचसे जिराफासारखे होते. त्यांचे शरीर जिराफापेक्षा वजनदार होते. मान व पाय जिराफापेक्षा थोडे आखुड होते. नराला शिंगांच्या दोन जोड्या होत्या. त्यांपैकी पुढची ललाटास्थीवरील शिंगे लहान व साधी होती, तर पार्श्वकपालास्थीवर असणारी मागची शिंगे मोठी, शाखायुक्त, पसरट व हस्ताकृती होती. शिंगे गळून पडत नसत. शिवाथेरियमाच्या बाकीच्या सवयी जिराफाप्रमाणेच होत्या. क्रमविकासात त्याची शिंगे लहान व साधी झाली.

प्लाइस्टोसीन काळातील जिराफासारखा इंद्रथेरियम हा प्राणी खरोखरीच शिवाथेरियमाच्या मादीसारखा असावा. तो शिवाथेरियमापेक्षा लहान असून त्यांच्या कवट्यांमध्ये फरक आढळले पण दंतसूत्रात साम्य आढळून आले आहे.

                                                                                                                   

जोशी, लिना