रक्तस्राव:रक्ताभिसरणतंत्राच्या रक्तवाहिन्या या प्रमुख भागातून रक्त (कोशिकांसह-पेशींसह-रक्तद्रव) बाहेर पडण्याला ‘रक्तस्राव’ म्हणतात. रक्तस्राव आघातजन्य किंवा विकृतिजन्य असू शकतो. वाहिनीच्या प्रकाराप्रमाणे रक्तस्रावास रोहिणी रक्तस्राव, नीला रक्तस्राव आणि केशवाहिनी रक्तस्राव म्हणतात.शरीराच्या पृष्ठभागाच्या बाहेर होणाऱ्या रक्तस्रावाला बाह्य अथवा दृश्य आणि आत होणाऱ्या रक्तस्रावाला अंतर्गत अथवा अदृश्य अशा संज्ञा वापरतात. रक्तस्रावाचा उल्लेख शरीर भागावरूनही केला जातो उदा., डोक्याच्या कवटीमधील रक्तस्रावाला अंतर्कर्पर रक्तस्राव तर उदरगुहेतील रक्तस्रावाला उदरीय रक्तस्राव म्हणतात. रक्तस्राव जेव्हा शरीराच्या विशिष्ट भागातून होतो तेव्हा विशिष्ट नावाने ओळखला जातो. नाकातून होणारा नासारक्तस्राव, मूत्रातून होणारा रक्तमेह, उलटीतून होणारा रक्तवमन आणि मलातून झाल्यास रक्तमल अशी नावे दिली जातात.

कारणे: आघातजन्य रक्तस्राव वाहिनीस इजा झाल्यामुळे होतो व तो बाह्य किंवा अंतर्गत असू शकतो. अंतर्गत रक्तस्रावाचे निदान करणे कठीण असते. कधी कधी गंभीर ⇨अवसादाची लक्षणे दिसू लागेपर्यंत अदृश्य रक्तस्राव होत असल्याचे लक्षात येत नाही.

विकृतिजन्य रक्तस्रावाच्या कारणांची विभागणी पुढीलप्रमाणे करता येते : (१) वाहिनीभित्तीची चिरकारी (दिर्घकालीन) विकृति उदा., रोहिणी-काठिण्य, रोहिणी-विस्फार. (२) वाहिनीभित्तीची तीव्र विकृति उदा., वाहिनीवरील विषबाधाजन्य (पारा वा आर्सेनिक दुष्परिणाम). (३) रक्ताच्या विकृति उदा., मारक पांडुरोग [⟶ पांडुरोग], क्लथनासंबंधीच्या विकृति [⟶ रक्तक्लथन], श्वेत कोशिकार्बुद (रक्तकर्क).

रक्तनाश: सर्वसाधारणपणे एकूण रक्तघनफळाच्या ३०% पर्यंत रक्तनाश रक्तदाब कमी न होता मानव सहन करू शकतो. बहुतेक प्राणी शरीरवजनाच्या १% वजन भरेल एवढा रक्तनाश सहन करू शकतात, तर ३% वजन भरेल एवढा रक्तनाश सशांना व कुत्र्यांना मारक असतो. ५५% रक्तघनफळाचा नाश बहुतेक कुत्र्यांना मारक असतो. एकाएकी अथवा अकस्मात उद्‌भवणारा रक्तस्राव हळूहळू व वारंवार होणाऱ्या रक्तस्रावापेक्षा अधिक गंभीर असतो.

मानवी जीवनास ३०% पेक्षा जास्त रक्तघनफळाचा जलद नाश धोकादायक असतो. त्यापेक्षा कमी रक्तनाश काही प्रतिपूरक यंत्रणा कार्यान्वित होऊन रक्तघनफळ पूर्ववत करण्याचा शरीर प्रयत्न करते. प्रतिपूरक यंत्रणांची विभागणी (अ) तत्काळ कार्यान्वित होणाऱ्या आणि (आ) कालांतराने कार्यान्वित होणाऱ्या, अशी करता येते.

(अ) तत्काळ सुरू होणाऱ्या : जादा व अकस्मात रक्तघनफळ कमी होताच रक्तदाब ताबडतोब कमी होतो. वाहक क्षेत्रातील रक्त सामावून घेण्याची क्षमता अनेक छोट्या छोट्या वाहिन्यांच्या आकुंचनामुळे कमी केली जाते. यामुळे त्वचा, श्लेष्मकला (आतडी, गर्भाशय इ. नलिकाकार पोकळ्यांचे पातळ पटलमय अस्तर) आदि जीवनावश्यक नसलेल्या शरीरभागांतील रक्त फक्त जरूरीच्या जीवनाश्यक भागांस पुरवले जाते. उदा., मेंदूतील लंबमज्जा भागातील सर्व महत्त्वाच्या केंद्रांना योग्य रक्त पुरवठा केला जातो. या यंत्रणेला ‘पुनर्वितरण’ म्हणतात. रक्तस्रावामुळे अनुकंपी तंत्रिका तंत्रातील [⟶ तंत्रिका तंत्र] प्रतिक्षेपी क्रियांद्वारे उद्दीपित होऊन. (१) रोहिणी आकुंचन, (२) नीला व नीला कोटरांचे आकुंचन आणि (३) हृदक्रिया वाढ (नाडी ७२ वरून २०० पर्यंत वाढू शकते) हे प्रमुख परिणाम होतात. अनुकंपी तंत्रिका तंत्राच्या उद्दीपनामुळे हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रोहिण्यांवर तसेच मेंदूला जाणाऱ्या रोहिण्यांवर परिणाम होत नसल्यामुळे या जीवनावश्यक भागांना नेहमीप्रमाणे रक्त पुरवठा चालू राहतो.

(आ) कालांतराने सुरू होणाऱ्या : यामागे कमी झालेला रक्ताचा द्रव भाग पूर्ववत करण्याचा हेतू असतो. जठरांत्र मार्ग (जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून बनणारा अन्नमार्ग) व आंतरकोशिकीय अवकाश यांतून शक्य तेवढा द्रव रक्तात अभिशोषित करण्याचा जोरदार प्रयत्न केला जातो. केशवाहिन्यांतील द्रव स्थितिकीय दाब (स्थिर द्रवातील एखाद्या बिंदूच्या वर असणाऱ्या द्रवाच्या स्तंभाच्या वजनामुळे उद्‌भवणारा त्या बिंदूपाशील दाब) कमी होऊन ऊतक-द्रव (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहातील द्रव) त्यांत शिरतो. रुग्णास तहान लागण्यामागे ऊतक-द्रव केशवाहिन्यांमध्ये गेल्याची व ऊतक-कोशिकांची द्रव पुरवठा करण्याची मागणी असते. शरीराची जलसंचय पूर्ववत करण्याची तहान ही नैसर्गिक सूचनाच असते.

त्यानंतर काही आठवडे किंवा काही महिने चालणारे अस्थिमज्जादी (लांब हाडांच्या पोकळीतील पदार्थादी) भागांचे कार्य सुरू होते व त्यामुळे कोशिकासंख्या प्राकृतिक बनते. याकरिता लागणारा अवधी रक्तस्रावाचे प्रमाण, व्यक्तीचा आहार व वैयक्त्तिक नुकसान भरून काढण्याची क्षमता यांवर अवलंबून असतो.

आ. १. अपरावर्तनीय रक्तस्त्रावजन्य अवसादावरील रक्ताधान उपचाराची निष्फलता.वरील यंत्रणांशिवाय रक्तवाहिनी तुटलेल्या जागी काही रक्तस्तंभन (रक्तप्रवाह रोखण्याच्या) प्रतिक्रिया सुरू होतात [⟶ रक्तक्लथन].

लक्षणे: रक्तस्राव वाढत गेल्यास लक्षणे गंभीर बनतात. सुरुवातीस रक्तदाब अल्पसा कमी होऊन रुग्ण उभा असल्यास नाडी जलद होते व तो पहुडलेला असल्यास कधी कधी लक्षणविरहित अवस्थाही आढळते.आ. २. शरीरावरील दाब बिंदू : दाबपट्टी वापरावयाचे बिंदू चौकोनाने आणि बोटांनी दाब द्यावयाचे बिंदू बाणांनी दर्शविले आहेत. रक्तदाब कमी होणे, त्वचा व श्लेष्मकला फिकट पडणे, हातपाय गार पडणे ही लक्षणे आढळतात व ती रक्त पुनर्वितरणजन्य असतात. त्यानंतर सर्वांगास घाम फुटणे, नाडी मंदगती होणे, श्वसनक्रिया जलद व उथळ होणे ही लक्षणे आढळतात. अस्वस्थता, मळमळणे व कधीकधी उलट्याही होतात. रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यास अत्यल्प रक्तदाब व वायुक्षुधा ही लक्षणे उद्‌भवतात. शेवटी बेशुद्धी, बाहुली विस्फार व मृत्यू संभवतो. लहान मुले व वृद्ध यांवर प्रौढांपेक्षा अधिक लवकर दुष्परिणाम होतात.

रक्तस्रावजन्य अवसादाला अल्प रक्तघनफळजन्य अवसाद असेही म्हणतात. त्याच्या स्थिर अथवा अप्रगामी आणि प्रगामी अशा अवस्था असू शकतात. एका ठराविक पातळीपर्यंत झालेल्या रक्तस्रावजन्य दुष्परिणामांतून शरीर पूर्ववत बनू शकते. या प्रकाराला ‘अप्रगामी अवसाद’ म्हणतात परंतु पहिली किंवा सुरुवातीची अवसाद अवस्था जादा अवसाद उत्पन्न करते तेव्हा तो अवसाद प्रगामी बनतो. या अवस्थेत जेव्हा ⇨रक्तधान इ. सर्व उपचार फलदायी ठरत नाहीत, तेव्हा तो अवसाद अपरावर्तनीय बनतो व काही मिनिटे किंवा तासांतच रुग्ण मृत्यू पावतो. या अवस्थेत कधीकधी रक्तधानामुळे हृद्क्षेपित रक्त प्रमाण प्राकृतिक बनून रक्तदाबही पूर्ववत होतो परंतु ही सुधारणा अल्पकालीनच असते.


उपचार: उपचारांचा प्रमुख उद्देश रक्तस्राव ताबडतोब थांबवणे व योग्य तेव्हा रक्तधानाने रक्तघनफळ शक्य तेवढ्या लवकर पूर्ववत करणे, हे असतात. रक्त ताबडतोब उपलब्ध नसल्यास रक्तद्रव, अल्ब्युमीन विद्राव किंवा लवणविद्राव (सलाइन) देऊन रक्तघनफळ वाढवता येते. उभ्या किंवा बसलेल्या अंगस्थितीपेक्षा रुग्णास उताणे झोपवणे अधिक हितावह असते कारण या अवस्थेत वर उल्लेखिलेल्या प्रतिपूरक यंत्रणा अधिक परिणामकारक असतात. कधी कधी डोके सर्वांगापेक्षा खालच्या जागी ठेवणे मेंदूतील जीवनावश्यक केंद्रांना योग्य रक्त पुरवठा होण्याकरिता आवश्यक असते.

आ. ३. (अ) हात व पाय यांवरील दाब बिंदू, (आ) पायातील रक्तस्त्राव थांबविण्याकरिता उरुरोहिणीवर (मांडीतील रोहिणीवर) दाब देण्याची जागा.हातापायांतील बाह्य रक्तस्राव तसेच चेहरा व डोके या भागांतील रक्तस्राव थांबविण्याकरिता शरीराच्या विशिष्ट भागी प्रमुख रोहिणीवर दाब देऊन ठेवल्यास (रक्तस्रावाची जागा व हृदय यांच्या दरम्यान) रक्तस्राव थांबवता येतो. या दाब देण्याच्या भागांना ‘दाब बिंदू’ म्हणतात. नासा रक्तस्रवण दोन्ही नाकपुड्या घट्ट दाबून ठेवून थांबवता येते. मान व डोके यांकरिता दर्शविलेले दाब बिंदू तसेच दाबपट्टी नावाचे उपकरण फक्त तज्ञांनीच वापरावे. जखमेतील रक्तस्राव स्वच्छ कापड (निर्जंतुक असल्यास उत्तम) जखमेवर दाबून ठेवल्यास थांबतो.

अंतर्गत रक्तस्राव शरीराच्या कोणत्याही पोकळ भागात किंवा ऊतकात होण्याची शक्यता असते. येथे दोन महत्त्वाच्या अंतर्गत रक्तस्रावांबद्दल माहिती दिली आहे. (१) अंतःप्रमस्तिष्कीय [⟶ मेंदू] रक्तस्राव आणि (२) जठरांत्र रक्तस्राव.

(१) मेंदूच्या प्रमस्तिष्कीय भागात होणारा रक्तस्राव आघातजन्य किंवा विकृतिजन्य असू शकतो. पुढारलेल्या देशांतून डोक्याची इजा हे मृत्यूच्या कारणांमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरील कारण आहे. विकसनशील देशांतून त्याचा मृत्यूच्या पहिल्या दहा कारणांत समावेश होतो. विकृतिजन्य रक्तस्रावाची अनेक कारणे आहेत व त्यांमध्ये अतिरक्तदाब [⟶ रक्तदाब] व रोहिणीआ. ४. नासारक्तस्त्रवण थांबविण्याचा उपाय. विस्फार अथवा विदारण सर्वसाधारणपणे नेहमी आढळतात. आघातजन्य रक्तस्राव कवटीचा आतील पृष्ठभाग व दृढतानिका (मेंदूभोवतालचे सर्वांत बाहेरचे आवरण) यांमध्ये साठण्याची शक्यता असते. याला अंतर्कर्पर रक्तार्बुद म्हणतात.

मेंदूच्या विशिष्ट भागातील रक्तस्राव (उदा., मस्तिष्क सेतूतील रक्तस्राव) अतिशय गंभीर व मारक असतात. मेंदूच्या रक्ताभिसरणासंबंधीच्या विकृतींना प्रमस्तिष्कआ. ५. अंतर्कर्पर रक्तार्बुद : (१) कापलेल्या कवटीची कडा, (२) दृढतानिका, (३) रक्तार्बुद. वाहिनी विकृती म्हणतात. त्यांमध्ये रक्तस्रावाशिवाय वाहिनीक्लथनाचाही समावेश असतो. बेशुद्धी, अंशाघात किंवा पक्षाघात इ. लक्षणे असलेल्या या विकृतीला सर्वसाधारण भाषेत रक्ताघात म्हणतात.

(२) जठरांत्र रक्तस्रावामध्ये रक्तवमन व रक्तमल ही लक्षणे आढळतात. रक्तवमनाच्या रंगावरून जठरातील रक्तस्रावाचा अंदाज करता येतो. रक्तस्राव झाल्याबरोबर उलटी झाल्यास रंग लाल असतो, तर काही वेळानंतर झाल्यास जठरातील हायड्रोक्लोरिक अम्लामुळे तो काळपट होतो. रक्तवमन जठरांत्र मार्गाच्या ग्रहणीपर्यंतच्या (लहान आतड्याचा प्रारंभीच्या सु. २१ सेंमी. लांबीच्या भागापर्यंतच्या) रक्तस्रावाचे निदर्शक असते. प्रमुख कारणांमध्ये ⇨पचनजव्रणाचा समावेश असून १८% जठरव्रण व ३०% ग्रहणीव्रण असे प्रमाण एका पाहणीत आढळले होते. इतर कारणांमध्ये ग्रसनी-कुटिलनीला (घशातील पिळवटलेली नीला) १०% आणि ग्रसनीच्या शेवटास श्लेष्मकला विदारण ७% यांचा समावेश होतो.


जठरांत्र मार्गाच्या खालच्या भागामधील शेषांत्रातील किंवा बृहदांत्राच्या (मोठ्या आतड्याच्या) सुरुवातीच्या भागातील रक्तस्राव बहुधा रक्तमल म्हणून विसर्जित होतो. ६० मिलि.पेक्षा जास्त रक्तस्राव आठ तासांपर्यंत आत राहिल्यास रक्तमल बनतो. कधीकधी लाल रंगाचे रक्तच गुदद्वारातून बाहेर येते. यास ⇨मूळव्याधकिंवा लहान मुलांत गुदद्वारातून आत शिरकवलेली बाह्य वस्तू कारणीभूत असते. यांशिवाय व्रणयुक्त बृहदांत्रशोथ (बृहदांत्राची दाहयुक्त सूज), मोड वा मांसवृद्धी आणि गुदाशयाचा कर्करोग ही रक्तस्रावाची कारणे आहेत.

                रक्तवमन, रक्तमल किंवा रक्तमिश्रित मल ही गंभीर लक्षणे असून त्यांबाबतींत वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असते.

भालेराव, य. त्र्यं.

आयुर्वेदीयवर्णनवचिकित्सा: रक्तस्राव म्हणजे शरीराच्या बाहेर रक्त जाणे. हे एखाद्या रोगाचे लक्षण असते, रोग जेव्हा असतो तेव्हा त्याला रक्तपित्त असे म्हणतात.

रक्तपित्त-शोधनचिकित्सा: नाक, तोंड इ. शरीराच्या वरच्या द्वारांनी रक्त जाते, तेव्हा ओकारीचे औषध द्यावयाचे नसते, त्या वेळेला रेचक द्यावयाचे असते आणि जेव्हा गुद, मूत्रमार्ग व योनिमार्ग ह्या खालच्या द्वारांतून रक्तस्राव होतो, तेव्हा पण रेचक द्यावयाचे नसते, वमन द्यावयाचे असते. वरच्या मार्गाने होणाऱ्या रक्तपित्तस्रावाला ऊर्ध्वग रक्तपित्त म्हणतात व खालच्या शोधन मार्गाने होणाऱ्या रक्तपित्तस्रावाला अधोग रक्तपित्त म्हणतात. ह्या विकारांतील दोष उलट्या मार्गाने काढावयाचे असतात.

वरच्या मार्गांतून रक्तस्राव होत असेल, तर विरेचनानंतर उपवास द्यावा आणि त्या उपवासात नागरमोथा, चंदन, वाळा, काळा वाळा आणि पित्तपापडा ह्यांचे पाणी पिण्याला द्यावे. नंतर लाह्यांचे पाणी, मुगादिकांचे कढण, जवाची पेज देऊन मुख्य अन्नावर आणावे आणि नंतर कडू व तुरट रसाची औषधे द्यावीत. मंदाग्नी असून अम्लिच्छा असेल, तर आंबट डाळिंब किंवा आवळकठी घालून कढणे वगैर द्यावीत.

थंड व हलक्या भाज्या आणि द्विदल धान्ये द्यावीत, फळांचे रस द्यावे. द्राक्षे, आवळकठी, फालसा इ. पित्तघ्न फळांचा रस द्यावा. मध, पाणी द्यावे, लघुपंचमूलांनी सिद्ध केलेले पाणी द्यावे. चाकवत, चाकवतामध्ये सशाचे मांस व अंबराच्या काढ्यामध्ये तित्तिराचे मांस शिजवून खाण्याला द्यावे. रक्तस्राव फार होत असेल, तर रुक्ष प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचे (हरिण, ससा, शेळी इ.) रक्त मध घालून पाजावे किंवा शेळीचे कच्चे यकृत पित्तासुद्धा खायला द्यावे. अडुळशाचा काढा प्यायला द्यावा. मध व साखर घालून किंवा अडुळशाच्या रसाबरोबर गव्हला, काळी माती, रसांजन व मध द्यावे. नुसत्या अडुळशाचा रस मध व साखर घालून द्यावा. अडुळसा हा ताबडतोब रक्त थांबवतो. त्याचे ते श्रेष्ठ औषध आहे. पळसाच्या सालीचा काढा साखर घालून किंवा गाय व घोडा ह्यांच्या शेणाचा रस मध व तूप घालून थंड द्यावा.

घशातून रक्त जात असेल आणि ते कफयुक्त व बुळबुळीत असेल, तर निळ्या कमळाचा क्षार मध व तुपातून चाटवावा.

जाणाऱ्या रक्तात गाठी असतील, तर पारव्याची विष्ठा मधाबरोबर चाटवावी, नाकातून रक्तस्राव होत असेल, तर दूध व खडीसाखर, पाणी व खडीसाखर किंवा नुसते पाणी घालून तसेच डाळिंबाच्या फुलांचा रस, आंब्याच्या कोयीचा रस नाकात घालावा. पूर्वीचे योग दूध, उसाचा रस वगैरे घालून पोटात द्यावेत. ह्या उपचाराने कफ कमी झाला, अग्नी चांगला असला, रक्तस्राव थांबत नसेल, तर अशा वातभूयिष्ट अवस्थेत शेळीचे किंवा गाईचे दूध पाच पट पाण्यात लघुपंचमूलाने सिद्ध करून खडीसाखर व मध घालून द्यावे.

सिद्धौषधीचिकित्सा:मौक्त्तिक, प्रवाळ, सुवर्णमाक्षिक, कामदुधा, मुक्ताशुक्ती, गोदंती भस्म ही औषधे मध व खडीसाखर ह्यांच्या बरोबर द्यावीत.

रक्तस्राव चालू असता शंखभस्म सारखे चाटवावे. दीर्घकालपर्यंत रक्तस्राव होत असेल, तर आणि रक्त क्षीण झाले असेल, तर सुवर्णमाक्षिक भस्म जोडीला द्यावे.

अधोग रक्तपित्त : वमनावस्था : गेळफळ, लाह्यांचे तरवणे, खडीसाखर, मध ज्येष्ठमधाच्या पाण्याबरोबर, दुधाबरोबर किंवा उसाच्या रसाबरोबर द्यावे. वमन झाल्यानंतर शुद्धी झाल्यानंतर, कमळ, निळे कमळ यांचे केसर, पिठवण, गव्हला, तसेच काळा वाळा, लोध्र, दोन्ही लोध्र, सुंठ, तांबडे चंदन किंवा वाळा, धायटीची फुले, बेलाचा मगज व धमासा ह्यांची पेया (पेज) तयार करून द्यावी. रुक्ष प्रदेशांतील प्राण्यांचे शीतवीर्य, मांस द्यावे. त्या मांसाची पेया करून द्यावी. त्याचप्रमाणे साखर व मध घालून मांसरस द्यावे आणि रक्तस्रावाने रक्त क्षीण झाले असेल आणि अम्ल घ्यायची इच्छा असेल त्याला डाळिंबासारखे अम्ल घालून किंवा अम्ल घेण्याची इच्छा नसेल, तर अम्ल न घालताना तुपाची फोडणी देऊन साखर घालून पेया द्यावी. त्याचप्रमाणे पिंपरीच्या काढ्यात मोराचे आणि वडाच्या काढ्यात कोंबड्याचे मांस शिजवून द्यावे. त्याचप्रमाणे पडवळ, मालती, निंब, दोन्ही चंदन, पद्‌मकाष्ठ तसेच रोध्र अडुळसा, तांदूळजा, काळी माती, मेंदी तसेच शतावरी दोन्ही काकोली (कावळ्या), अनंतमूळ व ज्येष्ठमध ह्या तीन काढ्यांपैकी योग्य तो काढा मध व साखर घालून द्यावा.

गुदमार्गाने रक्तस्राव होत असेल, तर मोचरसाने सिद्ध असे दूध किंवा वडाच्या पारंब्या, वडाची कोवळी पाने किंवा सुंठ, वाळा, निळे कमळ ह्यांनी सिद्ध केलेले दूध द्यावे. रक्तातिसार व रक्ती मूळव्याध ह्यांची चिकित्सा ह्या ठिकाणी करावी, बस्ती द्यावा. वर सांगितलेले काढे दूध घालून द्यावे. दुधाबरोबरच जेवण करावे. जीर्ण विकार असेल, तर ह्यांच्या कषायांनी तूप तयार करून द्यावे.

लघवीच्या मार्गाने रक्तस्राव होत असेल, तर गोखरू शतावरी तसेच साठवण, पीठवण, रानमूग, रानउडीद ह्यांनी सिद्ध दूध द्यावे. म्हणजे बस्तीतल्या वेदनाही कमी होतात.

त्वग्‌गत रक्तस्राव : जरूरीप्रमाणे दोन्ही तऱ्हेच्या रक्तपित्तांवर विशेषतः त्वचेमधून होणाऱ्या रक्तस्रावावर वरची चिकित्सा करून शीत वीर्य, कडू औषधांचा लेप, त्यांनी सिद्ध केलेल्या तेलाचा अभ्यंग, उटणी वगैरेंचा उपयोग करावा किंवा लेप, उटणी यांनी सिद्ध केलेल्या तेलाने अभ्यंग करावा. पित्त ज्वराचे सर्व उपचार बाह्य व अंतरोपचार तसेच क्षतक्षीणांत सांगितलेले उपचार करावेत.

पटवर्धन, शुभदा अ.

संदर्भ : 1. Guyton, A. G. Textbook of Medical Physiology, Tokyo.1976.

    2. Macleod, J. Ed. Davidson’s Principles and Practice of Medicine, Hongkong, 1984.

    3. Petersdorf, R. G. and others, Ed. Harrison’s Principles of Internal Medicine, Tokyo, 1983.

    4. Scott, R. B. Ed. Price’s Textbook of the Practice of Medicine, Oxford, 1977.