होला : कोलंबिफॉर्मिस गणाच्या कोलंबिडी पक्षिकुलातीलकबूतरपारवा या दोहोंशी पुष्कळ साम्य असलेला पक्षी. भारतात याच्या लाल होला (स्ट्रेप्टोपेलिया ट्रँक्विबारिका) : नर (♂) व मादी (♀).चार-पाच जाती आढळतात. त्यांपैकी ठिपकेदार होला व लाल होला यांचा आढळ सर्वत्र असून इतर जाती काही प्रदेशांपुरत्या मर्यादित आहेत. 

 

ठिपकेदार होला : याचे शास्त्रीय नाव स्ट्रेप्टोपेलिया चायनेन्सिसअसे आहे. तो श्रीलंका, म्यानमार, थायलंड, मलाया द्विपकल्प, सुमात्रा, चीन आणि भारतामध्ये सर्वत्र आढळतो परंतु वायव्य भागातील रखरखीत प्रदेशांत तो दिसून येत नाही. हिमालयाच्या पायथ्यापासून सु. १,५२५ मी. उंचीपर्यंत तो आढळतो. 

 

होला पक्षी साळुंकीपेक्षा मोठा आणि पारव्यापेक्षा काहीसा लहानअसतो. त्याची लांबी सु. ३० सेंमी. असून डोके करड्या रंगाचे असते. शरीराच्या वरच्या बाजूचा रंग तपकिरी व करडा असून त्यावर पांढरे ठिपके, मानेच्या दोन्ही काळ्या बाजूंवर पांढरे ठिपके, पंखांच्या बाहेरच्या कडा राख्या रंगाच्या, तर डोळ्याभोवतालची कातडी तांबूस रंगाची असते. चोच मळकट काळी आणि पाय जांभळट लाल रंगाचे असतात. नर व मादी दिसायला सारखेच असतात. यांचा जोडा किंवा दोन चार जोडप्यांचा कळप असतो. होला पक्षी धान्य, फळे व बिया खातो. तो कापणी झालेली शेते, रस्ते, खेड्यांच्या आसपासची जागा, बाग व अंगण इ. ठिकाणी आढळतो. तो कू-कू-कूऽऽ उर-रू-उऽऽ असा आवाज काढतो. नर-मादीचा जोडा जन्मभर टिकतो. झाडांवर, झुडपांवर, घराच्या वळचणीला किंवा तुळईवर घरटे बनविलेले असते. मादी प्रत्येक वेळेस दोन पांढरी अंडी घालते. अंडी उबविण्याचे काम दोघेही करतात. अंडी उबविण्याचा कालावधी १४–१९ दिवसांचा असतो. नर दिवसा, तर मादी रात्री अंडी उबविते. विणीच्या हंगामात नर व मादी यांच्यात विशिष्ट ग्रंथीची वाढ होऊन त्यांमध्ये दाट दुधासारख्या द्रव्याचा स्राव तयार होतो. पिले जन्मानंतर मातापित्याच्या चोचीत चोच घालून पहिले ६-७ दिवस हे दूध पितात. याची नैसर्गिक अधिवासामध्ये (जंगलात) आयुर्मर्यादा १–४ वर्षे आहे. याची वीण वर्षभर चालू असते. 

 

लाल होला : याचे शास्त्रीय नाव स्ट्रे. ट्रँक्विबारिका असे आहे. ही जाती साळुंकीपेक्षा थोडी मोठी लांबी सु. २३ सेंमी. असून नर व मादी दिसायला वेगवेगळे असतात. नराचे शरीर तपकिरी रंगाचे मानेच्या मागच्या भागाभोवती काळा पट्टा पंख तांबूस शेपटीची कडेची पिसे पांढरीआणि मधली तपकिरी रंगाची असतात. मादी फिकट तपकिरी वकरड्या रंगाची असून पंख तांबूस नसतात. तिच्या मानेभोवती नराप्रमाणे काळा पट्टा असतो.

  

लाल होला वृक्षवासी असून त्याचा आढळ जंगलात, झुडपांत, उसाच्या शेतांमध्ये असतो. तो क्रू-उ-उ-उऽऽ किंवा गू-गू-गूऽऽ असा आवाजकाढतो. ठिपकेदार होल्याप्रमाणे याची वीण वर्षभर चालू असते आणिघरटे त्याच्या घरट्यासारखेच, परंतु नेहमी झाडावर फांदीच्या टोकाशीअसते. मादी प्रत्येक वेळेस दोन पांढरी अंडी घालते. 

 

इतर काही जातींमध्ये लाल टरट्ल होला (स्ट्रे. ओरिएंटॅलिस), लाल कॉलर असलेला होला (स्ट्रे. रिसोरिया) व लहान तपकिरी होला (स्ट्रे. सेनेगलेन्सिस) यांचा समावेश होतो. 

 

संदर्भ : Whistler, H. Kinnear, N. B. Popular Handbook of Indian Birds,      London, 1963. 

कर्वे, ज. नी.

 

ठिपकेदार होला (स्ट्रेप्टोपेलिया चायनेन्सिस) लाल होला (स्ट्रेप्टोपेलिया ट्रँक्विबारिका)