लंडन-१ : ग्रेट ब्रिटनची (युनायटेड किंग्डमची) राजधानी, देशातील एक प्रमुख बंदर, महत्त्वाचे व्यापारी, राजकीय, औद्योगिक तसेच सांस्कृतिक केंद्र व जगातील जुने ऐतिहासिक शहर. ‘ग्रेटर लंडन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाचे क्षेत्रफळ १,५८० चौ.किमी. असून लोकसंख्या ६७,७५,२०० होती (३० जून १९८६). ‘सिटी’ (शहर) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या भागाचे क्षेत्रफळ फक्त २.५ चौ. किमी. आहे. १ एप्रिल १९६५ पासून ग्रेटर लंडनची निर्मिती करण्यात आली. हे शहर देशाच्या आग्नेय भागात टेम्स नदीच्या काठावर, मुखापासून आत सु. ६५ किमी.वर वसले आहे.

टेम्स नदीखोऱ्याचा ‘लंडन बेसिन’ म्हणून ओळखला जाणारा हा भाग अंडाकृती असून चुनखडीच्या खडकांनी बनला आहे. या खडकांत इओसीन काळातील घट्ट खडक, वाळू, गाळाची माती इत्यादींचे मिश्रण आढळते. लंडनच्या सुरुवातीच्या वसाहती खडीच्या टेकड्यांवर झाल्या आणि गाळाच्या मातीचा उपयोग अनेक शतके विटा तयार करण्याकरिता झाला.

लंडनचे जानेवारीत सरासरी तापमान ३ से. व जुलैमध्ये २२.५ से. असते. येथे वार्षिक सरासरी ६० सेंमी. पाऊस पडतो परंतु त्याचे प्रमाण फार अनियमित असते. प्रदूषणावर उपाय म्हणून १९५६ मध्ये करण्यात आलेला ‘क्लीन एअर ॲक्ट’ फार प्रभावी ठरून हिवाळ्यात हवेतील दृश्यता १.६ किमी. पासून ६.४ किमी. इतकी वाढली आहे व धुराचे प्रमाणही कमी झाले आहे.

लंडनच्या नावाविषयी वेगवेगळ्या उपपत्ती सांगितल्या जातात. येथील मूळ रहिवासी लंडनर यांच्यावरून यास लंडन नाव पडले असावे असे सांगतात, तर टेम्स नदीवर रोमनांनी बांधलेल्या बंदराच्या लंडिनियम या नावावरून लंडन हे नाव पडले असेही मानले जाते. मॉन्मथचा जॉफी (इंग्लिश लेखक) याच्या मते लड राजाने शहराभोवती भिंती बांधल्याने त्याच्या नावाशी लंडनचा संबंध जुळतो. लॉफ्‌टीने हा शब्द केल्टिक ‘लायडीन’ (तलावातील किल्ला) यावरून आल्याचा तर्क बांधला आहे. जुन्या आयरिश भाषेतील लाँड म्हणजे रानटी, शूर या शब्दापासून लंडन शब्दाचा उगम झाला आहे असे एकवॉलचे मत आहे. फार प्राचीन काळापासून टेम्स नदीचा अंतर्गत वाहतुकीकरिता वापर होत असे. रोमन लोक ग्रेट ब्रिटनमध्ये येण्यापूर्वी (इ. स. ४३) सु. दोन हजार वर्षे सांप्रतच्या लंडन परिसरात शेतीप्रधान समाजव्यवस्था असल्याचा पुरावा सापडतो.


बिग वेन मनोऱ्यासह संसदभवनाचे दृश्यज्याच्या आज्ञेवरून रोमन सैन्याने इंग्लंडवर स्वारी केली, त्या रोमन सम्राट क्लॉडियसच्या मनात ‘कॅम्यलोड्यूनम’ (सध्याचे कोलचेस्टर) ही राजधानी करण्याचे होते. इंग्लिश खाडीवरील बंदरापासून या ठिकाणी जाणाऱ्या खुष्कीच्या मार्गावर टेम्स नदीला वॉल्व्रुक हा ओहोळ जेथे मिळे, तेथे रोमनांनी पूल बांधला. पुलाच्या उत्तरेला लष्कराची रसद साठविण्याकरिता आताच्या कॉर्नहिलवर जी वसाहत स्थापन झाली, तीच लंडनची सुरुवात होय. त्या काळी टेम्स नदी आतापेक्षा जास्त रुंद होती. परिणामी जहाजे या बंदरापर्यंत थेट येऊ शकत. कालांतराने कोलचेस्टर स्पर्धेत मागे पडले आणि लंडनने या प्रांताचे दळणवळण केंद्र व मुख्यालय, तसेच बंदर म्हणून आघाडी घेतली. इ. स. २०० च्या सुमारास शहराभोवती संरक्षक भिंत उभारली गेली. रोमनकालीन अवशेष शहरात अजूनही दिसतात.

रोमन सैनिकांनी ४१० मध्ये ग्रेट ब्रिटन सोडले. लंडनमध्ये स्थायिक झालेल्या स्थानिक ब्रिटन लोकांनी परदेशी व्यापार चालू ठेवला. रोमन काळानंतर जर्मन टोळ्यांनी लंडनवर आक्रमण केले. ८२५ च्या सुमारास लंडनवर ताबा असलेल्या सॅक्सन राजांनी इंग्लंडच्या बऱ्याच भागावर नियंत्रण मिळवून एक राज्य निर्माण केले. अँग्लो-सॅक्सन काळात सु. एक शतक लंडन नगण्य होते, तरी व्यापार सुरू होता आणि त्यामुळे शहराची भरभराट होऊन त्याचा विस्तार झाला. वेसेक्सचा राजा एजवेर्क्टचा नातू आल्फ्रेड द ग्रेट (८४९-९९) व डेन लोकांच्या युद्धकाळात लंडन हे प्रमुख केंद्र ठरले. आल्फ्रेडने ८८६ मध्ये लंडनवर कबजा केला. एडवर्ड द कन्फेसरने अकराव्या शतकाच्या मध्यावर लंडनच्या नैर्ऋत्येला ३ किमी.वर एक राजवाडा व नॉर्मन चर्च बांधले. वेस्टमिन्‌स्टर शहराची ही सुरुवात होती. राजवाडा ‘वेस्टमिन्‌स्टर पॅलेस’ व चर्च ‘वेस्टमिन्‌स्टर ॲबी’ या नावांनी प्रसिद्धी पावले.

शहराच्या भावी प्रगतीचा पाया १०६६ मध्ये नॉर्मन ड्यूक विल्यम द काँकरर याच्या स्वारीच्या वेळी घातला गेला. त्याने इंग्लंडच्या राजाचा पराभव करून इंग्लंडवर स्वामित्व प्रस्थापित केले आणि शहराच्या संरक्षक भिंतीच्या बाहेर टॉवर ऑफ लंडनमधील श्वेत मनोरा (व्हाइट टॉवर) हा मध्यवर्ती भाग बांधला. पुढे जवळजवळ प्रत्येक राजाच्या कारकीर्दीत या टॉवरभोवती तटबंदी व इमारती यांचे बांधकाम करण्यात आले. सांप्रत टॉवर ऑफ लंडनने सु. ७ हे. जागा व्यापली आहे. पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीपर्यंत (१६०३-२५) राजाचे निवासस्थान येथे होते. टाकसाळ, वेधशाळा, शस्त्रागार इ. या भागात होते. राजकीय कैद्यांना येथे ठेवले जात असे. दुसऱ्या महायुद्धात येथे ठेवलेला रूडॉल्फ हेस हा शेवटचा जर्मन कैदी होय. इंग्लिश इतिहासात बऱ्याच उच्च राजकीय कैद्यांना झालेल्या मृत्यूदंडाची शिक्षा येथे अंमलात आणली गेली.


लंडनच्या वाढत्या भरभराटीने आकर्षित होऊन डॅनिश, जर्मन, फ्लेमिश आणि इटालियन येथे स्थायिक झाले. ११३६ मधील अग्निप्रलयात नष्ट झालेल्या लाकडी घरांची जागा दगडी घरांनी घेतली. दक्षिण इटालियनांनी सावकार म्हणून आपले बस्तान बसविल्यावर, ज्यू लोकांची शहरातून हकालपट्टी झाली (१२९०). जसजसा व्यापार वाढू लागला तसतसे व्यापारी संघ (गिल्ड) प्रभावी ठरू लागले. राजकारणामध्येही त्यांचा प्रभाव दिसून आला. स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन करून राजाच्या शासनाऐवजी लंडन शहराकरिता महापौरपद निर्माण केले गेले. सामान्य परिषदेची (कॉमन कौन्सिलची) १३३२ मध्ये स्थापना झाली. पंधराव्या शतकाच्या मध्यापर्यंत इंग्लंडमध्ये जेव्हा पेचप्रसंग निर्माण होऊन राज्यात अशांतता माजे, तेव्हा तिचे शहरात पडसाद उमटू नयेत, या दृष्टीने शहराकरिता स्थिर प्रशासन स्थापन करण्याकडे कल होता.

प्रसिद्ध बकिंगहॅम राजवाडाट्यूडर काळात शहराचा विकास झपाट्याने झाला. १६०५ मध्ये भिंतींनी बंदिस्त असलेल्या शहर भागातील लोकसंख्या ७५,००० पर्यंत पोहोचली, तर या भिंतींच्या बाहेर सु. १,२५,००० माणसे राहत असत. शहरातील वेस्ट एंड भाग विकसित होऊ लागला. लंडन व वेस्टमिन्‌स्टर ही शहरे एकमेकांत विलीन झाली. या दोन शहरांमध्ये सरदार आणि उमराव यांची घरे होती. आठव्या हेन्रीच्या मृत्यूनंतर इंग्लंडची संसद वेस्टमिन्‌स्टर पॅलेसमध्ये भरू लागली. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत (१५५८-१६०३) लंडन हे जगातील पहिल्या क्रमांकाचे व्यापारी केंद्र बनले.

इंग्लंडच्या यादवी युद्धात लंडनने राजेशाहीच्या विरोधात पार्लमेंटच्या पक्षाला आपला पाठिंबा दिला पण अल्पावधीत पुन्हा राजाचे (दुसरा चार्ल्स) स्वागत केले. प्लेगने १६६५-६६ मध्ये सु. एक लाख नागरिकांचा बळी घेतला. १६६६ मध्येच अग्निप्रलयाने प्राणहानी झाली नसली, तरी सु. ८०% शहर जळून नष्ट झाले. पुढील काही दशके शहराच्या पुनर्बांधणीत गेली. सेंट पॉल कॅथीड्रल, केन्झिंग्टन राजवाडा, ग्रिनिचची वेधशाळा इ. इमारती या काळातच उभारल्या गेल्या. व्यापारी संस्थांनी हळूहळू आपापल्या व्यवहारांत स्थैर्य आणून स्वतःला सावरले व ते शतक संपेपर्यंत लॉइड्स इन्शुअरन्स कंपनी (१६८०), बँक ऑफ इंग्लंड (१६९४), लंडन स्टॉक एक्स्चेंज (१७००) यांसारख्या मातबर संस्थांची स्थापना झाली. पुढील शंभर वर्षांत लंडनची वाढ दिशाहीन होती.


मूळ रेखावृत्तावर घड्याळ असलेली जुनी वेधशाळा, ग्रिनिच.

औद्योगिक क्रांतीनंतर १८२० च्या सुमारास लंडनमध्ये ११ लाख माणसे राहत होती. येथे अनेक कारखाने स्थापन झाले खरे, पण लंडनची प्रमुख भूमिका कारखान्यांमधील उत्पादित मालाची बाजारपेठ ही होती. शहर विभागातून पैसा हाती खेळू लागल्यावर श्रीमंतांचे लक्ष वेस्ट एंडकडे वळले. औद्योगिक क्रांतीच्या काळात लंडनच्या काही भागावर दैन्यावस्था पसरली. कारखाने, गोद्या आणि गुदामे यांत काम करणारे सर्वसामान्य मजूर गरीब होते. ईस्ट एंड भागातील वस्ती गरिबांची होती व हा भाग गर्दीचा आणि अस्वच्छ तसेच बकाल होता.

एकोणिसाव्या शतकामध्ये जगातील या प्रथम क्रमांकाच्या शहरात सुधारणा घडवून आणण्याचे अनेक उपक्रम हाती घेतले गेले. पोलीसदल (१८२९), गॅसचे दिवे (१८१२), मोठी बसऑम्निबस (१८२९), लोहमार्ग (१८३९), पूल, भुयारी रेल्वे (१८९०) या सुविधा, स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी कायदा (१८५५), १८७० चा शैक्षणिक कायदा आणि लंडन काउंटीची स्थापना व त्याच्या प्रशासनाकरिता कौन्सिलची स्थापना (१८८८) यांमुळे लंडनची चौफेर प्रगती झाली. विशेषतः वाहतुकीची जलद साधने वापरात आल्यावर उपनगरे वाढू लागली.

लंडनच्या शहर भागाची १९०१ मध्ये फक्त २७,००० लोकसंख्या होती पण लंडन काउंटीची लोकसंख्या ४५ लाख एवढी झाली. या शतकात दोन्ही महायुद्धांत शहराची प्रचंड हानी झाली. विशेषतः दुसऱ्या महायुद्धात जर्मन वायुसेनेच्या ‘लंडन ब्ल्टिझ’ या मोहिमेत सप्टेंबर १९४० ते मे १९४१ यांदरम्यान रोज रात्री बाँबफेक होई व तीमध्ये बहुतांशी लंडन बेचिराख झाले.

दुसऱ्या महायुद्धानंतर लंडनच्या नगर नियोजनाच्या नव्या योजना आखल्या गेल्या. शहरातील पडलेल्या आणि उद्‌ध्वस्त भागांची पुनर्बांधणी, साउथ बँक भागाचा विकास, लंडन शहराभोवती मोकळा हरित पट्टा व त्या पट्ट्याबाहेर नव्या शहराची योजना आणि आखणी असे चार प्रमुख भाग या नियोजनात होते. मध्यवर्ती लंडनमध्ये गगनचुंबी इमारती उभ्या राहू लागल्या. जुन्या लंडनच्या काउंटीची जागा बृहन्‌लंडनने (ग्रेटर लंडनने) घेतली. येथील प्रशासनाला ग्रेटर लंडन कौन्सिल जबाबदार आहे. शहराची विभागणी ३२ बरोंमध्ये केली आहे. प्रत्येक बरोची स्वतंत्र निर्वाचित स्थानिक स्वराज्य संस्था असून तिचा मुख्य महापौर असतो. यांशिवाय शहर भागाचे प्रशासन कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ लंडन हे कोर्ट ऑफ सिटी कौन्सिलमार्फत करते.लॉर्ड मेयर हे याचे प्रमुख प्रशासक आहेत. शहर भागाव्यतिरिक्त पोलीस नियंत्रण महानगरीय पोलीस दलाद्वारे होते. शहर भागाचे स्वतंत्र पोलीसदल आहे.


शहराचे मध्यवर्ती लंडन आणि बाह्य लंडन असे दोन मुख्य भाग असून मध्यवर्ती लंडनचे (क्षेत्रफळ २६ चौ. किमी.), शहर (सिटी), वेस्ट एंड व साउथ बँक हे तीन उपविभाग पाडता येतात. शहर व वेस्ट एंड हे उपविभाग साउथ बँकशी नवा लंडन ब्रिज, टाउन ब्रिज व वेस्टमिन्‌स्टर ब्रिज यांनी जोडले गेले आहेत.

शहर भाग लंडनचा सर्वांत जुना भाग असला, तरी आज तेथे नव्या गगनचुंबी आढळतात. बँका व व्यापारी संस्थांची कार्यालये असणारा हा भाग आर्थिक उलाढालीचे मोठे केंद्र आहे. सेंट पॉल कॅथीड्रल, गिल्डहॉल या ऐतिहासिक इमारती याच भागात आहेत.

शहर भागाच्या पश्चिमेला वेस्ट एंड हा भाग आहे. ‘स्ट्रँड’ या शहरातील एका जुन्या आणि गजबजलेल्या रस्त्याने हे दोन भाग एकमेकांशी जोडले गेले आहेत. वेस्ट एंडमध्ये शासकीय कार्यालये, किरकोळ व्यापाराचे केंद्र (ऑक्सफर्ड स्ट्रीट, पिकॅडिली सर्कस, नाइट्‌सब्रिज) असून शहरातील श्रीमंत वस्ती येथेच आहे. वेस्ट एंडमधील जुन्या वेस्टमिन्‌स्टर शहराच्या क्षेत्रात संसदगृह, पंतप्रधानांचे निवासस्थान (१०, डाउनिंग स्ट्रीट) आणि बकिंगहॅमचा राजवाडा या प्रमुख इमारती आहेत. वेस्टमिन्‌स्टर ॲबी, वेस्टमिन्‌स्टर पॅलेस, ट्रफॅल्गर स्क्वेअर, मॅडम तुसोचे मेणाचे वस्तुसंग्रहालय आदी सर्व प्रेक्षणीय स्थळे या भागातच आहेत. पिकॅडिली येथे करमणुकीची साधने व सोहो येथे निशागृहे आहेत.

टेम्स नदी जेथे सर्पाकृती वळण घेते, त्याच्या दक्षिणेला पसरलेला साउथ बँक हा झपाट्याने वाढणारा भाग आहे. लंडनचे काउंटी हॉल (ग्रेटर लंडन कौन्सिलचे मुख्यालय) असणाऱ्या या भागामध्ये १९५१ मध्ये ‘फेस्टिव्हल ऑफ ब्रिटन’च्या निमित्ताने उभारलेली व नंतरही बांधलेली अनेक प्रेक्षागृहे (रॉयल फेस्टिव्हल हॉल, क्वीन एलिझाबेथ हॉल), कलादालने (हेवर्ड आर्ट गॅलरी), नॅशनल फिल्म थिएटर, साउथवर्क (सदर्क) कॅथीड्रल इत्यादीचा समावेश होतो.

टॉवर ऑफ लंडनच्या पूर्वेस ली नदीपर्यंत पसरलेल्या भागाला ‘ईस्ट एंड’ म्हणतात. गोदीजवळ असणाऱ्या या भागामध्ये सुरुवातीपासूनच गरीब लोकांची आणि मध्यमवर्गीयांची वस्ती होती. गेल्या शतकामध्ये परदेशातून येणारे गरीब लोक येथेच येऊन स्थायिक होत. त्यामुळे या भागात अठरापगड जातीचे लोक होते व त्या अनुषंगाने गुन्हेगारी व सामाजिक तणावही होते. कुप्रसिद्ध जॅक द रिपरने येथेच धुमाकूळ घातला होता (१८८८). दुसऱ्या महायुद्धात बाँबवर्षावात या भागाचे अतोनात नुकसान झाले. जुन्या गलिच्छ भागाची सुधारणा होऊन नव्याने घरे बांधली गेली. काही कुटुंबांनी लंडनबाहेर (उपनगरांमध्ये) जाणे पसंत केले. त्यामुळे १९६१ साली या विभागाची लोकसंख्या १९०१ पेक्षा घटली. गेल्या तीन दशकांत येथे भारतीय व पाकिस्तानी नागरिक मोठ्या संख्येने आले तसेच वेस्ट इंडीजमधूनही आले. गोऱ्या वांशिक द्वेषाचे येथे अधूनमधून पडसाद उमटत असले, तरी गोदीच्या विकासाच्या तसेच ईस्ट एंडबाहेर नवे शहर उभारण्याच्या नव्या योजनांमुळे येथे पुन्हा लोक येऊ लागले आहेत.


लंडनमधील उद्योगधंदे प्रामुख्याने पाच ठिकाणी आढळतात. शहर भागाच्या पूर्वेला व उत्तरेला सर्वांत जुने औद्योगिक विभाग आहेत. या विभागांत व्हाइट चॅपेल (कापड उद्योग), क्लर्कनवेल (घड्याळे व दागदागिने तयार करणे) ही दोन मुख्य केंद्रे आहेत. ग्रिनिचपासून टेम्स नदीच्या काठाने पूर्वेकडे पसरलेल्या औद्योगिक पट्ट्यात रसायने व कागद यांचे उत्पादन होते. ली नदीच्या काठावर एन्‌फील्ड, हॅकनी, टॉवर हॅम्लेट्स या बरोंच्या पूर्व सीमेला लागून आणखी एक केंद्र आहे. लंडनच्या पश्चिमेकडील बरोंमध्ये अन्न-उत्पादने आणि घरगुती उपकरणे तयार करणारे अनेक कारखाने आहेत.

बंदर म्हणून लंडन अनेक शतके प्रसिद्ध होते. पहिल्या एलिझाबेथच्या कारकीर्दीत लंडन ब्रिज आणि टॉवर यांमध्ये टेम्सच्या उत्तर काठावर काही बोट धक्के उभारले गेले. वाढत्या वाहतुकीच्या सोईकरिता १६६३ मध्ये नदीच्या दोन्ही बाजूंस बंदर धक्के बांधले गेले. जसजशी परदेशांशी आणि वसाहतींशी व्यापार व प्रवासी वाहतूक वाढू लागली, तसतशी गोद्यांची उभारणी झाली. लंडन बंदराचे तीन भाग पडतात : वेस्ट इंडिया, मिलवॉल व पॉप्लर हा आइल ऑफ डॉग्ज याच्यावरील गोद्यांचा एक गट रॉयल व्हिक्टोरिया, रॉयल ॲल्बर्ट आणि किंग जॉर्ज द फिफ्थ गोदी हा दुसरा गट आणि टिलवरी डॉक्स हा तिसरा गट. १९६० च्या पुढे उत्स्त्रोत भागातील (प्रवाहाच्या वरच्या भागातील) गोद्या बंद केल्या गेल्यानंतर नदीकाठावरील प्रदेशातील (रिव्हरफ्रंट) मालमत्ता लंडन बंदर प्राधिकरणाने विक्रीस काढली. नदीकाठावर असलेल्या जुन्या गुदामांचे शाळा, उपहारगृहे, करमणुकीची केंद्रे इत्यादींमध्ये नूतनीकरण करण्यात आले. या उपक्रमामुळे इतरही भागांचे नूतनीकरण, नदीकाठावरील भागांचे सुशोभीकरण आणि नदीचे प्रदूषण कमी करणे वगैरे योजना कार्यान्वित झाल्या.

बंदराचे आधुनिकीकरण झाल्यावर त्याचे इष्ट परिणाम साहजिकच व्यापारावर होणे अपरिहार्य होते. प्रमाणित पेटी जलवाहतूक पद्धतीने (कंटेनरायझेशन शिपिंग) प्रमाणित पेट्यांद्वारे (कंटेनर्स) व्यापार अधिक सुलभ झाला. शहरामध्ये ५,००० पेक्षा अधिक घाऊक व्यापाराची व ५०,००० पेक्षा अधिक किरकोळ व्यापाराची केंद्रे आहेत. कॉव्हंट गार्डन या घाऊक बाजारपेठेत प्रतिवर्षी सु. ९ लाख टन ताज्या फळांची व भाजीपाल्याची उलाढाल होते.

लंडनची ‘ट्यूब’ ही जगातील मोठी भुयारी रेल्वे मानली जाते. लंडन शहराखालून आणि प्रसंगी टेम्स नदीखालूनही धावणाऱ्या या रेल्वेची एकूण लांबी सु. १६० किमी. आहे. गॅटव्हिक व हिथ्रो या दोन विमानतळांवरून आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक चालते. या दोन्ही विमानतळांवरून प्रतिवर्षी सु. चार कोटी प्रवाशांची वाहतूक चालते. शहरामध्ये उच्च शिक्षणापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध असून १८३६ साली प्रसिद्ध लंडन विद्यापीठाची स्थापना येथे करण्यात आली.


वर उल्लेखिलेल्या महत्त्वाच्या बाबींव्यतिरिक्त शहरातील ब्रिटिश म्यूझीयम, ट्रफॅल्गर स्क्वेअर, हाइड पार्क, केन्झिंग्टन गार्डन्स, इन्स ऑफ कोर्ट, ग्रिनिच वेधशाळा, नॅशनल गॅलरी, लॉर्ड्‌सचे मैदान, रॉयल ॲल्बर्ट हॉल, सिंफनी ऑर्केस्ट्रा, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स ही प्रख्यात संस्था, बिंबल्डन टेनिस स्पर्धा, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) इ. उल्लेखनीय गोष्टी आहेत. सांस्कृतिक दृष्ट्या मोठी ग्रंथालये व संग्रहालये, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, शिल्पकला व चित्रकला यांची दालने इत्यादींमुळे लंडनला सांस्कृतिक वैभव प्राप्त झाले. व्हॉल्तेअर, मॅझिनी, लेनिन यांसारख्या प्रख्यात लोकांना येथे आश्रय मिळाला होता. इंग्रजी साहित्यात अगदी बालगीतापासून ते वर्ड्‌स्वर्थ व सॅम्युएल जॉन्सन यांच्या  कवितांपर्यंत व जॉन स्टो व एच्. जी. वेल्स यांसारख्या साहित्यकारांच्या वेगवेगळ्या गद्य प्रकारांतही लंडन डोकावते.

भारतीय इतिहासाशी तसेच ख्यातनाम भारतीय व्यक्तींशी लंडनचे नाते फार जवळचे आहे. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा व भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू येथील संग्रहालयात आहेत. भारताच्या पारतंत्र्याला कारण ठरलेली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, स्वातंत्र्याकरिता गोलमेज परिषदा व भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा इ. महत्त्वाच्या घटना येथेच घडल्या. श्यामजीकृष्ण वर्मा, हरदयाळ यांच्यासारख्या क्रांतिकारकांचा एक मोठा गट येथेच राहत होता व त्यांच्यापैकी मदनलाल धिंग्रांसारखे तरुण येथेच फाशी गेले. दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या आयुष्यात लंडनला फार मोठे स्थान आहे. भारतीय राजकारणात पुढे आलेले अनेक पुढारी बॅरिस्टर होण्यासाठी अथवा आय.सी. एस्.ची परीक्षा देण्याकरिता येथे येत असत.

संदर्भ : 1. Gorman, Paul, Days out, in and Around London, London, 1986.

          2. Harrison, Michael, London Beneath the Pavement, London, 1971.

          3. Kiek Jonathan, Everybody’s Historic London, London, 1984.

पंडित अविनाश