सरडा : लॅसर्टीलिया (सॉरिया) उपगणातील खवलेयुक्त त्वचेच्या सरीसृपांना (सरपटणाऱ्या प्राण्यांना) सरडा हे सर्वसामान्य नाव दिले जाते. सरडयांचे सापांशी जवळचे नाते असून दोहोंचा समावेश स्क्वॅमेटा गणात करतात. सापेक्षत: आधुनिक व अजूनही पसार पावणाऱ्या स्क्वॅमेटा गणाचा उदय ट्रायासिक कल्पात (सु. २०-२३ कोटी वर्षांपूर्वी) ईओसुचिया या निर्वंश झालेल्या प्राण्यांच्या गटापासून झाला. सापांना पाय नसतात, तर सरडयांना पाय असतात, हा दोहोंतील फरक आहे पण काही सरडयांना पाय नसतात. त्यामुळे साप आहे की, सरडा आहे हे अजिबात ओळखता येत नाही. [→ साप].

इतर अनियततापी (ज्यांच्या शरीराचे तापमान परिस्थितीच्या तापमानाप्रमाणे कमी-जास्त होते अशा) प्राण्यांप्रमाणे उष्ण व उपोष्ण कटिबंधांत सरडयांचा प्रसार विपुल आहे. समशीतोष्ण कटिबंधाच्या उत्तर व दक्षिण सीमांकडे त्यांची संख्या कमी होत जाते. सरडे नेहमी ऊन खातात व त्यांच्या शरीराचे तापमान विशिष्ट पातळीपर्यंत वाढल्याखेरीज ते मोकळेपणाने आपल्या सर्व हालचाली करू शकत नाहीत. सध्याचा कोणताही सरडा खराखुरा जलचर नाही व उडणाराही नाही परंतु सर्व प्रकारच्या पर्यावरणांत राहण्यासाठी व जीवन जगण्यासाठी त्यांचे अनुकूलन झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी आकार, आकारमान व संरचना या बाबतींत अनुरूप अशी खूपच विविधता दिसते. [पहा आकृती].

सरड्यांचे खवले केराटिनयुक्त असतात. खवल्यांचे आकार व आकारमान भिन्न कुलांत वेगवेगळे असतात. जुनी त्वचा गळून तिच्या जागी नियमितपणे नवी त्वचा येते [→निर्मोचन]. चपळ सरडयांत ती खूपच सैल असते. बिळात राहणाऱ्या सरडयांची त्वचा चमकदार व एकमेकांवर बसणाऱ्या खवल्यांमुळे गुळगुळीत असते. खवल्यांच्या पृष्ठाखाली त्वचेत हाडांची संरक्षक तकटे असतात. परिसराप्रमाणे ते आपल्या त्वचेचा रंग बदलतात [→सरडगुहिरा]. त्यांना शिंगे किंवा झालरीसारख्या शिखा ही संरक्षक किंवा क्वचित आक्रमक साधनेही असतात. सरडयांच्या डोळ्यांवर निमेषक पटल असते. तसेच सापांप्रमाणे ‘याकॉबसन अंग’ हा संवेदनशील अवयव असतो.

सरडे सामान्यतः सरपटत चालतात, पण विभिन्न परिस्थितींत त्यांच्या हालचालींत पुष्कळ बदल झालेले दिसतात. मोकळ्या, भुसभुशीत वाळूत राहणाऱ्या सरडयांच्या पायांच्या बोटांमध्ये झालर असते. डोंगरांच्या कडयांवर व वृक्षांवर चढणाऱ्या सरडयांच्या पुढच्या व मागच्या पायांना सामान्यत: काटेरी खवले असतात. वृक्षवासी सरडगुहिऱ्याची बोटे चिमटयाप्रमाणे समोरासमोर येतात व शेपटी पकड घेणारी असते. इग्वानासारखे सरडे भ्यायले असता मागच्या दोन्ही पायांवर पळतात. बिळांत राहणाऱ्या किंवा घनदाट जंगलात राहणाऱ्या सरडयांत बोटे व पाय ऱ्हास पावलेले असतात. त्याच्या जोडीलाच शरीर लांबट, सडपातळ, मान नसणे, डोळ्यांचा ऱ्हास, बाह्य व मध्य कर्णाचा ऱ्हास, छोटी व भक्कम कवटी हेही बदल झालेले असतात. ड्रॅको जातीच्या वृक्षवासी सरडयात कबंधाच्या (धडाच्या) प्रत्येक बाजूस एक दुमडलेल्या झालरीसारखा त्वचेचा भाग असतो. त्यास पटाजियम म्हणतात. त्यास बरगडयांचा आधार असल्याने पटाजियम पसरून हे सरडे हवेत घसरत (विसर्पण करीत) जातात. बचाव म्हणून पुष्कळ सरडे आपली शेपटी गमवितात. राहिलेल्या खुंटापासून पुन्हा शेपटीची पहिल्यासारखी वाढ होते.

आकार, आकारमान आणि संरचना यांमध्ये विविधता असलेल्या सरडयाच्या जाती : (१) पाल, (२) उडणारा सरडा (ड्रॅको), (३) शिंगे असलेला सरडा, (४) गेको, (५) बॅसिलिस्क, (६) नियततापी सरडा, (७) सरडगुहिरा, (८) दंडगोलीय स्किंक, (९) गिला मॉन्स्टर, (१०) काचसर्प.


 बहुसंख्य सरडे कीटकभक्षी आहेत, काही सर्वभक्षी आहेत. इग्वाना व ॲगॅमा सरडे हे शाकाहारी आहेत. भक्ष्य पकडण्यासाठी त्यांना जीभ बरीच लांब बाहेर काढता येते. उदा., सरडगुहिरा.

प्रियाराधनाशी संबंधित द्वितीयक लैंगिक लक्षणे भिन्न कुलांत सर्वत्र आढळतात. समागमाच्या काळात नराचा रंग भडक, चमकदार होतो व सामान्यत: त्याच्या दिमाखाची तृहा साधी असते. नर झटके देऊन डोके असतात. त्या अंडी जमिनीत पुरून ठेवतात व उन्हाने तापून ती उबतात. तथापि काही सरडयांत अंडी फुटण्याच्या काळापर्यंत अंडवाहिनीत ठेवली जातात. अशा वेळी अंडयांच्या कवचाची जागा पातळ, पारदर्शक पापुद्रयाने घेतलेली असते. पिलू अंडदंताने अंडयांचे कवच फोडून बाहेर येते.

सरडयांची १८ कुले असून त्यांत २५००-३००० जातींचा समावेश आहे.

कॅलोटीस कॅलोटीस : (कुल ॲगॅमिडी). हा सरडा आग्नेय आशियात आढळतो. तो सडपातळ, ४५ सेंमी. लांब असून त्याचे डोके टोकदार व शरीर दोन्ही बाजूंनी खूप चापटलेले असते. त्याचे पाय लांब, बारीक शेपटी सामान्यत: लांब असते. ती शरीराच्या एकूण लांबीच्या दोन-तृतीयांश असते. त्याचा रंग पाचूसारखा हिरवा असून मानेच्या काटयावर मोठा चमकदार निळा ठिपका असतो. याची रंग बदलण्याची शक्ती पराकोटीला गेलेली असते. त्याला डिवचल्यास डोके व शरीराचा पुढचा भाग रक्तासारखा लाल होतो व उरलेला शरीराचा भाग बराच काळपट होतो. तो कठीण भुंगेरे फोडून खातो व कीटकांशिवाय लहान सरडेही खातो. तो अपवाद म्हणूनच जमिनीवर येतो, अन्यथा सर्व वेळ झाडांच्या फांदयांवर कसरत करण्यात घालवितो.

कॅलोटीस व्हर्सिकलर : हा ॲगॅमिडी कुलातील सरडा भारत, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, सुमात्रा वगैरे प्रदेशांत आढळतो. किंबहुना दक्षिण आशियात अफगाणिस्तान ते दक्षिण चीन या विस्तृत भागात हा सर्रास आढळतो. भारतात वायव्येकडील काही भाग वगळता तो सर्व देशभर आढळतो. सामान्यत: इंग्रजीत यास गार्डन लिझार्ड, ब्लड सकर किंवा इंडियन चेंजेबल लिझार्ड म्हणतात. त्याला काही वेळा चुकीने ⇨ सरडगुहिरा म्हटले जाते.

बागा, शेते, जंगले यांत झाडाझुडपांवर, कुंपणावर हा सरडा इकडून तिकडे जाताना, ऊन खात अगर सावलीतही आढळतो. त्याची लांबी सु. ३९-४० सेंमी. असून, नर मादीहून थोडा अधिक लांब असतो. शेपटीची लांबी शरीराच्या लांबीच्या सुमारे दोन-तृतीयांश असते. या सरडयाचा रंग वरून करडा-तपकिरी असून त्यात काही गडद तपकिरी पट्टे, ठिपकेही आढळतात. शरीराचा खालचा भाग भुरकट पांढरट किंवा राखाडी रंगाचा असतो. शेपटीवर फिकट तपकिरी वलये आढळतात. परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तो काही प्रमाणात रंग बदलू शकतो. नराच्या गळ्याखाली काळसर, आडवा, दांड्यासारखा पट्टा असतो. विणीच्या हंगामात नरात डोक्याच्या व मानेच्या खालचा भाग शेंदरी (भडक लालसर) रंगाचा होतो, तर मादीच्या कबंधावर प्रत्येक बाजूस एक फिकट पिवळा पट्टा आढळतो. कडक उन्हात त्याचे डोके व मान पिवळसर लाल, शरीर लालसर तपकिरी आणि पाय व शेपटी काळी असते. हा सरडा प्रामुख्याने कीटकभक्षी असून तो उपद्रवी व विषारी नाही. याच्या विणीचा हंगाम मे ते सप्टेंबर असा असतो. मैथुनानंतर मादी जून ते ऑगस्टच्या दरम्यान, जमिनीत सु. १५ ते १८ सेंमी. खोलीवर डझनभर अंडी घालते. अंडी उबून पिले बाहेर येण्यास सु. सहा आठवडे लागतात. पिले १०-१२ महिन्यांत प्रौढ होतात.

पहा : इग्वाना काचसर्प गिला मॉन्स्टर ड्रॅको पाल-२ सरडगुहिरा सरीसृप वर्ग साप.

संदर्भ : 1. Carr, A. F. The Reptiles, 1963.

             2. Scmidt, K. P. Inger, R. F. Living Reptiles of the World, 1957.

जमदाडे, ज. वि.