आर्गोनॉट : मॉलस्का संघाच्या सेफॅलोपोडा वर्गातील आठ बाहू असलेला प्राणी. याला ‘कागदी नॉटिलस’ असेही म्हणतात. याचे शास्त्रीय नाव आर्गोनॉटा आर्गो आहे. हा ð ऑक्टोपसचा जवळचा नातेवाईक आहे. उष्ण कटिबंधातील समुद्रांच्या खोल पाण्यात तो राहातो. विणीच्या हंगामात

आर्गोनॉट

 फक्त रात्री तो पृष्ठभागावर येतो. पोहताना सारख्याच वेगाने तो पुढे मागे जाऊ शकतो. नराच्या शरीरावर कवच नसते पण मादीच्या असते. मादीच्या दोन पृष्ठीय बाहूंच्या स्रावापासून ते तयार होते. बाहूंच्या बुडापर्यंत मादीचे शरीर जरी त्याने झाकलेले असले तरी शरीराचा त्याच्याशी आंगिक संबंध नसतो. ते अतिशय पातळ, पारभासी (दुधी काचेसारखे) व कुंडलित असून त्याच्यावर पन्हळी असतात. त्याची लांबी सुमारे १५ सेंमी. असून आकार जहाजासारखा आणि रंग, पिवळी छटा असलेला पांढुरका असतो. अंडी साठविण्याकरिता त्याचा उपयोग होतो. नराची लांबी सुमारे ३ सेंमी. असते. त्याचे बाहू आखूड असून त्यांपैकी एक विशेषित होऊन जननांगाचे कार्य करतो. त्याला ‘निषेचनांग’ म्हणतात. मैथुनाच्या वेळी शुक्राणुंनी भरलेला हा बाहू नराच्या शरीरापासून तुटून मादीच्या प्रावाराला (धडाला झाकणाऱ्या त्वचेच्या मऊ दुमडीला) चिकटतो आणि त्यामुळे अंड्यांचे निषेचन (फलन) होते.

कर्वे, ज. नी.