वृद्धावस्था : सर्व प्राणिजातींप्रमाणे मानवी आयुष्याची मर्यादाही अनुवंशिकतेने पूर्वनिश्चित असते. अपघात, हत्या, प्राणघातक रोग इत्यादींमुळे मृत्यू न ओढवल्यास व्यक्ती सु. शंभर वर्षे जगते, असे ज्ञात मानवी इतिहासकालापासून आढळले आहे. या आयुर्मानापैकी सु. साठ ते पासष्ट वर्षानंतरच्या काळास वृद्धावस्था असे म्हणतात. शरीराच्या विविध तंत्रांमधील कोशिकांची (पेशींची) कार्यक्षमता व अपायग्रस्त स्थितीमधून पूर्ववत होण्याची समर्थता यांच्या साहाय्याने भौतिक परिसराशी संतुलित अवस्थेमध्ये राहण्याची व्यक्तीची क्षमता जेव्हा कमी होऊ लागते तेव्हा जरण सुरु होते. म्हणजे वाढत्या वयाची लक्षणे दिसू लागतात, असे म्हणता येईल. या अवस्थेतील शारीरिक, मानसिक व सामाजिक बाजूंचा अभ्यास जराविज्ञानामध्ये (जेराँटॉलॉजी) केला जातो आणि वैद्यकीय चिकित्सेचा विचार जराचिकित्सेत (जेराँटोथेरपी) होतो.

वृद्धावस्थेची समाधानकारक व्याख्या करणे कठीण आहे परंतु विशिष्ट कालावधीवर भर न देता वर लिहिल्याप्रमाणे परिसरातील ताणांशी सामना करण्याची कुवत असमाधानकारक होण्याची लक्षणे दृश्यमान होण्यावर बहुतेक सर्व जरावैज्ञानिक भर देतात. या बदलांशी संबद्ध अशी विविध इंद्रियांची कार्यक्षमता स्वतंत्रपणे पाहिली, तर ती निरनिराळ्या गतींनी वयाच्या ३० ते ४० वर्षांपासून हळूहळू कमी होतच असते; परंतु ५० ते ६० वर्षे या वयोगटापासून विविध मानसिक ताण, शारीरिक हालचालींतील बदल आणि मध्यम वयातील आजार यांमुळेही अवनती प्रकर्षाने जाणवते.

वैद्यकीय दृष्ट्या वृद्धावस्थेकडे निराळ्या दृष्टीने पाहण्याची गरज असलेले मुख्यतः दोन वयोगट मानता येतात. साठ ते चौऱ्याहत्तर वर्षे वयाचा पहिला आणि पंच्याहत्तर वर्षापासून पुढील वयाचा दुसरा असे वयोगट. भारतात अशा व्यक्तींचे प्रमाण एकूण लोकसंस्ख्येच्या अनुक्रमे ६.१% आणि ०.८% होते (जनगणना २००१). राहणीमानात पुढारलेल्या व अपेक्षित आयुर्मर्यादा जास्त असलेल्या देशांमध्ये ते अधिक होते उदा., अमेरिकेत ११.७% व ५.२% तर ब्रिटनमध्ये अनुक्रमे १३.८% व ६.८%. कुटुंबनियोजन, आरोग्यविषयक सुधारणा आणि दीर्घकालीन रोगांवर नियंत्रण यांमुळे भारतातील अपेक्षित आयुर्मान (सरासरी ६३.८ वर्षे पुरुषांसाठी ६१.८ वर्षे स्त्रियांसाठी ६४.१ वर्षे) जसे उंचावेल, तसे एकूण वृद्धांचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा अधिक होईल अशी अपेक्षा करता येईल. २००१ साली सु. १०२.८८ कोटी लोकसंख्येपैकी ७.१ कोटी व्यक्ती वृद्धावस्थेतील होत्या. २०५० सालाच्या सुमारास हीच संख्या ३२ कोटी, म्हणजे त्यावेळच्या अपेक्षित लोकसंख्येच्या (१५३ कोटी) जवळजवळ २१% असेल.

वार्धक्याची कारणे : जरणप्रक्रिया कशी सुरु होते, याचा अनेक पातळ्यांवर अभ्यास होत आहे. ऊतकसंवर्धनामध्ये [शरीरापासून वेगळे करुन प्रयोगशाळेत नैसर्गिक वातावरणाच्या प्रतिकृतीत वाढविण्यात आलेल्या कोशिका, ऊतके, अवयव किंवा इतर भागात→ऊतकसंवर्धन] तंतुजन्य कोशिकांच्या विभाजनशीलतेचे [→कोशिका] परीक्षण केल्यास असे आढळते की, काही विशिष्ट विभाजनसंख्येनंतर ही क्रिया थांबते व कोशिका मरु लागतात. तसेच विभाजनशीलतेचा मुळातच अभाव असणाऱ्या तंत्रिका (मज्जा) किंवा स्नायुकोशिकांच्या ऊतकसंवर्धनाचा प्रयत्न केल्यास कोशिकांतर्गत घटक [उदा., डीएनए (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल), एंझाइमे (उत्तेजक स्राव), सूत्रकणिका (कोशिकेसाठी ऊर्जा निर्मिणारे अंग)] हळूहळू कमी होतात व केंद्रकांचे (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अंगाचे) आकारमान लहान होऊ लागते. वार्धक्याचे निर्देशक असे लिपोफ्युसीन हे रंजकद्रव्य कोशिकेत साठू लागते. यावरुन प्रत्येक कोशिकेची विभाजनक्षमता व आयुर्मर्यादा तिच्या जननिक वृत्तांमध्ये (अनुवंशिक माहितीत) साठवलेली असते, असे दिसते.

संपूर्ण शरीरामध्ये प्रत्येक ऊतकातील कोशिकांचे एकंदर शरीराच्या द्रव्यमानाशी असणारे प्रमाण स्थिर असते, त्यासाठी समविभाजनशील कोशिकांच्या संख्येवर कॅलोन नावाच्या द्रव्यांकडून नियंत्रण ठेवले जाते, असे दिसते. या स्वनिर्मित द्रव्यांच्या प्रभावामुळे काही विभाजनशील कोशिकांचे स्थिर कोशिकांमध्ये रूपांतर होते आणि नंतर त्यांच्यातील जरणप्रक्रियेला सुरुवात होते व विशिष्ट कालावधीनंतर कोशिका मरते.

रेणवीय पातळीवरील अभ्यासात असे आढळते की, डीएनएच्या कार्यातील बिघाड व गुणसूत्रांमधील [→गुणसूत्र] च्युती सर्वच कोशिकांमध्ये जरणप्रक्रियेत घडून येते. त्यावरुन कोशिकाजरणाच्या मुळाशी डीएनएच्या आवृत्ती निर्माणातील, आरएनए प्रतिलेखनातील [→आनुवंशिकी] किंवा प्रथिननिर्मितीस मदत करणाऱ्या एंझाइमातील दोष असावेत, असे सिद्धांत मांडले आहेत. डीएनए रेणूंचे एकमेकांशी अनैसर्गिक अनुबंधन हे कारणही यामागे असू शकते. दोषपूर्ण अनुबंधनातून वा प्रतिलेखनातून यदृच्छ उत्परिवर्तने [वारसारूपाने संततीत उतरू शकणाऱ्या वैशिष्ट्यांतील बदल→उत्परिवर्तन] निर्माण होतात व त्यांच्या संचयामुळे कोशिकावार्धक्य होते, अशीही शक्यता आहे. यांशिवाय चयापचयातून निर्माण झालेल्या मुक्त रासायनिक मूलकांनी (स्वतंत्र अस्तित्व नसलेल्या पण रासायनिक विक्रियेत न बदलणाऱ्या अणुसमुच्चयांनी)⇨ऑक्सिडीभवन  घडवून आणल्याने किंवा कोशिकाबाह्य हानिकारक घटकांमुळे (उदा., अल्परक्तता, विषाक्त रेणू, दीर्घकाल उपयोगरहितता) जरणजनक घटकांचे सक्रियण होत असावे, अशीही शक्यता पुढे मांडली गेली आहे.

सार्वदेहिक पातळीवर प्रतिरक्षा यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावते. बालवयात आणि प्रौढांमध्ये कोशिकीय उत्परिवर्तनांचे किंवा इतर यदृच्छ दोषांचे निर्मूलन प्रतिरक्षा तंत्रांकडून होत राहते परंतु वयोमानानुसार या यंत्रणेची कार्यक्षमता ऱ्हास पावते आणि कोशिकीय दोषांचे परिणाम प्रत्यक्षात येतात, असे समजले जाते. बी व टी कोशिकांची प्रतिक्रियाशीलता कमी होण्याबरोबरच आत्मप्रतिरक्षा प्रतिक्रियांचे प्रमाण वाढत जाते. वाढत्या आत्मप्रतिपिंडामुळे काही रोग (उदा., मधुमेह, कर्क, विऱ्हासी रोग) होण्यास मदत होत असावी, असा सिद्धांत आहे. प्रतिरक्षा जटिले वाढत्या प्रमाणात आढळतात. या सर्व बदलांचा यौवनलोपी ग्रंथीची लवकर⇨अपपुष्टी होण्याशी संबंध जोडला जातो. [→रोगप्रतिकारक्षमता]. तांत्रिक तंत्र (मज्जासंस्था) आणि विशेषतः मेंदूचे कार्य यांचा जरानियंत्रणातील भागही आता प्रकाशात येत आहे. प्राणिसृष्टीत मेंदूचे आकारमान व वयोमर्यादा यांचा स्थूलमानाने समसंबंध आढळतो.⇨ मेंदूतील अधोथॅलॅमसाच्या नियंत्रणाखालील ⇨ पोष ग्रंथी  व तिच्याकडून नियंत्रित इतर अंतःस्रावीजन्य हॉर्मोन यांचा वार्धक्यनियंत्रणात महत्त्वाचा वाटा आहे, असे मत अलीकडे मांडले गेले आहे. वार्धक्याचे मूलभूत कारण परिघीय कोशिकांमध्ये असले, तरी त्याचे कार्यान्वयन होण्यास मेंदू व हॉर्मोनांमधील कार्यऱ्हास कारणीभूत होतो, असे दिसते. या दोन्ही घटकांचे साहाय्य शरीरातील अंतर्गत समस्थितीचे संतुलन सांभाळण्यात होत असते व ते कमी झाल्यामुळे ताणजन्य हानीस कोशिका बळी पडतात. अशा ताणवस्थांशी सामना करण्यासाठी शरीरात असलेली भरपूर राखीव क्षमता हळूहळू कमी होत जाते. ही कमतरता सुप्तावस्थेत राहते परंतु एखाद्या तीव्र ताणावस्थेत (उदा., संक्रामणजन्य रोग, मानसिक आघात) तिचा आविष्कार असंतुलित स्थितीमध्ये होतो. अशी दोषपूर्ण समस्थिती, प्रतिरक्षायंत्रणेचा ऱ्हास आणि बाह्य विकृतिकारक किंवा कर्कासारखे रोग यांच्या एकत्रित सामुदायिक परिणामांतून मृत्यू संभवतो [→मृत्यू]. ⇨ क्रमविकासातून निश्चित झालेली प्रत्येक प्राण्याची वयोमर्यादा त्याच्या ऊर्जावापराशीही निगडीत असते. शरीराच्या वजनाच्या प्रतिकिग्रॅ. मागे या ऊर्जेचा वापर जेवढा जास्त (उदा., कीटक, पक्षी, उंदीर) तेवढी वयोमर्यादा कमी, असे व्यस्त प्रमाण दिसून येते.

वृद्धावस्थेचे शरीरावरील परिणाम : निरनिराळ्या ऊतकांची नैसर्गिक जरणशीलता वेगवेगळी असली, तरी सार्वदेहिक वार्धक्य प्रक्रियेचे दुय्यम परिणाम त्यांमध्ये लवकर दिसू लागतात. सर्वसाधारणपणे, ऊतकांमध्ये होणार्याव बदलांचे स्वरुप पुढीलप्रमाणे असते : (१) विभाजनशील व पुनर्जननशील कोशिकांची विभाजनक्षमता घटते. (२) तंत्रिका व स्नायू या विभाजन-अक्षम कोशिकांच्या कार्यक्षमतेचे ऱ्हसन व विघटन आणि मृत्यू होतो. (३) संयोजी ऊतकांमधील कोलॅजेन व इलॅस्टिन या प्रथिनांतील बदलांमुळे लवचिकपणा कमी होऊन काठिण्य वाढते. (४) लिपोफ्युसिनाच्या पिवळ्या कणिकांचे कोशिकांतर्गत संचयन होते. (५) ऊतकसंधारण व प्रतिष्ठापन कमी परिणामकारक होऊन इंद्रियांची कार्यक्षमता ओसरु लागते. (६) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. प्रथिनी ऊतकांची जागा वसा ऊतके घेऊ लागतात. जराजन्य आणि विकृतिजन्य बदलांमध्ये अनेकदा स्पष्ट असा भेद करता येत नाही. अनेक जराजन्य बदल चिकित्सेच्या पद्धतींनी नेहमीच्या वैद्यकीय तपासणींत ओळखले जाऊ शकतात परंतु वैद्यकीय उपचारांनी त्यांचे प्रत्यावर्तन (उलट बदल) करता येत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. विविध इंद्रियांची-विशेषतः हृदय, वृक्क, श्वसनमार्ग यांची-कार्यक्षमता रोगांमुळे कमी होऊ देणे टाळल्यास जराजन्य बदलांची गती काही अंशी कमी करता येते.

विशिष्ट तंत्रांमधील वृद्धावस्थेमुळे होणारे बदल पुढे दिले आहेत:

त्वचा : पातळ, कोरडी, सुरकुतलेली, शिथिल, रंजकद्रव्य पसरल्याने काळवंडलेली दिसते. केस पातळ करडे, विरळ होतात. [→केस; त्वचा].

पचन तंत्र : श्लेष्मल (बुळबुळीत) पटलाची ⇨अपपुष्टी  होते सर्व पाचक स्राव कमी होतात हिरड्यांचे अपसरण होऊन दात सैल होतात व पडतात जबड्याच्या हाडांची अववृद्धी होऊन कृत्रिम दात वापरण्यात अडचण येते दात एका रेषेत नसल्याने चावण्याच्या क्रियेत अडथळा येतो भूक अनियमित व नंतर मंद होते अपचन, बद्धकोष्ठ, परिणामी आहारावर मर्यादा येऊन कुपोषण होते. [→ पचन तंत्र].

श्वसन तंत्र : विविध ऊतकांचे काठिण्य वाढते ऑक्सिजन-ग्रहणाच्या क्षमतेत घट होते, बरगड्यांची हालचाल, लवचिकपणा व संकोचनक्षमता कमी झाल्याने प्रदीर्घ श्वसनधारकता मर्यादित होते. सकेसल (लवयुक्त) अभिस्तर आणि श्लेष्म ग्रंथींची श्वसनमार्ग स्वच्छ ठेवण्याची क्षमता मंदावून संक्रमणाचा धोका वाढतो. [→श्वसन तंत्र].

रक्ताभिसरण तंत्र : रोहिणीकाठिण्य येते महावाहिन्यांची तोंडे अरुंद होतात हृदयावर वाढता ताण येतो, हृद्‌क्षेपित रक्ताचे घनफळ कमी होऊन शरीराच्या श्रम करण्यावर मर्यादा पडतात, लवकर धाप लागते. झडपांची लवचिकता कमी होते, हृद्‌श्रवणात विविध अप्राकृतिक ध्वनी ऐकू येतात, नीला रंदावतात व त्यांना फुगीरपणा येतो, ⇨अपस्फीत नीलांच्या प्रमाणात वाढ होते. [→रक्ताभिसरण तंत्र].

मूत्रमार्ग व जनन तंत्र : वृक्कनलिकांच्या गाळण व उत्सर्जन क्षमतेत घट होते, कार्यान्वित नलिकांच्या संख्येत पूर्ण आयुर्मानात निम्म्याने कपात होते रक्तपुरवठा कमी होऊन मूत्रनिर्मिती कार्याचा उत्तरोत्तर ऱ्हास होतो. राखीव क्षमतेत घट होते, अष्ठीला ग्रंथीची वाढ होऊन सत्तरीच्या पुढे मूत्रमार्गात अडथळ्याची वाढती शक्यता असते, सुप्त कर्काभ बदल होतात. [→मूत्रोत्सर्जक तंत्र]. स्त्री व पुरूष या दोन्हींच्या बाह्य व आतील जननेंद्रियांच्या आकारमानाचा संकोच व बीजनिर्मिती हळूहळू बंद होते. लौंगिक हॉर्मोनांची निर्मिती कमी झाल्याने स्त्रीस्तनाची अपपुष्टी व पुरुषस्तनात थोडी वाढ होते. स्त्रियांमध्ये ४५ ते ५५ वर्षे वयात हळूहळू⇨ऋतुनिवृत्ती येते आणि तज्जन्य लक्षणे, मानसिक ताण निर्माण होतात. [→ऋतुस्राव व ऋतुविकार जनन तंत्र].

इतर हॉर्मोने : पोष ग्रंथिजन्य पोषक हॉर्मोन कमी होऊन त्यामुळे अवटू, अधिवृक्क, जनन इ. ग्रंथींची कार्यात्मक घट होते. परिघीय ऊतकांमधील हॉर्मोनग्राहींची संवेदनशीलता कमी होत असावी, असे इन्शुलिनावरून अनुमान करता येते. त्यामुळे हॉर्मोनांची निर्मिती, रक्तातील पातळी आणि अंतिम परिणाम यांमध्ये सुसंगत संबंध लावणे कठीण होते. [→ग्रंथिद्रव्ये].

कंकाल व स्नायू तंत्र : कॅल्शियम कमी झाल्याने हाडे ठिसूळ होतात अपघताने हाड मोडण्याची वाढती शक्यता असते, कुबड निघणे, उंची कमी होणे, वाकून चालावे लागणे इ. गोष्टी घडू शकतात. सांध्यांची हालचाल मर्यादित होते व लवचिकता कमी होते, ताठरपणा, पाठदुखी, सांधेदुखी ही लक्षणे दिसतात. स्नायूंचे आकारमान व तंतूंची संख्या घटल्याने बल कमी होते प्रचलन, आधार व गुंतागुंतीच्या क्रिया ही कार्ये असमाधानकारक होतात. एकापाठोपाठ एक अशा विविध हालचाली भरभर करणे अशक्य होते. प्रत्येक ऐच्छिक हालचाल सावध व संथ जाणवू लागते. स्नायूंचे एकंदरीत द्रव्यमान कमी झाल्याने शरीरातील एकूण पोटॅशियमामध्ये घट होते. [→कंकाल तंत्र; स्नायू तंत्र].

तंत्रिका तंत्र व ज्ञानेंद्रिये : मेंदूतील कोशिकांगांचे ऱ्हसन, अभिवाही प्रवर्धांच्या संख्येत घट, अनुबंधनी संबंध अकार्यक्षम हे परिणाम होतात. मेंदूचे आकारमान लहान होऊन परिमस्तिष्कीय पटले जाड होतात. [→ मेंदू]. बौद्धिक प्रतिसाद, बुध्दिचापल्य व अमूर्त युक्तिवादाची क्षमता, संवेदनविश्लेषण आणि समाकलनशक्ती क्षीण होतात. स्मृती अल्पकालीन होते व अध्ययनक्षमता पुरी पडत नाही दृष्टिकोनातील ताठरता वाढते आणि वृत्ती आत्मकेंद्रित, अंतर्मुख होऊ लागते. संवेदनांच्या बोथटपणाबरोबरच कृतिकौशल्यातही उणीव निर्माण होते, अचूक सफाईदार हालचालींवर विपरीत परिणाम होतो. स्वायत्त तंत्रिका तंत्रातील ⇨ प्रतिक्षेपी क्रिया  मंदावल्याने अंगस्थितिजन्य रक्तदाब कमी होतो. तापमान निय़ंत्रण अनियमित होते व अंतस्त्यांच्या (हृदय, वृक्क यांसारख्या इंद्रियांच्या) हालचाली असंगत होतात. डोळे खोल जातात, पापण्या शिथिल होतात. अश्रुवाहिनी संकोचामुळे पाणी वाहण्याची सहज शक्यता निर्माण होते, नेत्रजल दाब वाढतो. काचबिंदू निर्माण होऊ शकतो. स्नायू व बंधनींच्या लवचिकतेत ऱ्हास होऊन जवळ पाहण्यासाठी समायोजन शक्ती कमी होते. भिंगांची पारदर्शकता कमी होऊन दृष्टी मंदावते,⇨मोतीबिंदूची  शक्यता वाढते, दृष्टिक्षेत्राचे आकुंचन होते [→ डोळा]. श्रवणेंद्रियाची तीव्रता, विशिष्ट ध्वनितरंगांच्या संवेदनाची क्षमता आणि विविध आवाजांचे तारतम्याने प्रतिबोधन करण्याची मस्तिष्काची क्षमता यांत कमतरता जाणवू लागते. स्वरयंत्रातील घड्या सैल पडून आवाज कापरा व चिरका होऊ लागतो. गंधतंतू व रूचिकलिकांची संख्या घटल्याने या संवेदनांत बोथटपणा येतो. [→ तंत्रिका तंत्र; ज्ञानेंद्रिंये]. तंत्रिका तंत्रातील बदलामुळे वृद्ध व्यक्तिला खाली पडण्यासारखे अपघात, संवेदनातील गैरसमज, मानसिक गोंधळ, मलमूत्रविसर्जन क्रियांवरील नियंत्रणाचे शैथिल्य, अचानक उद्‌भवलेल्या शारीरिक व मानसिक ताणांना सामोरे जाण्याची असमाधानकारक प्रतिक्रियाशीलता, अशा अडचणींशी झगडावे लागते. तंत्रिका तंत्र, वृक्क आणि हॉर्मोने यांवरील एकत्रित परिणामांमुळे जल, सोडियम, पोटॅशियमांसारखे आयन (विद्युत्‌ भारित अणू, रेणू किंवा अणूगट) आणि अम्ल-क्षारक यांच्यातील संतुलन प्रौढावस्थेपेक्षा जास्त नाजूक होते. या पदार्थांचे आधिक्य किंवा अल्पता यामुळे दीर्घकाळ टिकणारी असंतुलित अवस्था सहज निर्माण होऊ शकते.

वृध्दावस्थेतील विकार : येथे काही विकारांचा केवळ उल्लेख करणेच शक्य आहे, परंतु जराचिकित्सेमधील पुढील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये मात्र लक्षात घेतली पाहिजेत : (१) अनेक विकार एकाच वेळी उद्‌भवू शकतात. म्हणून एकाच रोगापुरती मर्यादित तपासणी न करता सर्वंकष चाचण्या करणे हितावह ठरते. (२) रोगांचा आरंभ हळूहळू व सुप्तपणे होतो. काही लक्षणे वर दिलेल्या जराजन्य बदलांचीच आहेत, असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. (३) रोगप्रक्रियेला शरीराकडून मिळणारा प्रतिसाद प्रौढापेक्षा निराळा असू शकतो. उदा., वेदनांची जाणीव कमी असते व त्या सहन करण्याची प्रवृत्ती जास्त असते, तापमान वाढण्याऐवजी अवतापनाने अंग गार पडण्याची शक्यता असते. बद्धकोष्ठ, निर्जलीभवन, औषधयोजनेस अनपेक्षित प्रतिसाद इ. धोके लक्षात घ्यावे लागतात. (४) रोगावर नियंत्रण केल्यावरही शरीर पूर्वस्थितीस येण्यास विलंब लागतो. वृद्धावस्थेत पुढील प्रकारचे विकार आढळतात: (१) विऱ्हासी विकार उदा. अस्थिसंधिशोथ. (२) चलनाचे रोग: पक्षाघात, अंशघात, कंपवात. (३) संक्रामणजन्य रोग व जुन्या संक्रमणांचा पुनरूद्‌भव होतो उदा., श्वसनी शोथ (दाहयुक्त सूज), मूत्रमार्ग संक्रामण, त्वचारोग, क्षयरोग, फुफ्फुसशोथ. (४) कर्क व इतर अर्बुदे [→ अर्बुदविज्ञान ]. (५) अतिरीक्त रक्तदाब व तज्जन्य हृदयविकार, अपस्फीत नीला क्लथन, मूळव्याध. (६) जीवनसत्वे, प्रथिने, इतर पोषण द्रव्ये यांच्या कमतरतेमुळे कुपोषण. (७) हॉर्मोनांचे असंतुलन : मधुमेह, अवटुआधिक्य, अवटुन्यूनता, ऋतुनिवृत्तीची लक्षणे. (८) मनोविकार: स्मृतिभ्रंश, छिन्नमानस, अवसादन, चित्तविकृती, तीव्र संमोहावस्था. (९) ज्ञानेंद्रिय विकार: मोतीबिंदू, काचबिंदू, बहिरेपणा. (१०) स्नायुदुर्बलतेमुळे विरूपण : अंतर्गळ, गर्भाशय किंवा मलाशयाचे स्खलन.

वृद्धांची वैद्यकीय सेवा : पूर्वी वर्णन केलेल्या जराजन्य बदलांमुळे निर्माण होणारी विकलांगता आणि विकारजन्य ऊतकनाश किंवा इजा यांचे उपचार हा वैद्यकीय सेवेचा एक महत्त्वाचा भाग ठरतो.

औषधांचे शोषण, चयापचय, वितरण आणि ऊतकांची औषधांच्या क्रियेस प्रतिसादक्षमता या सर्वच बाबतींत वृद्ध शरीर व प्रौढ शरीर यांत अनेक गुंतागुंतीचे फरक आढळतात. तसेच औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांचे प्रमाणही वृद्धावस्थेत अधिक असते. म्हणून औषध योजना करताना जास्तीत जास्त सुरक्षित द्रव्ये निवडून ती कमीत कमी मात्रेत देणे आवश्यक ठरते. एकाच वेळी देण्यात येणाऱ्या औषधांची संख्या कमी ठेवून औषधी आंतरक्रिया टाळणे व औषधांच्या मात्रा घेण्यातील घोटाळे कमी करणे हेही महत्त्वाचे आहे. विशेषत: रक्तदाब, दमा, तंत्रिका तंत्रीय रोग यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या बाबतीत हे अत्यावश्यक आहे.

औषधोपचाराव्यतिरिक्त वैद्यकीय सेवेची इतर अंगे म्हणजे नियमित तपासणी करून रोगाच्या उद्भवाचे वेळीच निदान करणे, योग्य अशा व्यायामाचा आणि पोषक आहाराचा उपयोग करून रोगप्रतिबंध करणे आणि निवासस्थान व परिसराची पाहणी करून दुखापती टाळण्यासाठी आवश्यक ते बदल सुचविणे. पाश्चात्त्य देशांत यासाठी खास प्रशिक्षण देऊन वैद्यकीय समाजसेवक तयार केले जातात व ते वृद्धांच्या घरी जाऊन आवश्यक सल्ला देतात.

संदर्भ : 1. Adams, G. F. Essentials of Geriatric Medicine, Oxford, 1986.

2. Cormack, D. Geriatric Nursing : A Conceptual Approach, Oxford, 1985.

३. गोडबोले, मंगला, वार्धक्यविचार, पुणे, १९९१.

४. पोतदार, शंकरराव, वृद्धत्व : समस्या आणि उपाय, मुंबई, १९९७.

श्रोत्री, दि. शं.