वेदना : (पेन). वेदनासंवेदन हे प्राण्यांच्या संरक्षणयंत्रणेमधील एक महत्त्वाचे अंग आहे. हानिकारक पदार्थ किंवा घटना यांच्यापासून निर्माण होणाऱ्या उद्दीपनामुळे वेदनेचे जे बोधन (जाणीव) होते त्यामुळे किंवा जाणिवेत प्रवेश न केलेल्या अबोधित अशा संवेदनांमुळे निर्माण होणाऱ्या अनेक ⇨प्रतिक्षेपी क्रिया असतात. त्यांनी घडविलेल्या हालचाली व वर्तनातील बदल पुढील अपाय टाळण्यास मदत करतात. वेदनासंवेदन हे अप्रिय दु:खदायक असते. एवढेच नव्हे, तर ते तीव्र व दीर्घकालीन असले, तर अनुकंपी ⇨तंत्रिका तंत्रामार्फत (मज्जासंस्थेमार्फत) मूर्च्छा, रक्तदाबातील वाढ यांसारखे अनिष्ट परिणामही घडवून आणते. म्हणून वेदनेचे शमन करणे आवश्यक ठरते. या दृष्टीने वेदनानिर्मितीची परिघीय व केंद्रीय यंत्रणा अभ्यासणे उपयुक्त ठरते.
वेदनेचे बोधन ही आत्मनिष्ठा व पूर्वानुभवावर आधारित अशी प्रक्रिया असते. व्यक्तीने केलेल्या वर्णनावरच तिचे मापन अवलंबून असते. प्राण्यांमधील प्रायोगिक स्वरूपाच्या वेदनेचे बोधन मनुष्याला समजेल अशा भाषेत व्यक्त होणे अशक्य असल्याने वेदनाजनक उद्दीपनास प्राण्याने व्यक्त केलेला दृश्य किंवा श्राव्य शारीरिक प्रतिसाद (उदा. दूर सरणे, धडधडणे, किंचाळणे इ.) अभ्यासावा लागतो. तंत्रिका कोशिकांमधून (मज्जापेशींमधून) होणाऱ्या विद्युत् आवेग निर्मितीचे मापनही उद्दीपनाच्या परिणामांबद्दल वस्तुनिष्ठ माहिती पुरविते.
परिघीय यंत्रणा : अपायकारक उद्दीपनाची जाणीव होण्यासाठी दोन प्रमुख प्रकारचे तंत्रिका तंतू (मज्जातंतू) असतात.
सी (C) तंतू : ऊतकास (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिकासमूहास इजा करण्याइतपत तीव्रतेचे कोणतेही उद्दीपन (उदा., जोराचा दाब, आघात, तापमानातील मोठा बदल, हानिकारक रसायने) या तंतूंना उत्तेजित करते. वसावरणहीन (मायेलीन या मऊ पांढऱ्या काहीशा मेदासारख्या द्रव्याचे आवरण नसलेले) आणि आवेगाचे मंद गतीने (प्रतिसेकंद ०.५ ते २.० मी.) वहन करणारे हे तंतू मेंदू व ⇨मेरुरज्जू सोडून इतर सर्व ऊतकांत आढळतात. बहुउद्देशीय सी वेदनाग्राही या संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या या तंतूंमध्ये ऊतकहानीमधून निर्माण होणारा ब्रॅडिकिनीन हा पदार्थ आवेगनिर्मिती करतो. तंतूंच्या अग्रांची संवेदनशीलता वाढविण्याचे काम प्रोस्टाग्लॅंडिन द्रव्ये करतात आणि संदेशवहनात पी (P) पदार्थ (एक विशिष्ट प्रकारचे प्रथिन) व लॅक्टिक अम्ल, सिरोटोनीन, ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेट (एटीपी) इ. रसायनांचे साहाय्य होते. बोथट, दीर्घकाळ टिकणारी, ठसठस किंवा ठणका या शब्दांत व्यक्त अशी वेदना हे तंतू निर्माण करतात.
सी तंतूंचा मेरुरज्जूमध्ये प्रवेश बव्हंशी पश्चतंत्रिकामूलातून (→तंत्रिका तंत्र) होत असला, तरी सु. ३०% तंतू पश्चमूलगुच्छिकेपासून मूलातून परत फिरतात व अग्रमूलातून मेरुरज्जूत प्रवेशतात. यामुळेच पश्चमूलाच्या छेदनानंतरही काही वेदना शिल्लक राहते.
ए (A) डेल्टा तंतू : शरीराच्या संपूर्ण बाह्यपृष्ठावरील त्वचेत आणि मुख व गुदद्वाराच्या श्लेष्मपटलामध्ये (बुळबुळीत अस्तरामध्ये) तुलनेने वरच्या थरात ग्राही आढळतात. तीव्र यांत्रिकी उद्दीपनाने (उदा., टोचणे) आणि ४५० से. पेक्षा जास्त तापमानाने सक्रियित (अधिक क्रियाशील) होणारे हे विशिष्टग्राही वसावरणयुक्त बारीक तंतूंना जोडलेले असतात. त्यांतून आवेगाचे वहन जलद (५-१५ मी. प्रतिसेकंद) होते व तीव्र, अल्पकाळ टिकणारी प्राथमिक वेदना निर्माण होते. ⇨प्रतिक्षेपी क्रियेने शरीराचा अपायग्रस्त भाग अपायकारकापासून तत्काळ दूर करण्यास ही वेदना मदत करते. त्वचेला सौम्य इजा आधीच झाली असल्यास (उदा., उन्हाने होणारा त्वचाशोथ म्हणजे त्वचेची दाहयुक्त सूज) संवेदनक्षमता वाढून वेदना जास्त दु:सह्य होते.

सदर दोन प्रमुख वेदनाग्राही तंतूंबरोबरच इतर विशिष्ट संवेदनाग्राही तंत्रिका अतिशय मोठ्या प्रमाणात उद्दीपित झाल्यास वेदना निर्माण करू शकतात. उदा., खूप उष्णता किंवा गारवा यांची संवेदना, मोठा आवाज, लखलखीत प्रकाश, जोराचा पण बोथट दाब इत्यादी. तसेच तंत्रिका तंतूंमध्ये शोथ किंवा इतर विकृती निर्माण झाली, तर प्राकृत (नेहमीच्या) आवेगांचा अर्थही मेंदूत वेदना म्हणून लावला जातो. परिघीय यंत्रणेतील कमी प्रभावसीमा असलेल्या म्हणजेच थोडा दाब देऊन उद्दीपित होणाऱ्या ए बीटा (A Beta) या तंतूंचा वेदनानियंत्रक म्हणून उल्लेख केला पाहिजे. कोणत्याही ठिकाणी दुखू लागल्यास आपण तो भाग वेदना कमी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे तंतू कार्यान्वित होतात.
केंद्रीय यंत्रणा : मेरुरज्जूच्या गाभ्यातील करड्या रंगाचा कोशिकांनी व्यापलेला भाग सर्व अपवाही तंतूंचे उगमस्थान व अभिवाही तंतूंचे संयोगस्थान असतो. मेरुरज्जूच्या आडव्या छेदात एखाद्या पंख पसरलेल्या फुलपाखराप्रमाणे दिसणारा हा गाभा पश्चभागाकडून (पश्चशृंगाकडून) अग्रभागापर्यंत (अग्रशृंगापर्यंत) विविध स्तरांमध्ये (पटलांमध्ये) विभागता येतो. पश्चभागातील पहिल्या दोन स्तरांमध्ये वेदनाग्राही तंतूंचा शेवट होतो. जिलेटिनी पदार्थक्षेत्र (जिलेटिनासारख्या करड्या द्रव्याने युक्त) या शारीरीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रातील अनेक अनुबंधनी कोशिकांच्या साहाय्याने आवेगाचे संवहन पुढे चालू होते. हे आवेग मेंदूतील विरुद्ध बाजूच्या थॅलॅमस या क्षेत्रात पोहोचतात व तेथून प्रमस्तिष्क बाह्यकाच्या विविध क्षेत्रांकडे आणि विशेषत: मध्यपश्च संवेलकाच्या विशिष्ट भागाकडे पसरतात. [→ मेंदू मेरुरज्जु].
केंद्रीय यंत्रणेमध्ये पुढील दोन महत्त्वाच्या प्रक्रिया वेदना आवेगावर घडतात: वेदना संस्करण आणि वेदनाबोधन.
(अ) वेदना संस्करण : यासाठी मेरुरज्जूतील जिलेटिनी पदार्थक्षेत्रात कोशिकांच्या विशिष्ट मांडणीमुळे वेदनानियामक द्वार या नावाने ओळखली जाणारी कार्यपद्धती असते, असे मेलझॅक आणि वॉल यांनी दाखविले आहे (१९६५). हे द्वार उघडून आवेगांचे सुलभ प्रेषण करण्याचे कार्य सी तंतू करतात. याउलट ए बीटामधील यांत्रिकी संवेदनाजन्य आवेग द्वार बंद करतात व वेदना आवेगांना मेंदूकडे जाऊ देत नाहीत. अशाच प्रकारचे रोधक कार्य ए डेल्टा तंतूंकडून येणाऱ्या तीव्र टोचणीच्या संवेदनांमुळेही घडून येते (पहा आकृती). व्यवहारात ए बीटा तंतूंचे पारत्त्वचीय विद्युत् उत्तेजन [→ विद्युत् चिकित्सा] करून आणि ए डेल्टा तंतूंना सूचिचिकित्सा पद्धतीच्या सुया टोचून हा परिणाम साधता येतो. याशिवाय वेदनानियामक द्वाराच्या संदमक (दमन करणाऱ्या) कोशिकांचे कार्य करण्यास उत्तेजन देणारे आवेग मेंदूतील अधोथॅलॅमस, मस्तिष्कनालीभोवतालचे करड्या पदार्थाचे क्षेत्र (परिमस्तिष्कनालीय धूसरद्रव्य) आणि संधिरेषा केंद्रक अशा मार्गाने प्रवास करीत येणाऱ्या अधोवाही तंतूंमधून येत असतात. या सर्व नियामक कार्यामध्ये नॉरॲड्रेनॅलीन, सिरोटोनीन आणि अहिफेनाभ या नावाने ओळखली जाणारी एन केफॅलीन, एंडॉरफीन इ. तंत्रिका प्रेषक रसायने महत्त्वाची भूमिका बजावतात.
(आ) वेदनेचे अर्थबोधन : (वेदनाबोधन). इतर संवेदनांप्रमाणे वेदना-संवेदनाही मेरुरज्जूमधून थॅलॅमसमध्ये येऊन पोहोचल्याशिवाय तिची जाणीव होत नाही. त्यानंतर हे आवेग प्रमस्तिष्काच्या विविध भागांकडे पोहोचतात व वेदनेचे मानसिक कार्य घडून येते. त्यात जाणिवेचा अर्थ लावून वेदना कोणत्या प्रकारची व कुठे आहे हे समजते. त्वचा व इतर पृष्ठस्थ भागातील वेदना तीव्र (सुस्पष्ट) आणि नक्की कोणत्या क्षेत्रात आहे हे कळते परंतु सांधे, अंतस्त्ये यांसारख्या वितलीय (खोल) इंद्रियांमधील वेदना बोथट, अस्पष्ट आणि जडपणा किंवा ठसठस या स्वरूपातच समजते किंवा त्याच तंत्रिका क्षेत्रातील जास्त पृष्ठस्थ आणि जाणिवेला पूर्वज्ञात अशा भागात अन्यत्र वेदना म्हणून जाणवते. उदा., हृदयातील वेदना डाव्या बाहूमध्ये किंवा यकृतसमीप मध्यपटलातील वेदना उजव्या खांद्यामध्ये आहे, असे वाटते. हात किंवा पाय तुटलेल्या रुग्णाला आपल्या नसलेल्या अवयवात (आभासी अंगात) कुठे तरी दुखते आहे असे कधीकधी वाटते.
मानसिक परिणामातून वेदनेप्रत अत्यंत आत्मनिष्ठ प्रतिक्रिया देखील निर्माण होत असते. काही व्यक्ती वेदना जाणवत असूनही तिचा बाह्य आविष्कार होऊ न देता ती सहन करतात तर इतरांमध्ये ओरडणे, कण्हणे, अस्वस्थपणे हालचाल करणे यांसारखी बाह्य अभिव्यक्ती केल्याशिवाय वेदना सुसह्य होत नाही. सांस्कृतिक, कौटुंबिक व व्यावसायिक पार्श्वभूमी आणि वेदनाकाळात आसपासची परिस्थिती व कार्यमग्नता या घटकांनुसार प्रतिक्रिया बदलतात. उदा., रणभूमीवर सैनिकाला कर्तव्यमग्नतेमुळे वेदना जाणवत नाही परंतु नंतर रुग्णालयात ती जाणवते. वेदनेच्या कारणाचे गांभीर्य माहीत असल्यास व त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांचा धसका घेतल्याने (उदा. शस्त्रक्रिया, मृत्यू ,अपंगत्व) प्रतिक्रिया जास्त तीव्र होऊ शकते. अमीबासारख्या एकपेशीय प्राण्यांमध्ये मोठा मेंदू लहान व थॅलॅमस तुलनेने मोठे असल्याने मानसिक क्लेश कमी प्रमाणात आढळतात.
प्रतिक्षेपी प्रतिक्रिया : जाणिवेतील प्रतिक्रियांबरोबरच, तीव्र आणि असह्य वेदनांमुळे अनुकंपी तंत्रिका तंत्राकडूनही [→ तंत्रिका तंत्र] काही प्रतिक्षेप कार्यान्वित होऊ शकतात. वेदना आवेगाचे अधोथॅलॅमसमध्ये आगमन झाल्यामुळे हे बदल घडतात. किंचित काल श्वास थांबणे, रक्त दाबात वाढ, हृदयाचे जलद स्पंदन किंवा अनियमितता, चक्कर येणे, लघवी किंवा शौचास होणे अशा स्वरूपाचे हे परिणाम असतात. हानिकारक परिणाम दीर्घकाळ टिकू नयेत म्हणून वेदान संस्करणासाठी असलेली यंत्रणा कार्यान्वित होऊन मेंदूच्या संधिरेषाकेंद्रकापासून वेदनानियामक द्वाराकडे आवेग जाऊन द्वार बंद होते वेदना आवेगांचे वरच्या पातळीकडे होणारे वहन जरी कमी झाले, तरी मेरुरज्जूच्या पातळीवर प्रतिक्षेप (उदा., स्नायूंचे आकुंचन, ताठरपणामुळे दुखऱ्या भागास संरक्षण) मात्र चालू राहतात.
वेदनेचे किंवा वेदनेच्या तीव्रतेचे वस्तुनिष्ठ मापन करणे मानवाच्या बाबतीतही तितकेसे समाधानकारक रीत्या शक्य झालेले नाही. प्रभावसीमेपासून (वेदना किंचित जाणवणे) ते असह्यतेच्या पातळीपर्यंत क्रमाक्रमाने उद्दीपन वाढविल्यास बुद्धिमान व्यक्ती सु. १० ते २० टप्पे ओळखू शकते. यांवरून वेदनेचे डोल हे एकक ठरविण्याचा प्रयत्न झाला आहे. सौम्य डोकेदुखी (०.५ ते १ डोल) आणि मोठ्या शस्त्रक्रियेची किंवा प्रसूतीची वेदना (१० डोल) या दोन टोकांच्या मधे सर्व प्रकारच्या वेदनाजनक प्रसंगांचा वर्णपट मांडण्याचा प्रयत्न वेदनेच्या संख्यात्मक अभ्यासास उपयुक्त ठरतो. कोणतेही दैहिक किंवा देहजन्य उद्दीपन नसताना जाणवणाऱ्या वेदनांना मनोजन्य म्हटले जाते. त्यांचे मापन अशक्य ठरते व शमन स्वयंसूचनाने किंवा अन्य मानसोपचाराने होऊ शकते.
श्रोत्री, दि. शं.
आयुर्वेदीय वर्णन : कुठेही वेदना झाल्यावर रेचक किंवा बस्ती देऊन शरीराची शुद्धी करावी, म्हणजे वेदनाकर दोष कमी होतील. अतिशय तीव्र वेदना असल्यास ताबडतोब त्या ठिकाणी जळवा लावाव्यात आणि साग, कायफळ, कळंब, पद्मकाष्ठ, मोचरस, शिरीष, वेतस, सुगंधी खरबूज, अशोक, काळा भोपळा ह्यांपैकी योग्य ते औषध द्यावे. महायोगराज गुग्गूळ, महावातविध्वंस, राजवल्लभ ही औषधेही योग्य ⇨अनुपानांतून द्यावीत. जेव्हा शस्त्राच्या आघाताने वेदना होतात, तेव्हा गायीच्या तुपात ज्येष्ठमध कालवून तेथे लावल्याने त्या वेदना शमतात. सर्वसामान्यत: पोटाला जर वेदना झाल्या तर हिंग, ओवा, पादेलोण ही गरम तुपातून द्यावीत. छातीत दुखत असल्यास पुष्करमूल, तुळस, रिंगणी, डोरली ह्यांचा उपयोग करावा. अंग दुखत असल्यास सालवण, पीठवण, रिंगणी, डोरली, कावळी, एरंड, चंदन, काळा वाळा, वेलदोडा, ज्येष्ठमध ह्यांचा उपयोग करावा. कंबर दुखत असेल तर ओवा, मेथी, जिरे, अहाळीव या चतुर्बीजांचे एकत्र चूर्ण द्यावे. बस्तीमध्ये वेदना असल्यास गोखरू, सराटे, एरंडमूळ, पुनर्नवा, दशमूल ह्यांचा उपयोग करावा. डोळ्यात वेदना असतील तर सूतशेखर, प्रवाळ इ. द्यावे. त्या त्या स्थानानुरूप योजना करावी.
पटवर्धन, शुभदा अ.
पहा : जखमा आणि इजा डोकेदुखी तंत्रिका तंत्र पोटशूळ प्रतिक्षेपी क्रिया वेदनाशामके.
संदर्भ : 1. Pasternak, G. W. Childers, S. R. Recent Advances in Clinical Pharmacology, Vol. 3, London, 1983.
2. Prescott, F. The Control of Pain, London, 1964.
3. Well, P. E Framton, V. Bowsher, D. (Eds.) Pain, London, 1988.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..