यकृतशोथ : यकृताच्या दाहयुक्त सूज येण्याला ‘यकृतशोथ’ म्हणतात. या दाहयुक्त सुजेस अनेक कारणे असू शकतात व कारणपरत्वे रोगाचे अनेक प्रकारही ओळखले जातात. व्हायरस, सूक्ष्मजंतू, कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती), प्रोटोझोआ (आदिजीव), हेल्मिंथ कृमी, स्पायरोकीटा (सर्पिल सूक्ष्मजंतू) हे यकृतशोथास कारणीभूत होतात. काही सार्वदेहिक संसर्गजन्य विकृतींतही सौम्य ते मध्यम यकृतशोथ उद्‌भवतो (उदा., कांजिण्या). काही औषधे व अल्कोहॉल यकृतशोथ उत्पन्न करतात. प्रमुख कारणांमध्ये व्हायरस, औषधे व अल्कोहॉल यांचा समावेश असल्यामुळे प्रस्तुत नोंदीत (१) व्हायरसजन्य, (२) औषधजन्य व (३) अल्कोहॉलजन्य (मद्यजन्य) यकृतशोथासंबंधी माहिती दिली आहे. यकृतशोथाचे वर्गीकरण (अ) तीव्र आणि (आ) चिरकारी (दीर्घकालीन) असे करता येते. तीव्र प्रकारातील अती तीव्र आणि अती गंभीर प्रकाराला ‘स्फोटक यकृतशोथ’ म्हणतात.

व्हायरसजन्य तीव्र यकृतशोथ : ही विकृती सार्वदेहिक संसर्गजन्य असून तिचे प्रमुख दुष्परिणाम यकृतावर होतात. व्हायरसांपैकी प्रथम व्हायरस-अ आणि व्हायरस-ब (अथवा बी) यांच्या प्रतिजन संबंधीच्या (शरीरात प्रवेश केल्यानंतर विशिष्ट प्रतिरक्षात्मक म्हणजे प्रतिकार करून शरीराचे रक्षण करण्याची प्रतिक्रिया उत्पन्न करण्यासंबंधीच्या) गुणधर्मांवरून निराळे ओळखता आले. अलीकडेच व्हायरसांचे अ-विरहित आणि ब-विरहित प्रकारही रोगोत्पादक असल्याचे आढळले आहे. पूर्वी व्हायरस-अ जन्य रोगास‘संक्रामक यकृतशोथ’ किंवा ‘अल्प परिपाक काल यकृतशोथ’ आणि व्हायरस-ब जन्य रोगास ‘रक्तरस यकृतशोथ’ किंवा ‘दीर्घ परिपाक काल यकृतशोथ’ किंवा ‘अंतःक्षेपण पिचकारी (अथवा सिरींज) कावीळ’ अशी नावे होती (परिपाक काल म्हणजे रोगकारक जीव शरीरात शिरल्यापासून प्रत्यक्ष रोगलक्षणे दिसू लागेपर्यंतचा काळ). ती बदलून नवी यकृतशोथ-अ आणि यकृतशोथ-ब अशी सुटसुटीत नावे देण्यात आली आहेत.

यकृतशोथ – अ : दोन्ही प्रकारांपैकी अधिक प्रमाणात आढळणारा हा रोग साथीच्या किंवा तुरळक स्वरूपात आढळतो. व्हायरसांच्या एंटरोव्हायरस गटापैकी व्हायरस-अ अतिशय संक्रामक असून मानवी मलाद्वारे फैलावतात. मानवी शरीरात ते मुखातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने प्रवेश करतात. संसर्गित रोग्याच्या मलातून रोगाच्या सुरुवातीपूर्वी दोन आठवडे अगोदर तसेच रोग बरा झाल्यानंतर ५ ते ७ दिवसांपर्यंत व्हायरस मलातून उत्सर्जित होतात. दाट लोकवस्ती व अस्वच्छता रोग फैलावण्यास मदत करतात. कधी कधी पाणी, दूध, कालव यांमधूनही रोग फैलाव झाला आहे. १९५५ मध्ये दिल्लीमध्ये रोगाची साथ उद्‌भवून ३०,००० काविळीचे रोगी व त्याहून तिप्पट सौम्य यकृतशोथाचे रोगी आढळले होते. वाहितमल संसर्गापासून पिण्याच्या पाण्यातून साथ पसरली होती. अशाच प्रकारची साथ १९८६ मध्ये पाटणा येथेही पसरली होती. या ठिकाणी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, क्लोरीनसारख्या जंतुनाशकाला हे व्हायरस प्रतिरोध करतात. पाणी उकळून वापरणे हाच यावर एक परिणामकारक उपाय असल्याचे आढळले आहे. व्हायरस रुग्णाच्या रक्तात कावीळ पूर्व, कावीळ असताना आणि कावीळपश्च अवस्थांत सापडतात. गोंदणे, दंतोपचार, रक्त व रक्तापासून बनविलेल्या पदार्थांचे अंतःक्षेपण (उदा., रक्ताधान म्हणजे रुग्णाला रक्त देण्याची क्रिया), अयोग्य निर्जंतुकीकरण केलेली अंतःक्षेपणाची उपकरणे (पिचकाऱ्या व सुया) इत्यादींमधून व्हायरस संक्रामित होतात. रोग्यांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असते. विकसनशील राष्ट्रांतील बहुसंख्य मुले व्हायरस प्रभावाधीनता, संक्रामण आणि तत्पश्चातजन्य प्रतिरक्षा यांना बळी पडतात. समलिंगी संभोगासक्त पुरुषांत रोग पसरण्याची शक्यता असते.

चिरकारी रोगवाहक आढळत नाहीत. रोगाचा परिपाक काल साधारणपणे एक महिन्याचा असतो.

थंडी वाजणे, डोकेदुखी, अस्वस्थता या सुरुवातीच्या लक्षणांनंतर बहुधा कावीळ उद्‌भवते. भूक मंदावणे, सिगारेट ओढणाऱ्यांना नेहमीची लज्जत नसणे, मळमळणे, उलट्या व अतिसार यांसारखी जठरांत्र मार्गासंबंधीची (जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून बनलेल्या अन्नमार्गासंबंधीची) लक्षणे उद्‌भवतात. पोटाच्या (उदरगुहेच्या) वरच्या भागात सतत जाणवणारी पोटदुखी (यकृताचे आकारमान वाढल्यामुळे पर्युदर वेष्टनावरील-उदरातील इंद्रियांवर पसरलेल्या पातळ पटलावरील-ताण वाढून) सुरू होते. पोटाचा उजवा वरचा भाग हाताने चाचपडून पाहिल्यास यकृत आकारमानाने वाढलेले व स्पर्शासदृश्य लागते. मूत्राचा गडद रंग व डोळ्यातील श्वेतपटलाचा (नेत्रगोलाच्या सर्वांत बाहेरच्या थराचा) पिवळा रंग कावीळ दर्शवितात.

हळूहळू अन्नवासना सुधारते व इतर लक्षणे सुधारतात. मूत्राच्या रंगात बदल होतो व यकृताचे आकारमान कमी होते. तीन ते सहा आठवड्यांत रोगी पूर्ण बरा होतो. कधी कधी अगदी सौम्य प्रकारच्या रोगात काविळीचा अभाव असतो.

लक्षणांच्या सुरुवातीनंतर लगेचच रक्तरस तपासणीस यकृतशोथ-अ-विरोधी प्रतिपिंड (विरोध करणारे विशिष्ट प्रथिन अँटि-एच ए व्ही) सापडतो परंतु केवळ त्यावरून निदान निश्चिती होत नाही. कारण पूर्वी न कळत रोग होऊन गेलेल्या व्यक्तीमध्ये प्रतिपिंड अनेक वर्ष सापडू शकतो. प्रतिपिंडाचे अनुमापन वाढते असणे किंवा इम्युनोग्लोब्युलीन-एम्‌ प्रकारचे प्रतिपिंड सापडणे अलीकडील रोग दर्शवितात.

रोगोपचाराकरिता कोणतेही विशिष्ट औषध नाही. किंबहुना रोगी उपचाराशिवाय पूर्ण बरा होण्याचे प्रमाण फार मोठे आहे. पोषक उपचारांमध्ये अंथरुणात पडून राहणे (विशेषेकरून लक्षणांचा जोर असल्यासच) आवश्यक असते. पन्नाशीवरील रुग्ण, गर्भवती स्त्रिया व इतर प्रमुख आजार असलेल्यांनी जादा विश्रांती घ्यावी. इतरांनी थकवा न येईल अशा बेताने हालचाली करावयास हरकत नाही. आहार उत्तम ३,००० कॅलरी दररोज असावा. सुरुवातीस मळमळ व उलट्या असल्यास फळांचे रस व ग्लुकोज (जरूर वाटल्यास अंतःक्षेपणाने) द्यावे. आहारात प्रथिनांवर भर असावा. औषधांमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडे दुय्यम दुष्परिणाम करतात म्हणून देऊ नयेत. शामके (क्षुब्धता कमी करणारी द्रव्ये) व संमोहके (निद्रा आणणारी द्रव्ये) वापरण्यापूर्वी ती यकृताला हानिकारक नसल्याची खात्री असावी. संततिप्रतिबंधक औषधे पूर्ण जीवरासायनिक सुधारणेनंतरच सुरू करावीत. अल्कोहॉल सेवन आजारात व पुढे सहा महिने वर्ज्य करावे.

प्रतिबंधात्मक उपायांमध्ये सामाजिक परिस्थिती सुधारण्यावर, विशेषेकरून दाटीदाटीने राहणे व अस्वच्छता टाळण्यावर भर दिला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता रोग फैलावास प्रतिबंध करते. रुग्णाच्या अलगीकरणाची आवश्यकता नसली, तरी रुग्णाचे रक्त व मल हाताळणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे जरूरीचे असते. रोगनिश्चिती होताच नातेवाईकांनी व इतर संपर्कित व्यक्तींनी इम्युन-सीरम-ग्लोब्युलिनाच्या (०.०४-०.०६ मिलि./किग्रॅ.) मात्रा अंतःक्षेपणाने घेणे इष्ट असते.

यकृतशोथ-ब : ब-व्हायरस वानरवर्गी प्राण्यांपैकी चिंपँझीमध्ये पसरवता येतो व त्यांच्यामध्ये वाढू शकतो. व्हायरस आणि त्याच्या वेष्टनापासून बनणारे पदार्थ रक्तप्रवाहात सापडतात. ‘यकृतशोथ-ब पृष्ठीय प्रतिजन’ किंवा ‘ऑस्ट्रेलियन प्रतिजन’ (१९६५ मध्ये ⇨बारूक सॅम्युएल ब्लुमबर्ग या शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियातील आदिवासींच्या रक्तरसात प्रथम ओळखल्यावरून त्यास हे नाव देण्यात आले) व्हायरसांच्या वेष्टनात असते आणि ते रेडिओ-प्रतिरक्षा-आमापन परीक्षेने (किरणोत्सर्गी-भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या-पदार्थाचा उपयोग करून एखाद्या नमुन्यातील प्रतिजनाचे प्रमाण काढण्याच्या परीक्षेने) ओळखता येते. रक्त व रक्तापासून बनविलेले काही पदार्थ प्रमुख रोगोत्पादक आहेत उदा., रक्ताधान (विशेषकरून धंदेवाईक रक्तदात्यांचे रक्त), रक्तक्लथनकारक (रक्त साखळण्यास मदत करणारी) औषधे (रक्तस्रावी रोगात वापरण्यात येणारी) वगैरे. रक्तापासून बनविलेले पदार्थ जर पाश्चरीकरण केलेले (विशिष्ट तापमानाला उष्णता संस्करण केलेले) असतील तरच वापरावेत. रक्ताधानाकरिता अथवा मादक द्रव्यांचे व्यसन असलेल्या व्यक्तींनी अंतःक्षेपणाकरिता पुनःपुन्हा वापरलेल्या सुया, गोंदणे व ⇨सूचि-चिकित्सेकरिता वापरलेल्या सुया रोग फैलावण्यास मदत करतात. लाळ, मूत्र, वीर्य, योनिमार्गाचा स्राव यांसारख्या शरीरद्रव्यांतून ‘ऑस्ट्रेलियन प्रतिजन’ मिळाले असल्यामुळे रोग फैलावण्याची अनेक कारणे असावीत. वैयक्तिक जवळीक हे समलिंगी संभोगासक्त पुरुषांत रोग पसरण्याचे प्रमुख कारण असावे. मातेकडून अपत्यामध्ये, बहुधा नवजात अर्भकात, रोग पसरू शकतो. हे व्हायरस फक्त मानवातच आढळतात आणि काही व्यक्ती लक्षणविरहित रोगवाहक असतात.

रोगाचा परिपाक काल सर्वसाधारणपणे तीन महिने असतो. लक्षणे वर दिलेली व्हायरस-अ जन्य यकृतशोथासारखीच परंतु अधिक तीव्र असतात. त्वचेवर पुरळ, पित्त उठणे,सांधेदुखी किंवा संधिशोथ ही लक्षणे बहुधा आढळतात.

प्रतिबंधात्मक उपायामध्ये रक्ताधान पश्च यकृतशोथ योग्य काळजी घेतल्यास टाळता येतो. हायपर-इम्युन-सीरम-ग्लोब्युलिनाचे अंतःक्षेपण प्रतिबंधात्मक असते. अमेरिकेत यकृतशोथ-ब लस मिळू लागली आहे परंतु ती अतिशय महाग असल्यामुळे अगदी जरूर असल्यासच वापरतात आणि ती संसर्गित रोग्यामध्ये निरुपयोगी असते.

काही व्यक्तींमध्ये पूर्वेतिहासाशिवाय लक्षणविरहित अवस्थेत हे व्हायरस टिकून राहतात व त्यांना चिरकारी रोगवाहक म्हणतात. यूरोप व उत्तर अमेरिकेत अशा रोगवाहकांचे प्रमाण ०.१% तर आफ्रिका, आशिया व भूमध्यसागरालगतच्या प्रदेशातून ते १ ते १५% आढळले आहे. अशा व्यक्तीचा जवळचा संपर्क, त्याच्या शरीरद्रव्यांतून रोग फैलावू शकतो. काही रोगवाहकांमध्ये चिरकारी यकृतशोथ व ⇨यकृत-सूत्रण रोग उद्‌भवतात. काहींना कर्करोगाचा धोका असतो. व्हायरस-ब च्या संसर्गानंतर उद्‌भवणारे संभाव्य परिणाम आकृतीत दर्शविले आहेत.

यकृतशोथ-ब व्हायरसाच्या संसर्गानंतर उद्‌भवणारे संभाव्य परिणाम 

यकृतशोथ – अ – विरहित, ब – विरहित : रक्तरस परीक्षेनंतर जेव्हा व्हायरस – अ आणि व्हायरस – ब निराळे ओळखता आले, तेव्हा त्यांच्या अभावातही इतर काही व्हायरस यकृतशोथास कारणीभूत असल्याचे समजले. त्यांचा निश्चित प्रकार अजूनही अज्ञात आहे परंतु ते मानवात रोगनिर्मिती करीत असल्याचे व विशिष्ट रोगप्रतिरक्षा निर्माण करीत असल्याचे सिद्ध झाले आहे. उत्तर अमेरिका आणि यूरोपातील रक्ताधानपश्च यकृतशोथांपैकी ९०% रोगी या प्रकारात मोडतात. अल्प आणि दीर्घ दोन्ही प्रकारांचा परिपाक काल आढळतो. रोगलक्षणे वरील यकृतशोथ-अ आणि यकृतशोथ-ब यांच्या प्रमाणेच असतात. चिरकारी रोगवाहक असू शकतात.

वर वर्णिलेल्या तिन्ही प्रकारांत विकृतिविज्ञानात्मक बदल सारखेच असतात. रोग प्रसृत प्रकारचा असून, यकृत कोशिकांचा (पेशींचा) विशेषेकरून खंडिकेच्या मध्यवर्ती कोशिकांचा [⟶ यकृत] अपकर्ष होतो. सूक्ष्मदर्शकीय तपासणीत काचाभ गोळ्या (अपकर्षित कोशिका) दिसतात. त्यांना डब्ल्यू. टी. कौन्सिलमन या अमेरिकन विकृतिवैज्ञानिकांच्या नावावरून ‘कौन्सिलमन पिंड’ म्हणतात. अपकर्षाबरोबरच कोशिकांचे पुनर्जननही चालू असल्याचे दिसते.

औषधजन्य यकृतशोथ : अनेक रासायनिक पदार्थ अंतर्वहन, अंतर्ग्रहण व आंत्रेतर मार्गांनी शरीरात प्रवेश केल्यानंतर यकृतहानीस कारणीभूत होतात. या पदार्थांमध्ये औद्योगिक विषे, भूछत्रातील विषे व औषधे यांचा समावेश असून सर्वांत जास्त प्रमाण औषधजन्य यकृतशोथाचे आहे. औषधे यकृतावर दोन प्रकारांनी दुष्परिणाम करतात : (१) प्रत्यक्ष व (२) प्रकृतिवैशिष्ट्य रीत्या (म्हणजे औषधाच्या मात्रेशी संबंधित नसलेल्या व काही व्यक्तींतच आढळणारा). बहुतेक दुष्परिणाम यांतील दुसऱ्या प्रकारात मोडतात. यकृतावर पुढीलप्रमाणे दुष्परिणाम आढळतात : (अ) यकृतामधील पित्त यंत्रणेशी संबंधित : (१) पित्त स्थिरता व (२) सूक्ष्म पित्तनलिकाशोथ (आ) यकृत कोशिकानाश,ऊतकमृत्यू (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाचा नाश होणे) किंवा वसा (स्निग्ध पदार्थ) अपकर्ष (इ) मध्यवर्ती खंडकीय नीलरोध. यकृताला हानिकारक असणाऱ्या औषधांची यादी फार मोठी आहे. औषधजन्य यकृतशोथ वाढत्या प्रमाणावर आढळून येत असल्यामुळे कोणतेही औषध धोकारहित नाही, असे समजणेच योग्य ठरते. औषधजन्य विकृतीचे निदान लवकर होणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण औषधसेवन चालू राहिल्यास यकृतास चिरकारी अपरिवर्तनीय हानी होण्याचा धोका असतो. वैद्याने रोगाचा इतिहास काळजीपूर्वक तपासणे, जरूर तेव्हा नातेवाईकांकडून औषधोपचाराबद्दल माहिती मिळविणे, जरूर नसल्यास औषधसेवन बंद करणे, नव्या औषधाच्या दुष्परिणामांची व आनुषंगिक परिणामांची रुग्णास कल्पना देणे वगैरे गोष्टी महत्त्वाच्या असतात. औषधजन्य यकृतशोथ आणि व्हायरसजन्य यकृतशोथ यांमध्ये यकृतातील विकृतिवैज्ञानिक बदल सारखेच असतात आणि पुष्कळ वेळा औषधाऐवजी व्हायरसाकडे लक्ष केंद्रित होण्याचा धोका असतो.

अल्कोहॉलजन्य यकृतशोथ : अल्कोहॉलच्या दुरुपयोगामुळे तीव्र किंवा चिरकारी स्वरूपाचा यकृतशोथ उद्‌भवतो. बहुतकरून अल्कोहॉलजन्य यकृत-सूत्रण रोगाची ती पूर्वगामी अवस्था असते. यकृतशोथाचा हा प्रकार परिवर्तनीय असूनही अमेरिकेत यकृत-सूत्रण रोग प्रौढांतील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अल्कोहॉलजन्य यकृतशोथाच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना पाच किंवा त्याहून जास्त वर्षे अल्कोहॉल सेवनाची सवय होती, असे आढळून आले आहे. सर्वसाधारणपणे सवय जेवढी जुनी (१०-१५ वर्षे किंवा जास्त) आणि मोठे सेवन प्रमाण (दररोज १२० ग्रॅ. पेक्षा जास्त अल्कोहॉल म्हणजे २३० ग्रॅ. व्हिस्की, ८५० ग्रॅ. वाइन किंवा २,८४० ग्रॅ. बिअर) तेवढी यकृतशोथ उद्‌भवण्याची शक्यता अधिक. पुष्कळ वेळा अल्कोहॉलजन्य यकृतशोथ लक्षणविरहित असतो. अशी अती सौम्य आक्रमणे वारंवार आल्यामुळे हळूहळू यकृत कोशिकांच्या नाशातून यकृत-सूत्रण रोग उत्पन्न होतो.

अल्कोहॉलाची सवय तीव्र यकृत कोशिका ऊतकमृत्यूस कारणीभूत होते व तीव्र यकृतशोथात कावीळ हे एक लक्षण असते. प्रमाणाबाहेर अल्कोहॉल सेवनाचा इतिहास,क्षुधानाश, यकृत व प्लीहा (पानथरी) वृद्धी व कावीळ ही लक्षणे आढळतात. यकृताची ⇨जीवोतक परीक्षा (जिवंत शरीरातून घेतलेल्या ऊतकाची स्थूल व सूक्ष्मदर्शकीय तपासणी) निदान निश्चित करते. फलानुमान (लक्षणांवरून रोगाच्या संभाव्य परिणामाचा काढण्यात येणारा अंदाज) यकृतनाशाच्या प्रमाणावर अवलंबून असते. विशिष्ट प्रकारचा हस्तकंप (यकृत हस्तकंप) हे एक अनिष्ट लक्षण असून ते उद्‌भवलेल्यांत मृत्यूप्रमाण अधिक असते. उपचारामध्ये अल्कोहॉल पूर्णपणे वर्ज्य करणे अतिशय महत्त्वाचे आहे. अंतर्नीला पोषण आणि जीवनसत्त्वाचा (विशेषेकरून फॉलिक अम्लाचा) पुरवठा हा उपचारांचा प्रमुख भाग आहे.

स्फोटक यकृतशोथ : व्हायरस-ब, अ-विरहित आणि ब-विरहित संसर्ग आणि औषधजन्य विकृतींत एकाएकी मानसिक गोंधळापासून बेशुद्धीपर्यंत मस्तिष्क (मेंदूसंबंधित) विकृती उद्‌भवतात. यकृत ऊतकाचा फार मोठ्या प्रमाणावर नाश होऊन यकृताचे आकारमान लहान होते (तीव्र पीत अपकर्ष). वाढत जाणारी गडद कावीळ हे प्रमुख लक्षण असते. निरनिराळे रक्तस्राव होतात. यकृत हस्तकंप उद्‌भवतो. प्रौढातील विकृती बहुधा मारक असते. सौम्य लक्षणे असूनही एक-तृतीयांश रुग्ण मृत्यूमुखी पडतात. बेशुद्ध रुग्णांपैकी १० ते २०% सुधारतात. अतिशय गंभीर प्रकारात एक आठवड्यात मृत्यू येतो. या विकृतीवर कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत.

संदर्भ : 1. Berkow, R. and others. Ed., The Merck Manual of Diagnosis and Therapy, Rathway, 1982.

2. Krupp, M. A. Chatton, M. J., Ed., Current Medical Diagnosis and Treatment, Singapore, 1983.

3. Macleod, J., Ed., Davidson’s Principles and Practice of Medicine, Edinburgh, 1984.

4. Weatherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Tokyo, 1984.