रेडिओलॅरिया : प्रोटोझोआ (आदिजीव) संघाच्या सार्काडिना अधिवर्गातील ऱ्‍हायझोपोडा या वर्गातील हा एक गण आहे. या एककोशिक (शरीर एकाच कोशिकेचे–पेशीचे–बनलेले आहे अशा) प्राण्याचे कोशिकाद्रव्य (पेशीतील केंद्रकाशिवाय असलेला जीवद्रव्याचा भाग) मध्यवर्ती संपुटात (कलायुक्त पिशवीत) व त्याभोवताली विभागलेले असते. संपुटातील कोशिकाद्रव्य अंतर्द्रव्यासारखे व त्याबाहेरील बहिर्द्रव्यासारखे असते. बहुसंख्य रेडिओलॅरियांचा आकार व सममिती गोलीय असून कोशिकेवर कंकाल (सांगाडा) असतो. पादाभ (हालचाल, परिग्रहण इ. कामी उपयुक्त असे जीवद्रव्याचे तात्पुरते बहिःक्षेप) अक्षदंडयुक्त किंवा तंतुयुक्त असतात. रिक्तिका (कोशिकेतील स्त्रावयुक्त पोकळ्या) संकोचनशील नसतात. एककोशिक प्राण्यात आकाराने हे मोठे आहेत. यांचा व्यास ५० मायक्रॉनांपासून (एक मायक्रॉन म्हणजे एक मीटराचा दहा लाखावा भाग) कित्येक मिमी. इतका असतो, तर काही सामूहिक जीवन जगणाऱ्‍या रेडिओलॅरियांत हा व्यास काही सेंमी. इतका असू शकतो.

या कोशिकेचा महत्त्वाचा भाग म्हणजे मध्यवर्ती संपुट होय. या संपुटात कोशिकाद्रव्य असते. संपुट कलेने वेष्टिलेले असते. संपुटाच्या कोशिकाद्रव्यात एक किंवा अनेक केंद्रके (कोशिकेच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणारे गोलसर पुंज) असतात. एकच केंद्रक असल्यास ते आकाराने मोठे असते व त्यात कोशिकाद्रव्याने वेढलेल्या लहान लहान केंद्रकांचे समूह असतात. संपुटाची कला टेक्टीन नावाच्या द्रव्याची बनलेली असते. त्यावर बरीच लहान छिद्रे किंवा छिद्रांचे पुंजके असतात. या छिद्रांद्वारे संपुटातील व संपुटाबाहेरील कोशिकाद्रव्यात देवाणघेवाण होते.

संपुटाबाहेरील बहिर्द्रव्यात केंद्रके नसतात पण सहजीवी शैवले असतात. कोशिकाद्रव्यात स्निग्ध काही रेडिओलॅरिया : (अ) ॲकँथेरिया (आ) नॅसेलॅरिया (इ) स्पुमेलॅरिया (ई) थॅलॅसिकोला : (१) मध्यवर्ती संपुट, (२) मध्यवर्ती संपुटाची कला, (३) संपुटबाह्य जीवद्रव्य.पदार्थांचे सूक्ष्म बिंदू, काही स्फटिकांचे सूक्ष्म कण आणि काही रंगीत कण आढळतात. बहिर्द्रव्यातून अक्षदंडयुक्त पादाभ बाहेर फैलावतात. पोषण प्राणिसदृश (बहुसंख्य प्राण्यांप्रमाणे घन अन्न कण खाण्याच्या) पद्धतीने होते.

रेडिओलॅरियाच्या कोशिकेभोवती कंकालाचे आच्छादन असते.कंकाल सिलिकेचा बनलेला असतो. काही उपगणांत हे कंकाल कॅल्शियम सल्फेट किंवा कॅल्शियम ॲल्युमिनियम सिलिकेट या खनिजांचेही आढळतात. संपुटापासून या कंकालाचे काटे बाहेर पडतात. या काट्यांच्या रचनेत निरनिराळे आकृतिबंध आढळतात.

संपुटापासून स्वतंत्र रेडिओलॅरियाची निर्मिती होऊ शकते. द्विभाजन पद्धतीने अलैगिंक प्रजनन होते. या प्रकारात केंद्रक, संपुट व बहिर्द्रव्य यांचे विभाजन होते. काही वेळा कंकालाचेही विभाजन होते. द्विभाजित कोशिकांची पूर्ण रेडिओलॅरियात वाढ होते. काही वेळा एका केंद्रकापासून अनेक केंद्रके निर्माण झाली, तर त्यांची गंतुके (परिपक्क जनन कोशिका) तयार होतात पण याबद्दल अजून पुरेशी माहिती उपलब्ध झाली नाही.

रेडिओलॅरिया हे समुद्रात राहणारे तलप्लावी (तळाशी तरंगणारे) प्राणी आहेत. स्निग्ध पदार्थाचे सूक्ष्मबिंदू पसरणारे पादाम आणि कंकालाचे काटे ही सर्व साधने ह्यांना पाण्यात तरंगण्यास उपयोगी पडणारी आहेत. पाण्याच्या तापमानावर ते किती खोलवर जातील हे अवलंबून असते. कधीकधी ५,००० मी. खोलीवरसुद्धा ते आढळले आहेत. यांच्या कंकालाच्या आकृतिबंधावरून यांचे चार उपगणांत विभाजन केले आहे.

कुलकर्णी, र. ग. इनामदार, ना. भा.

पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षापूर्वीच्या काळाच्या) पूर्वार्धातील खडकांत रेडिओलॅरियांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) क्वचित व डेव्होनियन कल्पापासून तो तृतीय कल्पापर्यंतच्या (सु. ४२ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांत ते अधिक आढळतात. ते सामान्यतः सागरात साचलेल्या चर्टात सापडतात. ब्रिटनी व इतर काही प्रदेशांतील कँब्रियन-पूर्व कालीन (सु. ६० कोटी वर्षांच्या आधीच्या काळातील) खडकांत रेडिओलॅरियांसारखे दिसणारे खनिज पदार्थ सापडलेले आहेत पण ते खरे जीवाश्म आहेत की नाहीत, याविषयी दुमत आहे. रेडिओलॅरियांची कवचे साचून तयार झालेला महत्त्वाचा खडक म्हणजे बार्बाडॉस बेटांच्या पुष्कळशा भागांत आढळणारी बार्बाडॉस माती होय. ती तृतीय कल्पाच्या अखेरच्या (सु. १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात तयार झालेली असून मुख्यतः रेडिओलॅरियांच्या सूक्ष्म कवचांची बनलेली आहे. तिच्यात आणि महासागरांच्या तळाशी आता साचत असलेल्या रेडिओलॅरिया ऊझात पुष्कळ साम्य आहे व महासागराच्या तळाशी ती तयार झाली असावी.

पहा : ऊझ.

ठाकूर, अ. ना