भुवनेश्वर–१ : (१९१० – ). हिंदी एकांकिका लेखक. त्यांचे नाव भुवनेश्वरप्रसाद मिश्र असले, तरी भुवनेश्वर म्हणूनच ते ओळखले जातात. जन्म शाहजहानपूर येथे. शिक्षणही जन्मगावीच. आधुनिक पाश्चात्त्य साहित्याचा त्यांचा चांगला व्यासंग आहे. इब्सेन, बर्नार्ड शॉ, डी. एच्. लॉरेन्स, फ्रॉइड हे त्यांचे आवडते लेखक. जीवनात आलेल्या कटू अनुभवामुळे त्यांच्या साहित्यात समाजाविषयीची विद्रोही वृत्ती ठळकपणे दिसून येते.

भुवनेश्वरांनी हिंदीत पाश्चात्त्य पद्धतीच्या एकांकिका लिहिल्या. त्यांच्या एकांकिकांत आशय व अभिव्यक्ती या दोन्हीही बाबतीत नावीन्य आढळते. ‘श्यामा–एक वैवाहिक विडंबना’ ही त्यांची पहिली एकांकिका असून ती हंस मासिकाच्या डिसेंबर १९३३ च्या अंकात प्रसिद्ध झाली. तिच्यावर शॉच्या कँडिडा नाटकाचा खूपच प्रभाव पडला आहे. नंतर त्यांच्या ‘प्रतिभाका विवाह’ (१९३३), ‘शैतान’ (१९३४), ‘एक साम्यहीन साम्यवादी’ (१९३४), ‘रहस्य रोमांच’ (१९३५), ‘लाटरी’ (१९३५) इ. एकांकिका प्रसिद्ध झाल्या. या एकांकिकांचा संग्रह १९३५ मध्ये कारवाँ नावाने प्रसिद्ध झाला. ह्या सर्वच एकांकिकांवर पाश्चात्त्य एकांकिकांच्या शैलीची, शॉ-इब्सेन यांच्या उपरोधाची आणि फ्रॉइडच्या लैंगिक समस्यांची गहिरी छाप स्पष्टपणे पडलेली दिसते. कारवाँतील स्त्री-पात्रे पुरुषपात्रांपेक्षा अधिक क्रूर असल्याचे व पुरुषपात्रे आत्मकेंद्री आणि दुर्बल असल्याचे दिसते.

यानंतर त्यांच्या ‘मृत्यू’ (१९३६), ‘हम अकेले नही है’, ‘सवा आठ बजे’, ‘स्ट्राइक’, ‘ऊसर’ (१९३८) ह्या एकांकिका प्रसिद्ध झाल्या. या एकांकिकांमध्ये त्यांचा दृष्टिकोन लैंगिक समस्या व प्रेमाचा ठराविक त्रिकोण यांच्या पलीकडे जाऊन सामाजिक दुःख-वेदनांकडे वळल्याचे, व्यापक बनल्याचे दिसते. १९३८ मध्ये त्यांनी रुपाभ ह्या सुमित्रानंदन पंत संपादित मासिकात आपल्या आदमखोर ह्या दीर्घ नाटकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी जीवनोन्मुख असा वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारल्याचे दिसते. १९४० मध्ये त्यांनी गोगोलच्या प्रसिद्ध इन्स्पेक्टर नाटकाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’ नावाने हिंदी एकांकिकेत रूपांतर केले. १९४१ मध्ये रोशनी और आग नावाचे एक प्रायोगिक नाटक प्रसिद्ध केले. त्यात ग्रीक नाटकासारखे समूहगान (कोरस) आहे. कठपुतलियाँमध्ये त्यांनी प्रतीकवादी शैलीचा अवलंब केला.

ह्या प्रायोगिक रचनांनंतर त्यांची नाट्यकला अधिक परिपक्व झाल्याचे दिसते. या दृष्टिने त्यांच्या ‘फोटोग्राफरके सामने’ (१९४५), ‘ताँबेके कीडे’ (१९४६), ‘इतिहासकी केंचुल’ (१९४८) ह्या सामाजिक तसेच ‘आजादीकी नीव’ (१९४९), ‘जेरूसलेम’ (१९४९), ‘सिकंदर’ (१९४९), ‘अकबर’ (१९५०), ‘चंगेज खाँ’ (१९५०), ‘सीकोंकी गाडी’ (१९५०) ह्या ऐतिहासिक एकांकिका उल्लेखनीय होत.

त्यांच्या एकांकिका, त्यांतील काव्यात्मता, व्यंजना, मार्मिकता, उठावदार व्यक्तिरेखा, उत्कृष्ट वातावरणनिर्मिती, चमकदार संवाद या दृष्टीने खूपच प्रभावी आहेत. आजच्या तथाकथित उच्चभ्रू समाजातील दुबळेपण, विकृती, किडलेपण त्यांनी परिणामकारक रीत्या प्रकट करून त्यावर कठोर प्रहार केले. सामाजिक रुढी व विषमता, मानसिक संघर्ष हे त्यांच्या चित्रणाचे प्रमूख विषय होत. हिंदी एकांकिकांच्या विकासात कला, नवे प्रयोग व शैलीचे नावीन्य या द्दष्टीने भुवनेश्वर व ‘प्रसाद’ यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्यांनी इंग्रजीत काही कविताही लिहिल्या आहेत.

संदर्भ : त्रिपाठी, श्रीपती, हिंदी नाटकोंपर पाश्चात्त्य प्रभाव, आग्रा, १९६१.

सुर्वे, भा. ग.