उपास्थि: संयोजी ऊतकाच्या [समान रचना व कार्य असलेल्या पेशींच्या समूहाच्या, ऊतके, प्राण्यांतील] एका विकसित प्रकाराला उपास्थी असे म्हणतात. या ऊतकाचे आधारद्रव्य घट्ट पण लवचिक आणि टणक पण थोड्या प्रमाणात प्रत्यास्थ (स्थितिस्थापक) असे असते. या ऊतकालाच तरुणास्थी किंवा कूर्चा असेही म्हणतात.

कंकाल तंत्राचे (शरीरातील हाडांच्या सांगाड्याचे) स्थायी आणि अस्थायी असे भेद करतात. सर्व पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या भ्रूणावस्थेतील कंकाल तंत्र उपास्थीचे बनलेले असते. काही माशांमध्ये स्थायी कंकाल तंत्र उपास्थिरूपच असते.

सर्व अस्थी उपास्थीपासूनच तयार होतात. उपास्थींच्या कोशिकांवर (पेशींवर) केशिकाग्रांचे (सूक्ष्मतम रक्तवाहिन्यांच्या अग्रांचे) आक्रमण होऊन तेथे कॅल्शियमाचे निक्षेपण (साका) झाल्यामुळे उपास्थींचे अस्थींमध्ये रुपांतर होते. उपास्थी टणक आणि लवचिक असल्यामुळे ते सांधे, वक्षस्थळ, स्वरयंत्र (आवाज उत्पन्न करणार्‍या दोन तंतूंचे बनलेले घशातील इंद्रीय), श्वासनाल व त्याच्या शाखा, नाक वगैरे ठिकाणी असतात. या ठिकाणच्या उपास्थींचे प्रौढ वयातही अस्थींमध्ये रूपांतर होत नाही.

उपास्थींच्या कोशिका दोन, चार अथवा आठ अशा समूहाने आढळतात. उपास्थींच्या आधारद्रव्याच्या रचनेप्रमाणे त्यांचे भेद कल्पिलेले आहेत.

(१) काचाभ उपास्थी: या प्रकारात आंतरकोशिका (कोशिकांच्या मधील) विभागांत कोणतेही तंतू नसल्यामुळे व त्यांचा रंग किंचित निळसर, अस्पष्ट पारदर्शक असे तिचे स्वरूप असल्यामुळे त्या प्रकाराला काचाभ (काचेसारखी) उपास्थी असे म्हणतात. सांध्यातील अस्थींची टोके, फासळ्यांची पुढची टोके, नाक, स्वरयंत्र, श्वासनलिका (श्वासनालातील हवा फुफ्फुसापर्यत नेणाऱ्या नलिका) व तिच्या शाखा, बाह्य कर्णरंध्र या ठिकाणी काचाभ उपास्थी असतात.

(२) श्वेत-तंतुमय उपास्थी: लकचिकपणापेक्षा काठिण्य आणि शक्ती यांची जेथे जरूरी आहे अशा ठिकाणी या प्रकारच्या उपास्थी आढळतात. या प्रकारात आंतरकोशिका विभागांत श्वेत-तंतूंचे प्राबल्य असते. दोन मणक्यांमधील चक्रे आणि प्रतरसंधी (दोन अस्थींचा हालचाल न होणारा संधी) यांमध्ये हा प्रकार आढळतो. वाटिकाकार संधीची खोली आणि चलनकक्षा वाढविण्यास या उपास्थींचा उपयोग होतो.

(३) प्रत्यस्थ-तंतुमय उपास्थी किंवा पीतप्रत्यस्थ उपास्थी : या प्रकारातील आंतरकोशिका विभागांत तंतूंचे जाळे असून तंतुशाखांनी त्या जोडलेल्या असतात. या तंतुजालामुळे या प्रकाराची उपास्थी लवचिक असून वाकली तरी त्वरीत पूर्वस्थितीवर येऊ शकते. तिचा रंग पिवळट असल्यामुळे तिला पीतप्रत्यस्थ उपास्थी असेही म्हणतात. स्वरयंत्रातील अधिस्वरद्वार (कंठाचे रक्षण करणारा झडपेसारखा भाग), ग्रसनी-कर्ण-नलिका (घशापासून कानापर्यंत जाणारी नलिका) आणि बाह्य कर्ण या ठिकाणी या प्रकारची उपास्थी आढळते.

आपटे, ना. रा.