हायड्रोझोआ :सीलेंटेरेटा संघातील प्राण्यांचा हा एक वर्ग आहे.या वर्गामध्ये सु. ३,७०० जाती आढळतात. त्यांचे बहुतकरून निवहअसतात. त्यांच्या जीवनचक्रामध्ये निवहांत पॉलिप व मेड्युसा अशी दोन्हीप्रकारची रूपे आढळतात. या दोहोंची संरचना साधी असते. प्रारूपिक जातीपॉलिप रूपानेच असतात. काही निवह वेलापवर्ती, तर काही स्थानबद्ध असतात. मेड्युसे पॉलिपांपासून मुकुलनाने तयार होतात आणि ते मुक्त किंवा बद्ध असतात.

 

काही हायड्रोझोआंच्या जीवनचक्रात नियमित पिढी-एकांतरण आढळते. निवहातील पॉलिपापासून मुकुलनाने मुक्त प्लावी मेड्युसे उत्पन्न होतात आणि त्यांच्यापासून लैंगिक प्रजननाने पॉलिप उत्पन्न होतात परंतु हायड्रासारख्या काही प्राण्यांत मेड्युसा अवस्था नसतेच. लैंगिक किंवा अलैंगिक प्रजननाने हायड्रापासून हायड्राच उत्पन्न होतो. ट्रॅकिलिना गणातील मेड्युसांपासून मेड्युसेच उत्पन्न होतात त्यांच्यामध्ये पॉलिप पिढी जवळजवळ नसते (उदा., ॲग्लॅन्था).

 

हायड्रोझोआ प्राण्यांमध्ये अरीय सममिती आढळते. पॉलिप लहान असून त्याच्या मुखाभोवती संस्पर्शके असतात. मुख आंतरगुहिकेत उघडते आणि ती अखंड असते. मेड्युसाची आंतरगुहिका सुद्धा अखंड असते, परंतु तिच्यापासून अरीय नाल निघतात. जनन-कोशिका बाह्य त्वचेत असून तेथून सरळ बाहेर पडतात. या वर्गात बहुरूपता परमावधीला पोहोचलेली असते.

 

जवळजवळ सगळे हायड्रोझोआ सागरी आहेत परंतु हायड्रा, लिम्नोकोडियम यांसारखे काही प्राणी गोड्या पाण्यातील आहेत. हायड्रॉयडिया (उदा., प्रोटोहायड्रा), ट्रॅकिलिना (उदा., क्यूनार्का), हायड्रोकोरॅलिना (उदा., मिलेपोरा) आणि सायफोनोफोरा (उदा., हॅलीस्टेमा) असे हायड्रोझोआंचे चार गण पाडलेले आहेत.

 

पहा : बहुरूपता सायफोनोफोरा सीलेंटेरेटा.

 

जोशी, मीनाक्षी र.