प्वेब्लो – १ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांतील नैर्ऋत्य भागात राहणारी एक जुनी अमेरिकन इंडियन जमात. त्यांची वस्ती मुख्यत्वे ॲरिझोना, न्यू मेक्सिको व रीओ ग्रांदे या भागांत आढळते. त्यांचे तीन स्वतंत्र प्वेब्लोंची वैशिष्ट्यपूर्ण मृत्पात्रेभाषिक गट असून, त्यांना अनुक्रमे होपी प्वेब्लो, झून्यी व केरेसान प्वेब्लो आणि ताओंअन प्वेब्लो म्हणतात. मध्य आशियातून अपाची व नॅव्हाहो हे आथापास्कन बोली बोलणारे लोक इ.स. १३०० ते १७०० च्या दरम्यान टोळ्याटोळ्यांनी अमेरिकेच्या नैर्ऋत्य भागातील वालुकामय प्रदेशात स्थायिक झाले. या लोकांवर १५४० मध्ये स्पॅनिश संशोधकांनी आक्रमणे करून त्यांच्या खेड्यांना प्वेब्लो ही संज्ञा दिली. त्या वेळेपासून प्वेब्लो हे नाव त्यांना प्राप्त झाले. इ.स. १६४० मध्ये प्वेब्लोंनी बंड करून स्पॅनिशांकडून आपला भाग परत मिळविला पण पुन्हा इ.स. १६९२ मध्ये स्पॅनिशांनी तो पादाक्रांत करून त्यावर आपले वर्चस्व प्रस्थापिले. अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर या प्रदेशावर अमेरिकेची सत्ता दृढमूल झाली. पुरातत्वीय संशोधनात त्यांच्या प्राचीन वस्तीचे तसेच अनेक वास्तूंचे अवशेष मिळाले. त्यांवरून त्यांची पहिली संघटित वस्ती इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली असावी. त्या वेळी धनुष्यबाण आणि मृत्पात्रे यांचा ते उपयोग करीत. त्यांच्या सुरेख टोपल्या, बाहुल्या व नावा यांमुळे बास्केटमेकर संस्कृतीशी त्यांचा जवळचा संबंध आला होता. त्यांची वस्ती सुरुवातीस गुहांतून असून ते खड्ड्यात धान्य साठवीत. गुहांतून शिंपल्यांचे दागिने, दगडी हत्यारे व कपडे तसेच नळ, बासऱ्या, बाहुल्या इत्यादींचे अवशेष मिळाले आहेत.

              

प्वेब्लो वृद्धा–वय १०७, ताओस.

मजबूत पण लहान बांधा, लालसर करडा वर्ण, काळे डोळे ही त्यांची काही शारीरिक वैशिष्ट्ये असून मंगोलॉइड वंशाशी त्यांचे साधर्म्य आढळते. त्यांच्यात अनेक बोलीभाषा आहेत. प्रारंभी खुरपणीच्या शेतीवर बार्ली-मका यांसारख्या पिकांवर व शिकारीवर ते उदरनिर्वाह करीत. पुरुष-स्त्रिया दोघेही डोक्यावर केस राखून हरिणाच्या कातड्याचे किंवा हाताने विणलेले कापड वापरीत. त्यांच्यात मातृसत्ताक कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात होती. वंशपरंपरेने आलेला टोळीचा प्रमुख हाच मुख्य असे. त्याच्या हुकमाने सर्व व्यवहार चालत. ‘किवा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जागेमध्ये तरुणपिढीचे दीक्षाविधी समारंभ पूर्वी सामुदायिक रीत्या साजरे करीत. या प्रसंगी देवदेवतांचे किंवा पितरांचे मुखवटे घालून ‘कॅचीना नृत्य’ केले जाई. प्वेब्लोंनी कुंभारकामात वैशिष्ट्यपूर्ण प्रगती केली होती. ते चाकाशिवाय मडक्यांना हातानेच आकार देत. प्रत्येक भांडे भट्टीत स्वतंत्र रीत्या भाजून काढीत व त्यावर हातानेच रंगीत नक्षीकाम करीत. वास्तुशास्त्रातही प्राचीन प्वेब्लोंनी एक विशिष्ट घरबांधणीपद्धत अवलंबिलेली  दिसते. त्यांची घरे दगडाची किंवा कच्च्या मातीच्या विटांची असत. घरांना दारे नव्हती. शिडी लावून छपरातून लोक घरांत प्रवेश करीत. खोल्यांची रचना सोपान तत्त्वावर आधारलेली असे. हल्लेखोरांपासून संरक्षण व्हावे,  म्हणून अशी घरांची रचना करीत. स्पॅनिश व अमेरिकन लोकांच्या सान्निध्यामुळे १७-१८ व्या शतकांत त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला. जुन्या संस्कृतीने आधुनिक घरे, उपकरणे कपडेलत्ते अंगीकारले आणि प्राचीन संस्कृती जवळजवळ लोप पावली. आधुनिक प्वेब्लो जलसिंचनाच्या शेतीवर गहू, कापूस, भाज्या, फळे यांसारखी पिके घेऊ लागला आहे. स्पॅनिशांकडून त्यांनी धातूंची माहिती घेतली व चांदीकामात कुशलता मिळविली. त्यांच्या भाषेत स्पॅनिश शब्दांची भर पडूनही ‘इंग्रजी’ हीच बोलीभाषा झाली आहे. मात्र कॅचीना नृत्य इतर काही गुप्त संघटना, औषधोपचार, काही धार्मिक विधी इ. अजूनही त्यांच्यात आढळतात. होपी प्वेब्लोंत अद्यापि जमात प्रमुखाचे प्राबल्य असून त्याची निवड होते. इतर प्वेब्लोंत निवडलेल्या पंचायतेनुसार सर्व व्यवहार चालतात. प्वेब्लोंची समर पीपल व विंटर पीपल अशी दोन अर्धके असून, त्यांत सर्व प्वेब्लो विभागले गेले आहेत. धार्मिक समारंभ सामुदायिक रीत्या करण्याचे प्रमाण अलीकडे कमी झाले आहे. बऱ्याच प्वेब्लोंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला असून, ‘द ब्युरो ऑफ इंडियन अफेअर्स’ ही सरकारी संस्था शिक्षण, आरोग्य, राहणीमान इ. सुविधा पुरविते व देखरेख करते. १९६८ मध्ये त्यांची ॲरिझोना व न्यू मेक्सिको या भागांत सु. ३२,००० लोकसंख्या होती.

संदर्भ : 1. Dozier, E. P. The Pueblo Indians of North America, New York, 1970.

           2. Driver, H. E. Indians of North America, Chicago, 1969.

           3. Terrell. J. U Pueblos, Gods and Spaniards, New York, 1973. 

कीर्तने, सुमति