चिंच, विलायती : (हिं. दख्खनी बाभूल, विलायती आमली गु. खाळप्रिय आमली इं. मद्रास थॉर्न, मॅनिला टॅमॅरिंड लॅ. पिथेसेलोबियम डल्स, इंगा डल्सिस कुल-लेग्युमिनोजी). बाभूळ, शिरीष, वर्षावृक्ष इत्यादींचा अंतर्भाव असलेल्या उपकुलातील (मिमोजॉइडी), सु. सहा ते नऊ मी. उंचीचा हा काटेरी शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष मूळचा मेक्सिकोतील असून तेथून तो प्रथम फिलिपीन्समध्ये आणि नंतर भारतात व अंदमानात आणला गेला आणि आता तो सामान्यपणे रूक्ष जागी आढळतो. उष्ण कटिबंधात याची लागवड केली जाते, तथापि प्राण्यांनी विखुरलेल्या अनेक बिया पडीक जागी उगवून अनेक झाडे सर्वत्र वाढलेली दिसतात. खोड करडे, गुळगुळीत आणि त्यावर पिवळट पांढरी वल्करंध्रे (सालीतील छिद्रे) असतात. याचे सरळ व आखूड काटे रूपांतरित उपपर्णे असून संयुक्त पाने चार ते आठ सेंमी. लांब व फक्त दोन दलांची असतात. प्रत्येक दल विभागून पुन्हा त्याची दोन अवृंत (बिनदेठाची) लहान (१–४ सेंमी. लांब) दलके होतात व ती गर्द हिरवी, तिरपी-चिंचोळी असतात [→ पान]. जानेवारी ते मार्चमध्ये फांद्यांवर लहान फुलांचे झुबके येतात फुले फिकट पांढरी असून त्यांतील पाकळ्या तळाशी अंशतः जुळलेल्या व दहा जुळलेली केसरदले असतात  [→ फूल]. शिंबा (शेंग) प्रथम लालसर हिरवट पांढरी व नंतर लालसर, काहीशी चपटी, गाठाळ, पिळवटलेली आणि तडकणारी असून तीत सहा ते आठ काळ्या, चकचकीत व लालसर अध्यावरणाने (मगजाने) वेढलेल्या बिया असतात.

या झाडांचा मुख्य उपयोग त्यांच्या शेंगांतील गोड मगज खाण्याकरिता व झाडे रस्त्यांच्या दुतर्फा शोभेकरिता व सावलीकरिता लावण्यास करतात. बागेत कुंपणाकरिताही ही झाडे लावतात. बिया किंवा कलमे लावून अभिवृद्धी (लागवड) करतात. एप्रिल ते जूनअखेर फळे बाजारात मिळतात. पाने व फांद्या शेळ्यांना खाऊ घालतात. फळे दुभत्या जनावरांनाही चारतात. मगजापासून पेय बनवितात. खोडाच्या सालीपासून पिवळा रंग काढतात तो कातडी कमावण्यास वापरतात. साल स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी) असून तापावर व आमांशावर देतात पाने स्तंभक, वेदनाहारक व गर्भपातक असतात. लाकूड पिंगट, कठीण, जड व मजबूत असते ते खोकी, खांब, गाड्या व नांगर यांकरिता व विटांच्या भट्ट्यांत जळणाकरिता विशेषेकरून वापरतात. बियांतून काढलेले स्थिर (उडून न जाणारे) तेल फिकट पिवळे, चिकट व काहीसे भुईमुगाच्या तेलाप्रमाणे असते ते खाद्य असून साबण बनविण्यासही उपयुक्त असते. पेंड प्रथिनसंपन्न असल्याने ती जनावरांना उपयुक्त खाद्य आहे. सालीत ३७% टॅनीन असून हिरड्याच्या सालीबरोबर ती कातडी कमावण्यास चांगली असते. या झाडांवर लाखेचे किडे पोसतात. ही झाडे समुद्रकिनाऱ्यालगत वाढलेली आढळतात. 

पहा : लेग्युमिनोजी (मिमोजॉइडी) वर्षावृक्ष.

परांडेकर, शं. आ.

विलायती चिंच : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) शिंबा, (४) बीजोपांगासह बीज.