धोबी : या पक्ष्याचा मोटॅसिल्लीडी या पक्षिकुलात समावेश होतो. भारतात आढळणाऱ्या यांच्या जातींपैकी एक–शबल (चित्रविचित्र रंगाचा) धोबी–येथील कायमची रहिवासी असून बाकीच्या हिवाळी पाहुण्या म्हणून इकडे येतात. शबल धोब्याचे शास्त्रीय नाव मोटॅसिल्ला मदरासपटेन्सिस असे आहे. हिमालयाच्या ६१० मी. उंचीपासून खाली सगळीकडे तो आढळतो पण आसाममध्ये तो सापडत नाही. नद्या, ओढे, तलाव वगैरेंच्या काठी हा नेहमी असतो.

सगळ्या जातींच्या धोबी पक्ष्यांत हा मोठा असून साधारणपणे ⇨ बुलबुलाएवढा असतो. डोके, हनुवटी, गळा, छातीचा वरचा भाग आणि पाठ काळ्या रंगाची शरीराची खालची बाजू पांढरी चोचीच्या बुडापासून पांढरा पट्टा निघून डोळ्याच्या वरून मानेकडे गेलेला पंख काळे पण त्यांवर एक पांढरा पट्टा शेपटीची मधली पिसे काळी पण दोन्ही कडांची पांढरी असतात.

हे पक्षी नेहमी जोडप्याने जमिनीवर हिंडून किडे टिपीत असतात. जमिनीवर हे तुरूतुरू चालत जातात व मधूनमधून शेपटी खालीवर हालवीत असतात. एखादा उडणारा किडा दिसला की, त्याचा पाठलाग करून हा त्याला पकडतो. याची उडण्याची रीत मजेदार असते. पंख हालवीत थोडा वेळ उडाल्यावर तो पंख मिटून घेतो व अगदी खाली येतो पण लगेच पंख उघडून वर जातो आणि पुन्हा खाली येतो याचा आवाज मोठा, शीळ घातल्यासारखा असून गोड असतो. हा पक्षी गरीब स्वभावाचा आहे.

मोठी शबल धोबी

प्रजोत्पादनाचा काळ मार्चपासून सप्टेंबरपर्यंत असतो. या काळात नर उंच खडकावर किंवा अशाच एखाद्या उंच ठिकाणी बसून सुस्वर शीळ घालतो. घरटे पाण्याच्या जवळपास, खडकांच्या कपारीत किंवा पुलाच्या कमानीत असते. ते वाटीसारखे असून मुळ्या, केस, पिसे इ. पदार्थांचे केलेले असते. त्यात मादी ३-४ अंडी घालते. ती पांढरी असून त्यात करड्या, तपकिरी किंवा हिरव्या रंगाची छटा असते. त्यांवर तपकिरी ठिपके किंवा रेषा असतात.

स्थलांतर करून हिवाळ्यात भारतात येणाऱ्या धोब्यांच्या पुढील तीन मुख्य जाती आहेत. (१) करडा धोबी : वरची बाजू करडी, खालची पिवळी. (२) पिवळ्या डोक्याचा धोबी : कपाळ पिवळे, भुवया पिवळ्या रंगाच्या. उन्हाळ्याच्या आरंभी नराचे सगळे डोके चकचकीत पिवळे होते. (३) पांढरा धोबी : वरची बाजू करडी चेहेरा, हनुवटी, गळा पांढरा छातीवर काळा पट्टा खालचा भाग पांढरा पंख काळे पांढरे.

कर्वे, ज. नी.