वली दखनी : (१६६७-१७०७). प्रख्यात दखनी (दक्षिणेतील) उर्दू कवी. त्याच्या व्यक्तीगत ‘वली’ दखनीजीवनाविषयी फारशी अधिकृत व निश्चित माहिती उपलब्ध नाही. मियाँ  वली मुहंमद, मुहंमद वलीउल्ला, शम्सुद्दीन, शम्स वलीउल्ला अशा अनेक नावांनी तो ओळखला जातो. तो दख्खनचा की गुजरातचा, ह्याविषयीही मतभेद आहेत पण त्याचा जन्म अहमदाबाद येथे झाला असावा आणि नंतरचे वास्तव्य व शिक्षण औरंगाबाद येथे झाले असावे. अहमदाबादच्या अबुल-मआली ह्या स्नेह्यासमवेत तो दिल्लीला गेल्याचे (सु. १७००) उल्लेख सापडतात. दिल्लीमध्ये त्याची सूफी संतकवी शाह सादुल्ला गुलशनशी भेट झाली आणि त्याच्यावर सूफी पंथाचे संस्कार झाले. अहमदाबाद येथे त्याचे निधन झाले.

वलीने गझल, मस्नवी, कसीदा आदी प्रकारांत काव्यरचना केली. त्याच्या काव्यसंग्रहाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्याच्या कवितांच्या संग्रहाची १७४३ मधील हस्तलिखित प्रत दीवान-ए-वली नावाने ‘इंडिया ऑफिस लायब्ररी, लंडन’च्या संग्रही होती. त्यात तो दख्खननिवासी असल्याचा उल्लेख आहे. प्रख्यात फ्रेंच विद्वान गारसाँ-द-तास्सी याने आपल्या फ्रेंच प्रस्तावनेसह त्याचा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. वलीच्या गझलांना तो दिल्लीला जाण्यापूर्वीच चांगली प्रसिद्धी लाभली होती. त्याच्या गझला दिल्लीच्या बाजारपेठांतून गाइल्या जात. त्यांच्या नावीन्यपूर्ण स्वरूपामुळे दिल्लीच्या कवी व रसिकांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त स्वागत झाले. वलीने गझल या प्रकारास प्रतिष्ठा व नवे परिणाम प्राप्त करून दिले. पारंपरिक गझल प्रकारास धक्का न लावता, त्यात त्याने नवे अनुभव व अभिव्यक्ती आणली. त्याने नवा आशय व नवे संकेत उर्दू काव्यात निर्माण केले. त्याने घालून दिलेल्या काव्यादर्शाचे अनुकरण मोठ्या प्रमाणात झाले. उर्दू काव्येतिहासात वलीचे स्थान व महत्त्व अनन्यसाधारण आहे. वली गूढवादी सूफी परंपरेतील कवी होता. त्यामुळे त्याच्या काव्यात गूढवादी सूफी विचारांचा काही प्रमाणात आढळ होतो. तथापि त्याच्या काव्यात ऐहिकतेला जास्त प्राधान्य आहे. त्याची ऐंद्रिय विषयांतच विशेषत्त्वाने रमते. प्रेमभावनेची सूक्ष्म अभिव्यक्ती त्याच्या काव्यात आढळते, तसेच मित्रगौरवाची भावनाही त्यात प्रकर्षाने दिसते. त्याच्या कवितेतून त्याच्या प्रसन्न व शांत व्यक्तीमत्त्वाचे विलोभनीय दर्शन घडते. सौंदर्याच्या दर्शनाने त्याचे मन आनंदाने भरून येते व काव्यरूप घेते. दारिद्र्यातही आनंद मानण्याची वृत्ती त्यात दिसते.

वलीने ‘रेख्ता’ (जुनी उर्दू) भाषेतच प्रामुख्याने आपली रचना केली. त्याच्या काळात ग्रांथिक व राजव्यवहाराची भाषा म्हणून फार्सीस प्रतिष्ठा होती व दैनंदिन व्यवहारातील बोलीभाषा म्हणून उर्दू प्रचलित होती. पण वलीने उर्दूत ‘दीवान’ रचल्यामुळे दिल्ली वर्तुळातील नव्या कवींना फार्सीऐवजी मातृभाषा उर्दूत काव्यरचना करण्यास प्रेरणा मिळाली. परिणामी जनमानसावरील फार्सीचा पगडा हळूहळू कमी होत गेला आणि ऊर्दूला ऊर्जितावस्था व प्रतिष्ठा प्राप्त होत गेली. ऐतिहासिक दृष्ट्या वलीच्या काव्याचे महत्त्व उर्दूच्या ह्या प्रतिष्ठापनेत आहे. वलीच्या काव्यावर मात्र फार्सी काव्याचा प्रभाव होता. भारतीय संस्कृतीचाही त्याच्या रचनेवर प्रभाव दिसून येतो. गंगा, यमुना, राम, कृष्ण, सीता, लक्ष्मी इ. नावे त्याच्या काव्यात वारंवार आढळतात. फार्सी प्रभाव त्याच्या रचनेवर असला, तरी त्याने सरळ व शुद्ध उर्दूत विपुल रचना केली. आरंभीच्या उर्दू कवींत वलीचा समावेश होत असल्याने त्याच्या काव्यापेक्षा निखळ उर्दूत रचना करण्याचाच प्रभाव गहिरा असून, त्यामुळे उर्दू काव्य व भाषा व्यापक व समृद्ध बनविण्यात त्याच्या रचनेचा मोठाच हातभार लागलेला दिसून येतो.

फैजी, सुलताना (उर्दू) सुर्वे, भा. ग. (म.)