वालुसर्प : कोल्युब्रिडी कुलातील डिप्सॅडोमॉर्फिनी या उपकुलात सगळ्या वालुसर्पाचा समावेश होतो. भारतात यांच्या चार जाती आढळतात व त्या सगळ्या सॅमॉफिस प्रजातीतील आहेत. सॅमॉफिस काँडॅरॅनस ही जाती भारताच्या बहुतेक भागांत (महाराष्ट्रातदेखील) आढळते. वालुसर्प विषारी नाहीत.

वालुसर्प सडपातळ आणि सुंदर साप आहे. याची लांबी सु. ९० सेंमी. किंवा त्यापेक्षा थोडी जास्त असते. शेपूट शरीराच्या लांबीच्या एकचुर्थांश ते एकतृतीयांश असते. डोके लांबट अंडाकार असते. डोळे लहान व बाहुल्या वाटोळ्या असतात. कनीनिका तपकिरी असून तिच्या कडा पिवळ्या असतात. पाठ काळसर असून तिच्यावर डोक्यापासून शेपटीपर्यंत तपकिरी, फिक्कट हिरव्या किंवा पिवळ्या रंगाच्या चार लांब व बारीक रेखा असतात. वरचा ओठ पिवळा असतो. पोट पिवळसर असते. पोटावरील खवल्यांच्या प्रत्येक बाजूवर बारीक गर्द तांबडी रेषा असते.

हा दिवसा हिंडणारा साप आहे. उघडी जंगले, माळराने, भातशेते, त्याचप्रमाणे रेताड प्रदेशातही हा आढळतो. हा अंशतः वृक्षवासीदेखील आहे. बेडूक, सरडे आणि इतर लहान साप याचे भक्ष्य होय. मादी अंडी घालते.

कर्वे, ज. नी.