हिपॉक्राटीझ : (इ. स. पू. सु. ४६० – सु. ३७५). सुप्रसिद्ध प्राचीन ग्रीक वैद्य. परंपरेने ते पाश्चिमात्य वैद्यकशास्त्राचा जनक समजले जातात. हिपॉक्राटीझ यांच्याविषयी नंतर अनेक दंतकथा प्रसृत झाल्या. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सत्य आणि दंतकथा यांची सरमिसळ झाली. त्यांच्याबद्दलची सत्यासत्यता पडताळणे त्यामुळेच अवघड होऊन बसले. जवळपास ६० वैद्यकीय ग्रंथ किंवा लेखसंग्रह त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहेत, मात्र ते त्यांनीच लिहिले असण्याबाबत संदिग्धता आहे. वैद्यकक्षेत्रातील सेवेच्या नैतिक परिमाणांसाठी, अद्यापही वैद्यक पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना घ्यावी लागणारी ‘हिपॉक्राटीझ प्रतिज्ञा’ (हिपॉक्राटीझ ओथ) यासाठी ते प्रसिद्ध आहेत. याविषयी असाही संशय आहे, की ती त्यांनी लिहिलेली आहे की नाही. तरीही पाश्चिमात्य वैद्यकशास्त्रातील हिपॉक्राटीझ यांचे महत्त्व अबाधित आहे. 

 

हिपॉक्राटीझ यांचा जन्म कॉस बेट (ग्रीस) येथे झाला. ते एक वैद्यक व शिक्षक म्हणून प्रख्यात होते. त्यांचा तरुण प्रतिस्पर्धी ⇨ प्लेटो याने त्यांच्याविषयीदोनदा उल्लेख केलेला आहे. प्रोटॅ-गोरसमध्ये प्लेटोने हिपॉक्राटीझला ‘ॲस्क्लिपियाद ऑफ कॉस(म्हणजे जो विद्यार्थ्यांना मोबदल्या-साठी शिकवितो) म्हटले आहे. तसेच ते म्हणतात, हिपॉक्राटीझ हे पॉलिक्लीटस आणि फिडीयस या शिल्पकारांइतके वैद्य म्हणून प्रसिद्ध आहेत. आता हे सर्वत्र बऱ्यापैकी मान्यता पावले आहे की, ॲस्क्लिपियाद हा कोणी मंदिराचा पुजारी वा वैद्यांच्या संघटनेतील एक नसून तो पिढ्यान्पिढ्या विख्यात वैद्य निर्माण झालेल्या कुटुंबातील असतो. हिपॉक्राटीझसंबंधी प्लेटोचा दुसरा संदर्भ फीड्रस या ग्रंथात आलेला आहे. यामध्ये प्लेटोने म्हटले आहे की, हिपॉक्राटीझ प्रसिद्ध ॲस्क्लिपियाद असून त्यांचा वैद्यकाकडे बघण्याचा दृष्टिकोण तत्त्वज्ञानात्मक होता. ⇨ ॲरिस्टॉटल चा शिष्य मेनो यांनी त्यांच्या वैद्यकाच्या इतिहासात हिपॉक्राटीझची रोगांच्या कारणाविषयीची मते मांडली आहेत. अयोग्य आहार घेतल्याने अपचन होऊन सार निर्माण होतो आणि हा सार वाफा (वायू) बाहेर टाकतो. तो वायू सर्व शरीरात पसरतो आणि रोग निर्माण करतो. ॲरिस्टॉटल म्हणतात, ‘हिपॉक्राटीझ हा महान वैद्य होय, परंतु राजकारणात तो फारच लहान होता’.

 

हिपॉक्राटीझ
 

हिपॉक्राटीझ यांच्याविषयीची हीच काय ती माहिती समकालीन वा समकालीनांच्या जवळपास असलेल्यांकडून उपलब्ध होते. पाचशे वर्षानंतर ग्रीक वैद्य सोरेनस यांनी हिपॉक्राटीझ यांचे चरित्र लिहिले परंतु यातील माहिती ही पारंपरिक किंवा प्रतिभायुक्त होती. हिपॉक्राटीझची प्रतिष्ठा, त्यांच्या जीवनाविषयीच्या व कुटुंबाविषयीच्या दंतकथा या त्यांच्या मृत्यूनंतरच्या शंभर वर्षांत हेलेनिस्टिक काळात (ग्रीकांच्या काळात) वाढीस लागल्या. या काळात ईजिप्तधील ॲलेक्झांड्रिया वस्तुसंग्रहालयहे ग्रीसचा वैभवी भूतकाळ साजरा करण्यासाठी गतकाळातील साहित्य-विषयक संदर्भ आपल्या ग्रंथालयासाठी गोळा करीत होते. याच काळात असे घडले असण्याची शक्यता आहे की, ग्रीकांच्या अभिजात काळातील वैद्यकशास्त्रविषयक लेखन एकत्र करून त्या लेखनाला ‘हिपॉक्राटीझचा लेखसंग्रह’ (कॉर्पस हिपॉक्राटिकम) म्हणून नाव दिले गेले असावे. भाषातज्ञ व निष्णात वैद्यांनी त्यावर भाष्ये केली आणि परिणामस्वरूप अभिजात वैद्यकीय कामाचे श्रेय हिपॉक्राटीझ यांना प्राप्त झाले आणि त्यांच्या ज्ञात व्यक्तिमत्त्वामुळे ते आणखीनच दृढ झाले. 

 

द एम्बेसी या ग्रंथात हिपॉक्राटीझच्या कुटुंबाविषयी आणि कॉस व ग्रीसच्या इतिहासातील संकटमय घटनांविषयी लिहिले आहे. सदर ग्रंथ ॲलेक्झांड्रियाच्या ग्रंथालयात हिपॉक्राटीझच्या मूळ लेखनासोबत ठेवलेला आहे. नंतरच्या चार शतकांत द एम्बेसी ग्रंथाने अनेकांना कल्पनाप्रचुर लिहिण्यास प्रेरित केले. या ग्रंथातील लेखनाने हिपॉक्राटीझची प्रतिष्ठा वाढविण्यास मदतच झाली. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात देखील कॉर्पस मध्ये लेखनाची भर घालणे सुरूच होते. या लेखसंग्रहात ‘हिपॉक्राटीझ प्रतिज्ञे ‘चा देखील समावेश असून त्यामध्ये वैद्यकांच्या वर्तणुकीविषयी आदर्श नीतितत्त्वे घालून दिली आहेत. पुढे या प्रतिज्ञेत परिस्थितीनुसार बदलही झाले. 

 

‘हिपॉक्राटीझ प्रतिज्ञे ‘चा मजकूर दोन भागांत विभागला आहे. पहिल्या भागात वैद्यकीय शिक्षकांच्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या आणि विद्यार्थ्यांची शिक्षकांप्रती असलेली कर्तव्ये सांगितलेली आहेत. दुसऱ्या भागात वैद्याने कसे असावे याबाबत मार्गदर्शन आहे. वैद्याने आपल्या आकलनानुसार रुग्णास फक्त योग्य असा व फायदेशीर उपचार देण्यासंबंधी तसेच ते उपचार धोकादायक व त्रासदायक नसावेत याविषयी नमूद केले आहे. त्याप्रमाणेच वैद्याने आदर्श व्यक्ती म्हणून वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्य साधेपणाने जगण्याविषयी सांगितले आहे. 

 

तंत्रज्ञानात्मक वैद्यकशास्त्राचा विकास हेलेनिस्टिक व त्यानंतरच्या काळात झाला. शल्यतंत्र, औषधनिर्माणशास्त्र आणि शरीररचनाशास्त्र यांचा विकास झाला. शरीरक्रियाविज्ञान हा भाकित करता येणारा विषय झाला. तत्त्वज्ञानात्मक समीक्षेने वैद्यकीय सिद्धांतांना अधिक तर्कदुष्ट बनविले. एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या वैद्यकीय परंपरांमध्ये हिपॉक्राटीझला आपले प्रेरणास्थान व दैवत मानण्याची चढाओढ सुरू झाली. दुसऱ्या शतकातील वैद्य ⇨ गेलेन यांनी स्वतःची अशी अभूतपूर्व वैद्यकीय व्यवस्था तयार केली होती. आधीच्या कामाची चिकित्सा व त्यात त्यांनी टाकलेली भर यातून प्रबोधन काळातील यूरोपीय व अरेबिक वैद्यकशास्त्राचा पायारचला गेला होता. गेलेन हे वादग्रस्त होते, स्वतःच्या समकालीन व आधीच्या वैद्यांवर ते कडाडून टीका करीत असत. मात्र, ते आपल्या वैद्यकीय ज्ञानाचे व साधनेचे श्रेय हिपॉक्राटीझला देत असत. नंतरच्या काळातील वैद्यांसाठी हिपॉक्राटीझ प्रेरणास्थान म्हणून उभे राहिले, तरकळायला अवघड असे गेलेन फक्त खरे तपशील पुरविणारे झाले. काळ गेला तसा जुन्या वैद्यकशास्त्रातील कल्पना नव्या वैज्ञानिक पद्धतींनी व शोधांनी मागे पडल्या किंवा बदलल्या. गेलेन यांची अधिकारिता संपली. मात्र, हिपॉक्राटीझची वैद्यकशास्त्राचा जनक ही प्रतिमा कायम राहिली. एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत गेलेन हे वैद्यकीय सेवेत अप्रस्तुत झाले, तर हिपॉक्राटीझ यांचे वैद्यकाविषयीचे सामान्य ज्ञान नाहीसे व्हायला सुरुवात झाली. मात्र, हिपॉक्राटीझ वैद्यकीय व्यवसायातील नैतिक मूल्यांचा आदर्श म्हणून आजही प्रतिनिधित्व करीत आहे. 

 

हिपॉक्राटीझ यांचे लारीस (थेस्साली) येथे निधन झाले. 

वाघ, नितिन भरत