डूगाँग : या प्राण्याचे लौकिक नाव समुद्र गाय हे आहे. स्तनिवर्गाच्या सायरेनिया गणातील डूगाँगिडी कुलातल्या डूगाँग वंशातला हा प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव डूगाँग डूगान असे आहे. हा जलीय प्राणी तांबडा समुद्र, आफ्रिकेचा पूर्व किनारा, बंगालच्या उपसागरातील बेटांचा परिसर, मलाया द्वीपकल्प, मोलक्का बेटे, ऑस्ट्रेलियाचा उत्तर किनारा इ. ठिकाणी सापडतो. यांखेरीज हे प्राणी कच्छचे आखात, मलबार किनारा, श्रीलंकेचा वायव्य किनारा, अंदमान बेटाचा परिसर आणि मरग्वी द्वीपकल्प या ठिकाणीही आढळलेले आहेत. उष्ण प्रदेशातील समुद्रकिनाऱ्याजवळच्या ऊन पाण्यात राहणारे हे प्राणी असून ते उघड्या समुद्रात दूरवर कधीच जात नाहीत.

सर्वसाधारणपणे डूगाँगचे स्वरूप कान असलेल्या सीलसारखे असते. प्रौढ प्राण्याची सरासरी लांबी २·५–३·२ मी. असते. २७५ सेंमी लांबीच्या एका नराचे वजन १७० किग्रॅ. भरले आणि २४३ सेंमी. लांबीच्या मादीचे सु. १४० किग्रॅ. असल्याचे आढळून आले. सामान्यतः मादी नरापेक्षा लहान असते.

डूगाँग

याच्या शरीराच्या खालची बाजू कमी-अधिक प्रमाणात सपाट असून पाठ आणि दोन्ही बाजू गोलसर असतात. मान नसते डोके भरीव व पुढच्या बाजूला काहीसे रुंडित (तोडून टाकल्यासारखे) असते. पुढचे अवयव चपटे व फ्लिपरांसारखे (हालचालीसाठी वा तोल सांभाळण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या त्वचेच्या स्नायुमय घड्यांसारखे म्हणजे परांसारखे) असतात व त्यांवर नखे नसतात. पुच्छ पक्षावर खोल खाच असून त्याच्या दोन्ही पार्श्व पाली (मागील भाग) टोकदार असतात. मादीच्या पुढच्या अवयवांच्या लगेच मागे दोन स्तन असतात. मुख लहान असते. वरचा ओठ मांसल व घोड्याच्या नालाच्या आकाराचा असून खालच्या ओठाच्या पुष्कळच पुढे लोंबत असतो. प्रौढ प्राण्याच्या वरच्या जबड्यात दोन कृंतक (कुरतडण्यास उपयोगी पडणारे) दात असतात आणि वरच्या व खालच्या जबड्यात प्रत्येक बाजूला दोन किंवा तीन दाढा असतात. कृंतक दात अथवा ‘सुळके’ मोठे असून नरामध्ये ते खाली वळलेले व पुढे आलेले असतात. मादीमध्ये ते तसे नसतात. नाकपुड्या चंद्रकोरीसारख्या असून डोक्याच्या माथ्यावर असतात. डोळे लहान, खोल गेलेले पण मण्यांप्रमाणे चमकणारे असतात. पापण्यांमध्ये कित्येक ग्रंथी असून त्यांच्या तेलकट स्त्रावामुळे पाण्यात डोळ्यांचे रक्षण होते. बाहेरचा कान नसतो त्याच्या जागी एक छिद्र असते. शरीरावर केस असतात. मुस्कटाभोवती लांब ताठ केस असतात ते बहुधा संवेदी असावेत. शरीराच्या रंगात फेरबदल आढळतात पण साधारणपणे रंग फिक्कट तपकिरी अथवा करडा असतो.

डूगाँग हा अत्यंत निरुपद्रवी प्राणी आहे. यांची सामान्यतः जोडपी असतात किंवा तीन ते सहा व्यक्तींची टोळी असते. याच्या सगळ्याच हालचाली मंद असतात. ते दिवसा खोल पाण्यात विश्रांती घेतात व रात्री भक्ष्य मिळविण्याकरिता किनाऱ्याजवळ येतात. उथळ पाण्यात वाढणाऱ्या गवतावर आणि अनेक जातींच्या शैवलांवर ते उपजीविका करतात. गवत उपटून थोडे चावून ते सबंध गिळतात. पाण्याखाली भक्ष्य शोधीत असताना मधूनमधून श्वासोच्छ्‌वासाकरिता ते पाण्याच्या पृष्ठभागावर येतात व हवा नाकपुड्यांनी आत घेतात नंतर नाकपुड्या झडपांनी बंद करून भक्ष्य शोधण्याकरिता पुन्हा तळाशी जातात. यांचे श्रवणेंद्रिय तीक्ष्ण असते स्वादेंद्रियांचीही चांगली वाढ झालेली असते, पण दृष्टी मंद असते.

 यांचा प्रजोत्पादनाचा काळ ठराविक नसतो. सु. ११ महिन्यांच्या गर्भावधीनंतर मादीला दर खेपेस एकच पिल्लू होते. पिल्लाचा जन्म पाण्यातच होतो. मादी त्याला अतिशय जपते आणि कधीकधी त्याला पाठीवर घेऊन हिंडते.

या प्राण्यांपासून मिळणारे तेल, कातडे, चरबी आणि मांस यांकरिता माणसे त्यांची बेसुमार हत्या करतात. यांचे मांस रुचकर असते असे  म्हणतात. २००–३०० किग्रॅ. वजनाच्या डूगाँगपासून २४–५६ लि. तेल मिळते. मॅलॅगॅसीमधील आदिवासी यांचे मांस खातात व त्यांच्या शरीराच्या काही भागांचा कित्येक रोगांवर औषध म्हणून उपयोग करतात. बेसुमार हत्येमुळे काही क्षेत्रांत त्यांची संख्या अतिशय कमी झालेली आहे व मनुष्याची हाव वाढत राहिल्य़ास हे प्राणी केव्हा लुप्त होतील, ते सांगता येत नाही.

कर्वे, ज. नी. कुलकर्णी, सतीश वि.