निवटी :(निवटा). पेरिऑफ्‌थॅल्मिडी मत्स्यकुलातील पेरिऑफ्‌थॅल्मस वंशाचे मासे. यांच्या सु. १३ जाती आहेत. हे उष्ण कटिबंधातील असून आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात समुद्रकिनाऱ्यावर आढळतात. किनाऱ्यावरील पाण्याची डबकी, चिखलट जमीन व कच्छ दलदलींमध्ये ते राहतात. ओहोटीनंतर उघड्या पडलेल्या चिखलट किंवा रेताड जमिनीवर चालताना किंवा उड्या मारताना हे मासे नेहमी दिसतात. पुष्कळदा पाण्याच्या बाहेर येऊन खडकांवर किंवा कच्छ वृक्षांच्या मुळांवर ऊन खात ते पडतात पण त्यांची शेपटी मात्र पाण्यात बुडालेली असते.

निवटीच्या शरीराची लांबी सु . २०–२५ सेंमी. असते. शरीराचा रंगसर्वसाधारणपणे करडा किंवा फिकट तपकिरी असतो. डोके फुगीर व बेडकाच्या डोक्यासारखे दिसते. जाभाड फुगलेले असून मुस्कट अर्धगोलाकृती असते. डोळे डोक्याच्या माथ्यावर जवळजवळ असून मोठे, बटबटीत व पुढे आलेले असतात. डोळ्यांना आखूड देठ असून त्यांच्या साहाय्याने ते नेत्रकोटराच्या बाहेर काढता येतात किंवा आत ओढून घेता येतात. प्रत्येक डोळा स्वतंत्र्यपणे सगळीकडे फिरविता येत असल्यामुळे यांना सगळ्या बाजूंचे सहज दिसू शकते.

निवटी

पृष्ठपक्ष (पाठीवरील पर) दोन असून ते बहुधा उभारलेले असतात. अंसपक्ष (छातीचे पर) दोन असून ते मोठे व स्नायुमय असतात. त्यांचा उपयोग पायांप्रमाणे चालण्याकरिता किंवा उड्या मारण्याकरिता होतो. चालताना ते आपले शरीर फरपटत नेतात. अधरपक्ष (खालचे पर) दोन असून ते प्रायः अंसपक्षांच्या खाली असतात व त्यांची बुडे जोडलेली असतात. चालताना किंवा उड्या मारताना स्नायुमय शेपटीचाही उपयोग केला जातो. भक्ष्य शोधण्याकरिता हे कच्छ वृक्षांच्या मुळांवर चढतात व एका मुळावरूनदुसऱ्यावर उडी मारतात. हे इतके चलाख असतात की, उडत असलेले किडे ते चटकन पकडून खातात.

निवटी हा मासा असल्यामुळे श्वसनाकरिता त्याला पाण्याची आवश्यकता असते. जमिनीवर असताना क्लोमांच्या (कल्ल्यांच्या) वर असलेल्या दोन फुगीर आशयांत (पिशवीसारख्या भागांत) तो पाणी साठवून ठेवतो आणि ते संपल्यावर किनाऱ्यावरील पाण्यात लोळून त्यात पुन्हा पाणी भरून घेतो. या पाण्यामुळे क्लोम नेहमी ओले राहातात.

शेपटीचा उपयोग ही श्वसनासाठी होतो. पुष्कळदा हा पाण्याच्या बाहेर वृक्षांच्या मुळावर वसलेला असताना त्याची शेपटी पाण्यात असते. पुच्छपक्षात (शेपटीच्या परात) रक्तवाहिन्यांचे जाळे असल्यामुळे त्याच्यामार्फत श्वसन चालू राहाते. या माशाला एकसारखे पाण्यात राहाणे आवडत नसावे असे वाटते पण तो पाण्यापासून फार दूर केव्हाही जात नाही.

याच्या प्रजोत्पादनाविषयी काहीही माहिती नाही. मादी चिखलात बीळ करून त्यात अंडी घालते, असे म्हणतात.

यार्दी, ह. व्यं.