अयोध्या—१ : सुविख्यात हिंदू, बौद्ध आणि जैन तीर्थस्थान आणि प्राचीन कोशल देशाची राजधानी. उत्तर रेल्वेवरील फैजाबाद रेल्वे स्थानकापासून ६ किमी. ईशान्येस शरयू (घाग्रा) नदीच्या दक्षिण तीरावर हे भग्नावस्थेत आढळते. शाकेत, साकेत, कोशल, नंदिनी, अयोज्झा, विनीता, कोशल (सुकोशल), रामपुरी, इक्ष्वाकुभूमि, सोगेद, विशाखा अशी भिन्न नामांतरे असलेली अयोध्या नगरी ‘अवध’ अथवा ‘औध’ अशा नावांनी सध्या प्रसिद्ध आहे.

अयोध्या नगरीची स्थापना मनूने केली असे म्हटले जाते. ब्राह्मण ग्रंथांत ही वैभवशाली नगरी असल्याचा उल्लेख आढळतो. इक्ष्वाकुवंशीय राजांपैकी मांधातृ, हरिश्चंद्र, सगर, भगीरथ, दिलीप, खट्‌वांग, रघु, दशरथ व रामचंद्र हे पराक्रमी चक्रवर्ती सम्राट येथेच होऊन गेल्याने अयोध्येत सुशोभित रस्ते, गगनचुंबी इमारती, अनेक  प्रवेशद्वारयुक्त विस्तीर्ण तट व त्यांवरील अस्त्रे, शाल व आम्रवृक्षांच्या अनेक बागा, स्त्रियांनी चालविलेल्या नाट्यसंस्था इ. असल्याचे उल्लेख आढळतात. लव–कुश ह्यांनी राजधान्या अनुक्रमे श्रावस्ती व कुशावती येथे हलविल्याने अयोध्येस विजनावस्था प्राप्त झाली. सूर्यवंशीय ऋषभ राजाने अयोध्येस पुनर्वसन केले. महाभारतात ‘पुण्यलक्षणा ’ असा हिचा उल्लेख आढळतो. ‘अयोज्झा’ गावी गौतम बुद्ध दोन वेळा गेला होता, असा बौद्धवाङ्मयात उल्लेख आढळतो. बौद्धकाळी अयोध्येचे उपनगर साकेत समृद्धावस्थेत होते. ह्यूएनत्संगाच्या प्रवासवर्णनात येथे अशोकस्तूप, अनेक मठ व मंदिरे होती, असे उल्लेख आढळतात. जैनांच्या ऋषभदेव, अजितनाथ, अभिनंदन, सुमतिनाथ व अनंतनाथ या तीर्थंकरांचा जन्म अयोध्या येथे झाला होता. सुविख्यात जैनधर्मीय सम्राट भरत, सगर, मधवा, सनत्कुमार आणि सुभौम यांची राजधानी येथेच होती. पुरुषांना ७२ व स्त्रियांना ६४ विद्या शिकविण्याची व्यवस्था असलेले जैन विद्यापीठ येथे इ.स.पू. ६०० मध्ये असल्याचा हेमचंद्रसूरी उल्लेख करतात. मुसलमानी अंमलात अवध हा प्रांत होता. बाबराने येथील मंदिराची मशीद बनविली.

अयोध्या येथील अनेक तीर्थस्थानांचा निर्देश प्राचीन साहित्यात आढळतो. आज तेथे आढळणारी मंदिरे उत्तरकालीन असल्याने स्थानपत्यदृष्ट्या वैशिष्ट्यहीन आहेत. कनकभवन, रामजन्मस्थान, रत्‍नमंडप, स्वर्गद्वार, गोप्रतारतीर्थ, लक्ष्मणकुंड, हनुमानगढी वगैरे हिंदुधर्मीय स्थानेमणिपर्वत, सुग्रीवपर्वत, कुबेरपर्वत, दतूनकुंड ही बौध्दधर्मीय स्थाने  आणि तीर्थंकरांची मंदिरे ही जैनधर्मीय तीर्थस्थाने प्रसिद्ध आहेत.

शाह, र. रू. जोशी, चंद्रहास