आ. १. मानवी शुक्राणू : (१) शीर्ष, (२) ग्रीवा, (३) मध्य खंड, (४) प्लाझ्मा पटल, (५) पुच्छ, (६) पुच्छाग्र, (७) सूत्रकणिका आवरण, (८) अक्षीय तंतू जटिल रचना, (९) कर्ष-केंद्रकण, (१०) केंद्रकाबाहेरील टोपी, (११) केंद्रक, (१२) केंद्रकीय आवरण, (१३) ॲक्रोसोम.शुक्राणू : परिपक्व पुं-जनन कोशिकेला (पेशीला) शुक्राणू म्हणतात. ही विशेषीकृत पेशी असून हिची वाढ होत नाही. बहुतेक प्राण्यांतील नरांमध्ये शुक्राणुनिर्मिती होते. बहुतेक शुक्राणूंना चाबकासारखे पुच्छ असते. मात्र सूत्रकृमी, अयुतपाद, कवचधारी, डेकॅपॉड (उदा., क्रेफिश), डिप्लोपॉड (उदा., सहस्रपाद) या गटांतील प्राण्यांच्या शुक्राणूंना पुच्छ नसते व ते अचर समजले जातात. विशेषकरून सस्तन प्राण्यांसारख्या उच्च श्रेणीच्या पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत शुक्राणू ⇨ वृषणांत निर्माण होतात. मादीतील अंडाणूशी (अंडाशी) शुक्राणूचा संयोग होऊन फलन झाल्यावर नवीन संतती निर्माण होते. केवळ शुक्राणूपासून होणाऱ्या जीवोत्पत्तीला पुं-अनिषेकजनन म्हणतात. [→ अनिषेकजनन]. शुक्राणूचे वर्णन सर्वप्रथम ⇨ आंतॉन व्हान लेव्हेनहूक यांनी केले (१६७७). 

परिपक्व शुक्राणूचे शीर्ष, ग्रीवा (मान), मध्य खंड व पुच्छ हे ठळक भाग असतात (आ.१). प्रत्येक प्राणिजातीतील शुक्राणूच्या शीर्षाचा आकार वेगवेगळा असतो (आ. २). मानवी शुक्राणूचे शीर्ष चापट व बदामाच्या आकाराचे असून त्याची लांबी ४-५ मायक्रॉन व रुंदी २-३ मायक्रॉन असते (१ मायक्रॉन = एक दशलक्षांश मीटर). त्यात थोडेच कोशिकाद्रव्य असते आणि त्याचा बहुतेक भाग केंद्रकीय जननिक द्रव्याने (गुणसूत्रांनी) व्यापलेला असतो. डोळे, केस व त्वचा यांच्या रंगासारखी व्यक्तीची वैशिष्ट्यपूर्ण आनुवंशिक लक्षणे गुणसूत्रांमार्फत पुढील पिढीत नेली जातात. माणसाच्या शरीरातील प्रत्येक प्राकृत (सर्वसाधारण) कोशिकेत ४६ गुणसूत्रे असून व्यक्तीची सर्वसाधारण शारीरिक जडणघडण (आनुवंशिक पिंडधर्म) या गुणसूत्रांनी ठरत असतो. शुक्राणूमध्ये मात्र याच्या निम्मी म्हणजे २३ गुणसूत्रे असतात. असा शुक्राणू व २३ गुणसूत्रे असणारा अंडाणू यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या संततीच्या कोशिकेत ४६ गुणसूत्रे असतात. शुक्राणूमधील एक्स किंवा वाय या गुणसूत्रांनी भावी संततीचे लिंग निश्चित होते. [→ आनुवंशिकी लिंग].

आ. २. विविध प्राण्यांचे शुक्राणू : (१) घूस, (२) रांजा, (३) सॅलॅमँडर (उभयचर प्राणी), (४) पक्षी, (५) रातकिडा.

शुक्राणूच्या शीर्षाभोवती ॲक्रोसोम हे टोपीसारखे आवरण असते. त्यातील रसायनांची (उदा., हायलुरोनिडेज एंझाइम) शुक्राणूला अंडाणूत प्रवेश करण्यासाठी मदत होते. केंद्रक व ॲक्रोसोम दरम्यानच्या क्षेत्रात असणाऱ्या ॲक्टिन रेणूंची शुक्राणू व अंडाणू यांच्यातील आंतरक्रियेला मदत होते. शुक्राणूच्या मध्य खंडात सूत्रकणिका आवरण असून त्याभोवती प्लाझ्मा पटल असते. शुक्राणूचे पुच्छ म्हणजे तंतूचा केसासारखा बारीक झुबका असून तो शीर्ष व मध्य खंद यांना जोडलेला असतो. नऊ दुहेरी व दोन मध्यवर्ती सूक्ष्म नलिकायुक्त अक्षीय तंतू हा पुच्छाचा गाभा असतो व त्याच्याभोवती आवरण असते. पुच्छ ५० मायक्रॉनपेक्षा लांब असून मध्य खंडालगत त्याची जाडी १ मायक्रॉन असते व टोकाकडे त्याची जाडी ०·५ मायक्रॉनपेक्षाही कमी झालेली असते. पुच्छ चाबकाप्रमाणे आघात व आंदोलन करते. यामुळे शुक्राणूची चपळपणे हालचाल होते (म्हणून कधीकधी पुच्छाला कशाभिका म्हणतात). या हालचालीमुळे शुक्राणू अंडाणूपर्यंत पोचू शकतो. पुच्छाच्या हालचालीसाठी आवश्यक असलेली ऊर्जा मध्य खंडातील सूत्रकणिकांमार्फत मिळते. समागमाच्या वेळी शुक्राणू मादीच्या जननमार्गात सोडले जातात. अंडाणूचे फलन होईपर्यंत किंवा मृत्यू येईपर्यंत शुक्राणू तेथे हालचाल करीत राहतात. समागमानंतर माणसाचे शुक्राणू दोन ते तीन दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात आणि ते दोन दिवसांपर्यंत जननक्षम राहू शकतात. पुरुषाच्या आयुष्यात ४ हजार कोटींहून जास्त शुक्राणू निर्माण होतात. एका स्खलनात ३० ते ४० कोटी शुक्राणू असतात. मात्र अंडाणूचे फलन एकाच शुक्राणूने होते. शरीरात निर्माण होणाऱ्या प्रत्येक शुक्राणूत व अंडाणूत गुणसूत्रांमार्फत वाहून नेण्यात येणारे जननिक वृत्त (आनुवंशिक माहिती) किंचित वेगळे असते. यामुळे एकाच मात्यपित्याच्या संततीत साम्य व भेद निर्माण होतात. गोठवलेल्या स्थितीत मानवी शुक्राणू काही महिने वा वर्षे साठविता येतात. या काळात त्यांची फलनक्षमता टिकून राहते व प्राकृत तापमानाला आणून त्यांचा उपयोग करून घेता येतो. अशी पहिली शुक्राणू पेढी अमेरिकेतील मॅनहॅटन येथे स्थापन करण्यात आली.

नराच्या वृषणांत शुक्राणूंची निर्मिती व विकास होण्याच्या क्रियेला शुक्राणुजनन म्हणतात. वृषणांत अनेक रेतोत्पादक सूक्ष्म नलिका असतात. या नलिकांच्या भित्तींत शुक्राणू निर्माण होत असतात. या नलिकांत सिर्टोली कोशिका इतस्ततः विखुरलेल्या असतात. रेतोत्पादक नलिकांच्या बाह्य भित्तींमधील स्कंध कोशिकांपासून अपक्व (आद्य) शुक्राणुकोशिका तयार होतात. सिर्टोली कोशिका या अपक्व शुक्राणुकोशिकांचे पालनपोषण करतात. अपक्व शुक्राणुकोशिकांची वाढ झाल्यावर त्या रेतोत्पादक नलिकांच्या बाह्य पृष्ठभागावरून मध्यवर्ती पन्हळीत जातात. तेव्हा सिर्टोली कोशिकांची त्यांना मदत होते. मानवी अपक्व शुक्राणुकोशिकांत टप्प्याटप्प्यांनी बदल होत जाऊन सु. ७४ दिवसांनी परिपक्व शुक्राणू तयार होतात. या दरम्यान प्राथमिक जननकोशिकांच्या विभाजनाने २३ गुणसूत्रे असलेल्या द्वितीयक कोशिका बनतात. द्वितीयक कोशिकांच्या केंद्रकापासून शुक्राणूंचे शीर्ष व त्याभोवतीचे ॲक्रोसोम आणि कोशिकाद्रव्यापासून शुक्राणूंचे पुच्छ बनते. अशा रीतीने वृषणांत शुक्राणू सतत निर्माण होत असतात. वृषणातून बाहेर जाणाऱ्या वाहिन्यांद्वारे शुक्राणू अधिवृषणात साठविले जातात. मैथुनक्रिया न झाल्यास त्यांचा ऱ्हास व मग अभिशोषण होते.

पहा : अंड पुंस्त्वविद्या प्रजोत्पादन वंध्यत्व वीर्य ‘वीर्यसेचन, कृत्रिम’ वृषण. 

कुलकर्णी, सतीश वि.