किंग्स्टन – १ : जमेकातील सर्वांत मोठे शहर व राजधानी. लोकसंख्या १,१७,४०० उपनगरांसह ५,०६,३०० (१९७०). हे आग्नेय किनाऱ्यावरील एक खोल आखातावर वसले असून सोयीस्कर बंदर व व्यापाराचे केंद्र आहे. याचा इतिहास इंग्रज, स्पॅनिश व चाचे यांचे लढे व छापेमारी यांच्या साहसी कथांनी रंगलेला आहे. एके काळी येथे गुलामांच्या व्यापाराचीही मोठी बाजारपेठ होती. या शहराच्या घडणीत धरणीकंप व अग्निप्रलय यांचा हात आहे. जुनी राजधानी पोर्ट रॉयल ही १६९२ व १७०३ मधील प्रलयांत दोनदा नष्ट झाली व त्यानंतरची स्पॅनिश टाऊन ही राजधानीही अपुरी पडली. किंगस्टन हे व्यापारी शहर म्हणून वैभवास चढले होतेच त्यात १८७२ मध्ये राजधानीही तेथे आल्याने भरच पडली. कॅरिबियनमधील तुफानांच्या मार्गाजवळ असल्याने किंग्स्टनलाही त्यांचे तडाखे बसतात. १९०७ साली ते धरणीकंपाने जवळजवळ नष्टच झाले होते. हल्लीचे नवे किंग्स्टन उत्तम लेफ्टआखणीबांधणीबद्दल ख्यात आहे. वेस्ट इंडिज विद्यापीठ किंग्स्टनलाच आहे. त्या प्रदेशात योजिलेल्या चार तेलशुद्धीकारखान्यांपैकी एक तेथेच आहे व ब्रिटिशांच्या वेस्ट इंडिजमधील आरमाराचा एक तळही किंग्स्टनलाच आहे. खोबऱ्यापासून तेल व मार्गारीन, साबण, तसेच दारू गाळणे, लाकूडकाम, फळे डबाबंद करणे, कातडी कमावणे, मिठाई, सिगारेट, कापड, पादत्राणे, फर्निचर, औषधे, सौंदर्यप्रसाधने इत्यादींचे कारखाने, ग्रंथालये, संग्रहालये असून हे कॉफीच्या व्यापाराचे केंद्र आहे.

शहाणे, मो. ज्ञा.