ब्रूटस, ल्यूसिअस जूनिअस : (इ.स.पू.सु. सहाव्या शतकाचा उत्तरार्ध). रोमन प्रजासत्ताकाचा संस्थापक. ल्यूसि –असपासून ब्रूटस हे कुळाचे नाव झाले. या नावाचा अर्थ ‘मूर्ख’ असा होतो. तार्क्विनच्या मृत्युदंडाच्या शिक्षेतून वेडेपणाचे सोंग घेऊन ब्रूटसने आपली सुटका करून घेतली होती. म्हणून त्यास ‘ब्रूटस’ (मूर्ख) असे म्हटले जाते. ल्यूसिअस रोमन प्रजासत्ताकाचा संस्थापक असून जुलमी इट्रुस्कन राजा ल्यूसिअस तार्क्विनस स्यूपरबस याने बळकावलेले रोमचे राज्य याने परत मिळविले (इ. स. पू. ५०९) आणि नंतर प्रजासत्ताकाची स्थापना केली. ल्यूसिअस तार्क्विनस या जुलमी राजाच्या हुकूमशाही राजवटीला प्रजा कंटाळली होती. अशा वेळी ल्यूसिअस तार्क्विनसच्या सेक्स्टस या मुलाने ल्यूक्रीशिआ या ब्रूटस घराण्याशी संबंधित असलेल्या विवाहित स्त्रीवर बलात्कार केला. त्यामुळे ल्यूसिअस तार्क्विनसविरुद्ध बंद उद्‌भवले. परिणामतः या बंडाचा बीमोड करण्यासाठी ल्यूसिअस ब्रूटस याची प्रेटर म्हणून निवड झाली. तेव्हा तार्क्विनस पळून गेला आणि त्याने इटुरआची मदत घेऊन पुन्हा रोम जिंकण्याचा प्रयत्न केला तेव्हा ब्रूटसने त्याचा पूर्ण पराभव केला आणि अमाप खंडणी वसूल केली व नंतर रोमचे प्रजासत्ताक राज्य स्थापन केले, असे बहुतेक इतिहासकार मानतात. पुढे आपले मुलगे तार्क्विनसच्या कटात सामील झाल्याचे त्याला समजताच त्याने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. प्रसिद्ध फ्रेंच चित्रकार ⇨झाक ल्वी दाव्हीद (१७४८ – १८२५) याने या प्रसंगावर रेखाटलेले चित्र – द लिक्टर्स ब्रिंगिंग टू ब्रूटस द बॉडीज ऑफ हिज सन्स (१७८९) – फ्रेंच राज्यक्रांतीच्या वातावरणास अत्यंत प्रेरक ठरले. इटुस्कन युद्धाच्या वेळी स्यूपरबसच्या अरन्स या मुलाबरोबर झालेल्या द्वंद्वयुद्धात ब्रूटस मारला गेला असावा, असे परंपरेनुसार मानण्यात येते (इ. स. पू. सु. ५०७).

शेख, रुक्साना