खोकड : मांसाहारी गणातील ज्या कुलातला कोल्हा आहे त्याच कॅनिडी कुलातील हा प्राणी आहे. भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत हा सर्वत्र आढळतो. ह्याचे शास्त्रीय नाव व्हल्पिस बेंगॉलेन्सिस असे आहे.

ह्याचे डोके आणि धड मिळून लांबी ४५–६० सेंमी. शेपूट २५–३५ सेंमी. वजन २–३ किग्रॅ. असते. आकाराने लहान व सडपातळ पाय बारीक शेपटीचे टोक काळे शरीराचा रंग करडा किंवा राखी डोके, मान आणि कानाची मागची बाजू पुसट काळसर थंडीत याचा रंग पांढुरका होतो पण पाय तांबूसच असतात. हिवाळ्यात उत्तर भारतातील खोकडांना दाट आणि सुंदर केस येतात व त्यांनी थंडीचे निवारण होते.

खोकड मोकळ्या मैदानात राहतो दाट जंगलात तो नसतो. वाळवंटी प्रदेशालगतच्या वैराण आणि झुडपे असलेल्या भागात तो नेहमी राहतो. काही खोकड लागवडीखालच्या जमिनीत, कालव्यांच्या आसपास किंवा खडकाळ जमिनीत बिळे करून राहतात. बिळात पाणी साठेल असे वाटले, तर लहानशा टेकाडावर तो बीळ करतो. बिळात ६०–९० सेंमी. खोलीवर एक दालन असते बिळाला अनेक वाटा असतात, काही बंद तर काही दालनात जातात. खोकड निशाचर आहे दिवसा तो झोप घेतो व तिन्हीसांजेनंतर भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो. अंधार दाटून आल्यावर याचे ओरडणे सुरू होते. लहान सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, खेकडे आणि कीटक हा खातो. कलिंगडे, बोरे आणि हरबऱ्याचे घाटे देखील तो खातो. कोंबड्यांवर हा क्वचितच हल्ला करतो. उंदीर व खेकडे यांचा नाश करीत असल्यामुळे हा शेतकऱ्यांना हितकारक आहे.

पळून जाण्याखेरीज याला स्वसंरक्षणाचे दुसरे साधन नाही. पळताना वाकडेतिकडे पळून किंवा झटकन वळून तो शत्रूला हातोहात चकवतो. वळताना शेपटीने आपला तोल सांभाळतो.

खोकड

हिवाळा हा ह्याच्या प्रजोत्पादनाचा मुख्य काळ होय. मादीला दर खेपेस चार पिल्ले होतात. नर व मादी दोघेही पिल्लांची काळजी घेतात. पिल्ले बिळातच लहानाची मोठी होतात.

काश्मीर, लडाख आणि हिमालयाच्या काही भागांत एक तऱ्हेचा खोकड आढळतो. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा खोकड म्हणतात. त्याच्या शेपटीचे टोक पांढरे असते. त्याचे शास्त्रीय नाव व्हल्पिस व्हल्पिस आहे.

दातार, म. चिं.