ऱ्हायझोपोडा : प्रोटोझोआ (आदिजीव) प्राणिसंघातील एक वर्ग. या संघाच्या वर्गीकरणासंबंधी बरेच मतभेद आहेत. सर्वसाधारणपणे कोशिकांची (पेशींची) रचना व इतर लक्षणे विचारात घेऊन या संघाचे चार वर्गांत विभाजन केले आहे. त्यांतील ऱ्हायझोपोडा हा एक वर्ग आहे. काही वर्गीकरण पद्धतींत या वर्गास सार्कोडिना असेही म्हणतात. या वर्गातील प्राणी ⇨ पादाभाच्या सहाय्याने चलनवलन करतात. हे पादाभ अनेक प्रकारचे असतात. त्यांच्यावर पातळ आवरण असते. पादाभांचा उपयोग अन्नाचे कण पकडण्याकरिताही केला जातो. काही ऱ्हायझोपोडा ⇨ कशाभिकायुक्त प्रोटोझोआसारखे दिसत असले, तरी ते तितके संघटित नाहीत. या वर्गात ⇨अमीबाचा समावेश आहे. या कोशिकांचा आकार अनियमित व सममितीविरहित असतो. सममिती आढळलीच, तर ती गोलीय असते. यांच्या कोशिकेत व अग्र-पश्च संघटन किंवा उत्तर-अधर असे पृष्ठभाग नसतात. पादाभांचा आकार सारखा बदलत असतो. त्यामुळे शरीरकोशिकेचा आकारही बदलत असतो. काही ऱ्हायझोपोडांत कोशिकेभोवती कवच किंवा कंकाल असत. जीवद्रव्याची अंतर्द्रव्य व बहिर्द्रव्य यांत विभागणी झालेली असते. कोशिकेत एक किंवा अनेक केंद्रके (कोशिकेच्या क्रियेवर नियंत्रण ठेवणारे गोलसर पुंज) असतात. हे प्राणी गोड्या तसेच खाऱ्या पाण्यातही आढळतात. गोड्या पाण्यात राहणाऱ्या ऱ्हायझोपोडात ⇨ संकोचनशील रिक्तिका असतात. पादाभांच्या सहाय्याने जटिल अन्नकण पकडले जातात व त्यांवर पोषण होते. पादाभ चार प्रकारचे असतात. खंड-पादाभ हे दंडगोल आकाराचे असून यांची टोके गोल असतात. यांच्या जीवद्रव्यात अंतर्द्रव्य व बहिर्द्रव्य असते. अमीबाचे पादाभ या प्रकारचे आहेत. तंतुपादाभ हे नाजूक असून टोकदार असतात व त्यांत नुसते बहिर्द्रव्यच असते. जालरूप पादाभात तंतूंचे जाळे झालेले असते. अक्षपादाभात अक्ष असतो. या पादाभांचा उपयोग मुख्यतः अन्न जमविण्यास होतो. प्रत्येक जातीत एक प्रकारचा पादाभ असतो. पादाभांच्या सहाय्याने अमीबाचे जे चलनवलन होते ते समजण्याकरिता निरनिराळे सिद्धांत मांडण्यात आले आहेत. त्यांपैकी दोन महत्त्वाचे आहेत. एका सिद्धांतानुसार ⇨ पृष्टताण हे चलनवलनाचे कारण देण्यात येते, तर दुसऱ्या सिद्धांताप्रमाणे श्यानतेतील (दाटपणातील) फरक हे कारण दिले जाते.

ऱ्हायझोपोडा वर्गातील प्राण्यांचे प्रजनन (पैदास) प्रामुख्याने अलैंगिक असते. याचे तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार द्विभाजनाचा आहे. यात कोशिकेचे केंद्रकासकट दोन लहान भाग होऊन प्रत्येक भाग स्वतंत्रपणे जगू लागतो. अनुकूल परिस्थितीत हा प्रकार आढळतो. दुसरा प्रकार बहुभाजनाचा आहे. यात कोशिकेभोवती कवच तयार होते. या कवचात केंद्रकाचे अनेक भाग होऊन त्यांभोवती जीवद्रव्य जमा होते व यथाकाल कवच फुटून अनेक लहान कोशिका बाहेर पडतात व स्वतंत्रपणे जगू लागतात. प्रतिकूल परिस्थितीत हा प्रकार अवलंबिला जातो. तिसऱ्या प्रकारास बीजाणुजनन म्हणतात. यात कवच तयार होत नाही. केंद्रकाचे अनेक भाग होऊन त्यांभोवती जीवद्रव्य जमा होते व त्यावर पटल तयार होते. यथाकाल हे पटल तुटून बीजाणू पडतात व स्वतंत्रपणे जगू लागतात. अनेक वेळा अलैंगिक प्रजोत्पादन झाले म्हणजे लैंगिक प्रजोत्पादन होते. यात दोन ऱ्हायझोपोडा जवळ येऊन केंद्रकीय द्रव्यांची अदलाबदल होते. नंतर ते एकमेकांपासून विलग होऊन स्वतंत्रपणे जगू लागतात आणि पुन्हा अलैंगिक प्रजोत्पादन सुरू होते.

पूर्ण कोशिकेचे कृत्रिक रीत्या विभाजन केले व त्यामुळे निर्माण झालेल्या तुकड्यात जर केंंद्राकाचा भाग असला, तर त्या तुकड्यापासून पूर्ण कोशिका तयार होते.

ऱ्हायझोपोडा एकाकी व स्वतंत्र जीवन जगणारे प्राणी आहेत. काही परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) व सामूहिक जीवन जगणाऱ्या जातीही आढळतात. या वर्गातील प्राण्यांच्या व विशेषतः अमीबाच्या निरनिराळ्या उद्दीपकांविरुद्ध काय प्रतिक्रिया आहेत यांसंबंधी प्रयोग झाले आहेत. यांत्रिक आघात, स्पर्श, रसायने, तापमान, प्रकाश, अंधकार या सर्व उद्दीपकांस त्याच्याकडून नकारात्मक प्रतिक्रिया (प्रतिसाद) मिळाली आहे.

या वर्गात ⇨फोरॅमिनीफेरा, ⇨रेडिओलॅरिया, ⇨हीलिओझोआ या खोल समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांचा समावेश होतो. फोरॅमिनीफेरा प्राण्यांना सर्पिल आकाराचे कार्बोनेटाचे कवच असते. यामुळे या प्राण्यांना संरक्षण मिळते. कवचावरील छिद्रांमधून पादाभ बाहेर पडतात. मेलेल्या प्राण्यांच्या कवचाचे समुद्रतळावर थर साचतात. रेडिओलॅरियाचे कवच सिलिकेचे असते. यांच्या कवचाचेही समुद्रतळावर थर आढळतात. हीलिओझोआ या प्राण्यांची कोशिका गोलाकार असून तीवर गुळगुळीत आवरण असते. हे प्राणी समुद्रात तरंगत राहतात.

पहा : अमीबा प्रोटोझोआ.

संदर्भ : Hyman, Libbie H. The Invertebrates, Vol. I, New York. 1940.

इनामदार, ना. भा.