मिल्हा (आर्डीओला ग्रेआय)

मिल्हा : या पक्ष्याला ‘आंधळा बगळा’ असेही म्हणतात. इंग्रजी भाषेतील याचे लौकिक नाव पॅडी बर्ड म्हणजे साळ पक्षी किंवा पाँड हेरॉन असे आहे. हा बकसमूहातलाच असल्यामुळे आर्डीइडी पक्षिकुलात याचा अंतर्भाव होतो. याचे शास्त्रीय नाव आर्डीओला ग्रेआय असे आहे.

मिल्हा भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश आणि मलाया द्वीपकल्पात आढळतो. भारतात तो सगळीकडे दिसून येतो. डोंगराळ भागात १,२०० मी. उंचीवर, तर काश्मीर व नेपाळमध्ये १,५०० मी. उंचीवर तो आढळला आहे. नद्या, लहानमोठे तलाव, तळी, डबकी, भात-खाचरे, खाड्या वगैरे ठिकाणी वा थोडक्यात सांगावयाचे म्हणजे ज्या ठिकाणी पाणी आहे अशा सर्व ठिकाणी हा राहतो.

गायबगळ्यापेक्षा हा लहान असून याची लांबी ४६ सेंमी. असते. निश्चल उभा असताना याचा रंग मातीसारखा तपकिरी दिसतो पण उडाल्याबरोबर त्याचे पंख, ढुंगण आणि शेपूट तकतकीत पांढरी असल्याचे दिसून येते. डोके व मान गडद तपकिरी व त्यांच्यावर पिवळ्या रेषा हनुवटी व गळा पांढरा पाठ आणि खांदे राखी-तपकिरी छातीच्या वरच्या भागावर तपकिरी रेषा शरीराच्या बाकीच्या भागावरील पिसे पांढरी. विणीच्या हंगामात डोक्यावर लांब, पांढऱ्या पिसांचा तुरा आणि पाठीवर केसांसारखी लांब तांबूस पिंगट पिसे उगवतात. डोळे पिवळे, चोच पिवळी आणि पाय मळकट हिरव्या रंगाचे असतात.

मासे, बेडूक, खेकडे आणि किडे हे याचे खाद्य होय. पाण्याच्या काठावर चिखलात किंवा पावले बुडतील इतक्या उथळ पाण्यात पाण्याकडे टक लावून तो नेहमी निश्चल उभा असतो आणि भक्ष्य दिसताच तो ते चटकन टिपतो. कधीकधी उथळ पाण्यातून तो सावकाश चोरपावले टाकीत भक्ष्याची टेहळणी करीत असतो. हा निश्चल उभा असताना याचे रंग बाह्य परिस्थितीशी इतके जुळणारे असतात की, तो आपल्याला दिसत नाही उडाल्यावरच दिसतो. याची उडण्याची पद्धती इतर बगळ्यांसारखीच असते. पानांनी भरलेल्या मोठ्या झाडावर कावळे आणि इतर पक्षी यांच्या सहवासात यांचे थवे रात्री विश्रांती घेतात. हा एक प्रकारचा कर्कश आवाज काढतो.

मिल्ह्यांचा प्रजोत्पादनाचा काळ उत्तर भारतात मेपासून सप्टेंबरपर्यंत तर दक्षिण भारत व श्रीलंकेमध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा असतो. आंबा, चिंच किंवा अशाच एखाद्या मोठ्या झाडावर जमिनीपासून ३–९ मी. उंचीवर फांद्यांच्या दुबेळक्यात तो घरटे बांधतो. घरटे लहानसर उथळ वाटीसारखे असून काटक्यांचे बनविलेले असते. एकाच झाडावर पुष्कळ मिल्ह्यांची आणि इतर बगळ्यांची घरटी असतात. मादी ३–५ अंडी घालते. ती फिक्या हिरवट निळ्या रंगाची असतात. २४ दिवसांनी पिले अंड्याबाहेर येतात.

कर्वे, ज. नी.