चित्रपटातील रंगभूषा आणि वेशभूषा : मुख्यतः चित्रपट ही वास्तवाची हुबेहूब अशी प्रतिकृती असल्यामुळे त्यातील रंगभूषा आणि वेशभूषा ही वास्तवदर्शी असते. चित्रपटातील पात्रांच्या विशिष्ट रंगभूषेची अथवा वेशभूषेची वेगळी अशी जाणीव प्रेक्षकांना होऊ नये, अशी दक्षता घ्यावी लागते. म्हणजे चित्रपटातील रंगभूषा आणि वेशभूषा परिश्रमपूर्वक साधलेल्या असल्या, तरी त्या स्वाभाविक वाटाव्या याची काळजी घ्यावी लागते म्हणूनच चित्रपटीय रंगभूषेची आणि वेशभूषेची स्वतंत्र अशी शाखा असून तिचे तंत्रशुद्ध शिक्षण घेणे आवश्यक असते. अशा शिक्षणाच्या सोयी पश्चिमी देशांत उपलब्ध आहेत.

'हंचबॅक ऑफ नोत्र दॅम' (१९२३ ) मधील लीन चेनी रंगभूषेपुर्वी व रंगभूषेनंतर

चित्रपटातील रंगभूषेचे प्रयोजन सामान्यतः तीन प्रकारचे असते. उदा., (१) पात्राचा चेहरा कृत्रिम विद्युत प्रकाशात स्वाभाविक दिसेल असा राखणे, (२) मूळ चेहरेपट्टीत त्याच्या भूमिकेनुसार योग्य तो बदल करणे, (३) पात्राच्या मूळ चेहऱ्यात काही व्यंगे वा उणिवा असल्यास त्या दूर करणे. अर्थात अशा रंगभूषेसाठी रंगभूषाकाराला मानवी शरीराचे शास्त्रीय ज्ञान असावे लागते. चेहऱ्याप्रमाणेच केशभूषा हाही महत्त्वाचा घटक असतो. स्त्री-पुरुषांच्या केशभूषेचे अनेक प्रकार प्रचलित असतात. चित्रपटातील पात्रांच्या केशभूषा या सामान्यतः रूढ संकेतांनुसार राखलेल्या असतात. तथापि केशभूषांचे नवे नवे प्रकारही योजण्याची कल्पकता केशभूषातज्ञ दाखवितात. पुष्कळदा चित्रपटातील नायक-नायिकांच्या केशभूषांचे सर्रास अनुकरण समाजातील तरुण-तरुणींचा वर्ग करीत असतो. चित्रपटातील केशभूषेच्या सोयीसाठी केसांचे तयार टोपही वापरतात. हल्ली पुष्कळ नटनट्या केशभूषेसाठी आपले स्वतःचे तज्ञ केशभूषाकारी तसेच मोठमोठे कलाकार सर्वसाधारण रंगभूषेसाठी व वेशभूषेसाठीही आपले स्वतःचे तज्ञ बाळगतात.

'गोपालकृष्ण' (१९३८) मधील कंस.

चेहऱ्यावरील किरकोळ व्यंगे किंवा उणिवा रंगभूषेद्वारा दूर केल्या जातात. खोलगट खापड गाल थोडेसे गुबगुबीत बनविणे शक्य असते किंवा याउलटही प्रकार शक्य असतो. नाक, डोळे, भुवया, चेहऱ्यावरील सुरकुत्या, दातांची ठेवण इ. बाबतींत योग्य ते फेरफार भूमिकेनुसार करून घेतले जातात. त्याचप्रमाणे डोळ्यात अश्रू, अंगावरील जखमा व रक्तस्त्राव दाखविण्यासाठीसुद्धा योग्य ते रंगभूषेचे तंत्र वापरतात. हंचबॅक ऑफ नोत्र दॅम  या १९२३ सालच्या चित्रपटात लॉन चेनी हा नट आपला एक डोळा झाकून त्याच्या थोडा वर दुसरा डोळा चिकटवी व चेहरा विद्रूप दिसावा म्हणून तोंडात शिशाच्या गोळ्या ठेवी. लेडी एल्  या चित्रपटात सोफिया लॉरेन किंवा गुड बाय मिस्टर चिप्स  मध्ये रॉबर्ट डोनेट अगदी तरुणपणापासून जख्खड वृद्ध होईपर्यंत दाखविले आहेत. हे अवस्थांतर योग्य त्या रंगभूषेने साध्य केलेले आहे. पॉल म्यूनी हा अमेरिकेतील एक श्रेष्ठ चरित्र अभिनेता होय. नेपोलियन, चिनी शेतकरी, शास्त्रज्ञ लूई पाश्चर, साहित्यिक एमिल झोला अशा विविध भूमिका या कलावंताने अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या. प्रत्येक वेळी त्याने केवळ उत्कृष्ट अभिनयच वेगळा केला असे नाही, तर तो दरवेळी वेगळाच दिसत असे. त्याचे बरेच श्रेय रंगभूषेलाही द्यावे लागेल.

डॉ. जेकिल अँड मि. हाईड  या चित्रपटात तर उमदा दिसणारा डॉ जेकील हा हाईड झाल्यावर अत्यंत भयानक दिसतो. ही किमया रंगभूषेमुळेच होऊ शकते. नया दिन नयी रात  ह्या हिंदी चित्रपटात संजीवकुमार या एकाच नटाने वेगवेगळ्या प्रकारच्या नऊ भूमिका केल्या आहेत. त्यांच्या यशात रंगभूषा-वेशभूषा यांच्या किमयेचाही वाटा आहे.

रंगभूषेसाठी अनेक द्रव्ये वापरतात. खनिज तेल, ग्लिसरिन, ऑलिव्ह तेल यांचा फवारा मारून अगर ते अंगाला चोळून घाम आलेला दाखवितात किंवा घामाची तुकतुकी आणतात. अश्रू यावेत म्हणून डोळ्यांना ग्लिसरीन लावतात. चिकटपट्टी लावून त्यावर विशिष्ट प्रकारचे मेण पसरून शरीरावर झालेली जखम दाखविता येते, रक्त दाखविण्यासाठी त्याच्या सारखा रंग वापरतात. लाल रंगाच्या जिलेटिनच्या कुप्या वापरून मारामारीच्या किंवा अपघाताच्या वेळी शरीराच्या कोणत्याही भागावर होणारा रक्तस्त्राव दाखविता येतो. कृत्रिम नाक किंवा डोळे तयार करण्यासाठी स्पंजी रबराचा वापर करतात. चेहऱ्यावरील किरकोळ फेरबदल करण्यासाठी मेणाचा वापर करतात. पातळ प्लॅस्टिकची टोपी वापरून डोक्याचा तुळतुळीत चमनगोटा दाखविता येतो. कृत्रिम केस (क्रेप हेअर) दाढीमिशीसाठी वापरतात. यांशिवाय नाना रंगांच्या कांड्या, पेन्सिली, कुंचले यांचा उपयोग करून ओठांचा, डोळ्यांच्या पापण्यांचा, गालांचा हव्या त्या प्रकारचा रंग दर्शविता येतो. मुखवट्यांचा वापर करून अनेक भूमिका एकच व्यक्ती करू शकते अथवा नवा आभास निर्माण करता येतो.

चित्रपटातील दृश्यांचे चित्रीकरण अनेक दिवस चालते म्हणून पात्रांच्या रंगभूषेत व वेशभूषेत सुसंगती राखणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी पहिल्या वेळी केलेल्या रंग-वेशभूषेची छायाचित्रे घेऊन त्यानुसार नंतरच्या रंग-वेशभूषेत संगती राखता येते. यासाठी प्रत्येक पात्राच्या रंग-वेशभूषेचा तपशील एक सहायक दिग्दर्शक टिपून ठेवतो. तसेच प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी रंगभूषा व्यवस्थित राखण्यासाठी सहायक रंगभूषाकार नेहमी हाताशी लागतात. चित्रीकरणाच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत अखंडपणे चालणारी अशी ही रंगभूषा-वेशभूषा प्रक्रिया आहे.

शंखशिंपल्यानी अलंकृत अहिरावण, 'चंद्रसेना', १९३५. चित्रपटातील पात्रांच्या वेशभूषा त्याच्यातील कथानकाच्या काळानुसार राखणे आवश्यक असते. पौराणिक आणि ऐतिहासिक चित्रपटात वेशभूषेबद्दल विशेष अशी काळजी घ्यावी लागते. यासाठी जुन्या साहित्याचा काळजीपूर्वक अभ्यास करावा लागतो. शिवाय समाजासमोर असलेल्या पौराणिक अथवा ऐतिहासिक स्त्री-पुरुषांच्या प्रतिमा लक्षात घ्याव्या लागतात, यांत कल्पनाशक्तीला वाव असतो हे खरे तथापि ऐतिहासिक अभ्यासाने त्या कल्पनाशक्तीला योग्य ते वळण द्यावे लागते. प्रभात फिल्म कंपनीच्या रामशास्त्री  या बोलपटात यथायोग्य अशी ऐतिहासिक वेशभूषा एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच दिसली, असे मानले जाते. दादासाहेब फाळके यांनी आपल्या पौराणिक चित्रपटांतील पात्रांना महाराष्ट्रीय धर्तीची वेशभूषा दिली होती ती परप्रांतीयांना रुचली नव्हती. पुढे राजा रविवर्मा यांच्या पौराणिक चित्रांतील वेशभूषेनुसार बाबूराव पेंटर यांनी पौराणिक पात्रांच्या वेशभूषेला वेगळे वळण दिले आणि तेच सर्व भारतीय चित्रपटसृष्टीत रूढ झाले.

रंगीत चित्रपट व साधे चित्रपट यांच्यातील रंगभूषेत व वेशभूषेत फरक असतो. कॅमेऱ्याच्या दृष्टीने कोणते रंग ग्राह्य आहेत याचा विचार करून रंगभूषा व वेशभूषा ठरवावी लागते. यासाठी छायाचित्रकाराचाही सल्ला घेतला जातो. फिल्मचा प्रकार, छायाचित्रणाचे तंत्र यांचा या दोन्ही घटकांवर सतत परिणाम होत असल्याने चित्रपटातील रंगभूषा व वेशभूषा ठरविताना अनेक तांत्रिक अवधाने राखावी लागतात.

चित्रपटांतील रंगभूषा व वेशभूषा या दोहोंच्या बाबतींत संबंधीत दृश्याच्या पार्श्वभूमीचाही विचार करावा लागतो. ज्या पार्श्वभूमीवर चित्रपटातील पात्रे वावरतात, त्या पार्श्वभूमीला उचित अशी त्यांची रंगभूषा व वेशभूषा राखावी लागते. तथापि कथानकाच्या दृष्टीनेही त्यांचा विचार करावा लागतो.

चित्रपटातील रंगभूषा-वेशभूषा हा आता खास प्रशिक्षित कलावंतांचा विभाग बनत आहे. त्यांच्या तांत्रिक प्रशिक्षणाच्या सोयीही अमेरिकेसारख्या प्रगत देशांत उपलब्ध आहेत. भारतात हा विभाग परंपरेने हे काम करणाऱ्या कलावंतांनी बहुधा सांभाळलेला असला, तरी यापुढे प्रशिक्षित रंगभूषाकारांची अधिकाधिक गरज आहे. सरोश मोदी, हरिपादचंद्र, केशव परांजपे, जावडेकर हे काही कल्पक रंगभूषाकार आहेत.

शिंदे, मा. कृ.