वर्णकी लवक : (क्रोमॅटोफोर). ही रंगद्रव्य असलेली एक कोशिका (पेशी) आहे. या रंगद्रव्याचे कण विखरू शकणारे वा एकत्र येऊ शकणारे असे म्हणजे हालचाल करणारे असतात. वर्णकी लवक बहुतेक प्राण्यांच्या बाह्यत्वचेत किंवा अधिक खोलवर असणाऱ्या अन्य विशिष्ट ऊतकांतही (समान रचना व कार्य असणाऱ्या  कोशिकासमूहांतही) सापडतात. वर्णकी लवकातील रंगद्रव्याच्या रंगावरून प्राण्याचा रंग ठरतो. वर्णकी लवक एक कोशिकीय वा अनेक कोशिकीय असतो. अनेक शाखा असलेल्या वर्णकी लवकातील केंद्रक (कोशिकेच्या कार्यावर नियंत्रण ठेवणारा गोलसर पुंज) मध्याशी वा बाजूच्या शाखेतही असते. यातील रंगद्रव्याचे कण जीवद्रव्यात (कोशिकेतील सजीव पदार्थांत) पसरलेले किंवा एकाच जागी एकवटलेले असतात. शाखांतील सर्व रंगद्रव्य मध्यापाशी एकत्रित झाले म्हणजे वर्णकी लवक सूक्ष्म टाचणीच्या टोकाप्रमाणे दिसतो व प्राण्याचा रंग फिकट दिसतो. उलट हे रंगद्रव्य सर्व शाखांत पसरल्यावर प्राणी गडद रंगाचा दिसतो. असा रंगबदल सामान्यपणे स्वसंरक्षण, धोक्याची जाणीव, तसेच भय, राग, लैंगिक उद्दीपन इत्यादींचा निदर्शक असतो. वर्णकी लवकाचा रंग, संरचना, शरीरातील वाटणी इ. गोष्टी प्राण्यांच्या पुढील पिढीत त्याच स्वरूपात येताना आढळतात.

वर्णकी लवक मृदुकाय, कंटकचर्मी, शीर्षपाद, कवचधारी, मासे, उभयचर (जमिनीवर व पाण्यातही राहणारे), सरीसृप (सरपटणारे) इ. प्राण्यांच्या त्वचेत आढळतात. पक्ष्याची त्वचा व पिसे आणि माणसाची त्वचा यांतही रंगद्रव्य असलेल्या कोशिका असतात मात्र त्यांना वर्णकी लवक म्हणत नाहीत.

शीर्षपाद प्राण्याच्या त्वचेतील वर्णकी लवकांची संरचना गुंतागुंतीची असते. त्यांच्यात अनेक रंगी रंगद्रव्य आढळते. हे प्राणी धोक्याची जाणीव होताच सभोवतालच्या परिसराप्रमाणे रंग बदलून स्वतःचे संरक्षण करतात. कवचधारी प्राण्यांतही विविध रंगांचे वर्णकी लवक आढळतात. यांच्यातील रंगद्रव्यांना ⇨ हॉर्मोनांकडून (उत्तेजक स्त्रावांमार्फत) चालना मिळते. उदा., कोळंबी स्वसंरक्षणासाठी सभोवतालच्या परिसराशी जुळेल असा रंगात बदल करून घेते, तर खेकडे राग, भीती वगैरे दाखविण्यासाठी असा रंगबदल करतात. माशांमध्ये काळे, पिवळे, तांबडे, पांढरे इ. रंगद्रव्ययुक्त वर्णकी लवक आढळतात आणि मासेही वरील कारणांसाठी रंगबदल करतात. उभयचर व सरीसृप प्राण्यांमध्ये सामान्यपणे काळे, पिवळे, नारिंगी वा तपकिरी रंगद्रव्यांनीयुक्त वर्णकी लवक असतात मात्र यांच्यातील रंगबदल अधिक सावकाशपणे होतात. उदा., बेडकाच्या अंगावरील कायमच्या ठिपक्यातील रंगद्रव्याची हालचाल होत असल्याने ते गडद वा फिकट दिसतात.

प्राण्यात आढळणारा असा शरीरक्रियावैज्ञानिक रंगबदल तात्पुरता असून तो केवळ वर्णकी लवकांतील रंगद्रव्याच्या कणांच्या हालचालींनी घडून येतो. याउलट आकारवैज्ञानिक रंगबदल बराच काळ टिकणारा असतो. असा रंगबदल बहुतकरून वर्णकी लवकांची संख्या कमी वा जास्त होऊन, रंगद्रव्य नव्याने निर्माण होऊन अथवा असलेले रंगद्रव्य नष्ट होऊन होतो. प्राणी बराच काळ एकाच प्रकारच्या परिसरात राहिल्याने असा बदल होतो.

वनस्पतींमध्ये ⇨ शैवलांत विशिष्टता पावलेला रंगद्रव्ययुक्त प्राकलकणू असतो [⟶ कोशिका]. त्याला वर्णकी लवण असेही म्हणतात. काही कशाभिकायुक्त (हालचालींस उपयुक्त चाबकाच्या वादीसारख्या लांबट रचनांनीयुक्त) आदिजीवांमध्येही (प्रोटोझोआंमध्येही) हरित द्रव्ययुक्त वर्णकी लवक आढळतात. हे काहींमध्ये जाळीदार, काहींत चपटे किंवा एकाच मोठ्या कणाच्या रूपात आढळतात. यांच्यातील रंगद्रव्य बहुधा हिरवेच असते परंतु कधीकधी त्याच्या जोडीने पिवळे, तपकिरी किंवा क्वचित निळसर किंवा हिरवट पिवळे रंगद्रव्यही आढळते. हिरव्या रंगद्रव्यामुळे प्रकाशसंश्लेषण [प्रकाशीय ऊर्जेचा वापर करून कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी यांच्यापासून साधी कार्बोहायट्रेटे निर्माण होण्याची क्रिया ⟶ प्रकाशसंश्लेषण] होते परंतु इतर रंगद्रव्यांचा कोणता उपयोग असावा, हे अजून माहीत झालेले नाही. काही आदिजीवांच्या जीवद्रव्यातच रंगकण आढळतात.

पहा : कोशिका.  

चिन्मुळगुंद, वासंती रा.