चष्मेवाला : हा पक्षी चिमणीपेक्षा लहान असून त्याचे शास्त्रीय नाव झोस्टेरॉप्स पाल्पीब्रोझा आहे. त्याचा समावेश झोस्टेरॉपिडी कुलात होतो. त्याचा प्रसार उष्ण कटिबंधात सर्वत्र असून भारतात तो वाळवंटी प्रदेशाशिवाय सगळीकडे आढळतो. आकारमान व रंगांच्या छटा यांनुसार त्याच्या सात भौगोलिक प्रजाती आढळतात. पाठीकडचा रंग हिरवट पिवळा आणि छाती व उदर यांचा रंग करडा पांढरा असतो. शेपटी गडद तपकिरी रंगाची असते. त्याच्या डोळ्यांभोवती पांढरे वलय असते व ते चष्मा लावल्यासारखे दिसते आणि त्यावरून ‘चष्मेवाला’ हे नाव पडले आहे. त्याची चोच काळी, बारीक, टोकदार व किंचित वाकडी असते. नर व मादी सारखी दिसतात. त्यांचे थवे जंगले, बागा इ. ठिकाणी आढळतात. एका थव्यात ५–२० किंवा त्यापेक्षा थोडे जास्त पक्षी असतात. तो सर्वस्वी वृक्षवासी असून झाडाझुडपांच्या पानांमध्ये एकसारखे खाद्य पकडण्यात चष्मेवालागुंग असतो. तो फांदीला उलटा लटकून कीटक पकडतो. पाणी पिण्यासाठी व बागेतील डबक्यात आंघोळ करण्यासाठीच केवळ तो जमिनीवर येतो व तो चीर चीर असा आवाज काढतो. फक्त विणीच्या हंगामात नर व मादी एकत्र राहतात. त्या वेळी नर झाडांच्या उंच शेंड्यावर बसून मंजूळ गाणे गातो.

कीटक, कोळी, फळे इ. त्याचे भक्ष्य होय. तसेच तो फुलातील मधही खातो. तो एप्रिल-जुलैमध्ये घरटे करतो. घरटे लहान असून धागे उभे-आडवे गुंफून विणलेले असते. तो ते फांदीच्या टोकाला दुबेळक्यात करतो. घरटे जमिनीपासून १·५–३·० मी. उंचीवर असते. मादी त्यात सामान्यतः दोन-तीन अंडी घालते. ती फिक्कट निळ्या रंगाची असून कधीकधी रुंद बाजूवर गर्द निळा रंग असतो. नर व मादी घरटे बांधणे, अंडी उबविणे व पिलांना खाऊ घालण्याची कामे करतात.

जमदाडे, ज. वि.