द्रोणकावळा

द्रोणकावळा : (रॅव्हन). या पक्ष्याचा कोर्व्हिडी पक्षिकुलात समावेश केला आहे याचे शास्त्रीय नाव कोर्व्हस कोरॅक्स. यूरोप उत्तर आफ्रिका, आशिया आणि उत्तर अमेरिका येथे तो आढळतो. भारतात तो पंजाब व राजस्थानातील रेताड प्रदेशात सापडतो, बाकीच्या भागात तो क्वचित दिसतो. कोरड्या आणि ओसाड प्रदेशात आढळतो.

द्रोणकावळा हे ⇨ डोमकावळ्याचे मोठे स्वरूप आहे असे म्हणता येईल. सामान्यतः घारीएवढा तो असतो. याचा रंग काळा कुळकुळीत असून त्यावर निळ्या किंवा जांभळ्या रंगाची तकाकी असते. चोच बरीच मोठी व भक्कम असते, गळ्यावरची पिसे विसकटलेली असतात. नर व  मादी दिसण्यात सारखी असतात.

विणीच्या हंगामात याला एकांतवास जरी आवडत असला तरी इतर वेळी १५–२० पक्ष्यांचे थवे  खेड्यांच्या आणि गावांच्या शिवेवरील जमिनीवर भक्ष्य शोधीत भटकत असतात. कावळ्यासारखाच हा दुराचारी, जागरूक आणि धीट असतो. हा सर्वभक्षी असल्यामुळे साफसफाईचे बरेचसे काम याच्याकडून होते. नर आणि मादी यांचा जोडा जन्मभर टिकतो. यांची झोपी जाण्याची पद्धत कावळ्यासारखीच असते. पन्नास–साठ पक्षी संध्याकाळी एखाद्या झाडावर जमून गोंगाट करीत असतात. व अंधार पडल्यावर तेथेच झोपी जातात.

विणीचा हंगाम डिसेंबरपासून मार्चपर्यंत असतो. घरटे मोठ्या झाडावर फांदीच्या दुबेळक्यात किंवा खडकाच्या कंगोऱ्यावर बांधलेले असून मोठे, मजबूत आणि काटक्यांचे असते आतल्या खोलगट भागाला लोकर केस किंवा चिंध्यांचे अस्तर असते. मादी ४–६ अंडी घालते ती हिरवट निळ्या किंवा मळकट पिवळसर रंगाची असून त्यावर काळसर तपकिरी, पिवळसर तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे ठिपके असतात.

कर्वे, ज. नी.