मादक पदार्थ : ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व तीपासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा , चरस (हशिश), विविध प्रकारची मद्ये वगैरे पदार्थाचा मादक पदार्थांत समावेश केला जातो. या पदार्थांचे दीर्घ काळ सेवन करीत राहिल्यास प्रथम त्यांची सवय जडते व नंतर व्यसन लागते. इंग्रजीत वापरण्यात येणाऱ्या Narcotics या संज्ञेत मोडणारे पदार्थ मुख्यत्वे वेदनाशामक आहेत पण त्याचबरोबर त्यांमुळे एक प्रकारची गुंगी वा निद्रेची अवस्था, आसक्ती (व्यसनाधीनता) आणि आनुषंगिक परिणाम उद्‌भवतात. या पदार्थांना मादक वेदनाशामके अशीही संज्ञा वापरली जाते. या पदार्थांत अफू व तीपासून मिळणारे विविध पदार्थ, तसेच त्यांसारखे अर्धसंश्लेषित (नैसर्गिक पदार्थावर प्रक्रिया करून तयार केलेले उदा., हेरॉईन) व संश्लेषित (घटक एकत्र आणून कृत्रिम रीतीने तयार केलेले) पदार्थ यांचा समावेश करण्यात येतो. प्रस्तुत नोंदीत याच पदार्थांचे विशेषत्वाने विवरण केलेले आहे. बेंझिड्रीन, ॲ‌म्फेटामीन व त्यांपासून बनविलेली काही द्रव्ये, झोपेची बार्बिच्युरेट औषधे, तसेच इतर शांतक व शामक (उत्तेजित अवस्थेचे शमन करणारी) औषधे यांचीही सवय लागणाऱ्या द्रव्यांत गणना होते पण त्यांना ‘मादक’ म्हणणे सयुक्तिक नाही [⟶ बार्बिच्युरेटे शांतके शामके]. मेस्कॅलीन व एलएसडी (लायसर्जिक ॲ‌सिड डायएथिलअमाइड) यांसारख्या संभ्रमकारी द्रव्यांचाही वरील अर्थाने मादक पदार्थांत समावेश करण्यात येत नाही [⟶ संभ्रमकारके].

मादक पदार्थ हे शुद्धीत असलेल्या माणसाच्या वेदनाशमनासाठी उपलब्ध असलेल्या औषधांपैकी सर्वांत प्रभावी आहेत. इतर वेदनांपेक्षा काही विशिष्ट प्रकारच्या वेदनांवर (उदा., जठरांत्र मार्गातील – म्हणजे जठर, लहान आतडे व मोठे आतडे यांनी मिळून बनणाऱ्या अन्नमार्गातील -अथवा मूत्रवाहिनीतील) ॲ‌स्पिरीन, ॲ‌सिटामिनोफेन व तत्सम मादक नसलेल्या औषधांपेक्षा मादक पदार्थांचा उपचार अधिक उपयुक्त ठरलेला आहे.

प्रकार व सामान्य गुणधर्म : मादक पदार्थांचे नैसर्गिक, अर्धसंश्लेषित व संश्लेषित असे वर्गीकरण करता येते.

नैसर्गिक : अफू ही नैसर्गिक मादक पदार्थांचा प्रमुख उद्‌गम आहे. अफूचे मादक गुणधर्म फार प्राचीन काळापासून माहीत आहेत. औषधिक्रियाविज्ञानाच्या दृष्टीने अफूचे क्रियाशील घटक हे ⇨ अल्कलॉइडे नावाची संयुगे आहेत. अफूतील सु. २५% वजन या घटकांचे असते. अफूमध्ये अनेक अल्कलॉइडे असली, तरी त्यांपैकी फारच थोड्यांचा (उदा., मॉर्फीन कोडीन पॅपॅव्हरीन, नोस्कॅपीन) वैद्यकीय चिकित्सेसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो. अफूतील मॉर्फीन हे अल्कलॉइड सर्वांत महत्त्वाचे असून नव्या वेदनाशामक मादक पदार्थाची क्रियाशीलता ठरविण्यासाठी मॉर्फिनचा मानक (प्रमाणभूत) म्हणून उपयोग करतात. मॉर्फिनाशी समान क्रियाशीलता असणाऱ्या मादक पदार्थांना काही वेळा ओपिएट म्हणतात. वेदनाशमनासंबंधीच्या संशोधनापैकी बरेचसे संशोधन मॉर्फिनासारखा प्रभावी वेदनाशमनाचा गुणधर्म असलेला पण त्याच्यासारखे अनिष्ट आनुषंगिक परिणाम नसलेला पदार्थ शोधण्यासाठी करण्यात येत आहे.

अर्धसंश्लेषित व संश्लेषित : मॉर्फीन वा कोडीन रेणूंमध्ये सापेक्षतः साधा संरचनात्मक बदल करून अनेक अर्धसंश्लेषित मादक पदार्थ (उदा., हेरॉईन) तयार करण्यात आले आहेत. या संयुगांची माहिती कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे (यात तुलनेसाठी मॉर्फिनाचा समावेश केलेला असून मॉर्फीन सल्फेटाचा वेदनाशामक परिमाम आणि व्यसनासक्तांमधील वर्जन लक्षणसमूहाचे दमन करण्याची त्याची क्षमता १०० धरली आहे).

पूर्ण मॉर्फीन रेणूशी वा त्याच्या भागाशी संरचनात्मक सादृश असलेली पूर्णतः संश्लेषित संयुगेही (यांना काही वेळा ओपिऑइड असेही म्हणतात) मादक पदार्थ म्हणून उपयोगात आणतात. या संयुगांसंबंधी कोष्टक क्र. २ मध्ये माहिती दिली आहे.

औषधिक्रियाविज्ञान : मादक पदार्थांचे औषधिक्रियाविज्ञान (बाह्य पदार्थ शरीरात दिले गेल्यास त्यांच्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास व विवेचन करणारे शास्त्र) सामान्यतः मॉर्फिनाप्रमाणेच असते. त्यांच्यातील भेद त्यांच्या क्रियेची समर्थता व त्यांच्यामुळे उद्‌भवणाऱ्या आनुषंगिक परिणामाची विविधता व त्यांचे प्रमाण यांत आढळतात. मादक पदार्थांचे परिणाम वेदनाशामक असण्याबरोबरच त्यांच्यामुळे एक प्रकारची सुखभ्रमाची अवस्था येते आणि या अवस्थेत गुंगी येऊन चिंता व मनाचा तणाव कमी होऊन शांत व स्थिरवृत्ती येते. कोणताही मादक पदार्थ सेवन केला, तरी त्याचे परिणाम त्याच्या मात्रेशी निगडित असतात आणि अधिकतर मात्रेत सर्वच मादक पदार्थांमुळे गाढ निद्रा येऊन मेंदूच्या सर्व कार्यांचे सर्वसाधारण मंदायन होते. अतिमात्रेमुळे ओढवणाऱ्या मृत्यूला श्वसन केंद्राचे होणारे मंदायन व परिणामी श्वसन क्रिया बंद पडणे ही कारणे असतात.मॉर्फीन हे सर्वांत जास्त उपयोगात असलेले नमुनेदार मादक वेदनाशामक असल्याने मादक पदार्थांच्या औषधिक्रियाविज्ञानाचे विवरण मॉर्फिनाच्या संदर्भात करणे सोयीचे आहे. मॉर्फीनाचा (व इतर मादक पदार्थांचा) सर्वाधिक परिणाम केंद्रीय तंत्रिका तंत्रावर [⟶ तंत्रिका तंत्र] होतो. वैद्यकीय उपयोगाच्या दृष्टीने त्याची सर्वांत महत्त्वाची क्रिया म्हणजे वेदनाशमन ही होय. दुखापतीच्या इजेमुळे वा शरीरक्रियात्मक विकृतीमुळे होणारी वेदना व मानसिक यातनांमुळे उद्‌भवणारी वेदना यांत संशोधकांच्या दृष्टीने फरक आहेत. पहिल्या प्रकारची वेदना ही संवेदी आदानामुळे उद्‌भवणारी विशिष्ट संवेदना असते, तर दुसऱ्या प्रकारची वेदना ही संवेदी वेदनेला होणारी मानसिक प्रतिक्रिया असते. मादक पदार्थ शारीरिक वेदना व मानसिक यातना या दोहोंचे शमन करतात आणि या दुहेरी गुणांमुळेच वैद्यकशास्त्रात त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. शारीरिक वेदनांबाबतचे मॉर्फिनाचे कार्य मेंदूतील वेदनाग्रहण केंद्रांच्या मंदायनाद्वारे, तर मानसिक यातनांबाबतचे कार्य मेंदूच्या बाह्यकातील सहयोगी तंत्रिका मार्गांत [⟶ तंत्रिका तंत्र] खंड पाडून व त्यामुळे निर्माण होणाऱ्या सुखभ्रमाद्वारे साधले जाते.

अभिशोषण : मादक पदार्थ त्वचेखाली वा स्नायूत अंतःक्षेपित केल्यास (टोचल्यास) त्याचे चांगले अभिशोषण होते. जठरांत्र मार्गात वा इतर श्लेष्मकलांत (श्वासनाल, आतडी इ. नलिकाकार पोकळ्यांच्या पातळ अस्तरांत) अभिशोषण चांगले होते पण ते तितकेसे खात्रीशीर नसते. मॉर्फिनापेक्षा कोडीन या प्रकारे जास्त चांगले अभिशोषित होते. त्वचेखाली वा स्नायूत अंतःक्षेपित केलेल्या मादक पदार्थाचे परिणाम १५ ते ३० मिनिटांत दिसू लागतात व अधिकतम परिणाम ४५ ते ९० मिनिटांत आढळतो. शिरेतून अंतःक्षेपित केल्यास एक मिनिटात परिणाम दिसू लागतो व मादक पदार्थाच्या प्रकारानुसार अधिकतम परिणाम तीन ते सहा मिनिटांत होतो.

वितरण : मुक्त मॉर्फीन रक्तातून जलदपणे बाहेर पडते आणि इतर मादक पदार्थांप्रमाणेच मूत्रपिंड, फुप्फुस, यकृत व प्लीहा (पानथरी) यांत साचते आणि एकूण मात्रेपैकी फक्त अल्पांश केंद्रीय तंत्रिका तंत्रात आढळतो.

चयापचय : (शरीरात सतत होणाऱ्या रासायनिक व भौतिक घडामोडी). मादक पदार्थांचे चयापचयात्मक रूपांतरण प्रायः यकृताद्वारे होते. एस्टर प्रकारच्या मादक पदार्थांचे (उदा., मेपेरिडीन, ॲ‌निलीरिडीन, हेरॉईन) शरीरात जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे होण्याची क्रिया) होते. ईथर अनुबंधन असलेल्या कोडिनासारख्या संयुगांचे विअल्किकरण [अल्किल गट काढून टाकण्याची क्रिया ⟶ अल्किकरण] होते.

आनुषंगिक परिणाम : महत्त्वाच्या वैद्यकीय कार्याबरोबरच मॉर्फिनामुळे काही अनिष्ट आनुषंगिक परिणामही घडून येतात तथापि हे परिणाम प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत वा प्रत्येक मात्रेच्या पातळीवर निर्माण होतातच असे नाही.

  

श्वसन क्रियेचे मंदायन : मस्तिष्क स्तंभातील [⟶ तंत्रिका तंत्र] श्वसन केंद्राचे मॉर्फिनामुळे मंदायन होते. वेदनाशमनासाठी देण्यात येणाऱ्या नेहमीच्या मात्रेत हे मंदायन किमान असते पण मात्रा वाढविल्यास हे मंदायनही वाढत जाते. अतिमात्रेमुळे ओढवणाऱ्या मृत्यूस श्वसन मंदायन कारणीभूत असल्याने त्यावरील उपचारांत श्वसन क्रिया चालू ठेवण्याकडेच लक्ष केंद्रित केले जाते.

वमन (ओकारी) विषयक परिणाम : मॉर्फिन व इतर बहुतेक मादक पदार्थांमुळे मेंदूतील वमन केंद्र उत्तेजित होऊन ओकाऱ्या होतात व मळमळते. यावरून मेंदूतील काही केंद्रांचे उत्तेजन, तर काहींचे मंदायन करण्याचा मॉर्फिनाचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दिसून येतो. मॉर्फिनाची मात्रा वाढवीत गेल्यास वमन केंद्राचे उत्तेजन होण्याऐवजी अतिशय मंदायन होते व वमन ⇨ प्रतिक्षेपी क्रियेचा लोप होतो.


प्रतिबंधित मलोत्सर्जन व मूत्रोत्सर्जन : जठरांत्र मार्गावरील मॉर्फिनाचा परिणाम एकंदरीने मंदायक असतो. हा परिणाम आतड्याच्या भित्तितील अरेखित (रेषाविरहित अनैच्छिक) स्नायू व तंत्रिका जालावर होतो. अन्न पुढे ढकलण्यासाठी होणारी आतड्याची क्रमसंकोची हालचाल कमी होते वा थांबते आणि त्यामुळे मॉर्फीन काही काळ वापरल्यानंतर बद्धकोष्ठतेचा विकार होतो. या परिणामामुळेच पुरातन काळापासून आमांश व अतिसार या विकारांत अफूचा उपयोग करण्यात येत आहे. मूत्राशय ग्रीवेपाशील (मानेसारख्या भागापाशील) स्नायूचा संकोची ताण मॉर्फिनामुळे वाढतो व त्यामुळे मूत्राशयात मूत्र साठून राहते.

इतर परिणाम : मॉर्फिनामुळे त्वचेतील रक्तवाहिन्यांचे विस्फारण होते, त्वचा लालसर व गरम होते आणि घाम येण्याचे प्रमाण वाढते. डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात. टाचणीच्या अग्रासारख्या बारीक बाहुल्या मादक पदार्थांच्या व्यसनासक्तांत पुष्कळ वेळा आढळून येतात. यांखेरीज तीव्र कंड, अस्वस्थता वगैरे परिणाम होतात.

वैद्यकीय उपयोग :मादक पदार्थांमुळे अनिष्ट आनुषंगिक परिणाम होत असले व त्यांचे व्यसन लागण्याची शक्यता असली, तरी हे पदार्थ वैद्यकीय व्यवसायात अत्यंत उपयुक्त म्हणून मानण्यात येणाऱ्या औषधांपैकी आहेत. रुग्णाचे काळजीपूर्वक विश्लेषण करून योग्य मादक पदार्थ निवडल्यास यांचा वापर सुरक्षितपणे व परिणामकारकपणे करता येतो. निवड करताना विशेषतः त्याच्या परिणामाचा कालावधी, शमनाचे प्रमाण व जठरांत्र मार्गातून अभिशोषण होण्याची क्षमता या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. अतितीव्र वेदनांच्या नियंत्रणासाठी सापेक्षतः अल्प काळ हे पदार्थ वापरले, तर त्यांचे व्यसन लागण्याचा धोका किमान असतो. असाध्य कर्करोगासारख्या आजारात वेदना तीव्र व दीर्घकालीन असते आणि त्यामुळे व्यसन लागण्याच्या शक्यतेच्या विचारापेक्षा वेदना व यातना यांचे शमन महत्त्वाचे ठरते.

प्रत्येक मादक पदार्थाची एक महत्त‌म मात्रा असून तिच्या खाली या पदार्थाचा होणारा परिणाम अपुरा असतो आणि तिच्यावर मात्रा दिल्यास वेदनाशमनाचा हेतू साध्य होण्यात फारच थोडी वाढ होते पण त्याचबरोबर अनिष्ट आनुषंगिक परिणाम घात श्रेढीने वाढतात. ६७·५ किग्रॅ. वजनाच्या मनुष्याच्या बाबतीत मॉर्फिनाची महत्त्व चिकित्सात्मक मात्रा १५ मिग्रॅ. असते.

मादक पदार्थाचा (विशेषतः मॉर्फिनाचा) फुप्फुसांच्या शोफावर (फुप्फुसांत द्रव साचून येणाऱ्या सुजेवर) उपयोग करण्यात येतो. या अवस्थेत उपलब्ध ऑक्सिजनाचे प्रमाण कमी होऊन अस्वस्थता व धास्ती निर्माण होते. मॉर्फीन अशा रुग्णाला शांत करण्याबरोबरच परिसरीय कार्याचा रक्तवाहिन्यांचे विस्फारण करून पुरेसे रक्त अलग करून हृदयाच्या कार्याचा ताण कमी करण्यास मदत करते. हृद्‌रोहिणीच्या शाखेत अडथळा निर्माण होऊन छातीत अतितीव्र वेदना होण्याची शक्यता असते, त्या वेळी मादक वेदनाशामकांचा चांगला उपयोग होतो.

शस्त्रक्रियेकरिता करावयाच्या शुद्धिहरणपूर्व उपचारांत मादक पदार्थांचा प्रायः समावेश करण्यात येतो. त्यामुळे शमनास व विस्मरणास मदत होण्याबरोबरच रुग्णाला शस्त्रक्रियेची वाटणारी धास्ती व चिंता कमी होते तसेच शुद्धिहारकाची मात्राही कमी लागते. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाला वेदना होत असतील अथवा त्याला दीर्घ काळ मद्याची, बार्बिच्युरेटांची वा मादक पदार्थांची आसक्ती असेल आणि शस्त्रक्रियेनंतरची अस्वस्थता व क्षुब्धता रुग्णाला असह्य होण्याची शक्यता असेल, तर मादक पदार्थांचा वापर विशेषत्वाने उपयोगी पडतो. शस्त्रक्रियेनंतरच्या वेदनाशमनासाठी मादक पदार्थांचा बहुशः उपयोग केला जातो. भीती, चिंता व काळजी या कारणांनी शस्त्रक्रियेनंतर मादक पदार्थांचा उपयोग करणे आवश्यक ठरते. उदराच्या वरच्या भागाच्या शस्त्रक्रियेनंतर सामान्यतः सौम्य ते अतितीव्र वेदना होण्याची शक्यता असल्याने त्याबाबतीत मादक वेदनाशामकांचा उपयोग अनिवार्य होतो. शुद्धिहरणासाठी सामान्यतः नायट्रस ऑक्साइड व ऑक्सिजन यांचा उपयोग करतात तथापि बऱ्याच नायट्रस ऑक्साइडाने जरूरीइतके सखोल शुद्धिकरण निर्माण करणे शक्य होत नाही. अशा वेळी अधूनमधून शिरेतून मादक पदार्थ पूरक म्हणून द्यावे लागतात. मॉर्फीन अशा प्रकारे (विशेषतः हृदयाच्या शस्त्रक्रियेसारख्या जोखमीच्या वेळी) पुष्कळदा यशस्वीपणे वापरण्यात आले आहे.

सध्या वैद्यकीय उपचारांत वापरण्यात येणारा सर्वांत गुणकारी मादक पदार्थ म्हणजे फेन्टानील होय. हा पदार्थ मॉर्फिनापेक्षा ५० ते १०० पट गुणकारी असून त्याचा ड्रॉपेरिडॉल या गुणकारी शांतक पदार्थाबरोबर उपयोग करण्यात आलेला आहे. या दोन पदार्थांच्या संयुक्त उपयोगामुळे स्वायत्त व केंद्रीय या दोन्ही तंत्रिका तंत्रांवर परिणाम होतो.


मॉर्फीन व अन्य मादक पदार्थ प्रसूतिपूर्व वेदनाशमन उपचारांत वापरण्यात येत नाहीत कारण हे लहान रेणूंचे बनलेले पदार्थ वारेच्या अटकावातून गर्भाच्या रक्ताभिसरणात सहजपणे प्रवेश करू शकतात. बालकाच्या जन्मानंतर जेव्हा श्वसनक्रिया प्रस्थापित होऊन ती कार्यक्षम होणे अत्यंत महत्त्वाचे असते अशा ऐन वेळी या पदार्थांच्या वापरामुळे श्वसनक्रिया मंदावते, असे दिसून आले आहे. यामुळे प्रसूतिपूर्वी मोठ्या प्रमाणात मादक पदार्थांचा उपयोग केल्यास नवजात बालकाचा मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. अगदी लहान बालके व अतिवृद्ध व्यक्ती मादक पदार्थांच्या बाबतीत फार संवेदनशील असल्याने त्यांना हे पदार्थ देताना फार काळजी घ्यावी लागते.

शारीरिक अवलंबित्व : सर्व मादक पदार्थांत शारीरिक अवलंबित्व व काही कालावधीत वारंवार घेतल्यास आसक्ती निर्माण करण्याची क्षमता आहे. गरजेपोटी सतत मादक पदार्थ वापरावा लागल्याने शारीरिक अवलंबित्व उद्‌भवते. सवय, सह्यता वा आसक्ती यांपैकी एक वा अधिक अवस्था अवलंबित्वाची वैशिष्ट्ये असतात.

सवय : इतर कोणत्याही सवयीप्रमाणेच मादक पदार्थाची सवय लागणे शक्य असते. सिगारेटच्या रूपात निकोटिनाची व चहा वा कॉफीच्या रूपात कॅफिनाची सवय लागणे ही नेहमीची उदाहरणे आहेत. या सवयी सामान्यतः निरुपद्रवी मानल्या जातात. सवय लागणाऱ्या मादक पदार्थाचा उपयोग थांबविल्यास मानसिक उद्वेग निर्माण होतो पण महत्त्वाचा शारीरिक बिघाड उद्‌भवत नाही.

सह्यता : एखाद्या मादक पदार्थाचे सेवन वारंवार केले असता मूळ मात्रेने जो परिणाम मिळत होता तो हळूहळू मिळेनासा होतो. यालाच मादक पदार्थाच्या बाबतीतील शारीरिक सह्यता निर्माण होणे असे म्हणतात. याचे परिचित उदाहरण म्हणजे नेहमी कॉफी पिण्याची सवय असणाऱ्याच्या बाबतीत कॅफिनामुळे निर्माण होणारा मध्यवर्ती उत्तेजक परिणाम झपाट्याने नाहीसा होतो. ही सह्यता विलंबित वा अपूर्ण अभिशोषण, केंद्रीय तंत्रिका तंत्रातील ऊतकांचे (कोशिकांच्या-पेशींच्या-समूहांचे) बदललेले वितरण, चयापचयाची वा उत्सर्जनाची वाढलेली त्वरा अशा विविध कारणांनी निर्माण होते, असे म्हटले जाते. तथापि ही सह्यता सुरुवातीस कोशिकीय पातळीवर व्यक्त होते, यावर बऱ्याच प्रमाणात तज्ञांचे एकमत आहे. केंद्रीय तंत्रिका तंत्रातील कोशिकांना प्रारंभी मादक पदार्थाचे सापेक्षतः मोठे प्रमाण असताना कार्य करण्याची क्षमता प्राप्त होते पण लवकरच अशा मोठ्या प्रमाणाच्या अभावाच्या परिस्थितीत या कोशिकांना नेहमीचे कार्य करणे अशक्य होते. मादक पदार्थामुळे सुरुवातीस निर्माण होणारी सुखभ्रमाची अवस्था पुढे वारंवार सेवनाने आणि क्रमशः वाढत जाणाऱ्या शारीरिक अवलंबित्वाने उद्‌भवणाऱ्या सह्यतेमुळे कमी होत जाते. यामुळेच स्थिरावलेल्या व्यसनासक्तीत सुखभ्रमाचा अभाव व वाढत्या मात्रेची जरूरी असा विरोधाभास आढळून येतो.

आसक्ती : मादक पदार्थांच्या बाबतीत शारीरिक अवलंबित्व निर्माण झाले म्हणजे आसक्ती उद्‌भवते. जर मादक पदार्थ काही काळ नित्य वापरून त्याचे सेवन एकदम बंद केले, तर शारीरिक वेदना व विस्तृत शारीरिक प्रतिक्रिया ही ‘व्यसननिवृत्ती लक्षणे’ दिसून येतात. अशा वेदनामय व क्लेशकारक प्रतिक्रियांची व्यसनासक्ताला धास्ती वाटते आणि मादक पदार्थाचा वापर पुढे चालू ठेवण्याच्या सापळ्यात तो अडकतो.

सर्व मादक पदार्थ सवय, सह्यता व आसक्ती कमीअधिक प्रमाणात निर्माण करू शकतात. कोडिनाची आसक्ती सापेक्षतः विरळाच आढळत असली, तरी शक्य आहे. मॉर्फिनापेक्षा हेरॉइनाची आसक्ती झपाट्याने वाढत जाते व हा मादक पदार्थ अतिशय घातक मानला जातो. ॲ‌निलीरिडीन, ऑक्सिमॉर्फोन वा मेपेरिडीन यांच्यापेक्षा मॉर्फिनाची आसक्ती अधिक झपाट्याने वाढते. मादक पदार्थाचे व्यसन सोडल्यावर शारीरिक अवलंबित्वाची पुढील लक्षणे दिसून येतात.: जांभया येणे, अश्रुपात, घाम येणे, नाक वाहणे, डोळ्यांतील बाहुल्या विस्फारणे, कंप, अस्वस्थता, उदरात पेटके येणे, त्वचेतील अंकूर ताठ होणे (गूज फ्लेश), मलोत्सर्ग, ओकाऱ्या आणि आकुंचन रक्तदाबात, गुदांत्र तापमानात व श्वसन वेगात वाढ होणे, अति-अवलंबित व्यक्तींत झटके, श्वसन निष्फलता व मृत्यू उद्‌भवण्याची शक्यता असते.

मादक पदार्थांचा सुखभ्रम निर्माण करण्याचा गुणधर्मच त्यांच्या बिगर वैद्यकीय उपयोगास व त्यातून त्यांची आसक्ती जडण्याच्या सामाजिक समस्येस कारणीभूत आहे. वेदनाशमनासाठी रुग्णांना अविचाराने प्रभावी वेदनाशामके देण्यातून काही व्यक्तींत आसक्ती निर्माण झालेली आहे परंतु आतापावेतो बहुसंख्या व्यक्तींमधील आसक्ती मुख्यत्वे खऱ्या अथवा खोट्या मानसिक वा व्यावहारिक ताणांतून सुटका करून घेण्यासाठी चोरट्या मार्गाने मिळविलेल्या मादक पदार्थाच्या वापरातून उद्‌भवलेली आढळते. बहुतेक व्यसनाधीन व्यक्ती प्रामुख्याने हेरॉइनाचा उपयोग करतात. त्याचा प्रभाव मॉर्फिनापेक्षा जास्त असून त्याचा सुखभ्रम निर्मितीचा परिणाम उच्च आहे. शिरेतून दिल्यास ते सर्वांत परिणामकारक आहे. मॉर्फिनाचे ⇨ ॲ‌सिटिलीकरणाने हेरॉइनात सहज रूपांतर करता येते.


मादक पदार्थांच्या व्यसनातील सर्वांत मोठा धोका अतिमात्रेचा असतो. अशी अतिमात्रा व्यसनासक्ताला नेहमीपेक्षा अतिशय प्रभावी मादक पदार्थ उपलब्ध झाल्यास अगर त्याची सह्यता नाहीशी झालेली असल्यास (उदा., तुरुंगात किंवा रुग्णालयात रहावे लागल्यामुळे) आणि पूर्वी ज्या मोठ्या मात्रेची त्याला सवय होती तेवढी मात्रा पुन्हा घेण्यास सुरुवात केल्यास उद्‌भवते. याखेरीज व्यसनासक्तांमध्ये अनेक रोग बऱ्याचदा आढळतात. त्यांपैकी कित्येक रोग [उदा., यकृतशोथ (यकृताची दाहयुक्त सूज), विद्रधी (पू स्त्रवणारे फोड), रक्तप्रवाहातील संसर्ग] संसर्गित सुया आणि पिचकाऱ्या मादक पदार्थांच्या अंतःक्षेपणासाठी वापरल्याने होतात.

आसक्तीवरील उपचार व पुनर्वसन : मादक पदार्थाच्या आसक्तीवरील एकूण उपलब्ध उपचार अगदीच असमाधानकारक आहेत. सुसज्ज रुग्णालयात व्यसनासक्त व्यक्तीला दाखल केल्यास व्यसननिवृत्ती लक्षणांवर योग्य उपचार करून तिला व्यसनयुक्त करणे सहज शक्य असते. व्यसनयुक्त करण्याचा सर्वांत सोपा पण क्रूर उपाय म्हणजे व्यसनासक्ताला एका स्वतंत्र खोलीत ठेवण्यात येते आणि २ ते ३ दिवस त्याला व्यसननिवृत्तीच्या यातनांत तळमळत राहू देण्यात येते. या उपचाराला ‘कोल्ड टर्की’ पद्धत म्हणतात. दुसऱ्या दीर्घकालीन पद्धतीत २ ते ३ आठवडे रुग्णाला मिळणाऱ्या मादक पदार्थाची मात्रा हळूहळू कमी करतात. या कालावधीच्या शेवटी व्यसननिवृत्ती लक्षणे किमान ठेवून मादक पदार्थ देण्याचे पूर्णपणे थांबविण्यात येते. ‘मेथॅडोन चिकित्सा’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या नव्या पद्धतीत मेथॅडोन या मॉर्फिनासारखेच वेदनाशामक व इतर परिणाम असलेल्या मादक पदार्थाचा उपयोग करण्यात येतो. तथापि ते तोंडाने दिले, तरी परिणामकारक असून या बाबतीत ते इतर बहुतेक मादक पदार्थांपेक्षा भिन्न आहे. हेरॉईन व्यसनासक्तांच्या बाबतीत ते विशेष उपयोगात आणले जाते. कारण हेरॉईनमुळे उद्‌भवणारी शारीरिक व मानसिक दुर्बलता टाळून त्याचे सुखभ्रमजन्य परिमाम व त्याबद्दलची आसक्ती यांना मेथॅडोन रोध करू शकते. मेथॅडोनचा परिणाम सापेक्षतः दीर्घ काळ टिकत असल्याने बहुतेक हेरॉईन व्यसनासक्तांच्या बाबतीत दिवसाला तोंडाने द्यावयाची एकच मात्रा पुरेशी होते. मेथॅडोन हे स्वतः आसक्ती निर्माण करणारे असले, तरी हेरॉईनाइतकी त्याची आसक्ती निर्माण होत नाही. मेथॅडोन चिकित्सेत हेरॉईन आसक्तीच्या जागी मेथॅडोनाच्या आसक्तीची स्थापना करण्यात येते. कारण रुग्णाला या आसक्तीमुळे हेरॉईन आसक्तीपेक्षा अधिक नियमितपणे नेहमीचे काम करणे शक्य होते असे दिसते. कालांतराने मेथॅडोनही व्यसननिवृत्ती लक्षणे निर्माण न होता थांबविता येते.

कोणतीही उपचार पद्धती वापरली, तरी व्यसनासक्त व्यक्तीचे व्यसनमुक्तीनंतर पुनर्वसन करणे महत्त्वाचे आहे आणि उपचाराचा हाच सर्वांत अवघड व महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यासाठी मानसोपचार व सामाजिक परिस्थितीशी पुन्हा जुळवून घेणे यांची आवश्यकता असते. बऱ्याच वेळा तीव्र व्यसनाधीनतेवर यशस्वी उपचार केल्यानंतर व्यसनमुक्त व्यक्ती पूर्वीच्या वातावरणात व सवयीच्या परिस्थितीत परतल्याने पुन्हा व्यसनाधीन होते. उपचार केंद्रातून बाहेर पडल्यावर लवकरच व्यसनमुक्ती जडल्याचे बऱ्याचदा आढळून आले आहे. अशा मादक पदार्थ वापरीत नसलेल्या व्यसनमुक्त व्यक्तींकडे त्यांचे नातेवाईक व पारंपरिक समाजाचे प्रतिनिधी अविश्वासाने पहाण्याची शक्यता असते. अशा व्यक्ती मादक पदार्थाचा उपयोग करीत नसूनही पोलीस त्यांना चौकशीसाठी पकडणे शक्य असते. अशा परिस्थितीत या व्यक्ती इतर व्यसनासक्तांच्या मैत्रीकडेच पुन्हा वळण्याची जास्त संभाव्यता असते.

मादकतारोधी पदार्थ : मादक पदार्थांचे वेदनाशामक व श्वसन तंत्रावरील परिणाम आणि त्यांपासूनच तयार केलेल्या मादकतारोधी पदार्थांचे औषधिक्रियात्मक परिणाम यांत निकटचा सहसंबंध आहे. मनुष्याला दिल्यास मादकतारोधी पदार्थ मादक पदार्थांसारखेच काही औषधी गुणधर्म दर्शवितात. उदा., नॅलोर्फिनाची वेदनाशमनाची क्रियाशीलता मॉर्फिनाइतकीच आहे. तथापि लेव्हॅलोर्‌फॅन व नॅलोक्सोन हे मादकतारोधी पदार्थ मादक पदार्थांनी निर्माण झालेल्या श्वसन मंदायनाला प्रतिरोध करण्याइतक्या मात्रेत दिले, तरी त्यांचा वेदनाशमन परिणाम नगण्य असतो. मादकतारोधी पदार्थांनी सुखभ्रमाची अवस्था निर्माण होत नसल्याने त्यांची रुग्णाला सवय लागत नाही, हा त्यांचा विशेष गुणधर्म आहे.

अकल्पितपणे वा हेतुपूर्वक घेतलेल्या मादक पदार्थाच्या अतिमात्रेवर उपचार म्हणून मादकतारोधी पदार्थांचा प्रामुख्याने उपयोग करतात. प्रसूतीच्या वेळी मातेला वेदनाशमनासाठी दिलेल्या मादक पदार्थांमुळे नवजात बालकात श्वसन मंदायन आढळल्यास मादकतारोधी पदार्थांचा उपचार करता येतो. मादक पदार्थांवरील व्यक्तीचे शारीरिक अवलंबित्व तिला मादकतारोधी पदार्थ देऊन निदर्शित करता येते. यामुळे व्यसनमुक्त व्यक्तीत व्यसननिवृत्तीची लक्षणे दिसू लागतात.

पुरवठा व आंतरराष्ट्रीय नियंत्रण : १९७० नंतरच्या दशकाच्या सुरुवातीस अमेरिकेला होणाऱ्या ८०% पेक्षा अधिक हेरॉइनाच्या पुरवठ्याच्या मार्गांचे आरंभस्थान लेबानन व तुर्कस्तान या देशांतील अफूच्या शेतांत होते. १९५०–७० या काळात साम्यवादी चीन हा हेरॉइनाच्या चोरट्या व्यापाराचा प्रमुख उद्‌गम होता. यांखेरीज अफूचे उत्पादन करणारे प्रमुख देश म्हणजे भारत, रशिया, मेक्सिको, यूगोस्लाव्हिया, बल्गेरिया हे होत. आग्नेय आशियातील ब्रह्मदेश, थायलंड व लाओस या देशांच्या उत्तर भागांनी बनलेल्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर अफूची बेकायदेशीर लागवड होते व हा प्रदेश ‘सुवर्ण त्रिकोण’ या नावाने प्रसिद्ध आहे. मादक पदार्थांचा जगाला पुरवठा करणारी हाँगकाँग, सिंगापूर, बँकॉक ही महत्त्वाची बंदरे आहेत. अमेरिकेने १९६८ मध्ये ३० लक्ष डॉलर कर्ज देऊन तुर्कस्तानवर अफूचे उत्पादन कमी करण्याकरिता दडपण आणले होते. यामुळे तेथील लागवडीचे क्षेत्र कमी झाले, तरी कायदेशीर क्षेत्रात अधिक जोरदार लागवड करून आणि बेकायदेशीर लागवडीत पुष्कळ वाढ होऊन अफूचे उत्पादन जवळजवळ दुप्पट झाले. लेबाननमध्ये काही शेतकऱ्यांचे अफूऐवजी सूर्यफुलाची लागवड करण्याकडे मन वळविण्यात आले. तथापि विविध अफू उत्पादक देशांतील भिन्न भिन्न राजकीय प्रणालींमुळे अफू लागवडीवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे केवळ अशक्य झाले आहे.


हेरॉईन हा सर्वांत प्रभावी मादक पदार्थ असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर चोरटा व्यापार होतो. अशुद्ध अफूपासून प्रथम मॉर्फीन बेस व त्यापासून रासायनिक प्रक्रियेने हेरॉईन तयार करण्यात येते. याकरिता लागणाऱ्या प्रयोगशाळा फारशा मोठ्या व गुंतागुंतीच्या नसल्याने त्यावरून अगदी प्रतिष्ठित वाटणाऱ्या बंगल्यांच्या अंतर्भागातही प्रस्थापित केलेल्या असण्याची शक्यता असते. हजारो रुपये किंमतीचे थोडेथोडे हेरॉईन चोरट्या मार्गांनी आणता येणे शक्य असल्याने या व्यापाराला आळा घालणे फार अवघड झाले आहे. आभासी तळ असलेल्या मद्याच्या बाटल्या, वैज्ञानिक उपकरणे, मोटारगाड्यांची बाह्यांगे, वाद्ये इ. विविध मार्गांनी हेरॉईनची वाहतूक करण्यात येते. राजनैतिक सेवेतील व्यक्तींचे सामान त्यांच्या विशिष्ट दर्जोमुळे आंतरराष्ट्रीय सीमांवरील तपासणी नाक्यांवर तपासण्यात येत नसल्याने त्यांचा या कामी उपयोग करून घेण्याची मोठी शक्यता असते. व्यापारी नाविक दलातील लोक या वाहतुकीत बऱ्याचदा गुंतलेले दिसून येतात आणि हवाई वाहतुकीचे प्रमाणही सतत वाढत आहे.

अमेरिकेतील सरकारी अधिकाऱ्यांनी एका वर्षी १४० किग्रॅ. हेरॉईन पकडले होते पण एकूण चोरट्या व्यापारापैकी हा केवळ अल्पांश होता. अमेरिकेत दर वर्षी (जहाजांवरील व विमानांतील कर्मचारी वर्ग सोडून) २० कोटी लोक प्रवेश करतात आणि यावरून मादक पदार्थांच्या व्यापारासंबंधीचा कायदा अंमलात आणणे किती अवघड आहे, याची कल्पना येईल. याखेरीज या व्यापारात प्रचंड फायदा मिळण्याचे प्रलोभन विचारात घेणेही आवश्यक आहे. एक किग्रॅ. मॉर्फीन बेसची किंमत तुर्कस्तानात ३५० डॉलर आहे. त्याचे फ्रान्समध्ये शुद्धीकरण केल्यावर त्याची किंमत ३,५०० डॉलर आणि न्यूयॉर्कमध्ये आणल्यावर १८,००० डॉलर होते. न्यूयॉर्कमध्ये त्याचे सामान्यतः २५% हेरॉइनचे प्रमाण राहील असे दुग्ध शर्करा वा क्विनीन याच्याबरोबर मिश्रण करतात. या मिश्रणाचे एक एक औंसाचे (२८·३ ग्रॅ.) भाग करतात व प्रत्येक भाग ५०० डॉलरला विकला जातो. पुढे या मिश्रणाचे आणखी विरलीकरण करून फक्त ५% हेरॉईन असलेली पाकिटे तयार करतात. ही पाकिटे प्रत्येकी ५ डॉलर याप्रमाणे विकली जातात. अशा प्रकारे मूळ मालाची तुर्कस्तानातील ३५० डॉलर किंमत वाढत वाढत सु. २,२५,००० डॉलर होते. (किंमतीचे आकडे १९७५ च्या सुमाराचे आहेत). यावरून या व्यापारात अनेक लोक जोखीम पत्करण्यास का तयार होतात, हे कळून येते. या व्यापारातील बहुतेक हालचाली अतिशय सावधगिरीने व काळजीपूर्वक आखलेल्या असतात आणि त्या अतिशय सुसंघटितपणे पार पाडण्यात येतात.

नियंत्रणासंबंधीचे आंतरराष्ट्रीय करार : १९१२ ते १९३६ या काळात झालेले सहा आंतरराष्ट्रीय करार व त्यांना पूरक असे संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमाने झालेले आंतरराष्ट्रीय करार यांनी मादक पदार्थांच्या जागतिक नियंत्रणाची चौकट व वैधानिक पाया तयार झालेला आहे. शंभराहून अधिक राष्ट्रे यांपैकी एका वा अधिक करारांत सहभागी असून ते अमलात आणण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे.

हेग येथे पहिला आंतरराष्ट्रीय करार १९१२ मध्ये झाला. या करारात ८५ राष्ट्रे सहभागी झाली आणि या राष्ट्रांनी अशुद्ध अफूचे उत्पादन, वितरण व आयात – निर्यात यांबाबतचे महत्त्वाचे ठराव करारात समाविष्ट केले. तथापि काही अफू उत्पादक देशांनी उत्पादनाकरिता परवाने देण्याबाबत कडक धोरण अमलात न आणल्याने व सर्व उत्पादित अफू गोळा न केल्याने हा करार उद्‌गमापाशीच बेकायदेशीर व्यापार नियंत्रित करण्यास असमर्थ ठरला. हेग येथील कराराला पूरक म्हणून जिनीव्हा येथे ८३ राष्ट्रांनी १९२५ मध्ये राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार एक करार केला. या करारान्वये सहभागी राष्ट्रांनी मादक पदार्थांच्या चोरट्या व्यापाराला आळा घालण्यास मदत होणाऱ्या माहितीची सरळ देवाणघेवाण करण्यास मान्यता दिली. या करारान्वये प्रस्थापित झालेली आयात – निर्यात प्रमाणपत्राची पद्धत ही मादक पदार्थांच्या सर्व नियंत्रण पद्धतींचा गाभा ठरली आहे.

इ. स. १९१२ व १९२५ मध्ये झालेल्या करारांमुळे मोठ्या प्रमाणावरील व विस्तृत प्रदेशात चालणाऱ्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्यात यश आले नाही. यामुळे या करारांना पूरक असा मादक पदार्थांच्या उत्पादनास मर्यादा घालणारा व त्यांचे वितरण नियंत्रित करणारा करार १९३१ मध्ये ९१ राष्ट्रांनी जिनीव्हा येथे संमत केला. या करारात सर्व सहभागी राष्ट्रांनी मादक पदार्थांची आसक्ती जडण्यास प्रतिबंध करण्यासाठी सर्व उपाय योजून तशी मोहीम आखण्यासाठी खास शासकीय यंत्रणा उभारावी असे ठरले. या करारामुळे उत्पादित मादक पदार्थ परिणामकारकपणे नियंत्रणाखाली आणण्यात व बिगर वैद्यकीय हेतूंसाठी होणाऱ्या त्यांच्या उपयोगाचे प्रमाण किमान ठेवण्यात यश मिळाले, तसेच व्यसनासक्तांची संख्याही घटली.

उत्पादित मादक पदार्थ परवान्याखेरीज जवळ बाळगणे हे आता जगात सर्वच राष्ट्रांत बेकायदेशीर समजले जाते. मादक पदार्थांसंबंधीच्या प्रत्येक व्यवहाराची नोंद केली जाते व अशा नोंदी ठराविक काळाने संबंधित राष्ट्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांकडे कळविल्या जातात. हे अधिकारी या नोंदी तपासून व पडताळून पाहण्याबरोबरच मादक पदार्थांचे उत्पादन करण्याच्या व त्यांचा वापर करण्याच्या जागांची पहाणी करतात. हे अधिकारी त्यांना मिळालेल्या नोंदींचा संक्षिप्त अहवाल आंतरराष्ट्रीय नियंत्रण संघटनांना वेळोवेळी कळवितात.

इ. स. १९३० नंतरच्या दशकात जागतिक स्तरावरील विस्तृत मादक पदार्थ नियंत्रण व्यवस्था कार्यवाहीत होती. दुसऱ्या महायुद्धात राष्ट्रसंघाचे विसर्जन झाल्यावर अफू व इतर हानिकारक मादक पदार्थांवरील सल्लागार समितीही नामशेष झाली. महायुद्धानंतर लगेच संयुक्त राष्ट्रांनी मादक पदार्थांच्या कायदेशीर व्यापाराच्या देखरेखीकरिता मध्यवर्ती यंत्रणा पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक आंतरराष्ट्रीय कायम मध्यवर्ती अफू मंडळ नेमले. १९४६ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी मादक पदार्थविषयक आयोग स्थापन केला. प्रथमतः या आयोगात मादक पदार्थ उत्पादन करणाऱ्या महत्त्वाच्या अशा अगर मादक पदार्थांची व्यसनासक्ती वा त्यांचा बेकायदेशीर व्यापार ही गंभीर समस्या असलेल्या अशा एकूण १५ राष्ट्रांचा समावेश करण्यात आलेला होता. १९६१ मध्ये या सदस्य राष्ट्रांची संख्या २१ करण्यात आली. 


दुसऱ्या महायुद्धापूर्वी मादक पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय नियंत्रणात नैसर्गिक अफूचे अनुजात (तीपासून तयार करण्यात येणारी संयुगे), कोका, गांजा व काही विशिष्ट रासायनिक संयुगे यांचा समावेश होता तथापि त्यानंतर व्यसनासक्ती निर्माण करणारे अनेक संश्लेषित मादक पदार्थ विकसित झाल्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी कायदे करणे आवश्यक झाले. १९४८ मध्ये पॅरिस येथे झालेल्या करारान्वये व्यसनासक्ती निर्माण करणारे सर्व नवीन मादक पदार्थ (संश्लेषित पदार्थांसह), तसेच ज्यांचे व्यसनासक्ती निर्माण करणाऱ्या पदार्थांत रूपांतर करता येईल असे सर्व पदार्थ नियंत्रणाखाली आणण्यात आले.

अफूच्या लागवडीवर, तिच्या उत्पादनावर, आंतरराष्ट्रीय घाऊक व्यापारावर, तसेच तिच्या वापरावर मर्यादा व नियंत्रण ठेवण्यासाठी १९५३ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथील मुख्य कार्यालयात एक करार करण्यात आला. या करारान्वये बल्गेरिया, ग्रीस, भारत, इराण, रशिया, तुर्कस्तान व यूगोस्लाव्हिया या राष्ट्रांना निर्यातीसाठी अफूच्या उत्पादनाचा प्राधिकार देण्यात आला.

मादक पदार्थ आयोगाने जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीवरून हेरॉइनाचा वापर करण्यावर बंदी घालण्याची निकड सर्व राष्ट्रांच्या शासनांच्या निदर्शनास आणली. ब्रिटन, फ्रान्स व बेल्जियम यांच्याखेरीज सर्व राष्ट्रांनी १९७० सालापावेतो हेरॉइनाच्या वैद्यकीय उपयोगावर बंदी घातली.

मादक पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय नियंत्रणाबाबत १९६१ मध्ये संमत करण्यात आलेल्या करारात पूर्वीच्या करारातील अनेक मुख्य बाबींचा समावेश करण्यात आला. या करारात कोकाचे झाड, कोकाची पाने व गांजा यांच्या वाहतूकीवरील नियंत्रणाचा समावेश करण्यात आला. १९७० पावेतो ७५ राष्ट्रांनी या करारास संमती दिली. या करारान्वये जिनीव्हा येथे एक आंतरराष्ट्रीय नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले तथापि या मंडळाला देण्यात आलेल्या अधिकारांत परिणामकारक देखरेखीपेक्षा नैतिक प्रबोधनावर जास्त भर देण्यात आलेला आहे. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेची मादक पदार्थांच्या चोरट्या व्यापाराला आळा घालण्याच्या कामी फार मोठी मदत होते.

भारत : १८५७ मध्ये भारताने अफूच्या झाडाच्या लागवडीविषयी एक कायदा केलेला होता. पुढे १८७८ मध्ये अफूचे उत्पादन, वाहतूक व विक्री यांविषयी कायदा करण्यात आला. मादक पदार्थांच्या नियंत्रणाकरिता भारताने १९२५ सालच्या जिनीव्हा करारावर सही केली. या कराराची उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने भारत सरकारने १९३० मध्ये हानिकारक औषध अधिनियम केला. या अधिनियमात अफू, कोका व गांजा यांपासून तयार केलेल्या औषधांची (उदा., कोकेन, मॉर्फीन, हेरॉईन इ.) गणना हानिकारक औषधे म्हणून केलेली आहे. या अधिनियमात १९३३, १९३८ आणि १९५७ मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या.

मादक पदार्थांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार औषध निरीक्षकांद्वारे विविध व्यावसायिकांना परवाने देते. नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना विशिष्ट रुग्णासाठी मादक पदार्थांच्या ठराविक मात्रेचा औषधादेश (प्रिस्क्रिप्शन) देता येतो व त्यानुसारच विशिष्ट विक्रेत्याला रुग्णाला औषधे देता येतात. या व्यतिरिक्त वैद्यकीय व्यावसायिकाला किंवा रुग्णालयाला विशिष्ट औषधाचा साठा रुग्णोपचारासाठी जवळ ठेवता येतो. याप्रमाणेच उत्पादक, विक्रेते, आयात-निर्यातदार इत्यादींना अधिनियमानुसार विशिष्ट व्यवहारासाठीऔषध उत्पादन, वाहतूक व साठवण यांसाठी सरकार विशिष्ट परवाने देते. अशा परवान्यांचे ठराविक काळानंतर नूतनीकरण करून घ्यावे लागते. 

अमेरिकेची संयुक्त संस्थाने व अन्य काही राष्ट्रांत हानिकारक औषधांत बार्विच्युरेटे, शांतके, ॲ‌म्फेटामीन, एलएसडी, मेस्कॅलीन इत्यादींचाही समावेश करण्यात आलेला आहे. गांजा (मरीव्हाना किंवा मारिजुआना) हा तांत्रिक दृष्ट्या मादक पदार्थ मानला जात नाही आणि त्याच्या मादक परिणामांसंबंधी अद्याप तज्ञांत बरेच वाद आहेत.

परीक्षण : चोरट्या व्यापाराला आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीसांनी पकडलेला संशयित माल हा खरोखरीच मादक पदार्थ आहे की नाही, हे परीक्षणाने सिद्ध होणे आवश्यक असते. याचप्रमाणे एखादी व्यक्ती मादक पदार्थाच्या नशेमध्ये आहे किंवा नाही हे सिद्ध होण्यासाठी त्या व्यक्तीच्या रक्तात अगर लघवीत एखादा मादक पदार्थ सापडतो की काय, हे तपासून पहावे लागते. बाह्य लक्षणांवरून वैद्यकीय तपासणीने नशा आहे किंवा नाही हे सांगता येते तसेच ⇨ विद्युत् मस्तिष्कालेखनाने मेंदूतील आवेगांचा आलेख काढूनही ठरविता येते पण ती व्यक्ती कोणत्या मादक पदार्थांच्या नशेत आहे हे निश्चितपणे सांगावयाचे झाल्यास तिच्या रक्ताचे रासायनिक विश्लेषण करणे आवश्यक होते. सामान्यपणे ५–१० मिलि. रक्तावर परीक्षण करावे लागत असल्याने त्यासाठी सामान्य रासायनिक विश्लेषण पद्धती वापरून चालत नाही. त्याकरिता अत्यंत संवेदनशील सूक्ष्म परीक्षण तंत्रे वापरावी लागतात उदा., ⇨ वर्णलेखनाचे विविध प्रकार, जंबुपार व अवरक्त वर्णपटलेखन [⟶ वर्णपटविज्ञान].

पहा : अफू औषधासक्ति कोका कोकेन कोडीन गांजा बार्बिच्युरेटे मद्य मॉर्फीन वेदनाशामके शांतके संभ्रमकारके.

संदर्भ : 1. Anslinger, H. A Tompkins, W. F. Traffic in Narcotics, New York, 1953

             2. Beeson, P. B. McDermott, W., Ed., Textbook of Medicine, Tokyo, 1975.

             3. Bhatnagar, J. P. The Law of Drugs in India, Allahabad, 1961.

             4. Eldridge, W. B. Narcotics and the Law, Chicago, 1967.

             5. O’Donnel, J. A. Ball, J. C., Ed., Narcotic Addiction, New York, 1966.

             6. Reynold, A. K. Randall, L. O. Morphine and Allied Drugs, Toronto, 1957.

             7. Wilner, D. M. Kassebaum, G. K., Ed., Narcotics, New York, 1965.

कुलकर्णी, श्यामकांत जोगळेकर, व. दा.