89 - 1

पट्टकृमि : (टेप वर्म). अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांच्या पृथुकृमी संघातील (प्लॅटिहेल्मिंथिस) सेस्टोडा या वर्गातील हे प्राणी होत. यांच्या सर्व जाती पृष्ठवंशी प्राण्यांच्या अथवा इतर अपृष्ठवंशी प्राण्यांच्या आंत्रात (आतड्यात) अंतःपरजीवी (शरीरात राहून उपजीविका करणाऱ्या) असतात. यांचे जीवनचक्र गुंतागुंतीचे असते व त्यात एक अथवा दोन पोषकांचा (ज्या प्राण्यांच्या शरीरात परजीवी राहतो त्या प्राण्यांचा) अंतर्भाव असतो. ज्या प्राण्याच्या शरीरात त्याची पूर्ण वाढ होते त्याला अंतिम पोषक व ज्या प्राणाच्या शरीरात विकासाची फक्त सुरुवातीची अवस्था आढळते त्या प्राण्याला मध्यस्थ पोषक म्हणतात. माणसाच्या आंत्रात पट्टकृमींच्या काही जाती आढळतात.

यूरोप व अमेरिका येथे मांस विक्रीला जाण्यापूर्वीं त्याची तपासणी केली जाते. त्यामुळे तेथील फार थोड्याल लोकांना पट्टकृमींचा संसर्ग झालेला आढळतो परंतु आफ्रिका, बाल्टिक देश इ. ठिकाणी जेथे अस्वच्छ, कच्चे किंवा कमी शिजलेले मांस खाल्ले जाते तेथे या कृमींचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणावर झालेला आढळतो.

शरीररचना : वा कृमींचे शरीर चपटे, फितीप्रमाणे व अनेक देहखंडांचे (शरीराच्या भागांचे) बनलेले असते. रंग बहुधा पांढरा किंवा पिवळसर असतो. यांची लांबी १ मिमी.पासून काही मी.पर्यंत असते. फितीच्या एका टोकाला स्नायुमय शीर्ष असते. पोषकाच्या आंत्राला घट्ट चिकटण्यासाठी शीर्षाला चूषक (ओढून घेणारे) खळगे व अंकुश असतात. शीर्षाच्या लगत असलेल्या पाठीमागच्या भागाला ग्रीवा (मान) म्हणतात. ग्रीवेपासून खंडिलनाने नवीन देहखंड तयार होतात. काही जातींत ग्रीवा सुस्पष्ट नसते. प्रत्येक देहखंडात उभयलिंगी जननेंद्रिये (पुं-व स्त्री-जननेंद्रिये) असतात. सर्व शरीरावर बाह्य संरक्षकउपकला (पातळ पटल) असते. त्यामुळे पोषकाच्या आंत्रातील एंझाइमांचा (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांचा) परिणाम पट्टकृमींच्या शरीरावर होत नाही. या कृमींत आहारनाल (अन्नमार्ग) नसतो.

आ. २. पट्टकृमीचे शीर्ष : (१) अंकुश, (२) चूषक खळगा, (३) ग्रीवा.

तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) शरीराच्या दोन्ही बाजूंना दोन मुख्य तंत्रिका रज्जू असतात व प्रत्येक खंडात त्या एकमेकींना वलयाकृती परियोजीने (तंत्रिका तंतूंच्या जुडग्याने) जोडलेल्या असतात. शीर्षात तंत्रिका गुच्छिका (ज्यांपासून तंत्रिका तंतू निघतात अशा तंत्रिका कोशिकांचा –पेशींचा-समूह) असते. चूषकाला जाणारे तंत्रिका रज्जू या गुच्छिकेपासून निघतात. या कृमींना विशिष्ट ज्ञानेंद्रिये नसतात परंतु 

शरीराच्या बाहेरील आवरणात तंत्रिका तंतूंची टोके आढळतात.

उत्सर्जन तंत्रात (निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकणाऱ्या संस्थेत) पृष्ठीय (पाठीकडील) व अधर (खालच्या) अशा आडव्या नालांच्या (मोठ्या नलिकांच्या) दोन जोड्या व ज्वालाकोशिका (निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकणाऱ्या कोशिका) असतात. हे नाल प्रत्येक देहखंडाच्या मागील भागात एकमेकांना जोडलेले असतात. शीर्षामध्ये पृष्ठीय व अधर नाल एका वलयाने एकमेकांना जोडलेले असतात. ज्वालाकोशिकांपासून निघणाऱ्या सूक्ष्मनलिका एकमेकींना मिळून शेवटी मोठ्या नालांना जोडलेल्या असतात.

प्रत्येक देहखंडात पुं-व स्त्री-जननेंद्रिये असतात. अगदी नव्याने तयार झालेल्या ग्रीवेजवळच्या खंडात जननेंद्रिये नसतात. काही आदिम (आद्य) पट्टकृमींत (उदा., शार्क माशाच्या आंत्रात सापडणऱ्या कृमींत) जननेंद्रिये पक्व होण्यापूर्वीच देहखंड शीर्षापासून अलग होतो व तो स्वतंत्र कृमीप्रमाणे वाढतो परंतु उत्क्रांत (उदा., माणसाच्या आंत्रात सापडणाऱ्या) कृमींत ते अलग होत नाहीत. पुं-जननेंद्रिये बहुधा प्रथम पक्व होतात. यामुळे दोन वेगवेगळ्या कृमींत किंवा एका कृमीच्या वेगवेगळ्या देहखंडांत परनिषेचन (परफलन) होणे शक्य होते.

पुं- व स्त्री-युग्मक वाहिन्या (पुं-व स्त्री-जनन कोशिका म्हणजेच शुक्राणू व अंडाणू वाहिन्या) देहखंडाच्या एका बाजूला असलेल्या एकाच जनन-कोटरात उघडतात. वृषण (पुं-जननेंद्रिय)  गोलाकार, लहान व १ ते १,००० पर्यंत कितीही असू शकतात परंतु बहुधा ते १०० असतात. प्रत्येक वृषणापासून लहान लहान नलिका निघतात व त्या सर्वांची मिळून एक नलिका बनते, ती रोम या मैथुनांगात (मैथुन-इंद्रियात) उघडते. रोमाला काटे व अंकुश असतात. उद्वर्त्य (आत ओढून घेता येणारा) रोम एका कोशात असतो.

आ. ३. पट्टकृमीचा देहखंड : (अ) पक्व जननेंद्रिये असलेला एक देहखंड : (१) अनुदैर्घ्य उत्सर्जन नाल, (२) अनुदैर्घ्य तंत्रिका, (३) गर्भाशय, (४, ७) अंडाशय, (५) मेहलिस ग्रंथी, (६) पीतक ग्रंथी, (८) योनिमार्ग, (९) रेतोवाहिनी, (१०) जननंरंध्र (आ) पक्व देहखंड.

अंडाशय (स्त्री-जननेंद्रिय) एकच असून बहुधा दोन खंडांचा असतो. सायक्लोफायालिडिया गण सोडून इतर सर्व गणांत पीतक ग्रंथी (अंडाशयातील जीवरहित व पोषण करणारे द्रव्य स्रवणाऱ्या ग्रंथी) असतात. पीतक ग्रंथींपासून निघालेली नलिका अंडनलिकेला जोडलेली असते. याच ठिकाणी कवच ग्रंथीपासून निघालेली नलिका येऊन मिळते. यालाच जोडून पुढे गर्भाशय असते. जनन-कोटरात उघडणाऱ्या स्त्री जनन-रंध्राच्या आतील अरुंद नलिकेला योनी म्हणतात, ही अंडाशयात उघडते. गर्भाशयाची वाढ जननेंद्रिये तयार झाल्यावर होते. पहिल्या काही खंडांत ते एका साध्या पिशवीसारखे असेत, तर पुढच्या खंडांत गर्भाशयाला बऱ्याच शाखा फुटतात व ते जाळ्यासारखे होते.


विकास : मैथुनाच्या वेळी शुक्राणू योनीमार्फत अंडनलिकेत जातात व अंडाचे निषेचन (फलन) होते. निषेचित अंडे व पीतक कोशिका एका कवचाने वेष्टिलेले असतात. निषेचित अंडी गर्भाशयात साठवली जातात. काही जातींत आँकोस्फिअर भ्रूणापर्यंतची वाढ गर्भाशयात होते. आँकोस्फिअर डिंभाला (भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे जगणाऱ्या व प्रौढांशी साम्य नसणाऱ्या क्रियाशील पूर्वावस्थेला) अंकुशांच्या तीन जोड्या असतात. असे अनेक भ्रूण असलेले देहखंड अलग होतात व ते पोषकाच्या मलावाटे बाहेर टाकले जातात. टेट्राफायलिडिया गणात जननेंद्रिये पक्व झाल्यावरच देहखंड अलग होतात आणि अंड्याचे निषेचन व भ्रूणापर्यंतची वाढ पोषकाच्या शरीरात होते.

भ्रूण असलेले देहखंड एखाद्या कवचधारी प्राण्याने खाल्ले, तर पुढची वाढ त्या पोषकाच्या आंत्रात होते. आँकोस्फिअर अंकुशाने पोषकाच्या आंत्राच्या भित्ती फाडून शरीर पोकळीत प्रवेश करतो व तेथे त्याची प्रोकेरेकॉइड डिंभात वाढ होते. असे संसर्गित कवचधारी प्राणी पृष्ठवंशी प्राण्याने खाल्ले असता प्रोकेरेकॉइड डिंभाची पुढील वाढ त्या प्राण्याच्या आंत्रात होते.

आ. ४. पट्टकृमीचा विकास अथवा वाढ : (अ) सहा अंकुश असलेला भ्रूण (आ) टीनियाचा कोष्ठडिंभ (पूर्व अवस्था) (इ, ई, उ) कृमिशीर्षाच्या निर्मितीमधील तीन टप्पे : (इ) अंकुश आणि चूषक उत्पन्न होण्यापूर्वी होणारे अंतर्वलन (ई) अंकुश आणि चूषक उत्पन्न झालेली अवस्था (उ) अंशतः झालेली वहिर्वलन (ऊ) पूर्ण बहिर्वलित शीर्षपुच्छीय आशय (ए) आशयाचे अवशेष असलेले शीर्ष (ऐ) पट्टकृमीचे पिल्लू.

सायक्लोफायलिडिया गणातील पट्टकृमींचा मध्यस्थ पोषकही पृष्ठवंशी प्राणीच असतो. या कृमींची अंडी असलेले देहखंड पोषकाच्या मलावाटे बाहेर पडल्यानंतर त्यांचा संपर्क झालेले अन्न गायींच्या खाण्यात आले की, गायीच्या आंत्रात आँकोस्फिअर भ्रूण बाहेर पडतात. तेथून ते स्नायूंत जातात व तेथे त्यांची वाढ आशय कृमीत (पट्टकृमीच्या भ्रूणावस्थेतील एका रूपात) होते. आशयाला एका बाजूला अंतर्वलन तयार होते. त्याच्या विरुद्ध बाजूला शीर्ष तयार होते. या अवस्थेतील कृमीला सिस्टिसेर्कस (कोष्ठडिंभ) म्हणतात. शीर्षावर चूषक तयार होतात. अशा सिस्टिसेर्कसापासून संसर्ग होतो. हे मांसांत साबुदाण्याच्या गोळ्यांप्रमाणे दिसतात. या अवस्थेत कृमी कित्येक महिने राहतात. अशा मांसाला डिंभमय मांस म्हणतात. असे अस्वच्छ कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस माणसाच्या खाण्यात आले की, आंत्रात आशय पचविले जातात, शीर्ष बाहेर येते व चूषकाने आंत्राला चिकटून बसते. नवीन देहखंडांची वाढ सुरू होते. अशा प्रकारे या कृमीचे जीवनचक्र पुढे चालू होते. इतर काही पट्टकृमींच्या जातींत कुत्रा, ससा, डुक्कर इ. इतर पृष्ठवंशी प्राणीही मध्यस्थ पोषक असतात. 

                                                              

चिन्मुळगुंद, वासंती रा.

मानवातील पट्टकृमिजन्य विकार : उष्ण कटिबंधीय व उपोष्ण कटिबंधीय प्रदेशातील मानवांना सायक्लोफायलिडियन पट्टकृमींपैकी टीनिया सॅजिनाटा व टीनिया सोलियम, क्षुद्र (खुज्या) प्रकारांपैकी हायमेनोलेपिस नानाहायमेनोलेपिस डिमिन्युटा आणि कुत्र्यांतील इकिनोकॉक्स ग्रॅन्युलोससहकिनोकॉकस मल्टिलोक्युलॅरिस या पट्टकृमींचा संसर्ग होण्याची नेहमी शक्यता असते. यांशिवाय स्यूडोफायलिडियन पट्टकृमींपैकी डायफायलोबोथ्रियम लेटम हा प्रकारही मानवात रोग उत्पन्न करू शकतो.

आ. ५. टीनाया सॅजिनाटा या पट्टकृमीचे जीवनचक्र : (१) अंतिम पोषक-मानव, (२) अंडीयुक्त देहखंड, (३) मध्यस्थ पोषक-गाय, (३ अ) अंडी, (४) सिस्टिसेर्कस अवस्था, (५) डिंभमय गोमांस, (६) अपूर्ण शिजविलेच्या गोमांसाचे भक्षण, (७) मानवी आतड्यातील पूर्ण वाटलेला कृमी, (८) कृमीचे अंकुशविरहित शीर्ष.

टीनिया सॅजिनाटा या पट्टकृमीचे मानव हा अंतिम पोषक असलेले व गाय ही मध्यस्थ पोषक असलेले जीवनचक्र आ. ५ मध्ये दाखविले आहे.

लक्षणे व इलाज : टीनिया सॅजिनाटा टीनिया सोलियम या कृमींमुळे कधीकधी दैहिक विषाक्तता, पोटदुखी, बेचैनी इ. विकार उद्‌भवतात. आंत्रपुच्छशोथ (अपेंडिसायटीस) उद्‌भवण्याचा संभव असतो. रोग असल्याचे पुष्कळ वेळा पांढरे फीतवजा तुकडे मलात पाहिल्यानंतरच रोग्यांच्या लक्षात येते. कृमीच्या या दोन प्रकारांपैकी कोणत्या प्रकाराने रोग झाला आहे, हे ठरविणे जरूर असते. ह्याकरिता मलातून बाहेर पडलेले देहखंड पाण्याने प्रथम धुतल्यानंतर दोन काचपट्ट्यांखाली दाबून तापसल्यास दोन्हीतील फरकामुळे नक्की प्रकार ओळखता येतो. टीनिया सॅजिनाटामध्ये मानवात डिंभावस्था कधीच आढळत नाही. याउलट टीनिया सोलियम प्रकारात मानवी

मानवामध्ये विकार उत्पन्न करणाऱ्या पट्टकृमींची माहिती 

पट्टकृमीचे नाव 

लांबी 

देहखंड आकारमान व संख्या 

शीर्ष 

मध्यस्थ पोषक 

अंतिम पोषक 

डायफायलो बोथ्रियम लेटम 

५ – १० मी. 

४X १२ मिमी. 

३ – ४ हजार. 

१ – २ मिमी. 

२ मोठे चूषक. 

मासा 

मनुष्य 

टीनिया सोलियम 

३ मी. 

६X १२ मिमी. 

१,००० पेक्षा कमी. प्रत्येक खंडात १२ – १८ गर्भाशय शाखा. 

२ मिमी. 

२० – २४ अंकुश 

डुक्कर 

मनुष्य 

टीनिया सॅजिनाटा 

५ – १० मी. 

५X २० मिमी. १,००० प्रत्येक खंडात १५ – ३० गर्भाशय शाखा. 

१ – २ मिमी. 

६ चूषक. 

गाय 

मनुष्य 

हायमेनोलेपिस नाना 

२ सेंमी. 

१०० देहखंड 

१ मिमी. 

– 

मनुष्य 

इकिनोकॉकस ग्रॅन्युलोसस 

५ मिमी. 

५ ते ६ देहखंड 

१ मिमी. 

मनुष्य 

कुत्रा डुक्कर. 

ऊतकांतून (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहांतून) डिंभ तयार होतात. या रोगावस्थेला डिंभमयता (सिस्टिसेकोंसिस) म्हणतात. विशिष्ट ऊतकात असे डिंभ तयार झाले म्हणजे स्थानीय स्वरूपाची लक्षणे उद्‌भवतात. उदा., मेंदूतील डिंभ ⇨ अपस्माराची लक्षणे उत्पन्न करतात. ऐच्छिक स्नायू आणि संयोजी (जोडणाऱ्या) ऊतकांतही डिंभ तयार होतात. आंत्रमार्गातून एकदा रक्तप्रवाहात शिरलेला डिंभ शरीराच्या कोणत्याही भागात वाढण्याची शक्यता असते. मेलेल्या डिंभांचे कॅल्सिभवन (कॅल्शियम लवणे भोवती साचणे) होते. संशय असलेल्या रोग्यांच्या क्ष-किरण तपासणीत कॅल्सिभवन झालेले डिंभ दिसतात.

इलाजामध्ये टीनिया सॅजिनाटाकरिता निक्लोसामाइड (योमेसान) व डायक्लोरोफेन ही तोंडाने द्यावयाची औषधे उपयुक्त ठरली आहेत. ही औषधे टीनिया सोलियमाकरिताही उपयुक्त आहेत. मात्र या औषधांमुळे देहखंड आतड्यातच विरघळून असंख्य अंडी सुटी होऊन मलातून बाहेर पडताना ती पुन्हा आतड्याता शिरून डिंभमयता होण्याचा धोका असतो. रोगाच्या डिंभमय अवस्थेवर कोणतेही औषध उपयुक्त नसून फक्त उपशामक उपाय योजावे लागतात. इतर प्रकारांपैकी हायमेनोलेपिसडायफायलोबोथ्रियम यांकरिता वरील औषधे गुणकारी आहेत. इकिनोकॉकस प्रकारात बहुधा द्राक्षार्बुद (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणारी द्राक्षाच्या घडीसारखी दिसणारी गाठ) तयार होते. यकृतात होणाऱ्या या तसेच लांब अस्थीत होणाऱ्या द्राक्षार्बुदावर शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे. त्यावर कोणतेही औषध आजपर्यंत उपलब्ध झालेले नाही.

देवधर, वा. वा. भालेराव, य. त्र्यं.

पशूंतील पट्टकृमिजन्य विकार : मानवाप्रमाणे पाळीव पशूंमध्ये पट्टकृमिजन्य रोग आढळून येतात. माणसामध्ये आढळण्याऱ्या काही पट्टकृमींच्या जीवनचक्रांतील डिंभ व द्रवार्बुद या अवस्थांची वाढ काही पशूंमध्ये होत असल्यामुळेही त्यांना विकार होतात. याउलट पशूंच्या काही पट्टकृमींच्या जीवनचक्रांतील अवस्थांची वाढ माणसामध्ये होते व त्यांनाही विकार होतात. 

रवंथ करणाऱ्या गायीगुरे, शेळ्या व मेंढ्या जनावरांमध्ये अनेक जातींचे पट्टकृमी आढळून येत असले, तरी मोनिशिया व एव्हिटेलिना वंशांचे कृमी महत्त्वाचे आहेत. मो. एक्सपान्सा व मो. बेनेडेनी हे कृमी गायीगुरे, शेळ्या-मेंढ्या यांमध्ये व स्टायलेशिया विट्टाटा उंटामध्ये आढळतात. या पट्टकृमींच्या देहखंडांची रुंदी लांबीपेक्षा अधिक असते पण कृमीचा एकंदर लांबी काही मीटर असते. एकाच जनावराच्या आंत्रमार्गात १,००० पेक्षा अधिक कृमी आढळून आले आहेत. असे असले तरी वयस्क जनावरांच्या प्रकृतीवर त्यांचा सहसा परिणाम होत नाही. मात्र वासरे, कोकरे व करडे यांना या कृमीमुळे, विशेषतः त्यांची संख्या वाढल्यास, आजार उद्‌भवतात. खुरटलेली वाढ, अशक्तपणा, ढेरपोटेपणा, पोटाच्या व छातीच्या खालच्या भागावर जलशोफ (पाणी साचल्यामुळे आलेली सूज) ही लक्षणे दिसतात. आजार बळावल्यास अतिसार होऊन क्षीण होत जाऊन जनावर मरते. कॉपर सल्फेट (मोरचूद), निकोटीन सल्फेट, सोडियम आर्सेनाइट ही औषधे यांवर देतात व ती उपयुक्त आहेत.

यांशिवाय टीनिया सॅजिनाटाटी. सोलियम या माणसातील पट्टकृमींच्या सिस्टिसेर्कस बोव्हिस सि. सेल्युलोज या डिंभावस्था अनुक्रमे गायीगुरे व डुकरे यांच्या स्नायूंमध्ये आढळून येतात. यामुळे रुधिराभिसरणात व्यत्यय येऊन क्वचित काही आजार उद्‌भवतात.

घोड्यामध्ये ॲनोप्लोसेफाला वंशाचे पट्टकृमी आढळतात. ॲ. परफोलिआटा, ॲ. मॅमिलानाॲ. मॅग्ना या कृमींमुळे बहुधा शिंगरांमध्येच आजार उद्‌भवतात. पहिल्या प्रकाराच्या कृमींचे डोके मोठे असते व यामुळे घोड्यांच्या मोठ्या आतड्यात व्रण होतात. लीद रक्त व श्लेष्मा (बुळबुळीत द्रव्य) यांनी मिश्रित असते. पचन तंत्रात दोष उत्पन्न झाल्यामुले अशक्तपणा व रक्तक्षय ही लक्षणे दिसून येतात. टर्पेंटाईन तेल, मेल फर्नचा अर्क व जवसाचे तेल यांचे मिभ्रण शिंगराला २४ ते ३६ तास उपाशी ठेवून नंतर पाजतात.


पाळीव पशूंमध्ये कुत्रा व मांजर या प्राण्यांत पट्टकृमींमुळे सर्वांत अधिक रोग उद्‌भवतात. मनुष्यामध्ये आढळणारा डायफायलोबोथ्रियम लेटम हा पट्टकृमी कुत्र्यामध्ये आढळतो व त्यामुळे त्यांना रक्तक्षय होतो. टीनिया वंशातील अनेक पट्टकृमी कुत्रा व मांजर यांमध्ये आढळून येतात. कृमींची संख्या भरमसाठ वाढल्यासच आजाराची लक्षणे दिसतात. टीनिया हायडॅटिजेना, टी. मल्टिसेप्स, टी. इकिनोकॉकस (इकिनोकॉकस ग्रॅन्युलोसस), टी. ओव्हिस हे कुत्रा व मांजर यांमध्ये आढळणारे महत्त्वाचे पट्टकृमी आहेत. आतड्यामध्ये मल पुढे सरकणे थांबून तो घट्ट साठून राहणे, अस्वस्थपणा, अनियमित भूक व कृमींमुळे तयार होणाऱ्या विषाच्या परिणामामुळे आकडी व अपस्मारासारखे झटके येणे ही लक्षणे विशेषतः लहान वयाच्या कुत्र्यामांजरांमध्ये दिसून येतात. सूक्ष्मदर्शकाने विष्ठेची तपासणी केल्यास तीत कृमींची अंडी दिसू शकतात व त्यांवरून रोगनिदान करता येते. गायीगुरे, शेळ्या व मेंढ्या यांच्या मांसामध्ये व मेंदूमध्ये कुत्र्यांच्या पट्टकृमींच्या डिंभ व द्रवार्बुद अवस्थांची वाढ होत असल्यामुळे खाटीकखान्यतील कच्चे मांस अगर शिकार करून मारलेले जनावर खाणाऱ्या कुत्र्यामध्ये पट्टकृमींचा उपद्रव जास्त होण्याचा संभव असतो. कुत्र्याच्या विष्ठेतून बाहेर पडणारी पट्टकृमींची अंडी वर उल्लेखिलेल्या जनावरांच्या पोटात गेल्यावरच कृमीचे जीवनचक्र चालू राहते. जीवनचक्र खंडित करण्यासाठी कृमिव्याधींनी पछाडलेल्या कुत्र्यांना औषधोपचार करून विष्ठेतून पडणाऱ्या अंड्यांचा विष्ठा जाळून टाकून नाश करणे हा प्रतिबंधक उपाय होऊ शकतो.

आरेकोलीन हायड्रोब्रोमाइड, आरेकोलीन ॲसिटारुसॉल, अँथेलीन इ. औषधे उपयुक्त आहेत. औषध दिल्यानंतर दोन तासांच्या आत मलविसर्जन न झाल्यास रेचक अगर बस्ती (एनिमा) देणे आवश्यक असते.

वर उल्लेखिल्याप्रमाणे कुत्र्यांच्या पट्टकृमींच्या द्रवार्बुदावस्था ज्या पशूंमध्ये वाढतात त्या पशूंना त्यांपासून काही आजार होतात.

सि. सेरिब्रॅलिस ही टी. मल्टिसेप्स या पट्टकृमीची द्रवार्बुद अवस्था गायीगुरे व शेळ्यामेंढ्या यांच्या मेंदू व मेरूरज्जूमध्ये वाढते. द्रवार्बुदाच्या विशिष्ट ठिकाणाप्रमाणे दृष्टिनाश, डोके वारंवार झटकणे व एका बाजूला वाकडे करून चालणे, पाय उंच उचलून टाकणे, गोलगोल फिरणे इ. लक्षणे दिसतात. गायीगुरांतील व मेंढ्यांतील या आजाराला ‘गिड’ असे नाव आहे.

टी. इकिनोकॉकस या पट्टकृमीची द्रवार्बुद अवस्था गायीगुरे, म्हशी, शेळ्या, मेंढ्या व माणूस यांच्या यकृत, फुप्फुस आणि इतर अनेक इंद्रियांमध्ये वाढतात. जे इंद्रिय दूषित झाले असेल त्यानुसार आजाराची लक्षणे दिसतात. ह्या द्रवार्बुदांचे आकार लहान चेंडूपासून नारळाएवढेही असू शकतात.

सि. टेन्यूइकोलिस ही टी. हायडॅटिजेना या कृमीची द्रवार्बुद अवस्था गायीगुरे, शेळ्या व मेंढ्या यांच्या उदरगुहेमध्ये (शरीराच्या ज्या पोकळीत पोट असते तिच्यामध्ये) वाढते. कधीकधी या द्रवार्बुदांचा आकार चेंडूएवढा मोठा होतो व त्यांचा यकृतावर दाब पडल्यामुले यकृत अकार्यक्षम होते व त्यानुसार लक्षणे दिसू लागतात.

कोंबड्यांना डॅव्हॅइनिया प्रोग्लोटिना, रॅलेटिना टेट्रागोना या जातींच्या पट्टकृमींमुळे आजार होतात. सामान्यतः वयस्क कोंबड्यांना कमी प्रमाणात आजार होतात पण पिलांमध्ये कृमींची संख्या वाढल्यास ती मृत्युमुखी पडतात. अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे अंडी देण्याचे प्रमाण घटते. कधीकधी पक्षाघात होऊन पाय लुळे पडतात. तसेच डॅव्हॅइनियारॅलेटिना वंशांचे कृमी आतड्याच्या भित्तीमध्ये खोलवर जात असल्यामुळे आतड्यामध्ये रक्तस्राव व साबुदाण्याएवढ्या गाठी होतात.

आरेकोलीन ॲसिटार्‌सॉल, कार्बन टेट्राक्लोराइड व कमला [⇨ कुंकुम वृक्ष] ही औषधे वापरतात. प्रतिबंधक उपाय म्हणून पिलांना नियमितपणे ही औषधे देतात.

वर उल्लेखिलेली औषधे वापरून निरनिराळ्या औषधी कारखान्यांनी सेस्टरसॉल, मेम्यूराल, डायसेस्टाल इ. व्यापारी नावांनी जनावरांच्या व कोंबड्यांच्या कृमींवर इलाज करण्यासाठी व देण्याला सोपी अशी औषधमिश्रणे तयार केली आहेत.

दीक्षित, श्री. गं.

संदर्भ : 1. Dey, N. C. Medical Parasitology, Calcutta, 1958.

    2. Marshall, A. J. Williams, W.D., Eds., Textbook of Zoology : Invertebrates, London, 1972.

    3. Miller, W. C. West, G. P., Eds., Black’s Veterinary Dictionary, London, 1962.

    4. Sawitz, W. G. Medical Parasitology for Medical Students and Practicing Physicians, New York, 1956.

    5. Wardle, R. A. McLeod, J. A. The Zoology of Tapeworms, Minneapolis,