लुईजी पीरांदेल्लो

पीरांदेल्लो, लुईजी : (२८ जून १८६७ – १० डिसेंबर १९३६). आंतरराष्ट‌्रीय किर्तीचा इटालियन नाटककार आणि कथा- कांदबरीकार. सिसिलीतील गिरगेंती (विद्यमान आग्रिजेन्तो) या गावी त्याचा जन्म झाला. त्याच्या वडीलांचा गंधकाचा व्यापार होता. आपल्या पुत्रानेही व्यापारात पडावे, अशी त्यांची इच्छा असली, तरी पीरांदेल्लोला शिक्षणात अधिक रस होता. १८९१ मध्ये जर्मनीतील बॉन विद्यापीठातून त्याने भाषाशास्त्राची डॉक्टरेट मिळविली. विद्यापीठीय शिक्षण घेत असतानाच Mal giocondo (१८८९) हा त्याचा काव्यसंग्रह प्रसिध्द झाला होता. विख्यात इटालियन कवी जोझ्वे कार्दूत्ची ह्याचा प्रभाव त्यातील कवितांतून जाणवतो. यथावकाश तो कथा-कादंबरी आणि नाटक ह्यांकडे वळला. १८९४ मध्ये त्याच्या वडीलांच्या एका व्यापारी मित्राच्या मुलीशी पीरांदेल्लोचा विवाह झाला. गंधकाच्या खाणींत तिच्या नावे काही पैसा गुंतविण्यात आला होता. त्यामुळे पीरांदेल्लोला लेखनासाठी आवश्यक ते स्वास्थ्य लाभले. तथापि १९०३ मध्ये ह्या खाणींच्या धंद्यावर आपत्ती येऊन हे स्वास्थ्य संपुष्टात आले रोममध्ये इटालियन भाषेच्या शिक्षकाची नोकरी पीरांदेल्लोला चरितार्थासाठी पतकरावी लागली. आर्थिक आपत्तीच्या धक्क्याने त्याची पत्नी वेडसर झाली. ह्या दुर्घटनांतून निर्माण झालेले ताण त्याला दीर्घकाळ भोगावे लागले त्यांचा परिणाम त्याच्या साहित्यावरही अटळपणे झाला. मानवी व्यक्तिमत्त्वाची संकुलता व परिवर्तनीयता ह्यांचा वेध घेणे, हा त्याचा वाङ्मयीन ध्यास झाला. सखोल मनोविश्लेषण हे त्याच्या कथा-कांदबऱ्यांचे एक लक्षणीय आणि महत्वाचे वैशिष्ट्य ठरले. १९०४ मध्ये प्रसिध्द झालेली I fu Mattia Pascal (इं. भा. द लेट मात्तीआ पास्कल, १९२३) ही त्याची कांदबरी आणि La trappola (१९१५) सारखे कथासंग्रह या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. फ्रेंच मानसशास्त्रज्ञ आल्फ्रेड बीने ह्यांच्या Les alterations de la personnalite (१८९२, इं. शी. ऑल्टरेशन्स ऑफ द पर्सनॅलिटी ) ह्या ग्रंथाचाही फार मोठा परिणाम त्याच्या मनावर झालेला होता. स्वत:ची कलाविषयक तात्त्विक भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने पीरांदेल्लोने लिहिलेल्या L’umorismo (१९०८) ह्या ग्रंथात बीनेच्या विचारांचा प्रभाव प्रत्ययास येतो. Uno, nessuno e centomila (१९२५-२६) ह्या त्याच्या कांदबरीतील काही वर्णने अतिवास्तववादी वळणाची आहेत. तथापि पीरांदेल्लोच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रतिभेचा आणि कलादृष्टीचा साक्षात्कार विशेष प्रकर्षाने घडविला, तो त्याच्या Sei personaggi in cerca d’autore (१९२१, इं. भा. सिक्स कॅरॅक्टर्स इन सर्च ऑफ ॲन ऑथर, १९५४), Enrico IV (१९२२, इं. भा. हेन्री फोर्थ, १९६०) ह्यांसारख्या त्याच्या नाट्यकृतींतून मानवी जीवनाविषयीच्या त्याच्या विचारांचा सखोल, तात्त्विक गाभाच त्याने विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रंगभूमीवर जिवंत केला अमूर्ताला समूर्त केले आणि हे करीत असताना नाट्याचे भान कोठेही ढळू दिले नाही. मानवी व्यक्तिमत्त्वासंबंधीच्या सत्याचा वस्तुनिष्ठपणे शोध घेणे निष्फळ आहे, अशी पीरांदेल्लोची धारणा होती. आपल्या व्यक्तिमत्त्वाची परस्परांहून भिन्न अशी किती रूपे संभवतात, हे एखाद्या व्यक्तीला केव्हाच सांगता येणार नाही किंबहुना व्यक्तीला स्वत:विषयी जे ज्ञान झाले आहे असे वाटते, त्याच्या किती तरी पट ती स्वतःविषयी अज्ञानीच असते. वेळोवेळी निरर्थक ठरणारे एखादे मायावी वास्तव निर्माण करून, आपली फसवणूक करण्याची गरज आपणास सातत्याने भासत असते. ह्या गरजेची जाणीव का, कोठून आणि कशी निर्माण होते हेही आपणास कळत नाही. मानवी व्यक्तिमत्त्वाची ही गहन बहुविधता सिक्स कॅरॅक्टर्स …मधील एका व्यक्तिरेखेच्या तोंडूनच पीरांदेल्लोने वदविली आहे. पीरांदेल्लोच्या ह्या नाट्यकृतीला सर्वाधिक प्रसिध्दी मिळाली. एका नाटकाची तालीम करण्यासाठी जमलेल्या नटमंडळींबरोबर त्या नाटकाचा दिग्दर्शक बोलत असताना सहाजणांचे एक कुटुंब तेथे येते आमच्या जीवनावर नाटक लिहिणाऱ्या लेखकाच्या शोधात आम्ही येथे येऊन पोहोचलो आहोत, असे हे लोक दिग्दर्शकाला सांगतात आणि नंतर आपल्या जीवनाचे शोकात्म नाट्य त्या दिग्दर्शकाच्या व नटमंडळाच्या समोर उभे करतात. नाटकातल्या नाटकाचा हा एक नवा प्रकार पीरांदेल्लोने रंगभूमीवर आणला प्रत्यक्ष जीवन आणि त्याचे प्रेक्षकांना घडविले जाणारे नाटकीय रूप ह्यांतील विसंगती दाखवून देण्याचा त्याने प्रयत्न केला. ह्या नाटकाचा मराठी अनुवाद नाटककाराच्या शोधात सहा पात्रं ह्या नावाने माधव वाटवे ह्यांनी केलेला आहे (१९६८). हेन्री फोर्थचा नायक नाटकात चौथ्या हेन्रीचे काम करणारा एक नट आहे. एका अपघातामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम होतो आणि आपण खरोखरीच चौथा हेन्री आहोत, अशी त्याची समजूत दृढ होते. त्याला एकांतात ठेवून तेथे चौथ्या हेन्रीच्या काळातले वातावरण निर्माण करण्यात येते. या अवास्तवात वावरत असतानाच, पुढे केव्हा तरी, आपण खरोखरीच कोण, हे त्याला कळते परंतु त्यानंतर परिस्थितीच अशी निर्माण होते, की जाणूनबुजून हयातभर अवास्तव स्वीकारण्याचा, म्हणजेच वेडेपणाची भूमिका कायम ठेवण्याचा, तो निर्णय घेतो.

आपल्या नाट्यलेखनाने आधुनिक जागतिक रंगभूमीला ज्यांनी आकार दिला, अशा नाटककारांत पीरांदेल्लोचा अंतर्भाव होतो. चाळीसांहून अधिक नाटके त्याने लिहिली. त्या साऱ्यांचीच गुणवत्ता सारखीच आहे, असे म्हणता येणार नाही तथापि मानवी व्यक्तिमत्त्वांचे विभाजन एखाद्या अणूप्रमाणे घडवून आणून त्याच्या गाभ्याचे स्फोटक रूप दाखविण्याची त्याची प्रवृत्ती त्यांतून प्रत्ययास येते. त्याच्या नाट्यकृतींचे अनुवाद विविध भाषांतून झालेले आहेत. १९३४ सालचे साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. रोम येथे तो निधन पावला.

संदर्भ : 1. Ferrante, Luigi, Pirandello, Florence, 1958.

     2. Mac Clintock, Lander, The Age of Pirandello, Bloomington (Ind.), 1951.

     3. Starkie, Walter, Luigi Pirandello, New York, 1927 2nd edition,

     4. Vittorini, Domenico, The Drama of Luigi Pirandello, Philadelphia, 1935.

कुलकर्णी, अ. र.