गोरे, नारायण गणेश : (१५ जून १९०७–   ). स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत. विधवेशी विवाह करणारे कर्ते सुधारक. ‘नानासाहेब गोरे’ ह्या नावाने विशेष परिचित. रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यामधील हिंदळे ह्या गावी जन्म. शिक्षण पुणे येथे बी.ए. एल्‌एल्‌.बी.

ना. ग. गोरे

पर्यंत. पुणे येथील पर्वती मंदिर अस्पृश्यतानिवारण सत्याग्रहापासून त्यांनी सार्वजनिक कार्यात भाग घ्यावयास सुरुवात केली. १९३० मध्ये महाराष्ट्र यूथ लीगचे ते चिटणीस झाले. १९३६– ३९ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सदस्य होते. काँग्रेस समाजवादी पक्षाच्या संस्थापकांपैकी नानासाहेब हे एक होत. १९४८–५३ मध्ये समाजवादी पक्षाचे ते सहचिटणीस होते. पुढे १९५७–६२ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे प्रजासमाजवादी पक्षाचे ते खासदार होते. ह्याच काळात ह्या पक्षाचे ते सरचिटणीसही होते. १९६४ मध्ये ह्याच पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. १९६७-६८ मध्ये ते पुणे महापालिकेचे महापौर होते. १९७० पासून ते राज्यसभेचे सदस्य आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय भाग घेऊन नानासाहेबांनी अनेकवार तुरुंगवास भोगला. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर पोर्तुगीज सत्तेपासून गोवा मुक्त करण्यासाठी १९५५ मध्ये झालेल्या गोवा विमोचन सत्याग्रहाचा त्यांनी प्रारंभ केला. त्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती परंतु १९५७ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.

नानासाहेबांनी बरेच लेखनही केले आहे. समाजवादाचा ओनामा (१९३५) हे त्यांचे पहिले पुस्तक. जुन्या हैदराबाद संस्थानातील गुलबर्गा तुरुंगात शिक्षा भोगत असताना फेब्रुवारी ते डिसेंबर १९४२ पर्यंत त्यांनी लिहिलेली दैनंदिनी कारागृहाच्या भिंती   ह्या नावाने १९४५ मध्ये प्रसिद्ध झाली. तुरुंगातील भेदक अनुभवांचे प्रत्ययकारी चित्रण तीत आढळते. डाली (१९५६) हा त्यांचा ललितनिबंधसंग्रह. शंख आणि शिंपले (१९५७) मध्ये त्यांच्या आठवणी आहेत. सीतेचे पोहे (१९५३) आणि गुलबशी (१९६२) मध्ये त्यांच्या कथा संगृहीत केलेल्या आहेत. आव्हान आणि आवाहन (१९६३), ऐरणीवरील प्रश्न (१९६५) ह्या पुस्तकांत त्यांचे वैचारिक लेख अंतर्भूत आहेत. कालिदासाच्या मेघदूताचा त्यांनी समछंद अनुवाद केला आहे. त्यांनी केलेल्या अन्य अनुवादांपैकी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद विशेष उल्लेखनीय आहे. बेडूकवाडी (१९५७) आणि चिमुताई घर बांधतात (१९७०) ही त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके. त्यांनी लिहिलेल्या अन्य पुस्तकांत विश्वकुटुंबवाद (कम्यूनिझम) (१९४१) आणि अमेरिकन संघराज्याचा इतिहास (१९५८) ह्यांचा समावेश होता. मुरारीचे साळगांव (१९५४) हे त्यांनी प्रौढ साक्षरांसाठी लिहिलेले पुस्तक. 

जनवाणी, रचना, जनता  ह्यांसारख्या नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले. त्यांतून, तसेच अन्य इंग्रजी, मराठी आणि हिंदी नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले आहे. उत्तम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. रेखीव मांडणी, स्पष्ट विचार आणि अभ्यासपूर्ण विवेचन ही त्यांच्या वैचारिक लेखनाची आणि भाषणांची वैशिष्ट्ये. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

थत्ते, यदुनाथ