ॲड्‌मिरल सरदारीलाल मथरादास नंदा.

नंदा, ॲड्‌मिरल सरदारीलाल मथरादास : (१० ऑक्टोबर १९१५ —  ). भारताचे माजी नौसेनाप्रमुख. शिक्षण कराची येथे. इंग्लंडच्या शाही संरक्षण अकादमीचे ते स्नातक आहेत. १९४१ साली त्यांनी रॉयल इंडियन नेव्हल व्हॉलंटिअल रिझर्व्हमध्ये प्रवेश केला. नौदलात सैविवर्ग प्रमुख (१९५७), डायरेक्टर जनरल, मुंबईच्या नौदल तळाच्या विस्तार-योजनेचे प्रमुख (१९५८—६०), सारवद-प्रमुख (चीफ ऑफ मटेरिअल) (१९६२), माझगाव गोदीचे कार्यकारी संचालक (१९६४—६६), हिंदी नौदल ध्वजाधिकारी (१९६६—६८), पश्चिमी विभागाचे नौदल समादेशक (१९६८—७०) इ. पदे त्यांनी भूषविली, त्यांना अतिविशिष्ट (१९६२) व परमविशिष्ट (१९६८) ही सेवा पदके मिळाली आहेत.  ते १९७० मध्ये नौदलप्रमुख झाले होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली, त्यामुळे पद्मविभूषण ही पदवी त्यांना देण्यात आली (१९७२). सेवानिवृत्तीनंतर ते भारतीय जहाज वाहतूक-निगमाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक झाले आणि ‘इराणो-हिंद शिपिंग कंपनी’च्या स्थापनेत त्यांनी भारत सरकारतर्फे पुढाकार घेतला.

इनामदार, य. न.