ॲलिगेटर : जिवंत ⇨सरीसृपांचे (सरपटणाऱ्या प्राण्यांचे) जे चार गण आहेत त्यांपैकी क्रोकोडिलिया (नक्रगण) गणात ॲलिगेटराचा समावेश होतो. याच गणात केमन, घडियाल आणि मगर यांचाही अंतर्भाव होतो. हा गण जुरासिक (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात प्रथम आढळतो. प्राचीन काळी या गणातील प्राण्यांचा जगभर विस्तार झालेला होता, पण हल्ली ते सगळीकडे आढळत नाहीत. ॲलिगेटर अमेरिका आणि आशियात मगर आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात केमन अमेरिकेत आणि घडियाल आशियात आढळतात.

नक्रगणातील (क्रोकोडिलिया) प्राण्यांच्या डोक्याचे आकार (रूपरेखा). पृष्ठीय दृश्य : (अ) घडियाल, (आ) मगर (सुसर), (इ) ॲलिगेटर आणि केमन.ॲलिगेटर हे मगरांचे जवळचे नातेवाईक आहेत. यांचे डोके मगराच्या डोक्यापेक्षा जास्त रुंद व आखूड असते. डोक्याच्या पुढील निमुळत्या आणि चापट भागाला ‘तुंड’ किंवा ‘मुस्कट’ म्हणतात. ॲलिगेटराचे तुंड माफक लांबीचे, रुंद, तिकोनी अथवा गोलाकार असते. खालच्या जबड्याच्या दोन्ही अस्थिमय शाखांचा आठवा दातापर्यंत एकजीव झालेला असतो. याच जबड्यावरील चौथा दात वरच्या जबड्यातील एका खळग्यात बसतो. नासिका-छिद्राचे नासास्थीने (नाकाच्या हाडाने) विभाजन झालेले असते. खालच्या जबड्यावर १५ पेक्षा जास्त दात नसतात आणि तोंड मिटल्यावर ते वरच्या जबड्यावरील दातांच्या आत बसतात. पाय तुलनेने बारीक असल्यामुळे त्यांना जमिनीवर चालणे अवघड जाते.

ॲलिगेटराच्या दोन जाती आहेत : एक अमेरिकेत आणि दुसरी चीनमध्ये आढळते. ॲलिगेटर मिसिसिपिएन्सिस ही जात अमेरिकेच्या आग्नेय भागातील नद्यांत आणि सखल पाणथळ प्रदेशात राहते. हिची सरासरी लांबी अडीच ते सव्वातीन मी. असते, पण सहा मी. लांबीचा ॲलिगेटर सापडल्याचीही नोंद आहे. एके काळी ही जात फार मोठ्या प्रमाणावर या भागात आढळत असे, परंतु दिवसेंदिवस यांची संख्या घटत चालल्यामुळे यांची शिकार करण्यास हल्ली कायद्याने बंदी केली आहे.

याचे मुख्य भक्ष्य मासे होत, पण संधी मिळाली म्हणजे तो कुत्री, बकऱ्या, मेंढ्या यांना पकडून पाण्यात नेतो व नंतर खातो. माणसावर तो सहसा हल्ला करीत नाही. यांच्या प्रजोत्पादनाचा काळ मे-अखेर ते जुलैच्या मध्यापर्यंत असतो. या काळात ते मेघगर्जनेसारखा आवाज काढतात. घशाच्या दोन्ही बाजूंना एक आणि अवस्करात (ज्यात आतडे, युग्मकअंडाणू वा शुक्राणू वाहिन्या आणि मूत्र वाहिन्या उघडतात असा शरीराच्या मागच्या टोकाकडे असणारा समाईक कोष्ठ) एक अशा गंधग्रंथींच्या (ज्यांच्या स्रावाला वास असतो अशा ग्रंथींच्या) दोन जोड्या असतात. त्यांच्या स्रावाला कस्तुरीसारखा उग्र वास येतो. प्रजोत्पादनाच्या काळात आवाज आणि वास यांच्या साहाय्याने नर माद्यांना शोधून काढतात. प्रतिस्पर्धी नरांत मादीवरून झुंजी चालू असतात. मादी कोरड्या जमिनीवर घरटे म्हणजेच कुजणाऱ्या पालापाचोळ्याचा साधारण ६०–९० सेंमी. उंचीचा ढीग तयार करते व त्याच्या वरच्या टोकावर एक मोठे भोक पाडून त्यातून आत अंडी घालते. नंतर ती भोक बंद करते. एका वेळी मादी २०-७० अंडी घालते. ९-१० आठवड्यांनी अंडी फोडून पिल्ले बाहेर पडतात. ती या वेळी सु. १८ सेंमी. लांब असतात. त्यांची वाढ फार झपाट्याने होते. हा ॲलिगेटर ५६ वर्षे जगल्याची नोंद आहे.

 ॲलिगेटर सायनेन्सिस  चीनमधील यांगत्सीकिअँग नदीमध्ये आढळतो. याची लांबी दीड मी. असते. पायांवरील बोटे पातळ त्वचेने जोडलेली नसतात. हिवाळ्यात तळाच्या चिखलात पुरून घेऊन हा शीतसुप्ती (हिवाळ्यातील गुंगी किंवा झोप) घेतो. या जातीच्या सवयींचा विशेषत: अभ्यास झालेला नाही.

पहा : केमन घडियाल मगर.

संदर्भ : Ditamars, R. L. Reptiles of the World, New York, 1955.

कर्वे, ज. नी.