आंद्रे मोर्वामोर्वा, आंद्रे : (२६ जुलै १८८५–९ ऑक्टोबर १९६७). विख्यात फ्रेंच चरित्रकार, कादंबरीकार व निबंधकार. मूळ नाव एमिल हेरझाग. फ्रान्समधील येल्बफ येथे एका संपन्न कुटुंबात जन्मला. रुआन येथे त्याचे शिक्षण झाले. तेथेच विख्यात तत्त्वज्ञ आलँ ह्याच्या विचारांचा प्रभाव मोर्वावर पडला. पहिल्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यातील एक संपर्क अधिकारी म्हणून त्याने काम केले. त्या वेळी ब्रिटिशांचे जे निरीक्षण त्याने केले ते त्याच्या ले सिलांस द्यु कॉलोनेल ब्रॅम्बल (१९१८, इं. भा. द सालेन्स ऑफ कर्नल ब्रम्बल, १९१९). ह्या कादंबरीत प्रतिबिंबित झाले आहे. ह्या कादंबरीमुळे एक लोकप्रिय लेखक म्हणून त्याला मान्यता मिळाली. बर्नार्ड क्वेस्ने (१९२६), व्हॉटेव्हर गॉड्स मे बी (१९२८, इं. भा. १९२९) ह्या त्याच्या अन्य उल्लेखनीय कादंबऱ्या. त्याने कथालेखनही केले. ‘द हिस्टरी ऑफ इंग्लंड’ (१९३७, इं. शी.) सारखे इतिहासग्रंथही लिहिले. तथापि त्याची किर्ती आज मुख्यतः अधिष्ठित आहे, ती त्याच्या चरित्रग्रंथांवर. त्याने लिहिलेल्या चरित्रग्रंथांत शेली (१९२३, इं. भा. १९३५), डिझरेली (१९२७, इं. भा. १९३७), बायरन (१९३०, इं. भा. १९३०), व्हॉल्तेअर (१९३२, इं. भा. १९५२), प्रूस्त (१९४९, इं. भा. १९५०), जॉर्ज सँड (१९५२, इं. भा. १९५३), बाल्‌झॅक (१९६५) ह्यांचा समावेश होतो. चरित्र्यलेखन करताना मोर्वाने कादंबरीलेखनाचे तंत्र वापरले आणि प्रभावी चरित्रकार म्हणून त्याचा लौकिक झाला. १९३८ मध्ये फ्रेंच अकादमीवर त्याची नियुक्ती झाली. त्याच वर्षी त्याला ब्रिटिश साम्राज्याचा नाइट हा किताबही देण्यात आला.

आय् रिमेंबर आय् रिमेंबर (१९४२, इं. भा.) आणि कॉल नो मॅन हॅपी (१९४३, इं. भा.) हे त्याचे आत्मचरित्रात्मक लेखन त्याच्या कलावंत व्यक्तीमत्त्वाचे प्रसन्न दर्शन घडविते. 

पॅरिस येथे तो निधन पावला. 

संदर्भ : Lemaitre, Georges, Maurois: The writer and His Work, rev. Ed. Ungar, 1968.

देसाई, म. ग.