माँतर्ला, आंरी : (२१ एप्रिल १८९६–२१ सप्टेंबर १९७२). फ्रेंच कादंबरीकार, नाटककार आणि निबंधकार. जन्म नय्यी-स्युर-सॅन येथे एका कॅथलिकपंथीय उमराव कुटुंबात. नय्यी-स्युर-सॅन येथील एका शाळेत शिक्षण घेतल्यानंतर तो पहिल्या महायुद्धात लढण्यासाठी गेला. संकुल, आत्मकेंद्रित असे त्याचे व्यक्तीमत्त्व होते. आक्रमक पौरुषाचे, पराक्रमाचे आदर्श त्याने डोळ्यांसमोर ठेविले होते. युद्ध, बैलझुंजीसारखे क्रीडाप्रकार ह्यांचे त्याला आकर्षण होते. स्त्रियांचा, पुरुषाला भावविवश करणाऱ्या त्याच्या प्रभावाचा त्याला तिटकारा होता. लोकशाही राज्यपद्धतीही त्याला नापसंत होती. द ड्रीम (१९२२, इं. भा. १९६२), द बुलफाटर्स (१९२६ इं. भा. १९२७) ह्या त्याच्या कादंबऱ्यांतून त्याच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वाची प्रचीती येते. त्याच्यातील स्त्रीद्वेष्टा त्याने चार भागांत लिहिलेल्या एका कादंबरीतून विशेषत्त्वाने प्रत्ययास येतो. ले जन फिय आणि पित्ये पुर ले फाम हे ह्या कादंबरीचे पहिले दोन खंड (दोन्ही १९३६), पिटी फॉर विमेन (इं. भा.) ह्या नावाने १९३७ मध्ये एकत्रितपणे प्रकाशित झाले. उर्वरित दोन खंड ल् देमाँद्यु बियँ (१९३७) आणि ले लेप्रझ (१९३९) हे इंग्लंडमध्ये द लेपर्स (इं. भा.) ह्या शीर्षकाने १९४० मध्ये एकत्रितपणे प्रसिद्ध झाले. ह्या कांदबरीचा दोन भागांत केलेला एक इंग्रजी अनुवाद द गर्ल्स : ए टेट्रालॉजी ऑफ नॉव्हेल्स १९६८ साली प्रसिद्ध झाला.

तो १९४२ पासून नाट्यलेखनाकडे वळला. (तत्पूर्वी लेक्झील इं. शी. ‘द एक्झाइल’ हे नाटक त्याने १९१४ मध्ये लिहिले होते). ला रॅन मॉर्त (१९४२ इं. भा. क्वीन आफ्टर डेथ ऑर हाउ टू किल विमेन, १९५१), ल मॅत्र द्‌ सांतियागो (१९४७, इं. भा. मास्टर ऑफ सांतिआगो, १९५१), पोर्ट रॉयल (१९५४, इं. भा. १९६२) ह्यांसारखी नाटके त्याने लिहिली. कोणत्याही परिस्थितीत आपल्या उच्‍च ध्येयांना सतत चिकटून राहण्याची धडपड करणारे नायक आपल्या नाटकांतून त्याने निर्माण केले. अहंकार आणि आत्मप्रभुत्व जपणारी माणसे त्यांतून दिसतात. 

त्याची १९६० मध्ये फ्रेंच अकादमीवर नियुक्ती झाली. 

पॅरिस येथे त्याने आत्महत्या केली.

संदर्भ : 1. Batchelor, J. W. Existence and Imagination, The Theatre of Henry de Monthelant, New York, 1967.

             2. Becker, L. Hemry de Montherlant A. Critical Blography, Carbondale, Illi, 1970.

             3. Cruickshank, J. Montherlant, London, 1964. 

             4. Johnson, R. B. Henry de Montherlant, New York, 1967.

कुलकर्णी, अ. र.