आंत्वान द सँ-ते ग्झ्यू पेरी

सँ-तेग्‌झ्यू पेरी, आंत्वान द : (२९ जून १९०० –३१ जुलै १९४४). फ्रेंच वैमानिक आणि साहित्यिक. जन्म लीआँ येथे विपन्नावस्थेस आलेल्या एका उमराव कुटुंबात. इकोल नेव्हलमधील शिक्षणासाठी द्यावयाच्या प्रवेश परीक्षेत अपयश आल्याने तो लष्करी सेवेत रुजू झाला. १९२२ मध्ये त्याला वैमानिकाचा परवाना मिळाला. काही काळ फ्रान्सच्या हवाईदलात काम केल्यानंतर १९२६ मध्ये तो व्यावसायिक वैमानिक झाला. फ्रान्स, उत्तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका येथील आरंभीच्या हवाई मार्गांवरून त्याने अनेक उड्डाणे केली. १९३०-४० च्या दरम्यान त्याने चाचणी वैमानिक, एअर-फ्रान्स कंपनीसाठी प्रसिद्घी मदतनीस (ॲटॅची) व पॅरिस-सॉयर या नियतकालिकाचे वार्ताहर म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्घाच्या काळात तो पुन्हा फ्रेंच हवाई दलात दाखल झाला. जर्मनांनी फ्रान्स व्यापल्यानंतर तो उत्तर आफ्रिका मार्गे अमेरिकेत गेला (१९४०). १९४२ मध्ये तो उत्तर आफ्रिकेत आला आणि दोस्त राष्ट्रांच्या सेनेसाठी शत्रूची टेहळणी करण्याच्या कामगिरीवर जाऊ लागला. ३१ जुलै १९४४ रोजी टेहळणी करण्यासाठी भूमध्य समुद्रावरून केलेल्या उड्डाणानंतर तो परत आला नाही. तीच त्याच्या मृत्यूची तारीख मानली जाते.

तेग्झ्यूपेरी अत्यंत धाडसी होता. साहसाकडे आणि संकटांकडे एखाद्या कवीच्या दृष्टीने त्याने पाहिले. वैमानिकाच्या व्यवसायात त्याला जसा पराक्रम दिसला, तसाच वाङ्‌मयीन आविष्कारासाठी एक नवा विषयही मिळाला. प्राणांचीही पर्वा न करता निर्भयपणे संकटांना भिडणे, हे मानवी जीवनाचे सर्वोच्च श्रेय, अशी त्याची धारणा होती. Courrier-Sud (१९२९, इं. भा. सदर्न मेल, १९३३), व्हॉल द न्युई (१९३१, इं. भा. नाइटफ्लाइट, १९३२) ह्या त्याच्या कादंबऱ्या त्याच्या वैमानिकी जीवनातल्या अनुभवांवर आधारलेल्या आहेत. वैमानिकीच्या आरंभीच्या काळात कर्तव्यकठोर वृत्तीने मृत्यूला सामोरे जाणाऱ्या वैमानिकांचा त्याने कादंबऱ्यांतून गौरव केला. ह्या कादंबऱ्यांमुळे त्याला मोठी कीर्ती मिळाली. Terre des homes (१९३९, इं. भा. विंड, सँड अँड स्टार्स, १९३९) मध्ये वैमानिकी जीवनातील त्याच्या व्यक्तिगत साहसांचे निवेदन आहे तथापि त्या निवेदनाबरोबर त्याचे तात्त्विक चिंतनही आहे. आकाशात भ्रमण करणाऱ्या वैमानिकाला जगाच्या विविध भागांत राहणाऱ्या माणसामाणसांमधले भेद नष्ट झाल्यासारखे वाटतात. अवघी मानवता एक, असा अनुभव येतो. भावकाव्यात्म भाषा हे ह्या निवेदनाचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. पिलॉत द गरॅ (१९४२, इं. शी. ‘फ्लाइट टू आर्रास’) मध्ये जर्मनीने फ्रान्सवर आक्रमण केल्याच्या काळात अनेक अडचणींवर मात करून यशस्वी केलेल्या टेहळणीच्या कामगिरीची हकीकत आलेली आहे तथापि ती सांगतानाही युद्घातून प्रकट होणाऱ्या मानवी कौर्याचे भान ठेवून मानवी बंधुत्वाचे आवाहन केले आहे. ल पती प्रँस (१९४३, इं. शी. ‘द लिट्ल प्रिन्स’) ह्या लहान मुलांसाठी त्याने लिहिलेल्या कल्पनारम्य कादंबरीलाही तात्त्विकतेची बैठक असून जीवनातल्या सर्वोत्तम गोष्टी अत्यंत साध्या असतात आणि इतरांना देत राहण्यात खरी संपन्नता आहे, असा विचार दिला आहे. Citadelle (१९४८, इं. भा. द विझ्डम ऑफ द सँड्स, १९५२) हे त्याच्या चिंतनात्मक टिपणांचे पुस्तक त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्घ झाले.

तेग्झ्यूपेरीने माणसाचे आकाशात उडणे दोन ध्येयांशी निगडित केले : उमदेपणाची, शुद्घतेची आणि उदात्ततेची ओढ व स्वातंत्र्याची उत्कट इच्छा. त्याच्या दृष्टीने हवा हेच शुद्घतेचे प्रतीक होते. आकाशात उड्डाण करणे म्हणजे केवळ निसर्गाच्या अधिक सन्निध येणे नव्हते ते आधुनिक संस्कृतीच्या जडवादी मूल्यांनी न डागळलेल्या अफाट परिसरात विहरणे होते. त्यात धोके आणि संकटे होती परंतु नित्याच्या निरस जीवनापासून मुक्ततेची अनुभूतीही होती.

कुलकर्णी, अ. र.